ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सहामाही परीक्षा संपली की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. आणि दिवाळीपेक्षाही किल्ल्याचे! चित्रकलेचा शेवटचा पेपर देता देता कोणता किल्ला करायचा हे मनोमन ठरलेलं असायचं आणि बहुदा पेपर संपेपर्यंत वर्गातील इतर वर्गमित्रांनासुद्धा कळलेलं असायचं. साधारणपणे (आमच्या पिढीतील) प्रत्येकाच्या आयुष्यातील शालेय जीवन २००० साल उजाडेपर्यंत तरी असंच होतं… अगदी दहावीची परीक्षा येईपर्यंत!

१९९६ – ९७ चं साल असावं. मी त्यावेळी सातवीच्या वर्गात असेन. नेहमीप्रमाणे इतर मुलांसारखा किल्ला बांधायची स्वप्नं उराशी बाळगून चित्रकलेचा शेवटचा पेपर दिला अन् धावत धावतच घर गाठलं; कारण दगड, विटा आणि माती यांची जुळणी करायची होती. घर गाठलं खरं; पण तो किल्ला बांधायचा आनंद मला फार काळ टिकवता आला नाही. कारण दिवाळीच्या सुट्टीत मदतनीस म्हणून एका किराणा मालाच्या दुकानात कामावर जायचं होतं. काम पगार आणि बाकीचं बोलणं आईनं केलेलं होतं. मला फक्त रोजच्या रोज त्या दुकानात हजेरी लावायची होती.
खरंतर काकूंच्याच दुकानात कामाला जायचं होतं; त्यामुळे वेळेचं किंवा कामाचं कसलंही टेन्शन नव्हतं;पण मला माझं स्वप्न पुरं करायचं होतं – किल्ला बांधायचं! राहिलेल्या थोड्या वेळातच दगड, विटा आणि माती यांची जुळणी करून मी किल्ल्याच्या बांधणीचा प्लान तयार केला आणि झोपी गेलो; कारण सकाळी आवरून दुकानात कामावर हजेरी लावायची होती. सकाळ नेहमीसारखीच उजाडली. पण आता मी नेहमीप्रमाणे वागू शकत नव्हतो. आवरून चहापान झाल्यावर काकूंचं दुकान गाठलं आणि साफसफाई झाल्यावर, येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या मागणीनुसार मैदा, साखर, रवा, हरभरा डाळ इत्यादी तोलून द्यायला शिकलो. तेल जोखणं खरंच जोखमीचं काम असल्यानं ते तात्पुरत्या स्वरूपात का असेना; पण अंगावर पडलं नाही. मग दोन ते तीन या जेवणाच्या वेळेत घरी जाऊन जेवायचं आणि राहिलेल्या वेळेत स्वतःचं स्वप्न बांधायचं हा नवा उपक्रम सुरू झाला. आठवडा पूर्ण होतो न होतो तोपर्यंत मी कामात तरबेज झालो आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं. पण या अगोदर सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ माझ्या हाती दिसणारे बॅट, बाॅल आणि खेळाचे इतर साहित्य यांना मात्र सोडचिठ्ठी दिली…

आता ती पाहिलेली स्वप्नं सजवायचं काम बाकी होतं. घटस्थापनेला पत्रावळ्या विकून आलेल्या पैशांतून जे काही मावळे आणि महाराजांची मूर्ती विकत घेतली होती त्यातून ते सजवणंसुद्धा परिपूर्ण झालं. सकाळी कामावर जायच्या आधी जेवण करताना राहिलेल्या वेळेत आणि रात्री घरी आल्यावर मी माझं स्वप्न पाहत होतो, जगत होतो. इतरवेळी मात्र रवा, मैदा, साखर, लिस्सा साखर, पिठीसाखर, खोबरं, हरभरा डाळ, एक किलो, अर्धा किलो, दोन किलो या व्यतिरिक्त काहीच ऐकू येत नव्हतं; किंबहुना सुचत सुद्धा नव्हतं. अगदी कित्येक वेळा रात्रीला, “काय पाहिजे?” असा प्रश्न विचारून बडबडतसुद्धा जाग आलेली जाणवत होतं आणि समजतसुद्धा होतं.

किल्ला बांधून तयार होता. आणि किल्ल्यावर प्रत्येकानं आपापली जागा घेतलेली होती. अगदी मावळे, सरदार, पशुपक्षी, वाघ, सिंह इत्यादींनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या किल्ल्यातील जागेवर नेमका ताबा मिळवला होता. तो किल्ला फक्त महाराजांवाचून पोरका होता. कारण महाराजांची चांगल्यातली चांगली मूर्ती वीस-पंचवीस रुपयांच्या आसपास होती;जी घेणं मला शक्यच नव्हतं…

माझ्याजवळ दहा ते बारा रुपये शिल्लक होते – स्वकमाईचे! पण राहिलेल्या रुपयांची जुळवाजुळव होत नव्हती. अशा वेळी मला नेहमीप्रमाणे मदत करणारी बहीण- काकांची मुलगी, पाठीशी उभी राहिली. तिला दिलेल्या खाऊचे पैसे वाचवून ती दरवेळी किल्ल्यासाठी काही ना काही खरेदी करत राहायची. काका सर्व्हिसला असल्याने गावापासून दूर; त्यामुळे आमची भेट व्हायची ती फक्त सुट्टीच्या काळात! कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत तर कधी दिवाळीच्या सुट्टीत! सीमा माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. अगदी ज्या दिवशी इंदिरा गांधी गेल्या त्याच दिवशी जन्मलेली! त्यामुळे ही आमच्या घरातील इंदिरा गांधीच असल्याने हिचं ऐकावं लागायचं. किल्ल्यावरचा शिपाई घेतानासुद्धा ही नाक आणि डोळे बघून घ्यायची. किल्ल्यावरची जी गर्दी होती त्यातील निम्म्यापेक्षा जास्त गर्दी ही सीमाच्या पाॅकेटमनीचा हिस्सा होती. आणि आत्तासुद्धा तिनं महाराजांना (पारखून, बघून घेऊन, अगदी कुर्त्याचा रंग वगैरे बघून) किल्ल्यावर विराजमान केलं. आणि माझं या दिवाळीतील किल्ल्याचं स्वप्न परत एकदा सीमाच्या मदतीने पूर्ण झालं!

मी कामावरून घरी आलो. किल्ल्यावर मेणबत्ती पेटवून आणि किल्ल्यावर लावून किल्ला प्रकाशित केला. तो उजळलेला किल्ला बघत बघतच जेवण उरकलं. जेवण झालं. परत एकदा घरातील बच्चेकंपनीच्या सोबत दंगामस्ती करून झोपी गेलो. कारण काम करून लवकरच झोप यायची. कामाच्या दगदगीनं मी लवकरच झोपी गेलो खरा; पण त्या गडबडीत किल्ल्यावर सर्वजण तसेच राहिले. महाराज त्यांच्या सिंहासनावर तसेच बसून राहिले. सरदार, शिपाई यांच्यासहित पशुपक्षी, वाघ आणि सिंह इत्यादी, किल्ल्यावर ज्या स्थितीत उभे होते तसेच राहिले.

नेमका त्याच रात्री खूप पाऊस पडला. त्या पावसाच्या वर्षावात किल्लासुद्धा ढासळला. सकाळी मी जागा झालो तेव्हा तोंडात ब्रश घेऊन किल्ला जवळ केला आणि एकच आकांत सुरू केला. कारण माझं स्वप्न पावसाच्या पाण्यात वाहून गेलं होतं. माझं रडणं आणि ओरडणं ऐकून घरातील सर्व मंडळी हातातील कामं टाकून माझ्याजवळ येत होती; कारण माझ्या आसवांचा वेग पावसाच्या पाण्याच्या वेगापेक्षा जास्त होता.
मी बराच वेळ रडत होतो. माझी समजूत काढण्यात जो तो गुंग होता. पण आता मी समजून घेण्यापलीकडे पोहचलेलो होतो. डोळ्यांत साठलेल्या आसवांनी किल्ला थोडासा अस्पष्ट दिसत होता; मात्र काल रात्रीच्या अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात लख्ख चमकणारा किल्ला माझ्या ह्रदयात स्पष्ट दिसत होता. किल्ल्याच्या बुरजाप्रमाणे ढासळलेलं मन घेऊन मी किल्ल्याच्या जवळ गेलो. किल्ल्याच्या समोर केलेली विहीर तुडुंब भरलेली होती. बुरजांचा बराचसा भाग ढासळलेल्या अवस्थेत त्या विहिरीजवळ येऊन त्या विहिरीला तलावाचं स्वरूप देत होता. किल्ला मात्र त्या तलावात कुरूप दिसत होता. ढासळलेला किल्ला हा वस्त्रहरण झालेल्या द्रौपदीसारखा दिसत होता अन् माझीही अवस्था त्या द्रौपदीसारखी.

मी परत त्या ढासळलेल्या दगडांना किल्ल्याचं स्वरूप द्यायला झटत होतो. आणि पसरलेल्या ओल्या मातीला किल्ल्याचा आकार देताना कळलं की पावसाची चाहूल लागताच किल्ल्यावरच्या बऱ्याच जणांनी गड सोडलेला होता. कारण पाऊस पडल्यावर झालेल्या किल्ल्याच्या चिखलात फक्त वाघ आणि सिंहाची शिकार झाली होती. दिवस उजाडत असतानाच त्यांनी आपला देह किल्ल्याच्या मातीत मिसळलेला होता. कारण फक्त त्यांचाच रंग त्या किल्ल्याच्या मातीत स्पष्टपणे दिसत होता.

मग थोडं बाजूला होऊन मी मागे पाहिलं. कारण मागच्या बाजूला आजीचं अंथरूणसुद्धा नव्हतं. नव्वदीच्या आसपास पोहचलेली आजी तिथं नव्हती. उजव्या पायाला पडल्याने प्लास्टर घातलेलं होतं ते अगदी मांड्यापर्यंत गुडांळलेलं होतं. बाबा आणि काकांच्या हिश्शाचे घर ज्यांचे त्यांना दिल्यावर आजी दोन्ही घरांच्या उंबरठ्याजवळच परड्यात झोपायची. पलंग किंवा बाजलं बाळगायाची ऐपत नसल्याने दोन-चार गोणपाट अंथरून त्यांवर अंथरलेल्या फाटक्या धुपट्यावर ऊब घेत आजी तशीच झोपी जायची.

‘वाटणी करून दिल्यावर, म्हातारीला कोण सांभाळायचं?’ म्हणून झालेली भांडणं मी स्वतः पाहिली आहेत. आजीला प्रत्येकाचं म्हणणं पटलं असेल कदाचित किंवा तिनं पटवून घेतलं असेल. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची झालेली वाटणी मात्र तिला पटत नसावी. ती परड्यात दोन्ही उंबरठ्याजवळच पडून असायची. तिला काय हवं नको ते तिथूनच सांगायची. त्यातच ती शेताला जाता जाता पडली आणि एक पाय प्लास्टरच्या जुलमात अडकला. मग ती तिथेच बसून असायची. आजोबा खूप आधीच गेलेले. ही सारखी बसून बसून त्याच वाटेची अपेक्षा करत राहायची!
मी रात्रीच तिला बघितलं होतं. तिच्या हाताची बोटं मोडून, मायासुद्धा करून घेतली होती. तिनं दिलेले चार आणे (पंचवीस पैसे) माझ्याजवळच होते. त्या चार आण्यांचा किस्सा तर आठवला तरी भरून येतं. “सच्या, पाठ दाब रे! तुला चार आणे देतो!” कारण आजीचं दुखणं पाच पैशापासून सुरू होऊन पंचवीस पैशांपर्यंत आलेलं मला कळलंच नाही. आजी दिसली नाही म्हणून मी काकांच्या घरात शिरलो आणि तिथलं चित्र बघूनच खाली बसलो. आजीचा प्लास्टरचा पांढरा पाय किल्ल्याच्या लाल मातीने लालेलाल झालेला होता. ती झोपलेली होती, आणि तिच्या उशाजवळ एक दुरडी होती. त्यात महाराजांपासून, सरदार, शिपाई वगैरे स्वस्थ पडून होते. मला काहीच समजलं नाही. मी तसाच आजीजवळ जाऊन रडायला सुरुवात केली…

… तिच्या जवळ जातानाच काकूंनी सांगितलं,
“पावसाची चाहूल लागताच, म्हातारी सरपटत सरपटत जाऊन एक एक खेळणं दुरडीत भरत होती..”
माझ्या रडण्यानं आजीची झोपमोड झाली आणि तिनं पहिलाच प्रश्न विचारला, “सगळी खेळणी हायत नव्हं दुरडीत?”…
तो मनापासून बनवलेला शेवटचाच किल्ला! त्यानंतर मी किल्ला बांधायचा सोडून दिला. पण त्यावेळी एक सत्य नक्कीच समजलं. आपण पाहत असलेलं स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर फक्त प्रयत्न करून उपयोग नाही. ते स्वप्न जपणारंसुद्धा आजीसारखं कुणीतरी हवं असतं…

(एका फिनिक्स पक्ष्याची कथामधून साभार)

1 Comment

  1. हृदयस्पर्शी लेख!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *