आभाळ!

तान्हं बाळ होते तेव्हा खिडकीतून दिसलं पहिल्यांदा. लाल, पिवळा, केशरी- बदलत जाणारे रंग! जणू पाळण्यावर फिरणारं रंगीत खेळणंच! ऊन आलं तसं खिडकी बंद केली आईने. रात्री तर काळीच होती. उघडी खिडकी. गच्चीवर नेलं तर नुसती काळी चादर आणि त्यावर लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्या! आत्त्याने दिलेलं दुपटं जसं – पण कित्ती मोठ्ठं! कधी गायब व्हायच्या चांदण्या आणि पांढरा शुभ्र प्रकाश, आईच्या दुधासारखा आणि तो भला मोठा एकटा चांदोबा. कधी घूमघूम वार्‍याने आदळायची खिडकीची दारं; तर कधी बदाबदा आवाज करत कोसळायचा पाऊस बाहेर. काळे करडे ढग फिरत राहायचे खिडकीतून डोकावत. कळायच्या नाहीत खिडकीतून दिसणार्‍या आभाळाच्या तर्‍हा. वेगळंच दिसायचं प्रत्येक वेळी.
मोठी झाले तशी घराबाहेर पडले; तर दडपूनच गेले ते भलं मोठं आकाश पाहून; जणू एखाद्या निळ्या टोपलीखाली राहतात सगळे. भयच वाटलं आधी त्या अमर्यादेचं. खिडकीतलं एवढंसं चित्र कसं सगळीकडे पसरलेलं, वेढून घेणारं. सकाळचं उत्साहाचं रंगीबेरंगी आभाळ दुपार झाली की निळंभोर व्हायचं पण काहिली व्हायची नुसती. त्याच्याकडे बघावंसंही वाटायचं नाही मग. संध्याकाळी तसंच रंगीत मग धूसर आणि नंतर काळंभोर. ते आकाश प्रत्येक वेळी वेगळंच बोलायचं. सकाळी म्हणायचं, “फुलण्यासाठी जगावं” तर दुपारी म्हणायचं, “सावली शोध“. संध्याकाळी उगाच अशाश्वत, अस्वस्थ करायचं पण मग काळ्या मिठीत घेऊन जोजवायचं आणि नवी स्वप्नंही दाखवायचं.

आभाळाची बदलणारी रूपे, त्याचे रंग, कधी दाहक तर कधी शीतल, कधी भीती दाखवणारे तर कधी दिलासा देणारे. सततचं बदलत राहणं. ढग दाटून यावेत नि पाऊस पडूच नये तर कधी कोरडं ठक्क आभाळ कोसळत राहावं. अंगाची काहिली व्हावी तर एखाद्या ढगाने गार सावली द्यावी. थंडीने कुडकुडावं तर उन्हाची मस्त उबदार तिरीप यावी. अनिश्चित राहिलं आभाळ!

उंच उडणारे पक्षी पाहिले तेव्हा वाटलं, त्यांना कळलं असेल आभाळ. मग त्याला समजून घ्यावं म्हणून, जवळून पाहावं म्हणून विमानात बसून गेले उंच उंच. जवळ गेले तर ते तितकंच दूर होतं, जमिनीवरून दिसलं तसंच. डोक्यावर तसंच हाताला न येणारं आणि खाली पाहावं तर जमिनीला टेकलेलं. त्या शुभ्र ढगांत फिरताना छानच वाटलं; पण अशाश्वतता, अस्थिरता तशीच राहिली बेचैन करणारी. त्या त्याच्या भयाण अधांतरी पोकळपणाचंही भयच वाटलं, त्याला नाकारावंच म्हटलं तर त्याच्याही मुळाशी त्याचं अभंग असणं दिसलं. सतत भ्रमात ठेवत राहिलं आभाळ. जगणं या आभाळासारखंच वाटायला लागलं मग – वेगळं होत जाणारं, बदलत राहणारं आणि प्रत्येक वेळी काही वेगळंच सांगणारं. जवळची, दूरची, पुस्तकातून भेटणारी माणसं; सगळं जगच आभाळासारखं, सतत बदलणारं. किती प्रकारची माणसं; प्रत्येक वेळी वेगळंच बोलणारी, वागणारी, जाणीव करून देणारी. प्रत्येकाचं वेगळं तत्त्वज्ञान, जगणं. जे वाचू, ऐकू ते ते त्या त्या वेळी खरंच वाटायचं. मग दुसरं वाचलं, ऐकलं की पहिलं खोटं वाटायचं. मग कुणी तिसरा येऊन तिसरंच सांगायचा. जगण्याची रीत, तत्त्वज्ञान, मूल्यं माणसागणिक बदलायला लागली.

