पूर्वपीठिका:
श्री.अनंत मनोहर (अण्णा) ह्यांनी आजपर्यंत एकूण सहासष्ठ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी अठ्ठावीस कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीविश्वात वैविध्य आहे. ‘द्वारकाविनाश’, ‘अरण्यकांड’, ‘ज्येष्ठ’, ‘राब’, ‘दोन मुठी तांदूळ’, ‘कापूराच्या वाती’, ‘पैलतीर’ ह्या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना लोकप्रियतेबरोबरच महाराष्ट्र राज्य पुरस्कारासह अनेक साहित्यिक मानसन्मान प्राप्त झालेले आहेत. याखेरीज त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्या (साम्रज्याचा अस्त, पूर्ण झालेले वर्तुळ, ऑपरेशन डेल्टा, राक्षसाचा निःपात, विषवृक्ष आदी) आणि रूपांतरित कादंबऱ्याही (त्या नदीच्या पार वेड्या, द्वंद्व, अगतिक, फिनिक्स, पाठलाग, डाव मांडुनी आदी) लिहिल्या आहेत. २०१४ साली श्रीमती आरती जाधव ह्यांनी ‘अनंत मनोहरांच्या कादंबऱ्या’ ह्या विषयावर ३५६ पानी प्रबंध लिहून कर्नाटक विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. ह्या प्रबंधामध्ये त्यांनी अण्णांच्या कादंबऱ्यांचे आशयविश्व, कांदबऱ्यांतली सामाजिकता आणि त्यातल्या पर्यावरणीय जाणिवा, त्यांतल्या व्यक्तिरेखा आणि अभिव्यक्तीविशेष अशा साहित्यिक अंगांची मीमांसा केलेली आहे.

मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही मामबोचे सदस्य आणि अण्णा यांच्यातली निवडक साहित्यिक प्रश्नोत्तरे प्रसिद्ध केली होती. त्यांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या वर्षी डॉ. प्रियदर्शन मनोहर यांनी अण्णांच्या कादंबरी लेखनामागच्या प्रेरणा, त्यांचा कादंबरीलेखनप्रवास, त्यात आलेल्या अडचणी, त्यांना मिळालेलं मार्गदर्शन अशा मुद्द्यांवर अण्णांशी संवाद साधला आहे. आपली लेखनाची क्षितिजं सतत विस्तारू पहाणाऱ्या मामबोकरांना हा संवाद आवडेल अशा अपेक्षेनं या अंकात प्रसिद्ध करत आहोत. वाचनाच्या सोयीसाठी किरकोळ फेरफारांसह प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात हा संवाद मांडला आहे.

१. कादंबरीलेखनाबद्दल थोडंसं

प्रश्न: साहित्याच्या मुख्य प्रकारांचा विचार केला तर कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि गद्य लेखन (ज्यात मी निबंध, लघुनिबंध, ललित, स्फुट इत्यादींचा समावेश करतो) असे पाच प्रकार मनात येतात. ह्यापैकी कथा मला सगळ्यात जास्त वाचायला आवडते, त्यानंतर ललित. नाटक मला बघायला आवडतं; तर कविता ऐकायला आवडते. कादंबरी मात्र मनाची तयारी करून, वेळ देऊन वाचायला लागते. तुमचा सगळ्यात जास्त आवडीचा साहित्यप्रकार कोणता आणि का?

अण्णा: माझ्या मते लेखकाला जे सांगायचं आहे ते सविस्तरपणे सांगण्याचा सर्वश्रेष्ठ आकृतिबंध म्हणजे कादंबरी! म्हणून मला कादंबरी वाचायला सगळ्यात जास्त आवडते. ऐंशी पानांपासून ते बाराशे पानांपर्यंत कितीही लहान अथवा मोठी कादंबरी करता येते. एखाद्या वाचकाचंच काय पण एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या देशाचं प्राक्तन बदलून टाकण्याची क्षमता कादंबरीत आहे. रूढी, परंपरा, रिवाज, संस्कृती, विचार, कायदेकानू, धर्म आणि सत्ताबदल करून कादंबरीने क्रांती घडवून आणली आहे. लागतील तितकी पात्रं वा प्रसंग कल्पून बांधणी करता येते. कादंबरीच्या लवचीकपणामुळे भाषा, शैली, रचना ह्यात नावीन्य निर्माण करता येतं. त्या मानाने नाटक किंवा कवितेला आकृतिबंधाच्या मर्यादा पडतात. त्यामुळे ते साहित्यप्रकार जास्त आव्हानात्मक होतात. कविता तू म्हणतोस की तुला ऐकायला आवडते; पण त्याला अपवाद आहेत. बालकवी किंवा बोरकर घे. त्यांची कविता नुसती वाचली तरी डोळ्यांसमोर जिवंत चित्र उभं राहतं एवढं त्या शब्दांचं सामर्थ्य आहे! त्यांना सूर – तालाच्या साथीची गरजच नाही.

प्रश्न: कादंबरीलेखनाला सुरुवात केलीत त्यावेळची तुमच्यावर प्रभाव टाकणारी एखादी आठवण आहे का?

अण्णा: कुलकर्णी ग्रंथागाराने त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रथितयश व नवोदितांकडून कादंबऱ्या मागवल्या होत्या. त्यात भाग घेतला. त्या वेळेला कोयना धरणाची हवा होती. ज्याला विचारावे तो युवक कोयनेत कामाला असे. गावोगाव ह्या धरणाची चर्चा असे. धरणामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचे पाणी वाढणार होते. कित्येक गावे पाण्याखाली जाणार होती. विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न धगधगत होता. धरणाचे दरवाजे बंद करण्यापूर्वी एक वर्ष तारीख जाहीर होते. अशा एका गावाला नोटीस आल्यानंतरचे एक वर्ष त्या गावकऱ्यांच्या दृष्टीने कसे जाईल या विषयावर मी ‘पैलतीर’ ही कादंबरी लिहिली. ती निवडली गेली. प्रकाशकांकडून मला हे कळवले जाण्यापूर्वी मला एक पत्र आले.

प्रिय श्री. अनंत मनोहर,
स. न. वि. वि.

कुलकर्णी ग्रंथागाराकडून काही हस्तलिखिते माझ्याकडे वाचनासाठी आली होती. त्यात तुमची ‘पैलतीर’ कादंबरी होती. प्रकाशकांना मी माझे मत कळवले आहे. त्यांच्याकडून तुम्हांला पत्र येईल.

ज्या वेगाने तुम्हाला कादंबरीसाठी एकापेक्षा एक उत्तम कल्पना सुचतात त्याबद्दल मला तुमचा हेवा वाटतो. परंतु सुचलेल्या विषयाचा आवाका, त्याचे वजन, त्याचा पैस यावर मांडी घालून पुरेसे चिंतन करण्यापूर्वी घिसाडघाईने कांदबरी लिहून तुम्ही मोकळे होता ह्याचे सखेदाश्चर्य वाटते. असे करू नका.

‘पैलतीर’चे काय व्हायचे ते होईल. आपण ही कादंबरी लिहिलीच नाही असे मानून तुम्ही ह्या कल्पनेवर नव्याने चिंतन करा

आपला,
जयवंत दळवी

पत्र वाचून चपराक बसल्यासारखे झाले. दळवी हे माझे आवडते लेखक. बहुआयामी असे हे लेखक. त्यांच्याशी पुढच्या काळात माझी घट्ट पत्रमैत्री झाली. त्यांच्या या पत्राने मी सावध झालो. ‘लिटरेचर इज अ सिरीयस बिझिनेस’चा खरा अर्थ दिसू लागला. केवळ झपाटल्यासारखे लिहिणे, नावावर पुस्तके आणणे म्हणजे लेखन नव्हे. वाचनीयता एव्हढाच महत्वाचा मुद्दा नाही. त्यातील ऐवज व कस हे जास्त महत्त्वाचे ही दृष्टी आली. तेंडुलकरांनी मला लिहिते केले आणि दळवींनी मला खोल पाण्यात नेले.

२. अरण्यकांड

कादंबरीबद्दल थोडंसं:

‘अरण्यकांड’ ही अण्णांची मौज प्रकाशनने १९९८ साली प्रसिद्ध केलेली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे ह्या भागातील जंगलातील प्राण्यांवर ही कादंबरी रचलेली आहे. जंगलातलं रोजच्या दिवसाच्या, मौसमांच्या आणि वर्षाच्या ऋतुचक्राप्रमाणे बदलणारं, सदैव गजबजलेलं, निसर्गातले सगळे भाव जिवंतपणाने, सच्चेपणाने कादंबरीत टिपलेलं हे प्राणिविश्व! रंग, गंध, वास-श्वास, आवाज, जन्म, मृत्यू, भीती, भूक, ममता ह्या साऱ्यांनी भरून गेलेल्या रानातल्या जगाला कोणे एके सकाळी जाग येऊ लागते त्याचं वानगीदाखल हे वर्णन पहा:

“… हत्तीसुद्धा लपू शकेल असे पंधरा फुटांपर्यंत वाढणारे सिंक्रस गवत आता पार पिवळे पडले होते – दुमडले होते – जनावरांच्या वावराने दबले होते. तरीही हरणांच्या टोळीला त्याचा चांगला आडोसा होत होता. या गवताच्या आसऱ्याला आलेल्या हरणांचा कळप केव्हाच सावध झाला होता. अगदी भल्या पहाटे कोकिळा ओरडली होती. पाठोपाठ बांबूंच्या बेटातून रानकोंबड्याने आवाज दिला होता. उजाडता उजाडता तांबडट विटकरी रंगाचा व तांबूस डोळ्यांचा भारद्वाज कुक कुकुड कुक असा ओरडला होता. पिंपळाच्या फांद्याफांद्यांवरून झोपी गेलेल्या असंख्य चिमण्या जाग्या होऊन कुलकुलू लागल्या होत्या. रानात दूर कुठेतरी मोराने म्या ओS असा टाहो फोडला होता. पोपटांचा थवाच्या थवा किर किर किर आवाज करत भर्रर्रर्र करून पिकल्या उंबरांकडे झेपावला होता. चाफ्याच्या जाडशा फांदीवर टोक टोक टोक असा आवाज करत, तांबट पक्ष्याने आपल्या चोचीने घरटे पोखरायला घेतले होते. सातबाया कलकलल्या. पूर्वदिशा फाकत चालली. आपल्या टोळीकडे सावधपणे लक्ष ठेवणाऱ्या काळविटाने त्याचे कान उंचावले…”

प्रश्न: रानावर कादंबरी लिहावी ह्याची मूळ प्रेरणा कोणती?

अण्णा: पर्वत आणि अरण्य यांच्याबद्दल असलेलं माझं आकर्षण जुनं आहे – सह्याद्रीच्या सान्निध्याने मिळालेलं. आंबवली – आस्तानपासूनचं दाट अरण्य मी कितीतरी वेळा पाहिलं आहे. तीनदा हाताच्या अंतरावरून वाघरं पाहिली. अनेक पुस्तकं वाचली. जिम कॉर्बेट, अँडरसन, जेन गुडाल, जॉय ऍडॅमसन, सारा हार्डी वाचायला मिळाले. मारुती चितमपल्ली, सलीम अली यांच्या पुस्तकांची पारायणं झाली. व्यंकटेश माडगूळकरांच्या सत्तांतर, नागझिरा, जंगलातले दिवस तसंच दुर्गा भागवतांच्या ‘अस्वल’, ‘लंगुर्स ऑफ अबू’ या पुस्तकांनी झपाटून टाकलं. ही कादंबरी मी अर्पण केली आहे ती प्रिय मित्र बंका (व्यंकटेश माडगूळकर) ह्यांनाच!

पुढच्या आयुष्यात विंध्य – सातपुडा पाहिले. कर्नाटकात नोकरीनिमित्त आल्यावर अगुंबे, नागरहाळी, दांडेलीची जंगलं पाहिली. काही दिवस अगुंब्याच्या परिसरात राहिलो. तेव्हा तिथे डाक बंगल्यात फॉरेस्ट ऑफिसर उतरले होते. त्यांना मी रानावर कादंबरी लिहितोय हे कळताच त्यांनी मला गप्पा मारायला बोलवलं. माझा इंटरव्ह्यूच घेतला! त्यांनी मला जंगलाचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलं. त्या दृष्टीने माझी तयारी करून घेतली. अजून अभ्यासासाठी काही पुस्तकं सुचवली. सौ. जाई (डॉ. मृणाल भावे, माझी मोठी बहीण) अमेरिका, ऑस्ट्रेलियात गेल्यावर मी तिथली जंगलं पाहिली. अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव मनात जमत गेला होता.

प्रश्न: पण तरी ह्यावर ललित साहित्य निर्माण होईल ह्या विचारांना चालना कशी मिळाली?

अण्णा: फ्रँक बक ह्याचं “Bring Them Back Alive” हे पुस्तक मी वाचत होतो. हा माणूस जगभरच्या प्राणी संग्रहालयांकडून विविध प्राण्यांच्या ऑर्डर्स घ्यायचा आणि रीतसर परवानगी मिळवून ते ते प्राणी जिथे उपलब्ध असतील तिथे जाऊन, ते पकडून, त्यांना बोटींतून आणायचा. तो तस्कर नव्हता, हा त्याचा व्यवसाय होता. त्यात एक वाक्य वाचनात आलं – king cobra is gifted with awareness and intellect. त्याचं झालं असं होतं की तो मलेशियात किंग कोब्रा हा अस्सल नाग पकडायला गेला होता. तिथे सतरा सतरा फुटी लांब अतिविषारी किंग कोब्रा असतात. एतद्देशीय मलेशियन लोकांच्या मदतीने त्याने एका किंग कोब्राचा माग काढायला सुरुवात केली. ह्या नागाची विष्ठा ताजी असताना काळी असते आणि जसा वेळ जात जाईल तशी ती पांढरी पडत जाते. ह्यावरून नाग त्या ठिकाणी कधी आला असावा आणि कुठे गेला असावा ह्याचा अंदाज बांधत माग काढावा लागतो. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर फ्रँकच्या असं लक्षात आलं की तो नागच त्यांचा माग काढतो आहे! They were being followed by the king cobra! हा विचार मी आणखी पुढे नेला की एखादी ललित कृती अशी लिहावी की जिच्यात माणूस पात्रं नाहीतच – फक्त प्राणीच आहेत!

ह्या दृष्टीने विचार करता करता पात्रनिर्मितीसाठी मला हत्तींचा कळप सापडला, किंग कोब्राची मादी सापडली, अस्वलं सापडली, पक्षी – प्राणी सापडले, माकडांची टोळी सापडली, स्वतःची संकटातून सुटका करून घेण्यासाठी असह्य वास निर्माण करणारी ग्रंथी असलेला मुंगूस सापडला. अगुंब्याला गजमरणाची जागा पाहायला मिळाली. जेव्हा हत्तीला आतून कळतं की त्याची जगायची ईर्षा, इच्छा, मनाची धार पूर्वीसारखी राहिली नाही तेव्हा तो शांतपणे त्या जागेकडे जातो. बाकीच्या कळपाला ते कळतं. ते शांतपणे आदब राखून त्याच्यामागून त्या जागेकडे जातात. थोडा वेळ तिथे थांबून निघून जातात. दोन दिवसांनी त्याच्यासाठी कोवळा पाला घेऊन येतात. पण तो हत्ती तो पाला खात नाही.

विशाल निसर्गचक्रात प्रत्येक प्राण्याला आपापलं स्थान आहे, काम आहे. त्यांचा जन्म – मृत्यू, संसार, वृद्धत्व, अन्न-पाण्याचा शोध, भय, निद्रा, परिसर रक्षण, कुटुंब पद्धती, घरं, शिक्षण, शिस्त आणि न्यायदान, प्रियाराधन, माणसांकडून आणि इतर प्राण्यांकडून होणारे उपद्रव आणि धोके, एकमेकांकडून करण्यात येणाऱ्या चोऱ्या – सगळं सगळं आहे तिथे! यावर आधारित ललितकृती लिहिणं हे आव्हान वाटलं मला.

प्रश्न: मौज प्रकाशन हे मराठीतलं एक सर्वोत्तम प्रकाशन गृह मानलं जातं. तर प्रकाशनासाठी इथे ही कादंबरी कशी पोचली? त्यांचा काही खास वेगळा अनुभव सांगाल का?

अण्णा: त्याची गंमत अशी झाली की तेव्हा मी शंकर रामाणींबरोबर पायी फिरायला जात असे. कुठेतरी बसून आम्ही गप्पा मारायचो. एक कप चहासाठी तासभर हॉटेलात बसलो तरी कुणी आम्हांला त्रास द्यायला यायचं नाही. अशाच एका वेळी मी त्यांना माझ्या ह्या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना सांगितली. ती त्यांना आवडली. पुढे योगायोगाने काही दिवसांनी मौजचे श्री. पु. भागवत त्यांच्याकडे आले असताना रामाणींनी माझी कल्पना त्यांना सांगितली. श्रीपुंना कल्पना आवडली आणि त्यांनी फोन करून अधिक चर्चा करायला मला तिथे बोलावून घेतलं. ऐकून घेतल्यावर ते म्हणाले,” हा विषय नवा आहे. कादंबरी लिहून झाली की हस्तलिखित वाचायला पाठवा आमच्याकडे.”

त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवल्यावर पुढचा माझा अनुभव म्हणजे खरंच विशेष होता. हस्तलिखित वाचल्यावर श्रीनिवास कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर आणि स्वतः श्रीपु ह्यांनी नोट्स काढून आणल्या होत्या. लहानातल्या लहान शंकेपासून पासून ते मोठ्या सूचना. उदाहरणार्थ – कादंबरीत वानर आणि माकड असे दोन वेगवेगळे शब्द का वापरले आहेत? त्यांनी सुचवलं की कादंबरीत थोडीतरी माणसं आणा. मग मी आदिवासी, जंगल अधिकारी आणि प्राणी पकडणारी माणसं ह्यांचा विचार केला. अशा तऱ्हेने त्या जंगलाला माणसाचा स्पर्श झाला. कल्पना विस्तारत गेली. हा प्रवास दीड वर्षं चालू होता. काही कल्पना अशा असतात की त्यावर लिहायला फारसा विचार करावा लागत नाही पण काही कल्पना इतक्या नवीन असतात की त्यावर खूप विचार, अभ्यास करावा लागतो. त्या बैठकीनंतरच्या दोन महिन्यांत मौजकडून दहा मोठी मोठी पत्रं आली – अनेक प्रश्न, शंका, सूचना… मौजचे लोक लेखकाला जणू नर्सरीत नेऊन बसवतात! पण त्या अनुभवातून मी खूप शिकलो हे निश्चित.

३. दोन मुठी तांदूळ

कादंबरीबद्दल थोडंसं:

ही कादंबरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका भिरगाव नावाच्या ‘मिडल ऑफ नो व्हेअर’ असलेल्या गावातल्या जीवनावर लिहिलेली प्रादेशिक कादंबरी आहे. उदाहरणादाखल खालील उतारा पहा:

“भातं ताब्यात आली नि माणसं आपापली ओटीपडवी धरून स्वस्थ बसली. दिडीनं, दुपटीनं उसनवार फेडून झाली. घोंगडीवाले, किराणावाले, खेडातले वाणी दुकानदार आपापला शेर वसूल करून मोकळे झाले. रकमांची व्याजं भरून घेऊन सावकार पावते झाले. घाटावरून बहुरूपी, गोंधळी, पोवाडेवाले, महादेव, सनईवाले, फेरीवाले, वासुदेव, कोल्हाटी, नंदीवाले, डोंबारी, अस्वलवाले येऊन आपापला शेरपसा घेऊन निघून गेले.

कोकण पिकलं होतं. बऱ्याच दिवसांनी खूप स्वच्छ चांदणं पडलं होतं. भिरगाव चांदण्यात भिजत होतं. मी उंचीवरून भिरगावकडे पाहत होतो. आत्ता भिरी नदी वाहत होती. दोन-तीन महिन्यांत भिरीचा प्रवाह पार नाहीसा होणार होता. मग उरणार होता तो डोह. त्याच्या शेजारी विरळ-विरळ पसरलेली कुणब्यांची वाडी. पलीकडचा मोहल्ला. ही रावांची घरं. ही मधेच असलेली चावडी. हे भिरोबाचं देऊळ.

असं एक गाव आहे पृथ्वीवर, हे किती जणांना माहीत असेल? भिरगावची भूक, तहान, कष्ट, ऊन, पाऊस यांना तोंड देत जिद्दीनं – हट्टानं जगणारी माणसं तरी कुणाला माहीत आहेत?….”

प्रश्न: ही कादंबरी तुम्हांला कशी सुचली?

अण्णा: ही कादंबरी माझ्या मनात बीजरूपानं बरीच वर्षं होती. त्याकाळी श्री. ना. पेंडसे, गो. नि. दांडेकर, मधू मंगेश कर्णिक असे मोठे लेखक कोकणावर कादंबऱ्या लिहीत होते. पण तरी टीकाकारांचं समाधान होत नव्हतं. हे मोठे लेखक लिहीत असताना कोकणातल्या जीवनाचं मला काही वेगळं कळलेलं इंगित सांगणारी कादंबरी लिहायचं धाडस करावं का? पण गोष्ट मनातून जात नव्हती: गोष्टीतला नायक एसएससी आणि टीचर्स ट्रेनिंग झालेला एक खान्देशचा मुलगा. तो शेतमजुरी करत असतो, म्हणजे एकप्रकारचा वनवासच! तो शिक्षकाची नोकरी शोधत असतो. सहा महिन्यांनंतर त्याला रत्नागिरीला मुलाखतीला बोलावतात आणि हा केशव दगा पाटील रा. कापडणे, मु. पो. धुळे इथला कोवळा तरुण रत्नागिरीला जातो. त्याला प्रचंड लांब वाटणाऱ्या ह्या प्रवासात सारा भूगोल बदलून गेलेला आहे. एका बाजूला ऊर फोडणारी दरी आणि दुसऱ्या बाजूला अगदी हाताच्या अंतरावर असलेला आभाळात घुसलेला डोंगर! एसटीच्या प्रवासातच त्याला भविष्याची भीती वाटते असते. पण त्याला ती शिक्षकाची पक्की नोकरी मिळते आणि त्याची भिरगावच्या छोट्याशा प्राथमिक शाळेत नेमणूक होते. तो मनाचा हिय्या करतो आणि स्वतःच्या मनाशी दोन गोष्टी ठरवतो:

१. आपल्याला उत्तम शिक्षक व्हायचं आहे.

२. आपल्याला इथे मुळं रोवून राहायचं आहे. आपण इथे केवळ नोकरीसाठी नाही तर आपलं आयुष्य जगण्यासाठी आलेले आहोत ह्याचं विस्मरण होऊ द्यायचं नाही.

ह्या दृष्टीने विचार केल्यावर मला माझ्या मनातली कथा मोठी होऊन तिची कादंबरी होईल असं वाटलं. केशव आता तिथे त्रयस्थ म्हणून नोकरी करणार नाही – तो त्या गावाशी समरस होणार आहे. गावकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न त्याला कळत जाणार आहेत. इथे कथा मोठी होऊन कादंबरी होते.

प्रश्न: ह्या विचारमंथनाचा तुम्हांला पुढे किती आणि कसा उपयोग झाला?

अण्णा: खूपच! ही कादंबरी म्हणजे माझ्या पुढच्या ‘राब’ कादंबरीचं मूळ आहे. त्या कादंबरीत मानवी मनाचं आणि जीवनाचं अधिक सूक्ष्म चित्रण आहे. प्रखर, ढळढळीत वास्तव आहे. एक मुख्य मुद्दा असा असतो की जे आपल्याला माहीत नाही ते आपण लिहायचं नाही. मी माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात तशी चूक केली होती. एका कथेत मी माझा कथानायक त्याच्या मोटारगाडीतून त्याच्या माथेरानला असलेल्या बंगल्यावर जातो असं लिहिलं होतं. पण संपादकांनी मला विचारलं – अहो! आता माथेरानला गाडीरस्ता झालेला आहे का? कारण त्याकाळी तो नव्हता! अशी चूक होता कामा नये. त्यामुळे जे आपण लिहितो त्या मातीशी आणि जीवनाशी इमान ठेवावं लागतं. साहित्य हे जीवनस्पर्शी व्हायला हवं – केवळ ‘हा पहा कोकणातला एक स्पेसिमेन’ असं लिहून चालत नाही.

प्रश्न: ह्या अनुषंगाने मला मराठी साहित्यातल्या प्रादेशिक कादंबऱ्यांबद्दल तुमचं मत काय आहे ते विचारायचं आहे. मराठी साहित्यात ह्या कादंबऱ्यांचं नेमकं मोल आणि योगदान काय आहे?

अण्णा: प्रादेशिक कादंबऱ्यांनी अनेक ठिकाणचं प्रत्यक्ष जीवन साहित्यात आणलं. पुणे- मुंबईच्या शहरी जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या जातच होत्या. त्या आधीच्या काळातल्या खांडेकर ह्यांच्या स्वप्नाळू, ध्येयवादी आणि अलंकारिक भाषेतल्या कादंबऱ्या होत्या. ना. सी. फडक्यांच्या रोमँटिक कादंबऱ्या होत्या. त्यात रंजकता होती. चकचकीत, गुळगुळीत भाषा होती – पण ते जीवनाचं चित्रण वरवरचं होतं. ह्याच्या उलट प्रादेशिक कादंबऱ्यांनी साहित्याला प्रत्यक्ष जीवनाच्या, जिवंत अनुभवांच्या, बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या समीप नेऊन उभं केलं. हे त्यांचं फार मोठं कार्य आहे. इथून मराठी साहित्याला वास्तवदर्शी असं एक वेगळं वळण फुटलं.

४. राब

कादंबरीबद्दल थोडंसं:

‘राब’ कॉन्टिनेन्टल प्रकाशन ने १९८१ साली प्रथम प्रसिद्ध केली. ह्या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ह्या कादंबरीच्या मलपृष्ठावर ‘राब’बद्दल असं लिहिलेलं आहे: ‘सह्याद्रीच्या कुशीतले आनेगाव, त्यातील माणसे, चांगली आणि वाईट अशी, त्यांची नातीगोती, परस्परांतील बांधिलकी, हेवेदावे आणि वैरदेखील; त्यांचे आपापसातले व्यवहार, मनाच्या मानी आणि माथ्याच्या संतापी अशा ह्या सह्यपुत्रांचे ज्ञान-व्यवहारज्ञान-अज्ञान, श्रद्धा आणि अंधश्रद्धाही…’

प्रश्न: ‘राब’ च्या निर्मितिप्रक्रियेबद्दल सांगाल का?

ही कादंबरी मला सुचली होती. मनात भरून राहिली होती, पण बाहेर पडत नव्हती. मला जे म्हणायचं होतं ते मला म्हणून टाकता आलं असतं पण ते अनुभवकथन झालं असतं – त्याची कादंबरी झाली नसती. जे मनात आहे ते लेखकाने घाई करून ओरबाडून टाकायचं नसतं. त्याला जन्म घ्यायला वेळ द्यायला हवा. ह्या कादंबरीचा फॉर्म मला सापडत नव्हता. अशाच अस्वस्थपणात एक दिवस सकाळी शेजाऱ्यांच्या रेडिओवरून ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकू आला “घनु वाजे घुणघुणा”. तो अभंग मी ऐकत होतो आणि एकीकडे सकाळची कामं उरकत होतो. अचानक त्या अभंगातला शेवटचा चरण आला: ‘दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले’ आणि मी एकदम चकित झालो. मनात विचार आला: आपण आरशापुढे उभे राहतो तेव्हा आपल्याला आरशात जे दिसतं ती एक प्रतिमा, खऱ्या अस्तित्वाचं एक प्रतीक आहे. पण ते खरं अस्तित्व नव्हे, त्रिमिती अस्तित्व नव्हे. म्हणजे मला जे सांगायचं आहे त्याचं प्रतिबिंब मला दाखवायला हवं आहे. त्यावरून वाचकाला खऱ्या अस्तित्वाची प्रचिती येईल. म्हणून मग मी माझ्या कथानकातला नायक बाहेरगावाहून कोकणात आला असं दाखवायचं ठरवलं. म्हणजे नायकाच्या ह्या नव्या कोऱ्या मनाच्या आरशात सह्याद्रीच्या जीवनाचं प्रतिबिंब पडेल आणि ते मला लेखक म्हणून स्वतंत्र राहून रंगवता येईल. त्या अनुषंगाने मी विचार करायला लागलो आणि मग मला त्यातली पात्रं आणि प्रसंग दिसायला लागले. मला सांगायच्या अनेक गोष्टींचे स्वतंत्र तुकडे न राहता त्यांची जुळणी होऊन एक एकसंध मोठी कहाणी होऊ लागली. आणि मग मी प्रत्यक्ष लिहायला सुरुवात केली…”

५. द्वारकाविनाश

कादंबरीबद्दल थोडंसं:

“सृष्टीतील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाला युद्धाचे सर्वनाशक रूप पाहूनही शहाणपण का येत नाही? तो युद्धाचा आसरा का घेतो? खरे तर कोणतेही युद्ध अंतिम नसते, निर्णायक नसते. युद्धात हरल्याच्या जखमा माणसे मनात ठेवतात. योग्य संधी पाहून मागल्या पिढीचा हिशेब फेडण्यासाठी पुन्हा एकदा नव्या युद्धाला आमंत्रण देतात. महाभारत हे कौरव-पांडवांचं युद्ध. त्या युद्धाच्या पायात कोणती कारणं दिसतात? सत्तालोभ, राक्षसी महत्त्वाकांक्षा, सुंदर स्त्रीबद्दलची अभिलाषा, मत्सर, वैर, सत्तेत भागीदार नको असणे… कालच्या, आजच्या, उद्याच्या युद्धांच्या इतिहासात हीच कारणे सापडतील.”

प्रश्न: तुमच्या द्वारकाविनाश कादंबरीमागची मूळ प्रेरणा कोणती? कादंबरी वाचल्यानंतर जाणवतं ते हे की ह्या कादंबरीतून तुम्हाला कोणती धार्मिक कथा सांगायची नाही, कोणतं ऐतिहासिक संशोधन मांडायचं नाही. मग ह्या कादंबरीमागचा मुख्य विचार कोणता आहे?

अण्णा: जगभरात अनेक साम्राज्यं निर्माण झाली. अशा साम्राज्यांच्या पाठीमागे एक धगधगती महत्त्वाकांक्षा असलेला कर्तबगार पुरुष असतो. परंतु ते साम्राज्य उभं करणाऱ्या पुरुषाला हे साम्राज्य भोगण्याची उसंत नसते. शिवाजी महाराजांचंच उदाहरण घे. मराठी साम्राज्य उभं करून केवळ वयाच्या पन्नासाव्या वर्षी ते गेले सुद्धा. पुढे काही पिढ्या हे साम्राज्य टिकतं आणि मग त्यांचा लोप होतो. वाढलेल्या साम्राज्याचा पसारा सावरण्यासाठी जेव्हा पुढील पिढ्यांतून पराक्रमी वीर निर्माण होत नाहीत तेव्हा विनाशाकडे ही वाटचाल अटळ असते. सवते-सुभे निर्माण होतात. नीतिमत्ता ढासळते. अंतर्गत कीड लागते. मोठ्या साम्राज्यांच्या अस्तित्वाप्रमाणेच त्यांच्या विनाशामागेही सूत्र असतं. ह्या कादंबरीत यादवी साम्राज्याचा, द्वारकेचा अस्त कसा झाला त्याचा वेध घ्यायचा मी प्रयत्न केला आहे.

प्रश्न: यादवी साम्राज्याचा अस्त एकमेकांतील भांडणामुळे झाला असं आपण ऐकतो. म्हणूनच आज आपापसांतल्या, कुटुंबातल्या भांडणांना ‘यादवी युद्ध’ म्हणतो. बरोबर आहे ना?

अण्णा: बरोबर आहे. यादवी साम्राज्य नष्ट व्हायला आणखीही अनेक कारणं होती. एक म्हणजे महाभारतीय युद्धानंतर यादवांनी भारतात आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. तेव्हा सारा भारतदेश इतका कमकुवत झाला होता की यादवांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नव्हता. त्या निरंकुश अधिकारामुळे यादव उद्दाम, विलासी आणि मद्यपी झाले होते. बलराम तर सदैव मद्यधुंद असे. त्याने आपल्या कुटुंबातल्या म्हाताऱ्या लोकांना आणून वेगवेगळ्या ठिकाणी गादीवर बसवलं. वसुदेव-देवकी, उग्रसेन – हे इतके म्हातारे होते की त्यांना स्वतःला सांभाळता येत नसे. ते मोठं साम्राज्य काय सांभाळणार? बलरामाची ही अवस्था तर दुसरीकडे कृष्ण उद्विग्न झाला होता. त्याचं कुणावरही लक्ष नव्हतं. विषण्ण होऊन तो रानावनात फिरत होता. अशा परिस्थितीत यादवांनी एकमेकांशी स्पर्धा आणि वैर करून मारामाऱ्या सुरू केल्या. हे सगळे यादव सहलीसाठी बाहेर गेले असता त्यांनी एकमेकांचं शिरकाण चालवलं आणि स्वतःचा विध्वंस करून घेतला. समुद्रकिनारी बसलेल्या बलरामाला एका मोठ्या लाटेनं समुद्रात ओढून नेलं. एका बाणाने कृष्णाचा वेध घेतला. त्यावेळी त्याच्या हातात ना काही बदल करण्याची शक्ती उरली होती ना काही इच्छा उरली होती.

पण लेखक म्हणून एवढ्यानंच माझं समाधान झालं नाही. कृष्ण उद्विग्न का झाला? प्रद्युम्न कर्तबगार होता तरी त्याला राज्य न देता त्याच्या इच्छेविरुद्ध म्हाताऱ्या लोकांकडे राज्यकारभार दिला गेला म्हणून का? की महाभारतीय युद्धातला संहार बघून तो उद्विग्न झाला? पण कृष्ण द्रष्टा होता. त्याला हा संहार घडणार हे माहीत होतं. हे युद्ध अटळ आहे ह्याची जाण त्याला होती; की पांडवांना काही वेळा अधर्माने वागून युद्ध जिंकून दिल्याचा शोक त्याला वाटत होता? जमिनीत फसलेलं रथाचं चाक बाहेर काढायचा प्रयत्न करत असताना, युद्ध करण्याच्या शारीरिक अवस्थेत नसताना कर्णावर त्याला ठार मारण्यासाठी बाण सोडण्याचा अर्जुनाला दिलेला आदेश त्याला डाचत होता का? की गांधारीचा शाप त्याला भोवला? “तुला हवं असतं तर तू युद्ध टाळू शकला असतास. पण ते तुला नको होतं. तुला युद्ध हवं होतं. आणि त्याची जबाबदारी तुला कौरवांच्या माथ्यावर मारायची होती. तुझी शिष्टाई कुटील होती. माझ्या पुत्रांना चिथावून हे युद्ध करण्यास तू त्यांना भाग पाडलंस. तू ह्या वागण्याची कटू फळं भोगशील…” गांधारी म्हणाली होती. त्या युद्धात कुरुकुलाचा नाश झाला आणि आता यादव कुळाचा सर्वनाश. द्वारका पाण्याखाली चालली होती. सर्वंकष विनाश घडत होता. हे कृष्णाला अटळ वाटलं होतं. कृष्णाच्या युद्धोत्तर वागण्याचं समाधानकारक उत्तर मला कादंबरीत देता आलेलं नाही असं मला वाटतं.

प्रश्न: श्रीकृष्ण, बलराम अशा देवता किंवा देवतासमान व्यक्तींबद्दल लिहिताना तुम्हांला दडपण नाही का आलं किंवा काळजी नाही का वाटली की कदाचित लोकांच्या धर्मभावना दुखावतील? विशेषत: हल्लीच्या काळात जेव्हा कशाचंही भांडवल करण्यात येतं आणि त्यातून अनर्थ घडवले जातात.

अण्णा: ही ऐतिहासिक कादंबरी नाही, सामाजिक आहे! इथे श्रीकृष्ण, बलराम ही पात्रं आहेत, देव-देवता नाहीत. ऐतिहासिक घटना बदलता येत नाहीत पण पात्रं निर्माण करताना लेखकाला त्यांच्या जीवनातच काय पण मनातही डोकावून बघायची मुभा असते. वाचक एकाच तऱ्हेने विचार करतो पण लेखकाला मात्र त्या पात्रांचा विचार वेगवेगळ्या अंगांनी करायचा असतो. त्यामुळे पात्रं साकार करताना कुणाला काय वाटेल ह्या गोष्टीचा विचार लेखकाने करायचा नसतो. त्याने स्वत:शी प्रामाणिक रहायला हवं!

६. रूपांतरित कादंबऱ्या

प्रश्न: भाषांतर किंवा अनुवाद आणि रूपांतर ह्याच्यात नक्की फरक काय आहे? रूपांतर ही लेखकाची एक स्वतंत्र निर्मिती धरली जाते का?

अण्णा: भाषांतर/अनुवाद आणि रूपांतर ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. भाषांतरात लेखकाने काही स्वातंत्र्य घेतलेलं नसतं. त्यामुळे अशा तऱ्हेचं साहित्य काही वेळा कृत्रिम वाटतं. कारण नव्या ठिकाणी नव्या भाषेत ते नीट रुजत नाही. भाषांतरात किंवा अनुवादात केवळ पुस्तकाची भाषा तुम्ही बदलत असता मात्र रूपांतरात कथेची मध्यवर्ती कल्पना घेऊन तुम्ही वेगळी स्वतंत्र निर्मिती करत असता. रूपांतर करत असताना मूळ कथावस्तू तुम्ही तुमच्या संस्कृतीमध्ये जेव्हा आणता त्यावेळेला तुम्हाला अनेक गोष्टींशी इमान ठेवायला लागतं.

एक उदाहरण द्यायचं झालं तर ‘द फिलाडेल्फियन’ नावाची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे. लेखक: रिचर्ड पॉवेल. फिलाडेल्फियामध्ये केवळ तुम्ही चार पैसे मिळवले म्हणून तुम्हांला खानदानी मानत नाहीत. हे मी वाचलं आणि मला असं वाटलं की हे आणावं आपण. खानदानी घराणी सगळीकडे आहेत उदाहरणार्थ गुजराथमध्ये लुहाणा असतील, ठक्कर असतील, रावळ असतील, जानी असतील, शहा, पटेल, देसाई असतील. खानदानी होण्यासाठी तुमची एक विशिष्ट संस्कृती, एक परंपरा त्या घराण्यानं कमावलेली असावी असते आणि त्याच्याशी त्यांचं इमान असतं. ह्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित ‘त्या नदीच्या पार वेड्या’ ही कादंबरी मी लिहिली. गुजराथी समाजावर ही कादंबरी आधारलेली आहे. ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि ‘दादूमिया’ ह्या टोपण नावाने लिहिणारे डॉ. नेने ह्यांचं प्रकाशक बेहेरे ह्यांना पत्र आलं की मी गुजराथेत इतकी वर्षं राहतोय पण ‘अनंत मनोहर’ ह्या लेखकाला मी कुठल्याही सभा-समारंभात बडोदा किंवा अहमदाबाद इथे भेटलो कसा नाही? हा लेखक गुजराथेत अनेक वर्षं राहिलेला असला पाहिजे त्याशिवाय तो असं लिहू शकणार नाही! मी खुलासा केला की मी आजतागायत अहमदाबादला गेलेला नाही; पण तिथले काही लोक बेळगावला राहतात. मी त्यांच्याशी अनेक वेळा बोललो, आय पिक्ड देअर ब्रेन्स आणि मी माहिती जमवली. अहमदाबादचा इतिहास, त्याची वाढ कशी झाली, तिथली घराणी, त्यांची परंपरा, नवं आणि जुनं अहमदाबाद ह्यांतला फरक…ह्याचा मी अभ्यास केला आणि हे सगळं मी माझ्या कादंबरीत वापरलं.

प्रश्न: ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही रूपांतरं केलीत का?

अण्णा: हो – अशीच अजूनही काही चांगली रूपांतरं माझ्या हातून लिहिली गेली ह्याचं मला समाधान वाटतं. हेन्री डेंकरची ‘द फिजिशियन्स’ ही कादंबरी मी मराठीत ‘द्वंद्व’ ‘च्या रूपाने आणली. इथे मेडिकल मालप्रॅक्टिसचा एक खटला आहे. एखाद्या पेशंटने त्याच्या भूतकाळात घडलेल्या काही घटना डॉक्टर पासून दडवून ठेवल्या आणि त्यामुळे दिशाभूल होऊन डॉक्टरने योग्य उपाय योजना केली नाही तर ती त्याची चूक होऊ शकत नाही. हेन्री डेंकरच्याच ‘द स्कोफिल्ड डायग्नोसिस’ ह्या कादंबरीत लहान मुलांना झालेल्या मारहाणीमुळे (चाईल्ड अब्यूज) त्यांच्या मेंदूला इजा होण्याची शक्यता असते असा विषय घेतलेला आहे. शिस्त लावण्यासाठी लहान मुलांना मारणे हे आपल्याकडेही होतंच. म्हणून हा विषय मी मराठीत ‘अगतिक’ ह्या कादंबरीतून आणला. ‘डाव मांडुनी’ ही कादंबरी बेट्टी मॅक्डोनाल्डच्या ‘ओनियन्स इन द स्ट्यू’चं रूपांतर आहे. वयात येणारी मुलं अकारण विचित्र वागतात, भांडतात हा सगळयांना येणारा अनुभव. प्रत्येक संस्कृतीत हे कायम घडतं. ‘ती ती पदे नित्य फिरूनी येती’ असं आपण म्हणतो त्याप्रमाणेच. म्हणूनच अशा एका वाढत्या वयाच्या मुलांच्या कुटुंबाची कहाणी मला लिहावीशी वाटली.

पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की रूपांतर कितीही चांगलं केलं तरी रूपांतराला लोक स्वतंत्र निर्मिती म्हणणार नाहीत.

प्रश्न: मग इतर भाषांतून उपलब्ध असलेल्या साहित्याचं भाषांतर न करता ते रूपांतरित करून रसिकांपर्यंत नेमका फायदा कोणता होतो?

अण्णा: रूपांतर करून वेगवेगळे विषय आपल्याला आपल्या मराठी साहित्यात आणता येतात. मूळ कथेचा गाभा किंवा ‘कांदा’ दुसऱ्या कुणाचा असला तरी त्यातला स्ट्यू म्हणजे रस्सा आपला पाहिजे! त्यातले धने, मसाला, वाटण-घाटण, कोथिंबीर आपली पाहिजे म्हणजे ते साहित्य आपल्याला आपलं वाटतं. इथे लेखकाने मध्यवर्ती कथाकल्पना – म्हणजे तो निर्मितीचा कंद घेऊन त्यावर स्वतंत्र विचार करायचा असतो. तो कंद त्याने आपल्या जमिनीत, आपल्या मातीत रुजवायचा असतो. त्यासाठी ही परकी कथा आता ज्या नव्या ठिकाणी रुजणार आहे तो प्रदेश कसा आहे, तिथल्या चालीरीती कशा आहेत, खाणंपिणं कसं आहे, सणसमारंभ-उत्सव कसे आहेत, हवामान कसं आहे, नातीगोती कशी निभावली जातात ह्याचा विचार करायला हवा. ते सगळं वातावरण निर्माण व्हायला हवं. मूळ कथेचं प्रतिबिंब ज्या नव्या संस्कृतीच्या आरशात पडायला हवं तिथला आरसा सदोष असता कामा नये. उदाहरणार्थ विदर्भातल्या घराच्या अंगणात नारळाची झाडं उगवणार का? असं नाही करता येणार. ह्यासाठी लेखकाने ग्राउंड वर्क करायला हवं. त्या त्या स्थळांना/प्रदेशांना भेट देणं, चार स्थानिक लोकांशी बोलणं महत्त्वाचं असतं. दोन्ही भाषांचा अभ्यास चांगला असावा लागतो. वेगळी संस्कृती अभ्यासण्याची तयारी असावी लागते. संस्कृतीच्या पिढ्यानपिढ्यांच्या खुणा ओळखाव्या लागतात. त्यानंतर कादंबरी रचनेच्या दृष्टिकोनातून स्वतंत्रपणे प्रसंग आणि संवाद रचले पाहिजेत. इथे लेखकाची लेखणी फुलली पाहिजे. म्हणूनच रूपांतर करणं वाटतं तितकं सोपं नाही. ती एक नवनिर्मितीची प्रक्रिया असते. रूपांतरित कादंबरी जवळ जवळ स्वतंत्रच लिहायची असते. तरच ती कथावस्तू नव्या संस्कृतीत, नव्या भाषेत, नव्या संवादांतून रुजते आणि वाचकाला आपलीशी वाटू शकते. अर्थात मूळ लेखकाचं ऋण हे मान्य करायचंच असतं. रूपांतर करण्याआधी मूळ लेखकांना पत्र लिहून कळवायचं हा शिष्टाचार आहे. माझा अनुभव असा आहे की लेखक परवानगी आनंदाने देतात. आपल्या साहित्याचं कोणत्यातरी दुसऱ्या वेगळ्या भाषेत रूपांतर होतंय ही त्यांच्यासाठी आनंदाचीच गोष्ट असते!

संपादकाचे चार शब्द:

अण्णा आणि डॉ. प्रियदर्शन मनोहर यांच्यातला संवाद वाचणं हा खजिन्यानं भरलेल्या गुहेत फिरण्यासारखा प्रकार असतो. याचं संपादन हा माझ्यासाठी अतिशय समृद्ध आणि आनंददायी अनुभव होता. कादंबरी म्हणजे लेखनातला ‘बडा ख्याल’. तो तब्येतीत लिहावा लागतो आणि वाचावाही लागतो. या संवादात अण्णांनी कादंबरीलेखनाच्या सगळ्याच अंगांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. सोशल मीडियामुळं लिहायला अनेक नवीन व्यासपीठं मिळाली आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण यामुळं चिंतन करून, विषय मनात मुरवून लिहायचं प्रमाण कमी झालंय. या पार्श्वभूमीवर हा संवाद एकूणच सशक्त लेखन कसं करावं याचाही धडा देऊन जातो. मामबोच्या लेखनाबद्दल सजग आणि प्रयोगशील असणाऱ्या सदस्यांना हा संवाद नक्कीच मनोरंजक आणि मार्गदर्शक वाटला असेल यात शंका नाही. नेमके आणि मार्मिक प्रश्न विचारल्याबद्दल डॉ. प्रियदर्शन मनोहर यांचे आणि आपलं ज्ञान आणि अनुभवाचं भांडार मोकळं केल्याबद्दल अण्णांचे मनःपूर्वक आभार!

(श्री. अनंत मनोहर (अण्णा) ह्यांच्याबरोबर केलेली साहित्यिक चर्चा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *