माणगावचे दादा!
८ ऑगस्ट १९६८! कोकणातील दुर्गम डोंगररांगांच्या कुशीत तोंड खुपसून बसलेले ते छोटेसे गाव! त्या दिवशी अंगात आल्यासारख्या कोसळणाऱ्या, कुठून कुठून आडव्या-तिडव्या झोडपणाऱ्या पावसाच्या सरींना आपल्या तुटपुंज्या ताकदीने तोंड देत अंधार सर्वांगावर वेढून बसलेले ते ‘माणगाव’ नावाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक खेडेगाव! संध्याकाळची वेळ, धुवांधार पाऊस आणि काळोखाचे साम्राज्य! विजेचा शोध तर अजून या गावापर्यंत पोहोचलाच नव्हता. त्यामुळे सगळीकडे अंधार, उदासी यांनी भारलेले वातावरण! अशाच त्या कातरवेळी एक तरुण डॉक्टर आपला सगळा बाडबिस्तरा घेऊन माणगावच्या सरकारी दवाखान्यात ‘वैद्यकीय अधिकारी’ म्हणून रुजू होण्यासाठी एस्टीतून उतरला. आत गेल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Primary Health Center) वातावरण अधिकच उदासवाणे होते. मोडकळीस आलेली इमारत, ठिकठिकाणी गळणारे पावसाचे पाणी, ओलेत्या भिंती आणि सहा महिन्यांत रिटायरमेंटला आलेला एकमेव कंपाउंडर! तोच हातात छोटा कंदील घेऊन डॉक्टरांच्या स्वागतासाठी उभा होता. चहा- पाणी सुरू असतानाच कंपाउंडरसाहेबांनी आपल्या अस्सल मालवणी भाषेत नकारघंटा वाजवायला सुरुवात केली.
“हडे पाण्याचे वांधे असत. खोली दुरुस्त करून घेउची लागात, जनावरांचा त्रास असा …… “
झाले! एकंदर वातावरण बघून डॉक्टरसाहेबांच्या मनात आधीच उदासी दाटून आली होती. त्यातच रत्नागिरीसारख्या शहरी भागात – देवरुखच्या मातृमन्दिर हॉस्पिटलमध्ये काम करून आल्यावर अशा दुर्गम भागात, इतक्या असुविधा असताना पत्नी व लहान मुलाला घेऊन राहायचे की जायचे? अशा द्विधा मनःस्थितीत ते सापडले. शेवटी आजची रात्र कशीबशी इथे काढायची आणि उद्या पुन्हा मूळ कामावर रुजू व्हायचे असा विचार त्यांनी केला आणि त्याचवेळी एक मनुष्य हातात कंदील घेऊन जरा साशंकतेनेच हॉस्पिटलमध्ये शिरला. ‘मदत कितपत मिळेल?’ या विवंचनेत तो होता. त्यावेळी माणगाव खोऱ्यात तापाची प्रचंड साथ होती आणि त्याच्या घरातील तो सोडून दहा-बारा लोक तापाने फणफणले होते. त्याची कहाणी ऐकून सर्व विचार बाजूला सारून डॉक्टरसाहेबांच्या मनातील कर्तव्यदक्ष डॉक्टर रुग्णसेवेसाठी सज्ज झाला. ‘उद्याचे उद्या बघू’ असा विचार करून ते लगेच त्या पेशंटबरोबर व्हिजिटला गेले आणि त्याचे घरच नव्हे तर त्या रात्री संपूर्ण वाडीलाच तपासून आले. घरटी किमान दोन-तीन लोक तरी तापाने आजारी होते. दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत ‘डॉक्टर आल्याची’ वार्ता वाऱ्यासारखी पसरली. वाळवंटात ओअॅसिस सापडल्यासारखे लोकांना वाटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून पेशंटचा इतका अखंड ओघ सुरू झाला की डॉक्टरांना परत फिरण्याचा विचार करण्याससुद्धा वेळ मिळाला नाही. त्यांच्यातील संवेदनशील डॉक्टरने अगदी अपुऱ्या वैद्यकीय साधनांच्या मदतीने या लोकांसाठी त्या दिवसापासून ते वयाच्या जवळजवळ ७०व्या वर्षापर्यंत रुग्णांची अव्याहत सेवा करून ‘गरीबांचा डॉक्टर – त्यांचा देव’ अशी ख्याती मिळवली. या डॉक्टरांचे नाव आहे, ‘मनोहर अनंत फणसळकर’ ! माणगाव पंचक्रोशीतील लोकांसाठी मात्र ते ‘दादा’!
प्रथम काही वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केल्यावर काही वर्षांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारात सामील होण्यासाठी दबाव आणला गेला. त्याक्षणी राजीनामा देऊन त्यांनी खाजगी सेवा देण्यास सुरुवात केली. आता तर कोणतीही बंधने नसल्यामुळे त्यांचे काम अधिक जोमाने सुरू झाले. दवाखाना बंद केल्यावर दादांच्या व्हिजीट सुरू होत. सुरुवातीच्या काळात पायी, नंतर सायकलवरून या व्हिजीट सुरू असत. माणगाव खोऱ्यातील शिवापूरपासून आकेरी या जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटरच्या डोंगराळ भागात आणि तीस गावांमध्ये सायकलनेच प्रवास होत असे. कारण वाहतुकीची अन्य साधने उपलब्धच नव्हती. सुरुवातीला सायकलही स्वतःची नव्हती. एका स्नेह्यांची सायकल ते वापरत असत.
याच काळात डॉक्टरांनी आपल्या ज्ञान व कर्तृत्वाच्या जोरावर अनेक अवघड व्याधी बऱ्या करण्याचे कौशल्य प्राप्त केले होते. मग अगदी सर्दी-तापापासून बाळंतपण, सर्पदंश, गळू (abcess), दात काढणे, खांदा निखळणे (shoulder dislocation) अशा प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये करायच्या गोष्टींसाठीही रुग्ण डॉक्टरांकडे येत असत. कारण प्रचंड आर्थिक चणचण, वाहतुकीची अपुरी साधने व अज्ञान यांमुळे या रुग्णांना सावंतवाडी किंवा कुडाळसारख्या तालुक्याच्या गावात जाणे शक्यच नसायचे. त्यामुळे ‘डॉक्टर दादा’ हेच त्यांचे सर्वस्व होते. जर एखादी critical case असेल आणि दादांनी पुढे घेऊन जायला सांगितले की पेशंट आणि नातेवाईक ‘आता पेशंट वाचणार नाही,’ या कल्पनेने आधीच रडारड करायला सुरुवात करत.
दादा कोणतीही केस नेहमीच आहे त्या परिस्थितीत, कमी खर्चात कशी बरी करता येईल याचा ताळमेळ घालत उपचार करीत असत. याच मनोभूमिकेतून अनेकदा दादांनी व्हिजिटला गेल्यावर घरच्याच सुई – दोऱ्याने जखमा शिवल्या आणि आश्चर्य म्हणजे कधीही त्या चिघळल्या नाहीत. त्या भागात रानडुकरे शेतीचे नुकसान करत. म्हणून त्यांच्यासाठी शेतात बॉम्ब पेरून ठेवले जात. एकदा एका आठ-नऊ वर्षांच्या मुलीच्या हातात शेतात रानडुकरासाठी पेरून ठेवलेला हा बॉम्ब फुटला व हात फाटला. तिच्या पालकांची तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती, सुविधाही नव्हती. तात्काळ दादांनी तिला घरच्याच सुई-दोऱ्याने टाके घातले. कोणतेही इन्फेक्शन न होता जखम उत्तम प्रकारे बरी झाली. एका घरात एकदा एक मुलगी जन्मली. वैद्यकीय भाषेत ज्याला face presentation अशा पद्धतीने मुलगी जन्मली होती. त्यामुळे चेहरा वेडावाकडा दिसत होता. सुईणीने “राखस जल्मलो (राक्षस जन्मला)” म्हणून आरडाओरड करून सगळ्यांच्या मनात आधीच भीती निर्माण केली होती. त्यातच वार (placenta) पडत नाही व रक्तस्राव भरपूर होत होता म्हणून दादांना बोलावले गेले. दादांनी बाळंतिणीची सुटका केली व बाळाकडे बघितले. त्यांनी बाकीच्या लोकांची भीती घालवली व मुलीला साफसूफ करून आईकडे दिले आणि योग्य ती काळजी घेण्यास सांगितली. ती मुलगी आजही सुखरूप आहे. अशा एक ना अनेक गोष्टींचा खजिना आता दादांकडे आहे.
पुण्यातील एका आयुर्वेदिक दंतोपचार करणाऱ्या वैद्यांकडून त्यांनी भूल न देता दात काढण्याचे तंत्र शिकून घेतले आणि मग दात काढणे म्हणजे त्यांच्या हातचा मळ झाला. हलणारा दात “बघू या” म्हणत पटकन कधी काढायचे ते पेशंटला कळतही नसे. रस्त्याने जाता जाता गाडीवर बसूनही त्यांनी अनेकांचे हलणारे दात काढले आहेत. अतिशय कष्ट आणि दारिद्र्य यांना तोंड देणाऱ्या लोकांसाठी ही एक जादूची कांडीच होती. ‘स्वस्तात मस्त’ असे त्यांचे काम होत होते.
‛भीती’ हा शब्दही दादांच्या शब्दकोशात नव्हता. एकदा माणगावपासून वरती डोंगरात वीस किलोमीटर आत असणाऱ्या गावात व्हिजिटला गेले असताना त्यांना स्वतःला फुरसे ( Echis carinatus) हा अत्यन्त विषारी साप चावला. पण एकही क्षण विचलित न होता ते रात्री तिथे मुक्कामास असणाऱ्या एस्टीत बसले व घरापर्यंत आले. येता येता वाटेतच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इंजेक्शन देण्यासाठी निरोप पाठवला. घरी येऊन आपल्यासाठी इंजेक्शन भरून ठेवले व वैद्यकीय अधिकारी आल्यावर त्यांच्या मदतीने योग्य ते उपचार करवून घेतले. असेच एकदा त्यांचे ब्लडप्रेशर वाढले व तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांनी शांतपणे दवाखाना संपवला व घरात कोणालाही कल्पना न देता जवळच्या शहरातील डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून आले.
लोकांची नाडी बघून उपचार करताना समाजमनाची नाडीही त्यांनी अचूक ओळखली होती. त्यामुळे येथील समाजाला योग्य दिशा दाखवायला आपण स्वतः राजकारणात उतरले पाहिजे असे त्यांना वाटू लागले . मग रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी आणीबाणीनंतर ‘जनता पक्षाकडून’ त्यांनी अर्ज भरला. प्रचंड विश्वास असणाऱ्या माणगाव खोऱ्यातील लोकांनी त्यांना बहुमताने निवडून दिले. स्वतः प्रा.मधू दंडवते यांनी त्यावेळी दादांची प्रत्यक्ष भेट घेतली व कौतुक केले. जनता पक्ष फुटल्यावर मात्र दादा राजकारणापासून दूर गेले; पण समाजकारण चालूच होते. ‘विश्व हिंदू परिषदेचे’ अनेक कार्यक्रम दादांच्या एका शब्दावर भरघोस उपस्थितीत व सहकार्याने पार पडत. याच कामातून माणगाव खोऱ्यातील दुर्गम अशा डोंगराळ भागातल्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सहज उपलब्ध व्हावी म्हणून वसतिगृहाची कल्पना त्यांच्या व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मनात आली. कारण त्यावेळी दहावीपर्यंत शिक्षणाची सोय फक्त माणगाव येथेच होती आणि मग वसतिगृह सुरू झाले. त्याच्याच जोडीला त्या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, शेती, कुक्कुटपालन व पशुसंवर्धन केंद्र असेही उपक्रम राबविण्यात आले.
पण त्यांच्या या विधायक कामामुळेच काही वेळा त्यांच्यावर बिकट प्रसंगही ओढवले. एकदा मोटारसायकलवरून येताना त्यांना प्रत्यक्ष जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला. पण माणगाव हे दत्तसंप्रदायातील ‘टेंबेस्वामींचे’ जन्मस्थान आहे. ‘त्यांचे कृपाछत्र आपल्या डोक्यावर असल्यामुळे त्याही प्रसंगातून आपण सहीसलामत बाहेर पडलो, ‘ असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
आता मात्र दादांनी वैद्यकीय व्यवसाय, संसार यांतून बाजूला पडून अध्यात्माची वाट चोखाळली आहे. ‘टेंबेस्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीवर त्यांनीच मानवसेवा करण्यासाठी आपल्याला बोलावून घेतले’, अशी त्यांची अढळ श्रद्धा आहे. डॉ.प्रकाश आमट्यांनी आपल्या कर्तृत्वाने प्रकाशवाटा निर्माण केल्या तर मनोहरांनी (दादांनी) त्या काळात अतिशय बिकट परिस्थितीत मनोहर नसणाऱ्या वाटांवरून प्रवास करून कित्येक वर्षे माणगावच्या खोऱ्यात वैद्यकीय क्षेत्रात आपले अखंड सेवाव्रत निभावले.
खूपच छान लेख… मीही माझ्या कामाच्या निमित्ताने दादा प्रॅक्टिस करत असताना त्यांना भेटलो आहे.. जनमानसात त्यांच्याविषयी असणारा नितांत आदर प्रत्यक्ष अनुभवला आहे… त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम…
दादांना शतशः प्रणाम!
आपल्या आधीच्या पिढीने किती खडतर परिश्रम केले हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे . तू अत्यंत सोप्या शब्दात त्यांचा जीवन प्रवास रेखाटला आहेस आणि जिवंत व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी केली आहेस.
उत्तम चरित्र रेखाटले आहे. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही त्या व्यक्तीला केवळ हा लेख वाचुन दादांची ओळखही व्हावी आणि साधारण आकृती डोळ्यासमोर उभी राहील
प्रदीप सप्रे
एका महान व्यक्तिमत्वाला उत्तम रितीने शब्दबद्ध केले आहे.