कोणी म्हणायचं,”हे सगळं नश्वर. गुंतू नये कशातच…” तर कोणी म्हणायचं, ”प्रत्येक क्षण समरसून जगावा.” कोणी म्हणे, ”मनातल्या कुठल्याच इच्छा मारू नयेत, दमन करू नयेत, पूर्ण कराव्यात.”. मग कोणी सांगे, ”मोहाची वाट नेहमीच घसरडी, त्याला मनावर राज्य करूच देऊ नये. सगळंच मिथ्या.” एक इकडे तर दुसरा दुसरीकडेच ओढायचा; तर तिसरा उगाच खुणावायचा. बुद्ध वेगळं, महावीर दुसरंच. फ्रॉईडचं एक तर लाओ त्सेचं निराळंच. आई, बाप, शिक्षक त्यांचं वेगळंच. कधी हे पटायचं तर कधी ते. मन कधी एखादी गोष्ट करून पहायला उतावीळ व्हायचं; तर दुसर्‍या क्षणी त्यात काही अर्थच वाटायचा नाही. खर्‍या जगण्यातली तर बातच वेगळी. रोज नवा प्रश्न, नवीच आव्हानं तर कधी काहीच नाही. पुस्तकातलं, कुणी कुणी सांगितलेलं सापडायचं इथं तिथं पण सगळं विखुरलेलं, सरमिसळ झालेलं. ठोस अर्थ काढावा, गृहीत धरावं असं काही सापडायचंच नाही. स्वप्नांचा जिद्दीने पाठपुरावा करताना आसपास अशा काही घटना घडायच्या की सगळं अशाश्वत वाटावं, उद्याचीच खात्री नसावी. निश्चल काहीही न करता बसावं तर जगरहाटीतल्या कितीतरी गोष्टी, स्वप्नं, मोह, आनंद भुरळ घालायचे. काहीतरी करण्याची ऊर्मी जागायची.
जगण्याचं आभाळ असं तुकड्या तुकड्यातून दिसायचं. क्षणोक्षणी रंग बदलणारं. एक रंग, एक आकार सापडायचाच नाही. स्वत:ला जे दिसतं.. वाटतं ते आणि दुसर्‍याला जे दिसतं, वाटतं, स्वत:चा अनुभव, दुसऱ्याचा अनुभव सगळ्यात प्रचंड फरक तर कधी टोकाचा विरोधाभास. मग नेमकं काय खरं? आपण चूक की समोरचा? अनाकलनीय होतं सगळं.

नेमकं काय करतोय आपण? कुठे जातोय? कुठवर? हे योग्य की ते? असं की तसं? आयुष्यभर या प्रश्नांनी पाठ सोडली नाही. एखादा धागा धरून चालावं; तर तो पुढे गेला की अधांतरी लोंबकळलेला. एखादा सोडून दिला तर तोच पुढे जाऊन दोरखंड बनून दूर वर पसरलेला. काहीच नक्की नाही. एखाद्याने सांगितलेलं पटावं तर ते कधीच अनुभवाला येऊ नये तर एखाद्याचं झिडकारलेलंच वाट्याला यावं.
आयुष्य हे असंच आभाळासारखं राहिलं. कितीतरी विचार, तत्त्वज्ञान ऐकत, वाचत, पाहत जातो. त्या त्या क्षणी भाळतो, भारावतो तर जगताना त्यातलं फोलपणच जाणवतं. कधी कुणाच्या सांगण्या-बोलण्याचा आपल्या तत्कालीन परिस्थितीशी मेळच बसत नाही. प्रत्येक प्रसंगाला, अनुभवाला आपण कुणाच्या अनुभवाशी ताडून पाहावं तर आपलं जाणवणारं वेगळंच. त्याच आभाळात आपण कधी खूप आनंदी तर कुणा दुसर्‍याला त्याच्याबद्दल तक्रारच. तिथे कुणी मस्तीत नाचावं तर ते आभाळ आपल्याला असह्यच व्हावं.
जगावं कसं? कोणाला गुरू मानावं? कोणाची शिकवण अंगीकारावी? हा प्रश्न तर आयुष्यात पुढे पुढे जाऊ, अनुभव घेऊ, वाचू, अनेकांना विचारू, अजमावू तसा तसा अधिकच गहन व्हायला लागला. बाहेरचं जग, आभाळ आणि आपलं जग याची सांगड कधी जुळायची तर कधी तट्कन तुटून वेगळीच व्हायची.

आभाळ! आपल्या आतही आणि तेही तसंच अनाकलनीय, सतत रंगरूप बदलणारं. कुठल्याच साच्यात, सूत्रात न बसणारं.
खूप विचार केला.
आणि
एक निखळ सत्य जाणवलं.
कितीही रूप बदलत असलं आभाळ तरी ते सामावून घेते जमीन.
ती वेगळीच!

शिशिरात पानगळ होऊन भयाण झालेलं तिचं रूप बघितलं तेव्हा वाटलं, “अरेरे! संपवूनच टाकलं आभाळाने हिला.” पाहिलं, तर वसंतात पुन्हा तरारून फुललेली! पावसाळ्यातलं तिचं भिजणं, नाहणं, तिचं सृजन…अविश्वसनीय! त्या कोसळणार्‍या पावसानेही खूपदा पडझड केली, झोडपून काढलं. कधी ती आतूनच फुटली तर कधी गगनाला भिडणाऱ्या लाटांच्या पोटात गुदमरली. कधी पावसाच्या दुराव्यात जळून गेली कधी बर्फाच्या ढिगार्‍याखाली दबून गेली. पण प्रत्येक वेळी… प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिली जणू काही घडलंच नाही विपरीत. प्रत्येक आघातानंतर नुसती उभी राहिली नाही तर नवनिर्मिती करत राहिली. रूप बदलत राहिली तरी वृत्ती, जिजीविषा कधीच बदलली नाही. सगळ्या बदलांना तोंड देत – ते जसे येतील तसे; कधी पावसाचा जीवनरस प्राशन करत राहिली; तर कधी पडझड, मोडतोड स्वीकारत राहिली. सूर्याचं अमृत असोशीने पिताना त्याचा दाहही सहन करत राहिली. आभाळाची, आकाशाची अनिश्चितता पूर्ण स्वीकारून घट्ट उभी राहिलेली जमीन! तो कसाही वागेल हे गृहीत धरून स्वत:च बदलत जाणारी…म्हटलं तर सर्वस्वी अवलंबून तरीही स्वयंपूर्ण. त्याने काहीही द्यावं तिने स्वीकारावं; नुसतं निमूट स्वीकारणं नाही; तर जे दिलंय त्यातून सतत नवनिर्मिती, सृजनशीलता…अथक…अखंड! ती प्रश्न करत नाही, गोंधळत नाही, खंत करत नाही, नाही दु:ख! जे मिळेल, जेव्हा जसं मिळेल ते स्वीकारून सतत फुलत राहणारी, जगण्याचं सगळं जीवन चक्र सांभाळत राहणारी जमीन!

हाताला न येणारं आभाळ, त्याचे सतत बदलणारे अनिश्चित रंग, विविध ढंग, तसंच बदलत जाणारं जगण्याचं तत्त्वज्ञान, अनुभव, शंकित प्रश्नांकित करणारं अशाश्वत अस्थिर आयुष्य! पण आभाळाला सामोरी जाणारी जमीन किती दिलासा देणारी…पावलांना घट्ट आधार देणारी!
आता बदलत जाणारं आभाळ प्रश्न करत नाही, भिववत नाही, गोंधळात टाकत नाही.
पावलांनी आता जमीन घट्ट धरून ठेवली आणि मी जमीनच झाले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *