गच्च अशा अनाम पावसाळी दिवशी
गर्द भरून आलेल्या आभाळानं,
पडलेल्या वाऱ्यानं,
फोटोत असावं जणू अशा स्तब्ध झालेल्या प्रत्येक फुला पानानं,
जाणीव करून दिली आता कोसळणारच अशा संततधारेची.
दाटून आली मनात एक अनामिक हुरहूर उगाचच.
स्तब्ध गोठलेली वेळ,
प्रकाशही असा झाकोळलेला,
करड्या ढगांतून गाळून विरळलेला,
जणू बरसणार कधी जलधि याची वाट बघणारा…
आता वीज कडाडणार नाही.
गरजतो तो पडत नाही.
आणि मग पडतो एक टप्पोरा थेंब…
टप्प आवाजाने क्षणभर दचकायला व्हावं तोवर,
आणखी टप्प टप्प टप्प टप्प…
एक दीर्घ श्वास पूर्ण होईतो,
चाराचे आठ, आठाचे चौसष्ठ आणि चौसष्ठाचे चार हजार शहाण्णव…
आकड्यांचा गुंता सोडला तिनं,
न्हायल्या केसांचा अंबाडा सोडावा त्या सहजतेनं.
सर्व दिशांनी पाण्याचे वेगाने वाहणारे ओघळ,
वाळल्या पानांना, मोडल्या काटक्यांना कवेत घेऊन,
वाट अडवू बघणाऱ्या दगडांना वळसा घालून
सुसाट धावत सुटलेत, ती बघतेय.
वाहू देतीय ती मनात खोल दडलेल्या आठवणी त्याच वेगानं…
सख्यानं पाहिलं सखीला खिडकीत टेकून, पाय मुडपून, स्वतःत हरवून कोसळधार बघताना.
दबक्या पावलांनी आत जाऊन,
भांड्यांचा आवाज न करता आधण ठेवलं.
दुधावरची घट्ट साय नीट काढून ठेवली मातीच्या भांड्यात प्रेमानं.
पेरभर आल्याचा तुकडा हळुवार किसला आधणात,
खलबत्त्याच्या आवाजानं सखीची तंद्री भंग नको म्हणून.
तिची आवडती चहा पत्ती टाकल्यावर उकळतं आधण फेसाळलं, त्याच्या मनातल्या प्रेमासारखंच…
मंद आचेवर चहा मुरू दिला त्यानं आणि एकीकडे तिच्या आवडीचे टोस्ट काढून घेतले ताटलीत.
चहाआल्याचा सुगंध दरवळला तसं तिला आवडतं तेवढंच अर्धा कप दूध हळूच ओतलं,
गडद आधण आणि पिवळसर पांढऱ्या दुधाचा रंग हलकेच मिसळला एकमेकांत,
जसा सखीच्या कानावर सख्याने ओठ टेकवल्यावर लाजेचा लाल रंग तिच्या गालांच्या रंगात मिसळतो तसा!
प्रेमळ आठवणीनं सखाही लाजला आणि त्याने मंद आवाजात किशोरची प्रेमगीतं लावली.
दोघांच्या लाडक्या मातीच्या हस्तघडीत ग्लासात, न सांडता चहा गाळून सखा बाहेर येतो तो सखी खिडकीतून गायब.
सखा बाहेर आला हलक्या पावलांनी आणि खेटून बसला सखीला, झुल्यावर झुलणाऱ्या…
बाहेर कोसळणारा पाऊस
झुल्यावर झुलत चहा आणि निःशब्द प्रेमाची ऊब
थंड वाऱ्याची झुळूक आणि अंगावर उठणारी शिरशिरी
बोटांत हलकेच गुंफलेली बोटे
दुरून ऐकू येणारे किशोरचे प्रेमगीत
वळचणीला आलेले दोन पक्षी
अळवाच्या पानांवर जमलेले पाण्याचे मोती
“बाबांची आठवण येतेय?”
सख्याच्या प्रश्नाला, गुंफलेल्या बोटांची पकड घट्ट करून सखीने दिलेले निःशब्द उत्तर
पाऊस कोसळत राहिला
ओघळ वाहत राहिले
चहा संपला पण टोस्ट तसेच
सखीचे सख्याच्या खांद्यावर डोके
सख्याने हलकेच घेतलेला झुला
निःशब्द हिंदोळे
आठवणींचे कढ
गुंफलेल्या बोटांची आणखीन घट्ट झालेली पकड
अचानक बटण बंद केल्याप्रमाणे थांबलेला पाऊस
आभाळीच्या रित्या मेघांना हटवून आलेला मित्र
हरवलेत सखीसखा आकाशातल्या इंद्रधनूच्या रंगात
वळचणीची पक्षी जोडी उडून गेली घरट्याकडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *