“जयमातादी, जयमातादी…जोर से बोलो…जयमातादी…”

त्या अनोळखी देवळातली देवी सरलाबेनला अजिबात आश्वस्त करत नव्हती. तिथल्या भिंतीबाहेरचा गारठा अजिबात रोखू शकत नव्हत्या आणि त्यांच्या मनातले विचार आरतीच्या त्या कोलाहलापेक्षा कैकपटीने मोठ्या स्वरात त्यांच्याच डोक्यात वाजत होते. रोशन इतक्या दूर कसा काय आला असेल आपल्याला घेऊन? एवढ्या वर्षांत फक्त बायको आणि पोरांना सोबतीला घेऊन फिरणारा हा आपलाच पोरगा आज आपल्याला का बरे घेऊन आला असेल? तेही चक्क नवरात्रीत – तेही इतक्या थंडीत? त्याचे डोळे असे अजब का दिसत आहेत? नजर का टाळतो आहे अशी? इथे असे बायका आणि पुरुषांना निराळ्या रांगा का आहेत की…

देवीवर लक्ष केंद्रित करत, सरलाबेन किंचित डोळे बंद करून मन एकाग्र करू बघत होत्या खऱ्या; पण काही केल्या जमेना! त्यांना त्यांच्या सरली गावातलं स्वामिनारायण मंदिर आठवलं! तिथल्या रंगीबेरंगी वाशांच्या खाली बसून ऐकलेली भजनं, पटांगणातला गरबा आठवला! त्या कलत्या छपराच्या जीर्ण मंदिरात त्यांनी कितीदा स्वामिनारायणाचे आभार मानले असतील, मुलगा झाल्याबद्दल, ते त्या स्वामिनारायणालाच ठाऊक! आता गावात काहीच नव्हतं, त्यांचं सौभाग्य नाही, वैभव नाही, ना नातीगोती! सगळे पांगले! २००१ च्या भूकंपानंतर जी नाती कोसळली, जी घरं कोसळली, त्यातून काहीच वाचू शकलं नाही… त्यावेळी जी भेग मनावर पडली ती कदाचित कधी सांधलीच नाही.

“बोलो श्री अंबेमाता की जय!” ह्या आवाजाने सरलाबेननी दचकून डोळे उघडले! मंदिरातला पुजारी त्यांना प्रसाद देत होता! “ अम्माजी लिजिए प्रशाद, जयमातादी!” तो काहीसा तरुण पोरसवदा भटजी तिच्या पुढ्यात झुकून तिला प्रसाद देत म्हणाला.

हात जोडून तो प्रसाद घेत सरलाबेन तशाच बसून राहिल्या. आजूबाजूला लोक कपडे झटकून उभे राहत होते. एक झंकारणारा कोलाहल सुरूच होता आणि प्रत्येक पायातले भारतीय पोषाखाखालचे जाड मोजे तेवढे सरलाबेन बघत राहिल्या! थोडी गर्दी ओसरली की रोशन येईल आपल्यापाशी, मग त्याच्या आधाराने उठावं म्हणून त्या तशाच अवघडून बसून राहिल्या.गर्दी पांगली. त्या एकट्याच बसून होत्या! मंदिरातल्या दोन पुजाऱ्यांची गडबड धावपळ रोजच्यासारखी सुरू होती. दोन सेवक येऊन आजूबाजूला पसरलेल्या गाद्या काढून ठेवू लागले! शेवटी आता फक्त सरलाबेनच्या खालची गादी शिल्लक होती. तसे त्यांना उठवायला ही मंडळी आली.

“माताजी, मदद करूँ आप की? वहा चेर पे बैठिये!” म्हणत सेवकांनीच त्यांना उठवलं. त्यांची नजर भिरभिरली, रोशन कुठेच दिसत नव्हता. त्या खुर्चीवर बसल्या तर खऱ्या, तरी त्या पुटपुटल्या, “बेटा हैं आया, दिखाई नहीं दिया तो बैठी रही…”
“होगा यहीं कहीं, प्रशाद लेने दुसरे हॉल में गया होगा, आप बैठिये, आता ही होगा” सेवक बोलून पुन्हा सगळं आवरू लागले. शेजारच्या हॉलमधून कोणी येते का, बघत सरलाबेन तिथल्या दरवाजावरडोळे टिकवून होत्या.
मंदिराचा भव्यपणा हळूहळू त्या बघू लागल्या! भारतातल्या मंदिरासारखी ही मंदिरं वाटत नाहीत, म्हणजे बांधतात एवढी भव्य; तरी तिथे मनाला शांती लाभत नाही! नुसतेच देखावे! मन भिरभिरतं ते तसंच भिरभिरत राहतं…

शेजारच्या हॉलमधली माणसेदेखील पांगली. बेन इथे तशाच बसलेल्या! रोशन काही दिसत नव्हता. त्या भिंतीचा किंचित आधार घेऊन उठल्या आणि हळूहळू पिशवी सांभाळत हॉलकडे चालू लागल्या. तिथे मगाचे सेवक आणि पुजारी दृष्टीस पडले आणि इतर काही अनोळखी चेहरे! त्या तशाच चपला जिथे ठेवतात तिथवर गेल्या. त्यांच्या एकटीचीच चप्पल तिथे होती. रोशनचे बूट दिसत नव्हते! कदाचित गाडी दारापाशी आणायला गेला असेल असे समजून त्या घाईने जमेल तितक्या वेगाने दारापाशी गेल्या. कोटाची बटणं लावत बाहेरच्या थंडीपासून स्वतःला वाचवत त्या किंचित आडोशाला गाडी दिसेल अशा बेताने थांबल्या. मंदिरातली ऊब इथे नव्हती. गारठा जोरदार होता. शिळ्या बर्फावरून येणारे वारे झोंबत होते. इथे ओहायोमध्ये थंडी बारा महिने! कुठे त्यांचे रणरणते भूज आणि कुठे हा बर्फाळ प्रदेश! मुलगा इथे आला, तेव्हा हक्काने घेऊन आला! “माँ, साथे चाल” म्हणून!
त्याचा इथला संसार, बायको आणि दोन पोरं, सगळं छान होतं, तसं म्हणायला! सुनेचं आणि त्यांचं तसं सख्य नसलं; तरी ती तशी अलिप्त होती. त्यांच्याकडून जमेल त्याहून थोडं जास्तच काम ती करून घ्यायची! कष्टाची सवय होतीच तशी, त्या आपल्या करतच राहिल्या काम! पोरांचं नातवंडांचं म्हणून, राबत राहिल्या मुलाच्या संसारात! आता इथे राहून पण तेरा वर्ष होत आली होती!

“माताजी, आप अंदर रुकिये, यहाँ काफी थंड है|” मगाचचा सेवक पुन्हा येऊन बोलू लागला. बेन थोड्या दचकून सावरून उभ्या राहिल्या. “नहीं, वो बेटा गाडी लेने गया हैं ने, तो मैं इधर रुकी हूँ|”
“ अच्छा, कौनसी गाडी हैं, कुछ कलर याद है? मैं बाहर देखकर आता हूँ|” स्वतःचे हातमोजे घालत तो सेवक पुन्हा विचारू लागला, तशा बेन थोड्या सटपटल्या. गाडीचा नेमका रंग आठवेना, नंबर तर अजिबातच ठाऊक नव्हता!
“वह आयेगा ना, मेरेकू कलर याद नाही…ग्रे होगा शायद… रोशन, मेरा बेटा हैं ने, उसके साथे मैं इधर आई ना…”
सेवक त्या गारठ्यात बाहेर पडला आणि थोड्या वेळात अतिशय शांतपणे परत आला.
“उसको बोला आप ने? माँ इधर है करके?” सरलाबेनने आल्या आल्या त्या सेवकाला विचारले.
“ आप भीतर चलिये माताजी, बैठिये इधर,” असे म्हणत तो सेवक सरलाबेनला बसवत कोटाची बटणं काढू लागला.
“ क्या हुआ?” बेन देखील थोड्या काळजीने बसत म्हणाल्या! त्या सेवकाच्या डोळ्यांत नेमके काय भाव होते त्यांना कळेना! …
“ माताजी, वो, बाहर कोई गाडी नही है, आपके पास फोन है क्या? नाही तो बेटे का नंबर होगा, तो फोन करते हैं…”

सरलाबेन जागीच थिजल्या, गाडी नहीं म्हणजे? आपल्याला सोडून गेलाच कसा असा? रोशन? त्यांच्याकडे फोन कधीच नव्हता, घरीच असायच्या म्हणून मग घरच्या फोनवरून त्या सगळ्यांना फोन करत. तिथे शेजारीच त्यांची छोटी वही होती, सगळे नंबर लिहिलेली! एखाद दोन दिवसाच्या ट्रिपला कुठे चाललो आहोत! येऊ संध्याकाळी घरी, असा विचार करत त्यांनी काही घेतलं नाही सोबत! तरी निघताना का कोणास ठाऊक, त्या थोडे पैसे घेऊन निघाल्या होत्या, एक जादाची कपडे जोडी आणि पासपोर्ट! सुनेचा जुना हिवाळी कोट आणि बूट घालून त्या बाहेर पडल्या, तेव्हा नातवंडं, सून, कोणीसुद्धा बाहेर आले नव्हतं, ह्या मात्र…

“माताजी, है क्या नंबर, पता है ना आपको, लगता है कुछ गडबड है…” सेवक, इतर काही मंडळी त्यांच्याभोवती जमू लागली होती…बेन, इथवर थोड्या गोंधळल्या होत्या, काय सुरू आहे आजूबाजूला त्यांना कळेना! सुन्न झालं होतं त्यांचं डोकं. काही शक्यतांपाशी त्या मनाने जाऊच शकत नव्हत्या! त्याचं मन काही केल्या त्या कल्पनेला शिवायला तयार होत नव्हतं! कोणीतरी त्यांच्या पिशवीत फोन किंवा वही आहे का बघितलं, थोडा वेळसभोवताली कुजबुज ऐकू येत राहिली. त्या मात्र तिथे नव्हत्याच जणू. अंगातलं त्राण जाऊन त्या बर्फाच्या निराकार ढिगाऱ्यासारख्या मख्ख बसून राहिल्या.

पोलिसांच्या गाडीच्या कर्कश भोंग्याने त्या एकदम दचकल्या. तीन-चार गाड्यांचा आवाज असावा. पोलीस आत आले. मगाचे हिंदी बोलणारे पुजारी, अमेरिकन हेल काढून भराभर इंग्रजी बोलू लागले. रोशन तसाच करी! त्यांना परत परत त्याचा चेहरा आठवत राहिला. कोणीतरी सांगू लागलं, “ शी इज अलोन, डज नॉट नो इंग्लिश, हर सन वॉज हियर टू, गेस ही लेफ्ट हर हियर, डज नॉट सीम लाईक अ मिस्टेक, मोर अ प्लॅन…येस, अनफॉर्च्युनेट…हाऊ डू वी टेल हर? हाऊ कॅन वी हेल्प ऑफिसर?”
“ माताजी, आप मेरे साथ चलिये, पोलीस थाने जा कर कुछ मदद मिलेगी शायद…”

“पुलिस क्या करेगी?” सरलाबेन पुरत्या कोसळल्या होत्याच, त्यांच्या मनाने कौल दिला होता… त्यांचा नवसाचा हा पोरगा, त्याने त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले होते! इथे, इतक्या लांब, एकटीला, अशा जीवघेण्या थंडीत! मंदिरात आणून सोडलं, हेच काय ते उपकार, शेवटचे! सगळं उघड होतं, मात्र पुढे काय?
बर्फावरून किंचित घसरत सगळ्या गाड्या पोलीस स्टेशनात पोचल्या. तिथे पुन्हा चौकशी, त्यांचा पासपोर्ट बघितला, काही शोध सुरू झाले आणि फोन करणे सुरू झाले. एक अधिकारी त्या मंदिरातल्या सेवकाला काही प्रश्न विचारत होता. त्याची भाषांतरित प्रश्नांचीसरबत्ती संपेना… बेन थकल्या होत्या, बधिरल्या होत्या…
थोड्यावेळाने तिथे एक दुसरी गाडी आली. त्यातून एक चाळीशीच्या आसपासची स्त्री बाहेर आली.
“ कैसी हैं आप अम्मा? आज आप मेरे साथ चलो, बाकी बाद में देखेंगे!”

तिथल्या सर्व ऑफिसरवर रोब जमवून तिने धाडधाड काही निर्णय त्यांना सुनावले, हातातले कागद आणून, त्यावर काय काय लिहून त्यांना ते स्वाधीन केले आणि पुन्हा तिच्या निराळ्याच हिंदीत ती त्यांच्याशी बोलता बोलता सगळं सामान उचलून त्यांना आधार देत गाडीपाशी घेऊन गेली.
गाडीत बसतेवेळी आता मात्र बेननी गाडीचा रंग बघून घेतला – काळा!
त्यांच्या भविष्यासारखा! काळा, अंधकारमय, भीतिदायक काळा! गाडीत बसल्या खऱ्या आणि तेही पुढे, तर काचेखाली मुसलमानाची तस्बीह! त्या तशाच बसून राहिल्या! ही बया आपल्याला कुठे घेऊन चालली आहे, त्यांना काही समजेना. “अम्मा आप खाना खाओगी? भूक लगी होगी ना?” ती बाई विचारत होती; तेव्हा सरलाबेनला जाणवलं, पोटात भुकेने खड्डा पडला होता. दुपारचा तो प्रसादाचा लाडू अर्धा खाऊन त्यांनी पिशवीत टाकला होता, तेवढेच खाल्ले होते! रोशन कुठे थांबला असेल जेवायला? अजूनही तोच विचार…
“आपका खाना, वो…मैं…” काय नेमके म्हणावे, सरलाबेन अडखळल्या.
गाडी चालवता चालवता, ती बाई बोलू लागली, “ अम्मा, मैं रुकसाना, डॉ.रुकसाना अजीज, जिरेनटोलॉजिस्ट हूँ, बूढे लोगों के लिये काम करती हूॅं | मैं पाकिस्तानसे हूॅं , मगर मेरे कुछ रिश्तेदार अभी भी लखनौ में हैं|यहा मैं सत्ताईस साल से हूॅं , अब अम्रिकी हूॅं …हम आपकी मदद करने के वास्ते हैं, हमारे यहाँ आप के जैसे बहोत लोग हैं|खाना आपको मिलेगा, देसी खाना, गोश्त नाही देंगे आप को.”
“आप के जैसे?” बेनना अचानक शब्द सापडले!
“ जिनको, उनके फॅमिलीने छोड दिया हैं, ऐसे दूसरे देश के बूढे लोग.”
“छोडा, मतलब? मेरे घर नाही जा रहे हैं?” बेन अजून अविश्वासानेबोलत होत्या!
“ अम्मा, आप का बेटा, आप को छोड कर गया हैं, जान बुझ के…हम ने पोलीस को सब बता दिया हैं, अगर वो आता हैं तो उसे हम मिलवा देंगे आप से”
अशी होती रुकसाना आणि सरलाबेनची पहिली ओळख…

गाडी एका मोठ्या करड्या इमारतीच्या खाली जाऊन थांबली! आतून एक लिफ्ट वर इमारतीत जाणारी होती. रुकसाना त्यांना अगदी हळूहळू घेऊन गेली. आतला स्वच्छ प्रकाश, भव्य कॉरिडॉर बघून बेन थोड्या आक्रसल्या. हलकेच चालत तिच्यामागून निघाल्या. डोक्यात असंख्य विचारांचे मोहोळ! मन कधी विचारात, तर कधी नवी जागा, तिथले मार्ग समजून घेण्यात गुंते. एवढा सजग विचार त्यांनी गेल्या कित्येक वर्षांत केला नव्हता. म्हातारपण आलं होतं, मुलगा आहे, तो सांभाळेल म्हणून निर्धास्त होत्या त्या! मात्र आता जे घडलं होतं, घडत होतं त्याचा मेळ मनात अजिबात बसत नव्हता! एका मोठ्या केबिनपाशी रुकसाना थांबली. आत जाऊन तिथले थोडे कागद आणि पर्स उचलून ती पुन्हा बाहेर आली. सोबत एक मोठी कपड्यांची पिशवी होती. दारावरची पाटी सांगत होती, ह्या महाकाय इमारतीत रुकसाना मुख्य अधिकारी आहे. एवढी शिकलेली मोठी बाई! आपल्याला मदत करायला कशाला आली असेल? इमारतीत इतर फार मंडळी दिसत नव्हती, संध्याकाळ झाली होती! म्हणा ओहिओमध्ये संध्याकाळ अशी कधी होत नाहीच, हिवाळ्यात दुपारी दोननंतर जो अंधार दाटून येतो, तोच संध्याकाळपर्यंत काठाकाठाने साकळत जातो.
रुकसानाच्या गाडीतून पुन्हा त्या तिथल्या जवळच्या इमारतीपाशी दोघी गेल्या, तिथेदेखील अतिशय सराईतपणे रुकसाना वावरत होती. बेन हळूहळू तिच्यापाठी निघाल्या, थोडे आत चालून गेल्यावर एक भव्य हॉल होता. त्याच्या एका टोकाला एक मुलगी बसली होती, ती तिथली काम करणारी कोणी असावी, रुकसानाला बघताच तिने काही कागदपत्र तिला दिले आणि एक किल्ली दिली. ते सगळं घेऊन त्या दोघी बेनना सोबत घेऊन एका दुसऱ्या कॉरिडॉरमधून हलकेच चालू लागल्या. तिथल्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जाऊन पुन्हा तेवढ्याच भव्य कॉरिडॉरमधून चालत एका दारापाशी थांबल्या. रूम नंबर ३७३! दार उघडून ती मगाचची मुलगी आत गेली, आत दिवे लावले, तसे बेनला दिसली एक मोठी कॉट, एका बाजूला छोटी शेगडी आणि ओटा, कोपऱ्यात फ्रीज आणि एक छोटा टी. व्ही. कॉटच्या बाजूला एक कपाट. एका बाजूला एक मोठा पडदा होता, भिंत भरून! कदाचित खिडकी असावी तिथे. फिकट हिरव्या रंगाच्या भिंती आणि पडदा हलका सायीच्या रंगाचा. एवढ्या दुःखातदेखील बेनला पडद्याच्या कापडाचा पोत बघायचा मोह आवरला नाही. रुकसानामधली डॉक्टर ते टिपत होतीच मनात!

“ अम्मा यहाँ आप रहेंगी, ये ऐमिली, यहाँ रहती है, कुछ जरुरत हो तो इस फोन पर ५ दबाकर उस से बात कर सकती हो| वो हिंदी जानती है|”
“ऐमिली माताजी का खयाल रखना” रुकसाना सगळे अगदी शांतपणे सवयीने सांगितल्यासारखे सांगत होती.
ऐमिली ही इथलीच पोरगी, हिला हिंदी कसे येते? सरलाबेन मनात विचार करत होत्या, आता हे आपलं घर आहे, हे त्यांनी अजून डोक्यात साठवलं नव्हतं, समजतच नव्हतं!
“ मैं सरला, सरलाबेन बोलते हैं सब. ओहायोसे हूॅं तेरा -चौदा साल से. वो आज शायद बेटा भूल गया मुझे मंदिर में, कल वापस आयेगा तो मैं चली जाऊँगी| आपका शुक्रिया इधर रहने दिया, इस खोली का भाडा कितना होगा? मेरे पास थोडे पैसे हैं, आप बोलो|”

त्या थकलेल्या चेहऱ्यावरचे भाव कितीही स्वाभिमानी असले तरी डोळ्यात साकळलेली गोंधळयुक्त भीती रुकसानाला थेट दिसत होती, त्या डोळ्यांतले पोर रुकसानाला ओळखीचं होतं. सगळे इथे येतात तेव्हा डोळ्यांत तेच, तसेच भाव असतात, गोंधळ, राग, अपमान आणि फसवणूक! पोटच्या पोराने केलेली फसवणूक मान्यच होत नाही. इतका मोठा विश्वासघात पचत नाही एकदम! अनेक दिवस जातात, कधी वर्षं! मनाला जी चीर पडते, मायेला जो तडा जातो तो खूप खूप खोलवरचा… तरी ही इथली पहिली आई नाही, शेवटची असणार नाही, हे तिच्यातल्या डॉक्टरला अगदी ठाऊक असते.
जगभरातले लोक इथे अमेरिकेत येतात, नवीन स्वप्न उराशी बाळगून, आपला देश, आपली भूमी सोडून, भविष्य उज्ज्वल करण्याच्या नादात! मग लग्न, मुलं! सगळे इथले; मात्र मुलं सांभाळायला आईवडील हवेहवेसे वाटतात. मुलं मोठी होतात आणि आई वडील वृद्ध! अचानक हिशोब सुचू लागतात- इन्शुरन्स, डॉक्टर, त्यांच्या फिया, औषधं आणि नर्स! सगळे खर्च एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुलांचे कॉलेज, शिक्षण. इथे येऊन काही सगळेच गडगंज श्रीमंत होतात असेही नाहीच. इथे येऊन इथले मध्यमवर्गीय किंवा त्याहून खालच्या स्तरांत स्थिरावलेली मंडळी! तरी कुठून येतो एवढा आसुरी विचार! देवाच्या दरबारात उभे राहतील तेव्हा काय उत्तर देतील ही मंडळी? इतिहासातली पैतृक हत्याकांडं माहीत असली; तरी अजूनदेखील फार काही बदललेले नाही. जिवंत सोडून देतात आई बापाला हेच काय ते शेवटचे उपकार! इथे बेन रोझ फाउंडेशनसारख्या संस्था आहेत, त्या काळजी घेतात म्हणून ही मंडळी सुरक्षित तरी आहेत! इतर वेळी काय झालं असतं, कल्पना करवत नाही! अनाथ नेमकं कोण होतं?सोडून गेली ती पोरं का हे वृद्ध आईवडील?

आईवडील जिवंत असताना अनाथ होण्याचे डोहाळे लागणारी ही कोणती विषावळ आहे? रात्री झोप कशी लागते, जेवण कसे जाते ह्यांना? घरचे कसे स्वीकारतात हे असले वागणे? का ते देखील सामील असतात ह्या कटात? एवढा स्वार्थ कोणत्या दुधावर पोसला जातो!
सरलाबेन देखील सुरुवातीला वाट बघत असत पोरगा परत येण्याची.
वर्ष सरून गेलं आणि त्या आता इथल्याच झाल्या. इथल्या स्वयंपाक्याला मदत कर, कुठे आणखी कोणाशी गप्पा मार! त्यांचे दिवस तसे बरे जात होते, मात्र मुळातला उद्योजक स्वभाव काही शांत बसू देई ना!
एक दिवस रुकसाना भेटायला आली.तिच्या हातातल्या त्या पिशवीकडे बोट दाखवून विचारू लागल्या, “क्या लेकर जाती है तू? इतना सामान?”
“अम्मीजान के और मेरे कुछ कुर्ते हैं, कम ज्यादा करने थे, मगर अब नहीं होगा, वो दरज़ी दूकान बंद कर के चला गया! सोच रही थी, क्या करूँ?”
“मशीन है क्या घर पे?” सरलाबेन ने थेट विचारलं.
“नही…”
“ तो मेरे को किधर से लाकर दे दे, मैं सब सिला देती हूँ!”
तो एक दिवस… आणि सरलाबेन बदलून गेल्या!

एक साधंसं जुनं मशीन रुकसानाने त्यांना आणून दिलं आणि काही रिळं! त्यांनी सगळे कुर्ते छान मापात टाचून दिले. मग पुढे इतर लोकांचे पण कपडे टाचून दिले! काही लोकांनी पैसे देऊ केले तशा त्या थोड्या अवघडल्या. मग रुकसानासोबत बसून थोडे भाव ठरवून घेतले!

हळूहळू मशीनचे पैसे त्यांनी तिला परत केले; मग तिच्याच ओळखीने बँकेत खाते उघडले आणिपैसे साठवू लागल्या! बाकी शिक्षण यथातथा असले तरी हिशोब पक्का होता त्यांचा!
कुठूनसा त्यांना शोध लागला की पडदे आणि मोठ्या उश्या, त्यांच्या खोळी आणि रजया इथे महाग मिळतात. झालं! मग काय एक एक सुरेख नमुने तयार करून त्या विकू लागल्या! बाजारभावापेक्षा थोडे स्वस्त; तरी नफा काढून त्या नवीन काही काही विकत असत! दर दिवाळीला त्या रुकसानाला बोलावून खास काही भेट देत!
वर्षं सरत राहिली आणि ह्या भ्यायलेल्या सरलाबेन आता उद्योजिकाच झाल्या होत्या! आल्या तेव्हा पासष्ट वय होतं, आता मात्र शहात्तर सुरू होतं! गेली दोन वर्षं त्या थोड्या दिवसांसाठी भारतात जाऊन येत, त्यांच्या सरली गावात! तिथे त्यांची बहीण राहत होती, तिच्यासोबत त्यांनी त्यांचे जुने घर नीट बांधून घेतले. बहिणीसोबत हिवाळ्यात तिथेच राहत. उन्हाळ्यात नवीन कापडं, नवीन हस्तकलेचे नमुने घेऊन पुन्हा येत. अकरा वर्षं त्या नुसत्याच राहिल्या नाहीत तर बहरून आल्या इथे बेन रोझ संस्थेत!
इतर दोन तीन मशीन आणून आता त्यांनी इथे आलेल्या दोन तीन बायकांना हा उद्योग सुरू करायला मदत केली होती! त्यांचा उत्साह वारेमाप!

रुकसाना तिचा नवा प्रबंध सादर करणार होती, तिच्यासाठी खास लखनवी पोशाख घेऊन आल्या होत्या त्या!
आज त्या हिरवळीवर त्याही तिच्या अम्मीजानसोबत बसल्या होत्या. एक एक जण स्वतःचे भाषण आणि प्रबंध सादर करत होते! रुकसाना बोलू लागली. तसे त्यातले बरेचसे त्यांना समजत नव्हते; पण ही आपलीच गोष्ट आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते! टाळ्यांचा एकच गजर झाला आणि सरलाबेन भानावर आल्या! लोक त्यांच्यापाशी येऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते! काही जण फोटो काढत होते. त्या भारावून गेल्या! पट्कन रुकसानाच्या अम्मीजानचा हात धरून खाली बसल्या!

रुकसानाने, ‘नीड फॉर इकॉनॉमिक इंडिपेंडंस इन डेस्टीट्यूट एल्डर्स’ ह्या विषयावर प्रबंध लिहिला होता : केस स्टडी अर्थात सरलाबेनची!

रोशन सकाळी सिरियल खाता खाता पेपर चाळत होता. त्यात तिचा फोटो बघून त्याला जोरदार ठसका लागला!
आई जिवंत आहे ह्याचे त्याला नवल वाटले का दुःख सांगता येईना. तरी तिच्याकडे आता पैसे आहेत म्हटल्यावर त्याची नियत पुन्हा फिरलीच!
शनिवारचा दिवस! ऐमिली सरलाबेनच्या ब्रेकफास्ट टेबलापाशी येऊन हलकेच म्हणाली, “आपसे कोई मिलने आया है, कुछ काम है|”
असेल कोणी कपडे घेऊन आलेले, अशा हिशोबाने बेन नाश्ता संपवून रमतगमत लॉबीपाशी आल्या. पाठमोरी बसलेली ती आकृती, त्यांना एक क्षण भास होतो आहे, असेच वाटून गेले! इतके वर्षं ज्याची वाट मनोमन पाहत होते, तो आत्ता आला! तरी पायांतलं त्राण गेल्यागत त्या सावकाश चालत सोफ्यापाशी आल्या!

“माँ!” रोशनच्या तोंडून ती हाक ऐकून त्या एक क्षण गहिवरल्या… ऐमिलीचे सगळे लक्ष त्यांच्यावर आहे ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.
लेक आलाय, कदाचित पश्चाताप झाला असेल, कदाचित काही अडचण असेल, काही तरी असेल, त्याची मजबुरी म्हणून इतका उशीरा आला असेल. शेवटी पोटचा गोळा तो, अगदी घ्यावं पोटाशी घट्ट धरून, असेच वाटून गेले त्यांना…

तेवढ्यात रोशन बोलू लागला, “माँ पेपरमां नाम आवी गयो, बहू सरस! तमारे पास बहू पैसे थई ना?”

पुढचं काही त्या ऐकूच शकल्या नाही. डोळ्यांतपाणी तरळून गेलं. तशाच काचडोळ्यांनी त्या स्तब्ध बसून राहिल्या. एक माफीचे अवाक्षर नाही, पश्चाताप नाही, चुकीची जाणीव नाही, ‘आई तू कशी आहेस? ‘ हेही नाही, फक्त तुझ्याकडे आता खूप पैसे आहेत ना, एवढंच? अकरा वर्षांपूर्वीआईला मंदिरात सोडून दिलं, त्यानंतर ती जिवंत आहे का मेली ह्याचादेखील ज्याने अजिबात शोध घेतला नाही, तो आज पैशांवर हक्क सांगायला इथवर आलाय!
स्वामिनारायणाला स्मरून बेन विचारू लागल्या, “नवस असा कसा रे फळला? हा काय राक्षस पोटी आला माझ्या…”
तोवर ऐमिलीनी रुकसानाला बोलावून घेतलं होतंच.

रोशन एकटाच काही बोलत होता.

बेन अचानक उठल्या, तसा तो चपापला, सावरत म्हणाला, “माँ, पैसा लेवानु मैं साथे आऊँ?”

बेन एकट्याच भकास चालत ऐमिलीपाशी गेल्या, एका क्षणात त्या इतक्या थकल्या होत्या, त्यांचं चैतन्य जणू कोणी शोषून घेतलं होतं.
“ऐमिली, ये कौन आदमी है? मैं जानती नहीं रे, किसी और को मिलना होगा तो पूछ लो, मेरा कोई बेटा नहीं हैं, मेरी बेटी है रुकसाना…”

रुकसानावर रेलत, धडपडत त्या खोलीपाशी आल्या आणि गादीवर कोसळून धाय मोकलून रडल्या – पहिलं आणि शेवटचं! पोरकं होणं आणि परकं करणं, दोन्ही एकदम करून बसल्या होत्या त्या…

तो एक दिवस संपला, तशा बेन दुसऱ्या दिवशी पुन्हा बागेत आल्या. पुन्हा दुकानातून कापडं आणायला संस्थेच्या बसने जाऊ लागल्या. पुन्हा त्यांचं मशीन धडधडू लागलं आणि त्या बेन रोझच्या विश्वात पुन्हा रमून गेल्या…
उलट सुलट नाती उसवून, त्यांना सुबक आल्टर करून, नव्याच जगण्यावर नव्याच स्वप्नांचे कशिदाकाम करत राहिल्या…

सरलाबेन !

4 Comments

  1. सुंदर कथा!

  2. बाप रे!
    छान लिहिलंयस तू.

  3. सुंदर कथा प्राजक्ता, तुझ्या सांजवात पुस्तकाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनात कुठेतरी दिसलेली सरला, रुक्साना, एमिली कथेत आलीय असं वाटलं.

Leave a Reply

Your email address will not be published.