अर्पिता कमलाला टेबल आवरायला मदत करत होती. जेवताना विषय काढायचा असं ठरवूनही तिला जमलं नव्हतं, शिवाय कमलासमोर नकोच असंही वाटलं होतं. जेवण झाल्यावर माँ फॅमिली रुममध्ये टीव्ही बघतात तेव्हाच जाऊन त्यांच्याशी बोलायचं असं तिने ठरवलं. कमलाही तिची कामं उरकून दुपारी थोडावेळ तिच्या सर्व्हन्ट क्वार्टरमध्ये जायची, त्यामुळे तिला थोडी प्रायव्हसी मिळणार होती.

तिच्या अंदाजाप्रमाणे माँ त्यांचा आवडता शो बघत बसलेल्या होत्या. डोळे टीव्हीवर आणि हातात विणकामाच्या नाचणाऱ्या सुया हे नेहमीचंच दृश्य होतं.
“आत्ता कसा काय लागला हा शो?”, तिने त्यांच्या बाजूच्या दिवाणावर बसत विचारलं.
“टीव्ही लावला तर हाच चॅनल लागला, तू बदल हवं तर. मी बघितला आहे हा एपिसोड.”, त्या म्हणाल्या.
तिने कमला जाईपर्यंत वेळ घालवायला म्हणून बातम्यांचा चॅनेल लावला. त्यावर काहीतरी रटाळ बातम्या चालू होत्या.
अर्पिताने मनात ठरवलेली सर्व वाक्य परत एकदा घोकली. आज कसंही करून तिला हे त्यांना सांगायचंच होतं. तेव्हढ्यासाठी ती दिल्लीहून भोपाळला आली होती. कमलाने दार ओढून घेतल्याचा आवाज आला. अर्पिताची धडधड वाढली.
काय रिऍक्शन होईल त्यांची?

“माँ, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.”, ती त्यांच्या जवळ जाऊन बसत म्हणाली.
“बोल ना बच्चा.”, त्या विणायचं थांबवत म्हणाल्या.
“आल्यापासून ठरवतीये की बोलायचं, पण कसं सांगू हेच कळत नव्हतं.”
“मी पण वाट बघत होते की तू कधी सांगतेस मला!”
अर्पिताला हे अनपेक्षित होतं. आदीने सांगितलं असेल त्यांना? पण तिचा मेसेज तर बघितलाच नव्हता त्याने..
“तू इतका वेळ का लावलास मला सांगायला? म्हणजे अजूनही सांगतंच नाहीयेस”, माँ म्हणाल्या.
“अहो पण..”
और अभी अभी कुपवारा से खबर आ रही है के आतंकवादी हमले में सात जवान और एक मेजर की मौत हो गई है. इसके पीछे जैश ए मोहम्मद…. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सांगत होतं कुणीतरी.

शेजारच्या खोलीतल्या लँडलाईन फोनच्या कर्कश्श वाजण्याने दोघींच्या कानांना कानठळ्या बसत होत्या. अर्पिताने बातमी ऐकल्याऐकल्या टीव्हीचा आवाज वाढवून दुसरा जास्त विश्वसनीय चॅनल लावला, तिथेही तीच ब्रेकिंग न्यूज लागली होती. माँच्या हातातल्या सुया खाली कार्पेटवर पडून एकीवरचे टाके उसवले. अर्पिताने धडपडत उठून फोन घेतला. आदीच्या ऑफिसमधून कुणीतरी बोलत होतं इतकंच कळलं तिला. पलीकडून कोण बोलतंय, काय बोलतंय, तिच्या मेंदूत काहीही शिरत नव्हतं. ती फॅमिली रूममध्ये गेली तर माँ निर्जीव डोळ्यांनी टीव्हीकडे बघत होत्या. तिने त्यांना जाऊन घट्ट मिठी मारली. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्या नुसत्या पुतळ्यासारख्या बसल्या होत्या. ती तरीही तशीच बसून राहिली दहा मिनिटं. मग तिने त्यांचे दोन्ही हात हातात घेतले, त्यांच्या कपाळावरचा घाम पुसला आणि साईड टेबलवर ठेवलेल्या फ्लास्कमधून ग्लासमध्ये पाणी ओतून दिलं. त्यांनी नुसती ‘नको’ अशी हाताने खूण केली. अर्पिता उठली, तिने बाहेरचं दार उघडून कमलाला हाक मारली. तिचा सेलफोन बराच वेळ सतत वाजत होता. तिने हातात घेतला तर स्क्रीनवर ‘बाबा’ लिहून आलं होतं. ते बघूनच तिच्या डोळ्यातून इतका वेळ काठावर थांबलेले अश्रू ओघळलायला लागले. बाबांचा आवाज ऐकल्यावर तिला हुंदका आवरला नाही.
“नंतर बोलू तुमच्याशी, इथे माँ..”
“मी निघालोय बाळा, रात्री पोचतो. तू स्वतःला आणि त्यांना सांभाळ. बातम्या नेहमी खऱ्याच असतील असं नाही..”
“बाबा, लवकर या!”
इतकंच म्हणून अर्पिता पुन्हा फॅमिली रूममध्ये गेली. पुढचे अठ्ठेचाळीस तास तिचे बाबा सोडून कोण कोण आले, काय बोलले, किती वेळ थांबले ह्याच्यापैकी तिला काहीच कळत नव्हतं. ती माँची सावली असल्यासारखी त्यांच्या मागे पुढे एखाद्या रोबॉटसारखी वावरत होती.

तिसऱ्या दिवशी सकाळी एअरपोर्टवर ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभी होती. आकाश निरभ्र होतं, हवेत थोडा गारठा होता आणि सगळंच निश्चल दिसत होतं. मीडियाच्या व्हॅन्स होत्या, लोकांचीही बरीच गर्दी जमली होती, पण सगळे शांत उभे होते विमानाची वाट बघत. आवाज नाही की धक्काबुक्की नाही. अर्पिताला असाच गर्दी असलेला दिल्लीचा एअरपोर्ट आठवला आणि तिचं मन भूतकाळात गेलं.

“देख कर चल नही सकते?” अर्पिताने तिच्यावर येऊन धडकलेल्या मुलाला रागाने विचारलं. तिच्या हातातली फाईल खाली पडली होती आणि त्यातले कागद इकडे तिकडे पसरले होते.
“देख ही तो रहा था तुम्हे!”, तो तिला कागद उचलून देत म्हणाला.
तिने त्याच्या हातातून कागद हिसकावून घेतले.
दिल्ली एअरपोर्टच्या गर्दीतून वाट काढत बाहेर जाऊन ती आता रस्त्यातल्या गर्दीत अडकली होती. इंटरव्ह्यूला उशीर होईल ह्याची चिंता वाटत होती तिला, पण ती वेळेवरच पोहोचली. फोनवर झालेल्या इंटरव्ह्यूनंतर तिला नोकरी मिळाल्यात जमा आहे अशी खात्री वाटली होती आणि झालंही तसंच. भारतातल्या लीडिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत नोकरी मिळवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे खूप आनंद झाला होता तिला.
हॉटेलवर पोहोचायला तिला एक तास लागला पण बाबांना फोन करण्यात, मेसेजेस बघण्यात तो सहज पार पडला होता. चेक-इन काउन्टरवर उभी असताना तो तिला परत दिसला. तिला बघता क्षणी तो तिच्या दिशेने आला.
“मेजर आदित्य जैसवाल”, त्याने हॅन्डशेक करायला हात पुढे केला.
तिने त्याला उत्तर द्यायच्या आधीच रिसेप्शनिस्ट म्हणाली,”अर्पिता मॅम, इफ यू कुड प्लीज साइन हिअर.”
“अर्पिता! नाईस नेम!”, आदित्य एकही संधी सोडणार नव्हता.
“आमच्याबरोबर डिनरला ये की. ओळख करून देतो माझ्या ग्रुपशी, तू एकटीच आलेली दिसतेस.”, तो पुढे म्हणाला.
“मी दमली आहे खूप. मला आत्ता गप्पा मारायची अजिबात इच्छा नाही”, अर्पिताने त्याला उडवून लावलं.
दुसऱ्या दिवशी एअरपोर्टला जायला निघाली तेव्हा तिला तो त्याच्या ग्रुपबरोबर लॉबीमध्ये बसलेला दिसला.

काही दिवसांनी तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने उचलला तर आदित्य होता.
“तुला नंबर कसा मिळाला माझा?”
“आहेत माझे सोर्सेस!”, तो म्हणाला.
“हे बघ, मला काहीही इंटरेस्ट नाही तुझ्याशी..”
“हे बघ, मला खूप इंटरेस्ट आहे, आणि मला माहीत आहे की तुलाही आहे, तुला फक्त मान्य नाही करायचं. मी बघितलं तुझं फेसबुक प्रोफाइल. नाहीये कुणी बॉयफ्रेंड वगैरे तुला. मीच असणार आहे पहिला!”

तिला त्याच्या हिमतीची दाद द्यावी का त्याच्या वागण्यामुळे संताप व्हावा हेच कळलं नाही क्षणभर.
पुढची दोन वर्ष मेजर आदित्य जैसवालने तिचा पिच्छा पुरवला. फोन, ई-मेल, पत्र, कार्ड्स, फुलं असा नुसता भडिमार होत होता तिच्यावर. तीही त्याच्या विश्वात हरवत चालली होती. त्याचं जगच वेगळं होतं. घरची परंपरा पाळत आर्मीमध्ये गेलेला आदित्य दिलखुलास होता. तिच्या बाबांना भेटायला आला तेव्हा त्यांची तर गट्टीच जमली एकाच भेटीत. आदी होताच तसा, कुणावरही छाप पडायची त्याची. त्यांच्या परवानगीने तो तिला त्याच्या आईला भेटायला भोपाळला घेऊन गेला. त्याचं घर जितकं सुंदर होतं, त्यापेक्षाही सुरेख त्याची आई होती. ती त्यांना नमस्कार करायला वाकली तेव्हा त्यांनी पटकन तिचे खांदे धरून तिला उभं केलं आणि “पैर मत छुओ मेरे बच्चे, गले मिलो.”, असं म्हणत तिला मिठी मारली.
“लेकीन आंटी.”

“मुझे माँ कहोगी तो ज़्यादा अच्छा लगेगा.”
अर्पिताला स्वतःची फक्त फोटोत बघितलेली आईच समोर उभी आहे असं वाटलं क्षणभर.
दुपारचा चहा पिताना आदित्यने अतिशय फिल्मी स्टाईलने एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं.
“हां कर दो अब, बहोत इंतज़ार करवाया है तुमने.”, माँ म्हणाल्या.
त्याने तिच्या हातात अंगठी घातली आणि तिच्या बाबांना फोन लावला.
“बाबा, हो म्हणाली अर्पिता!! माझा जीव भांड्यात आणि अंगठी तिच्या बोटात पडलेली आहे. आता माझं उरलेलं आयुष्य तिला अर्पण केलंय मी ऑफिशियली!”

त्याची आणि तिची सुट्टी बघून पुढच्याच महिन्यात लग्न करायचं ठरलं. जेहाननुमा पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या सर्वात ग्रँड लग्नांपैकी एक होतं ते. आदीच्या आईने स्वतः सर्व देखरेख केली होती. दोघांचे समस्त नातेवाईक लग्नाला उपस्थित होते. आदीचे बालपणापासून आत्तापर्यंच्या अनेक शहरांमध्ये झालेले मित्र मैत्रिणी आले होते. अर्पिताने त्यांच्यापैकी कित्येकांबद्दल आदीकडून ऐकलंही होतं. अर्पिताचा मित्रपरिवारही मोठा होता. दोघांच्या टोळ्यांनी मिळून धमाल केली लग्नात.

लग्नानंतर आठच दिवसात आदीला जॉईन व्हायचं होतं त्याप्रमाणे तो झाला. तेव्हा त्याचं पोस्टिंग आसाममध्ये होतं, तिथे अर्पिता जाणार नव्हती. ती दिल्लीला ऑफिस रीजॉईन करणार होती. तसं ठरवलंच होतं त्यांनी. आदीची एखाद्या वर्षात तिथून दुसरीकडे पोस्टिंग झाली की मग पुढचे निर्णय ते दोघं मिळून घेणार होते. गेली दोन वर्ष दोघं असेच एकमेकांपासून दूर होते पण आता ते अंतर खूप वाढल्यासारखं वाटत होतं दोघांनाही. पुढचे चार महिने त्याला सुट्टी मिळण्याची शक्यताही नव्हती. दिवसा मेसेजेस, रात्री तासंतास फोन, इंटरनेटची रेंज चांगली असल्यास व्हिडीओ कॉल असे दिवस गेले. मग तीनच दिवसाची सुट्टी कशीबशी सँक्शन करवून आदी दिल्लीला आला. प्रवासात त्याचा वेळ जायला नको म्हणून तिसऱ्या दिवशी माँ त्याला दिल्लीलाच भेटायला आल्या. त्या आता फक्त आदीच्या नाही तर सर्वार्थाने अर्पिताच्याही आई झाल्या होत्या. तो परत जायला निघाला तेव्हा त्या दोघी त्याला एअरपोर्टवर सोडायला गेल्या. तो आत गेल्यावर त्यांनी तिची समजूत काढली.
“थोडेच दिवसाचा प्रश्न आहे, मग राहाल जन्मभर एकत्र. मी राहू का इथे तुझ्या सोबतीला काही दिवस?”, असं त्या म्हणाल्या तेव्हा अर्पिता त्यांना लगेचच चालेल म्हणाली. त्या घडीला तिने त्यांना तिच्या मनात कायमचं स्वतःच्या आईचं स्थान दिलं.

आज त्याच आईच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा पुत्रशोक कमी करायचा ती निष्फळ प्रयत्न करत होती. त्या स्तब्ध उभ्या होत्या. युनिफॉर्ममधल्या जवानांनी फुलांच्या माळांनी सजवलेलं कॅस्केट आणून ठरलेल्या ठिकाणी ठेवलं. मग आर्मी प्रोटोकॉल प्रमाणे सलामी झाली. ‘भारत माता की जय’, ‘मेजर जैसवाल अमर रहे’च्या घोषणा गर्दीतून होत होत्या. अर्पिताच्या बाबांनी तिला आणि आदीच्या आईला पुढे आणलं. कितीतरी ओळखीचे चेहरे त्या गर्दीत तिला दिसत होते पण डोकं अतिशय सुन्न झालं होतं. तिने आदीच्या आईचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्यांनी फुलं वाहिली तेव्हा त्यांचे डोळेही वाहायला लागले. तीन दिवसांत प्रथमच! कापणाऱ्या क्षीण आवाजात ‘जय हिंद’ म्हणत त्यांनी आदीला सॅल्यूट केलं. सर्व परिसर ‘जय हिंद’ने दुमदुमला. आधी सासरे, मग नवरा आणि आता मुलगा अशा तीन पिढ्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. प्रत्येक वेळेस हात जोडून त्या अशाच उभ्या होत्या सजवलेल्या कॅस्केटच्या समोर. नवऱ्याच्या निधनानंतर त्यांनी स्वतःच्या अनेक स्वप्नांचीही आहुती दिली होती आणि आज परत तेच घडत होतं. अर्पिताला खूप अभिमान वाटला त्यांचा आणि तिलाही अश्रू अनावर झाले. आदीबरोबरचे सुखाचे दिवस आठवून तिचं उर भरून येत होतं. त्या दोघींना सांभाळणं तिच्या बाबांना बिचाऱ्यांना अवघड जात होतं. अडीच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या त्यांच्या मुलीच्या आयुष्यात आणखी किती वादळं येणार होती ह्याचा विचार करून ते स्वतः हादरून गेले होते.

दहावा, अकरावा, बारावा, सगळे दिवस जैसवाल घरण्याच्या पद्धतीप्रमाणे पार पडले. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. अर्पिता आणि तिची माँ एकमेकांसमोर सावरल्याचा अभिनय करत होत्या. दोघींनाही तो जमत नव्हता. जैसवालांचं भोपाळमधलं जुनं घराणं असल्याने तेराव्याला बरेच लोक होते. फुलांनी लगडलेला आदीचा मोठा फोटो दिवाणखान्यात एका टेबलवर ठेवलेला होता. अर्पिता आतल्या खोलीत बसली होती. तिच्या शेजारी माँ बसल्या होत्या. आलेले लोक एकेक करून त्यांना येऊन भेटत होते.

“कैसी हैं आप आंटी?”
अर्पिता तो आवाज ऐकून दचकली. समोर रियाना बसली होती, आदीच्या आईचे दोन्ही हात धरून. चिकनकारीचा पांढरा कुर्ता, डोक्यावरून दुप्पटा, रडून रडून सुजलेले डोळे. अर्पिताला तिला तिथे बघून राग अनावर झाला पण ती काहीच करू शकत नव्हती. रियाना तिथे असणं तिला सहन होत नव्हतं. तिला तिचा आवाजही ऐकायची इच्छा नव्हती.

“कैसी हो अर्पिता?”, त्यांच्या पहिल्या भेटीत रियानाने अर्पिताच्या खांद्याला हलकेच स्पर्श करत तिला विचारलं होतं पण नजर आदीवर होती. आदीचं पोस्टिंग कानपुरला होऊन दोन महिने झाले होते पण अर्पिताच्या कंपनीचं ऑफिस तिथे नसल्याने ती अजून दिल्लीतच होती. तिला चार दिवस सलग सुट्टी मिळाली म्हणून त्याच्याकडे आल्यावर दोघंजण एका पार्टीला आले होते.
“अर्पिता, मीट रियाना सेहगल. माझी कलीग आहे.”, आदीने त्यांची ओळख करून दिली.
“दे गो बॅक अ लॉंग वे. अकॅडमीपासून मैत्री आहे दोघांची!”, शेजारीच उभा असलेला आदीचा कलीग निहाल म्हणाला.
अर्पिताने आदीच्या सर्वच मित्र मैत्रिणींबद्दल आदीकडून काहीनाकाही किस्से ऐकले होते पण त्यात रियानाचा कधीच उल्लेख आला नव्हता. बघता क्षणी एखादी व्यक्ती आवडत नाही तसं तिचं रियानाच्या बाबतीत झालं होतं. पार्टी बराच वेळ चालली. तिला ते कधी एकदा घरी जातात असं झालं होतं. इतक्या दिवसानंतर तिला आदी भेटला होता त्यामुळे तिला त्याच्याबरोबर एकांतातले क्षण वेचायची इच्छा होती. घरी जाईपर्यंत दोघंही एकमेकांसाठी अधीर झाले होते.

सकाळी लवकर उठून अर्पिताने स्वयंपाकघराचा ताबा घेतला. ऑर्डर्लीला तिने सुट्टीच देऊन टाकली तीन दिवसांची. ब्रेकफास्ट तयार करून ती आदीला उठवायला गेली. तो फोनवर बोलत होता कुणाशीतरी. तिला बघितल्यावर त्याने फोन लगेच कट केला. नंतर तिने त्याच्याजवळ रियानाचा विषय काढला.
“ओह ती!! तिचं पण पोस्टिंग इथेच झालंय.”, तो म्हणाला.
“कधी बोलला नाहीस तिच्याविषयी, ती अकॅडमीत होती ना तुझ्याबरोबर? लग्नाला कशी काय आली नाही आपल्या?”
“लग्नाला यायला नाही जमलं तिला, तिचे वडील वारले होते तेव्हा.”
आदीने आधीचा प्रश्न टाळला होता हे लक्षात आलं तिच्या.
“तू काय ठरवलंस तुझ्या जॉबचं?”, त्याने विषय बदलत विचारलं.
“काय ठरवायचं आहे? आपलं आधीच झालं होतं की ह्याबद्दल बोलणं. माझं सध्याचं प्रोजेक्ट संपलं की मी इथे काही मिळतंय का बघते.”
“यू कुड क्विट राईट अवे!”
“मी हे प्रोजेक्ट आपणहून मागून घेतलं होतं आदित्य! तुझी बदली लवकर झाली, नाहीतर झालंच असतं एव्हाना पूर्ण. खरंतर आय अॅम अप फॉर प्रमोशन. पण तू जास्त महत्त्वाचा आहेस माझ्यासाठी.”
“तुझ्या बॉसना सांग कानपुरला ऑफिस उघडायला!”
“रियानाचं लग्न झालंय?”, अर्पिता पुन्हा मूळ मुद्द्यावर आली.
“हो, एअरफोर्समध्ये आहे तिचा नवरा, विशाखापट्टणमला असतो. आणखी काही प्रश्न आहेत का तिच्याबद्दल? सगळे एकदम विचार एका दमात!”, आदी वैतागून म्हणाला.
अर्पिताने मग तो विषय वाढवला नाही.

संध्याकाळी आदीने सिनेमाला जायचा प्लॅन बनवला. दोघंही सिनेमावेडे होते. सिनेमा, मग कॅन्डल लाईट डिनर आणि मग लांब ड्राइव्हवर जाऊनच घरी आले दोघं. पुढचे तीन दिवस भुर्रकन उडून गेले आणि अर्पिता दिल्लीला परतली. आदीला भेटल्यानंतर पहिला आठवडा फार कठीण जायचा. कानपुरला आल्यापासून त्याला फार काम असायचं त्यामुळे रोजचे मेसेज, फोनही थोडे कमी झाले होते. बरेचवेळा रात्री फोन केला तरी तो इतका दमलेला असायचा की कमीच बोलणं व्हायचं.

लग्नाच्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला तिने कानपुरला जायचं ठरवलं. आदीला येणं शक्यच नव्हतं आणि तिलाही सुट्टी मिळणं अशक्य आहे असं तिने त्याला वारंवार सांगितलं होतं मुद्दामच. पहिल्या वर्षी आदीने तिला मोठं सरप्राईज दिलं होतं. आग्र्याला ताजमहाल बघून ते ताजमध्ये जेवायला गेले तर तिथे माँ आणि बाबाही आलेले होते. तिने कानपुरला जायला एक दिवस आधीचं तिकीट काढलं आणि मग त्या तारखेची आतुरतेने वाट बघण्यात तिचा पुढचा महिना पार पडला. जायच्या आदल्या दिवशी तिने आधी आदीला फोन केला. तो ऑफिसमध्येच होता अजून. तिने संधी साधून घरी फोन केला. ऑर्डर्लीला सामानाची यादी सांगायची होती. तिने आदीचा आवडता मेनू प्लॅन केला होता. फोन बराच वेळ वाजला आणि मग एका अनोळखी आवाजात हॅलो ऐकू आलं तिला. तिने नंबर तपासला. नंबर तर बरोबर होता. ती बोलायला लागली तर फोन डिस्कनेक्ट झाला, परत लावला तर कुणीच उचलला नाही. तिने ऑर्डर्लीला मोबाईलवर फोन लावला. तो शेजारच्या क्वार्टरमध्ये गेलेला होता.
“कहां हैं आप पारस भैय्या, मैं कब से घर का नंबर ट्राय कर रही हूँ.”
“मॅडम, वो साहबने छुट्टी दी है आज.”, तो म्हणाला.
“घर पर किसीने फोन उठाया तो था. घर पर कौन है?”
“वो मॅडम..”
पारस अडखळला.
“घर पर तो कोई नही है..”
अर्पिताने त्याला सामानाची यादी लिहून घ्यायला सांगितली.

दुसऱ्या दिवशी अर्पिता घरी पोहोचली तेव्हा पारसने, सांगितलेलं सगळं सामान आणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आदी साधारण आठ वाजता घरी येतो असं पारस म्हणाला, म्हणून तिने लगेच केक करायला सुरुवात केली. पारस तिला उत्साहाने सगळी मदत करत होता.
“आप यहाँ आ जाइये रहने मॅडम. साहब बहुत अकेला हो जाता है.” त्याने तिला सांगितलं.
आठचे नऊ झाले तरी आदी आला नाही. अर्पिताने त्याला फोन केला तरी त्याने उचलला नाही. शेवटी दहा वाजता त्याच्या जीपचा आवाज आला तेव्हा अर्पिता उत्साहाने दार उघडायला गेली. दारात रियाना उभी होती. मागून आदी आला आणि अर्पिताला तिथे बघून गोंधळला.
“रियाना फाईल्स न्यायला आली आहे. बस ना रियाना, मी देतो आणून तुला.”, म्हणत आदी घाईने आत गेला.
एका मिनिटात बाहेर येऊन त्याने तिला फाईल्स दिल्या.
“हॅपी अॅनिव्हर्सरी यू टू. हॅव अ ग्रेट टाइम!”, रियाना अर्पिताकडे बघत म्हणाली.
“थँक्स!”, तिने कोरडं उत्तर दिलं. तिच्या मनात प्रचंड कालवाकालव झालेली होती. आदी शॉवर घेऊन येतो म्हणून आत गेला.
“जबरदस्त सरप्राईज आहे की हे!” मागून येऊन तिच्या कंबरेभोवती हात घालत आदी म्हणाला.
“फारच जबरदस्त!”, ती नकळत म्हणाली.
रात्री केक कापून माँ आणि बाबांना व्हिडीओ कॉल झाला. ते दोघं जागेच होते ह्या दोघांना विश करायला. दुसऱ्या दिवशी आदी ऑफिसला गेला तेव्हा जेवायला दुपारी घरी येईन असं सांगून गेला होता. अर्पिताने ठरवल्याप्रमाणे गुलाबजाम आणि रबडी केली. पारसने तिच्या सांगण्याप्रमाणे उरलेला स्वयपाक केला. आदी ठरल्यावेळेला घरी आला. जेवणं झाली.
“मी आठवडाभर राहते इथेच. सिक लीव्ह टाकते.”, तिने आदीला सांगितलं.
“अरे व्वा! झकास प्लॅन आहे हा तर! आठवडाभर रोमॅन्सची संधी अचानक चालून येते ती अशी मेजर जैसवाल.”
अर्पिताला आवडत होतं इथे राहणं आणि आदीचा सहवास पण मनातल्या शंका काही केल्या जात नव्हत्या. परत रियानाचा विषय काढला तर उगाच वातावरण कलुषित होईल असं वाटून ती तो काढत नव्हती.
दिल्लीला परत जाताना एअरपोर्टवर रियाना भेटली.
“हॅलो अर्पिता. वापस जा रही हो आज?”
“हाँ. तुम कहो तो रुक जाऊं.”, हे अर्पिता मनातल्या मनातच बोलली. प्रत्यक्षात तिने फक्त होकारार्थी मान हलवली.
बोर्डिंग झाल्यावर ती डोळे मिटून बसली होती तेव्हा एकदम फोनवर ऐकू आलेलं ते अनोळखी हॅलो आठवलं.

रियानाचाच आवाज होता तो!

तिने पोहोचल्यावर आदीला फोन केला तर त्याने अर्पिताची शंका हसण्यावारी नेली.
“यू अॅक्चुअली थिंक आय अॅम हॅविंग अॅन अफेअर विथ हर?”
“आदी, आय ऑनेस्टली डोन्ट नो व्हॉट टू थिंक! तुला वेळच नसतो माझ्यासाठी. सारखा म्हणतोस बिझी आहेस, खूप काम आहे. त्या दिवशी रात्री नक्की घरचा फोन तिनेच उचलला होता. काय करत होती ती आपल्या घरी? मी आले तेव्हा ती तुझ्याबरोबर घरी आली ती फाईल्स घ्यायला आली होती? इतक्या रात्री? अशी काय इमर्जन्सी होती त्या फाईल्सची. आय वॉजंट बॉर्न यस्टरडे! …”
“अर्पिता! हा तर सरळ सरळ आरोप आहे माझ्यावर! मी तुला किती विनवण्या केल्या की तू तुझी नोकरी सोडून दे, इकडे शिफ्ट हो माझ्याबरोबर. तू आलीस? प्रोजेक्टचं कारण देत असतेस. तुला माझ्याबद्दल अशा शंका येत असतील तर ये इकडे तो सोडून!”
“आदी तुला माहितीये मला आवडेल यायला. पण माझी इथेही काही जबाबदारी आहे. कमिटमेंट आहे माझीही नोकरीत. मी शक्य तितक्या लवकर माझं काम संपवायचा प्रयत्न करतीये. मला यायचंय तुझ्याकडे. आय रियली वॉन्ट टू! आय वॉन्ट अस!”, अर्पिता रडायलाच लागली.
“काम डाऊन अर्पिता. तुला वाटतंय तसं काही नाहीये. शी इज जस्ट अ फ्रेंड. बिलीव्ह मी.”
अर्पिताची इच्छा होतीच त्याच्यावर विश्वास ठेवायची.
दुसऱ्या दिवशी तिने स्वतःचा राजीनामा टाइप केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड होता. आता हा एक महिना इथे थांबणं कठीण होतं.

तिच्या बॉसना तिचा राजीनामा मान्यच नव्हता. तिचं प्रमोशन होणार होतं, ती मोठी चूक करत होती असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तो नुसताच ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. अर्पिता मात्र ठाम होती.

दोन आठवड्यांनी आदित्यची अचानक कानपुरहून काश्मीरमध्ये बदली झाली. तिथे फॅमिलीला घेऊन जाणं सध्या श्रेयस्कर नव्हतं असं सांगण्यात आलं होतं. अर्पिता सामान आवरायला आणि आदीला भेटायला कानपुरला गेली. तिला काहीच सुचत नव्हतं.
“मला यायचं आहे तुझ्याबरोबर”, असं ती परत परत त्याला म्हणत होती.
“मलाही इच्छा आहे तुला घेऊन जायची. पण नाईलाज आहे माझा”, तो तिला जवळ घेत म्हणाला. अर्पिता त्याच्या कुशीत शिरून पोटभर रडली.
दोघंजण एकाच फ्लाईटने दिल्लीला गेले. तिथून त्याची कनेक्टिंग फ्लाईट होती.
“जपून राहा.”, ती डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली.
“तू ही काळजी घे. पाहिजे असेल तर माँ ला बोलवून घे थोडे दिवस.”

श्रीनगरला गेल्यापासून तो अजूनच व्यस्त झाला. दरम्यान, अर्पिताला एका अमेरिकेच्या प्रोजेक्टवर असाईन करण्यात आलं. तिला जास्त बिझी राहण्याची गरज होतीच त्यामुळे तिने ते घेतलंही. एक दिवस रात्री फेसबुकवर स्क्रोल करत असताना ‘पीपल यू मे नो’च्या यादीत तिला रियानाचं नाव दिसलं. तिने कुतुहलाने तिच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक केलं. तो दल लेकला काढलेला होता! बाकी काहीच दिसत नव्हतं. तिने आदीला लगेच मेसेज पाठवला.
“रियाना श्रीनगरला आहे?”
त्याच्या उत्तराची वाट बघत झोप लागली तिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आदीचा मेसेज बघितल्यावर फोन आला. तिने त्याला परत तोच प्रश्न विचारला.
“तू परत का तिचा विषय काढतीयेस? हो, आहे ती इथेच. तिचंही माझ्यानंतर इथेच पोस्टींग झालं आहे.”
“तू म्हणाला नाहीस मला काहीच.”
“काय म्हणायचं होतं मी? वेळ काढून तुला फोन केला तर नको ते विषय का काढतेस तू? इथे किती स्ट्रेस आहे, कोणत्या परिस्थितीत आम्ही जगतोय तुला कल्पना तरी आहे का?”
“तू जर सांगितलंस मला तर येईल ना कल्पना? तुला वेळच नसतो माझ्यासाठी!”
“तुला काय झालंय अर्पिता हल्ली? का वागतेस अशी माझ्याशी?”
हा प्रश्न खरंतर मीच तुला विचारायला हवा असं तिला वाटलं पण ती तसं म्हणाली नाही.
“माँला कॉल करायचं आहे, ठेवतो मी फोन.”, म्हणत त्याने फोन ठेवून दिला.
अर्पिताला काहीच समजत नव्हतं. ती उगाच संशय घेत होती का त्याच्यावर? पण मग तो गेले कित्येक महिने बदलल्यासारखा का भासत होता तिला? त्या दोघांमध्ये अंतर का निर्माण झालं होतं इतकं? तिने बाबांशी ह्या विषयावर बोलायचं ठरवलं.

दुपारी मैत्रिणीबरोबर लंचला भेटायचा प्लॅन होता. मूड नव्हता तिचा पण तरी ती गेली. कॅफेमध्ये टेबलाशी जाऊन बसली तेव्हा तिला निहाल दारातून आत येताना दिसला. तिने तिथूनच त्याला हाक मारली.
“अर्पिता! सो नाईस टु सी यू!”
“कसा आहेस निहाल? आणि तू इथे कसा?”
“गर्लफ्रेंडला भेटायला आलो आहे.”
“अरे, जा मग तू. मी वेळ नाही घेत तुझा.”
“ती ही आली नाही अजून. उशीर करायची खोड आहे तिला.”, तो हसत म्हणाला.
अर्पिताने जाणूनबुजून त्याच्याकडे रियानाचा विषय काढला. खोदून खोदून प्रश्न विचारल्यावर तिला समजलं की रियाना आणि तिच्या नवऱ्याचा अलीकडेच डिव्होर्स झाला होता. निहाल रियानाचा विषय टाळतोय हे तिला जाणवत होतं.
“तू नोकरी सोडून द्यायला हवी होतीस. शिफ्ट व्हायला हवं होतंस कानपुरला.”, इतकंच म्हणाला तो शेवटी.
अर्पिताला जेवण गेलंच नाही. बाबांकडेही हा विषय काढून उपयोग झाला नसता. तिच्याकडे काहीच पुरावा नव्हता.
तिने आदीला मात्र मेसेज करून निहाल भेटल्याचं आणि त्याच्याकडून डिव्होर्सबद्दल कळल्याचं सांगितलं.
आदीचं त्यावर काहीच उत्तर आलं नाही. तिला लगेच त्याच्याकडे जायची इच्छा झाली पण ते ही शक्य नव्हतं. आताशा त्यांचा संपर्कही कमी झाला होता. ती अमेरिकेन वेळेवर रात्री काम करायची त्यामुळे त्यांच्या वेळा जुळायच्या नाहीत. आदी आपणहून करायचा कधीतरी फोन आणि नेहमीसारखं बोलायचा पण त्याचा सूर तिला बदललाय असं जाणवायचं. ती त्याला फोन करायची तेव्हा त्याचा फोन लागायचा नाही, लागला तर तो बरेचवेळा उचलायचा नाही.

एका रात्री तिला ऑफिसमध्ये असताना ई-मेल आली की तिला तिचं प्रोजेक्ट पूर्ण करायला आठ महिने अमेरिकेला जावं लागणार आहे. तिने पहिला फोन आदीला केला. त्याने उचलला नाही. तिने घरी केला. ऑर्डर्लीने उचलला.
“सर घर पर हैं?”, तिने विचारलं.
“सर आते ही होंगे. रियाना मॅडम हैं. उनसे बात किजीयेगा?”
तिने फोन ठेवून दिला.

“अजून काय पुरावा हवा आहे तुला अर्पिता?”, तिने स्वतःलाच विचारलं.

दोन तासाने आदीचा फोन आला.
“रियाना का आहे तुझ्या घरात?”, तिने थेटच विचारलं त्याला.
“रियाना? घरात? भास होतायेत का तुला आता? जागरण होतंय फार हल्ली त्याचा परिणाम झालाय.”
“तू खोटं बोलतोयस माझ्याशी! केव्हा पासून बोलतो आहेस? आणि का?”
“तू परत खोटे आरोप करतीयेस माझ्यावर. आय डोन्ट डिझर्व्ह धिस!”
अर्पिताने आधी केलेला फोन आणि ऑर्डर्लीशी झालेलं संभाषण सांगितलं.
“पाळत ठेवतीयेस माझ्यावर? म्हणून घरी फोन केलास?”
तिने त्याला अमेरिकेतल्या असाईनमेंटबद्दल सांगितलं. त्यावर त्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती.
“मी जायचा निर्णय घेतला आहे.”, एवढंच म्हणून तिने फोन ठेवून दिला.

पुढचे काही दिवस तिने परत सुरुवातीपासून घडलेलं सर्व मनात गिरवलं. आदीला फोन करून त्याच्याशी परत एकदा ह्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला. त्याने तिला खरं खरं काय आहे ते समजावून सांगावं अशी विनवणी केली. तो काहीच मान्य करायला तयार नव्हता. त्याला ह्या विषयावर बोलायचं सुद्धा नव्हतं. त्याच्यावर दाखवलेल्या अविश्वासाने तो दुखावला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं. पण तिचं मन तिला सांगत होतं की तिला जे काही वाटतंय ते उगाच नाहीये. तिला ह्यातून मार्ग काढायची इच्छा होती पण तो मार्ग दिसत नव्हता. तिने आदीच्या आईला जाऊन भेटायचं ठरवलं. त्यांनी तिला समजून घेतलं असतं आणि कदाचित आदीशीही बोलल्या असत्या. पहिल्या फ्लाईटचं तिकीट काढून ती भोपाळला पोहोचली आणि तिने घरी गेल्यावर आदीला मेसेज केला.
“माँना भेटायला आली आहे. तुला माहीत असावं म्हणून कळवलं. त्यांना सांगणार आहे मी सगळं. कदाचित त्या काही मार्ग सुचवतील. नसेलच काही मार्ग तर मी तुला आपल्या नात्यातून मुक्त करायला तयार आहे. पण त्यांना प्रत्यक्ष भेटून हा निर्णय सांगायची इच्छा आहे. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे तसंच माझ्यावरही आहे त्यामुळे हा अधिकार आहे त्यांचा. बाबांशीही बोलले. त्यांना ऐकून धक्का बसला. तेही तुला फोन करतील एखादवेळेस.”

बाबांच्या आवाजाने ती भानावर आली. बाबा आलेल्या लोकांना निरोप देत होते. दोन आठवड्यात त्यांचं वय दहा वर्षांनी वाढल्यासारखं दिसत होतं त्यांच्याकडे बघून. ती त्यांच्या दिशेने जायला लागली तेव्हढ्यात रियाना अर्पिताजवळ आली आणि म्हणाली, “मी तुझं दुःख समजू शकते.”
“मी ही तुझं दुःख समजू शकते.”, इतकंच म्हणून अर्पिताने तिला हात जोडून नमस्कार केला आणि आत निघून आली.

दुसऱ्या दिवशी तिच्या बॉसचा तिची ई-मेल बघितल्यावर लगेच फोन आला.
“ही संधी तू अशी हातची जाऊ देऊ नकोस अर्पिता, ऐक माझं. तुला मदत होईल तुझ्या दुःखातून बाहेर पडायला. गरज आहे तुला आत्ता इथून लांब जायची. जा तू अमेरिकेला ठरल्याप्रमाणे.”
“माझा निर्णय पक्का आहे. माझी गरज इथे आहे सध्या.”
“बघ परत एकदा नीट शांत डोक्याने विचार कर.”, ह्यापुढे म्हणण्यासारखं नव्हतंच त्यांच्याकडे काही.

आठवड्याभरानंतर माँ कोचावर स्वेटर विणत बसल्या होत्या. “तू त्या दिवशी मला काहीतरी सांगणार होतीस ना अर्पिता?”, विणलेला भाग तिच्या हाताला लावून माप घेत त्यांनी तिला विचारलं.
“हो माँ. मला अमेरिकेत एका प्रोजेक्टवर जायची संधी होती. तेच सांगणार होते. पण परवा कळलं की ते प्रोजेक्ट बंदच पडलं. मी आता भोपाळला बदली करून घेऊन इथेच राहणार आहे, तुमच्याबरोबर.”
त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि तिचा हात धरून तिला शेजारी बसवलं.
“तू जायचं आहेस अमेरिकेला ठरल्याप्रमाणे. हा आग्रह समज माझा किंवा आदेश.”
“पण माँ, तुम्हाला कुणी…”
“मला आदीने सांगितलं होतं तुझ्या प्रोजेक्टबद्दल आणि मी तुझं फोनवरचं संभाषण ऐकलं परवा.”
“मी तुम्हाला एकट्यांना सोडून कुठेही जाणार नाहीये माँ.”
“सोडून कशाला? तू गेलीस की मी ही येईन तुझ्याकडे राहायला काही दिवस. तुझे बाबा पण येतील त्यांना सुट्टी मिळाली की. तू कायमची कुठे जाणार आहेस नाहीतरी? आणि समज गेलीस तरी तुला हक्क आहे नव्याने तुझं आयुष्य सुरू करायचा. आदीची पण हीच इच्छा असेल नक्की.”
अर्पिता बघतच राहिली त्यांच्याकडे.

नेहमीपेक्षा तिप्पट स्पीडने स्वेटर पूर्ण करून त्या दिल्लीला येताना घेऊन आल्या.
“थंडी असते डेन्व्हरला. तुझ्या जॅकेटच्या आत घालायला होईल तुला.”, तिला तो स्वेटर देत म्हणाल्या तेव्हा अर्पिताचं मन आदराने आणि प्रेमाने भरून आलं. त्यांना आदीचं सत्य कधीच सांगायचं नाही असं तिने केव्हाच ठरवून टाकलं होतं. तिलातरी नक्की कुठे माहीत होतं सत्य? त्याच्याशी बोलून त्याची बाजू समजून घेण्याची संधी मिळायच्या आतच तो कायमचा गेला होता.

बाबांना माँनी तिच्यासाठी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक वाटत होतं आणि अर्पिताच्या त्यांना न सांगण्याच्या निग्रहाबद्दल तिचंही.
“योग्यच केलंस तू अर्पिता त्यांना न सांगून. त्यांना त्रास झाला असता फार आदीबद्दल असं ऐकून.”, तिला एअरपोर्टवर सोडायला जाताना बाबा म्हणाले.

तिची फ्लाईट सुटेपर्यंत ते बाहेरच थांबले आणि मग जड अंतःकरणानं घरी आले. गेल्या महिन्यात सगळंच बदलून गेलं होतं. घरी आल्यावर त्यांनी माँना फोन केला. तिने त्यांना फ्लाईट टेक ऑफ व्हायच्या आधी फोन केला होता असं म्हणाल्या त्या. बाबांनी व्हिसा काढून ठेवावा, त्याही काही महिन्यांनी जाऊन येतील म्हणाल्या.

“तिने मला काही सांगितलं नाही आदीबद्दल.”, त्या फोन ठेवताना म्हणाल्या.
“म म म्हणजे? तुम्हाला माहीत होतं?”, बाबांना धक्काच बसला होता.
“मुलगा होता माझा तो! त्याचं बदललेलं वागणं मलाही कळत होतंच. त्याच्याशी बोलूनही बघितलं होतं मी. परत बोलणार होते, पण… ती मुलगी, रियाना, आली होती तो गेल्यावर. तिचा काय दोष म्हणा.”
“तुम्ही खरंच फार ग्रेट आहात माँ. मला तुम्हाला हे सांगायची संधी मिळाली नाही पण तुम्ही अर्पिताला तिचं आयुष्य नव्याने जगायचं बळ दिलंय.”, बाबांचा आवाज कापत होता.
“जैसवाल घराण्यातल्या तीन पिढ्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. घरातल्या बायकांनाही त्यांच्या स्वप्नांना सरणावर चढवण्याचा शाप आहे. आपल्या मुलीनेही स्वतःची आहुती देण्याचा निश्चय केला होता. ही परंपरा मोडायची वेळ आली होती. हो ना?”, माँ शांतपणे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *