“अं… काय?”
पण फोनवरचे पुढचे शब्द अलकाच्या कानांवरून ओघळून गेले. ‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही. पुढे पस्तावशील…’
“ए पुढचं कशाला बघायचं. आत्ताचा क्षण आपला. तो पुरा भोगून मी मोकळा आणि आयुष्य असलं किंवा नसलं; तरी आपला मृत्यू नक्की आपल्या हातात असतो ताई! पस्तावायला वगैरे उरलो तर ना.” खळाळून हसण्याच्या धडपडीतूनही डोकावलेलं विमनस्कपण.
हातातून गळलेल्या फोनमधून सदानंदचं “हॅलो, हॅलो…”
आणखीच मोठ्यांदा. चिंताक्रांत? की तिलाच तसं वाटलं… थोडं सावरत ती म्हणाली.
“आं… हो. समजले. निघतेच मी. दादरच्या घरी ना? तूही येतोयस ना शक्यतो लवकर?”(हे कशासाठी?)
फोन खाली ठेवून ती उठली आणि मागचं-पुढचं काही दिसत नसल्यासारखी स्वयंपाकघरात गेली. समईला निरोप देण्याच्या हळुवारपणे तिनं गॅस बंद केला. कपाटातून पर्स काढून घेतली, चावी आहे ना बघितलं आणि चपला अडकवून दार लोटून बाहेर पडली. खट् करून लॅच बंद झाल्याचा आवाज आला आणि मनात आलं; तिथं मीनलही असणार. अर्थातच. त्याची साक्षात बायको म्हणजे असणारच. साडी बदलायला हवी होती का? आरशातही कसं डोकावले नाही? कशासाठी? कुणासाठी? दचकली अलका. स्वत:लाच. आरशात आपलंच विद्रूप दिसल्यागत.
रस्त्याला लागून टॅक्सी मिळेपर्यंत पाय उभे होते, पण टॅक्सीत बसल्याक्षणी विचित्र कंप सुटला. कानशिलं थडथडू लागली.

‘परिस्थितीवरची तुमची पकड कधी सुटत नाही ताई. आश्चर्य वाटतं… ताकद आहे मोठी. आपलं भवितव्य आपल्या मुठीत असल्याची खात्रीच जणू, दर क्षणी…’

ड्रायव्हरला सांगायला दादरचा पत्ता आठवला बिनचूक. रस्त्याची डावी-उजवी वळणंही सांगता आलीच. पण मग सगळे जिने जवळ जवळ धावत चढून पोचल्यावर तिथेच मट्कन बसकण घालावी, असं का वाटलं? बेलचं बटण दाबण्यासाठी चक्क स्वत:ला गोळा करावं लागलं तिला. बिल्डिंगमधे इतर सगळीकडे सामसूम. काहीच कुठे गैर घडलं नसल्यागत. कहर खरंच या मुंबापुरीचा.तिकडे गावाकडे अशी काही घटना घडली असती तर एव्हाना सारा गाव गोळा झाला असता. क्षणभर मनात असंही आलं, बातमी चुकीची तर नाही ना समजली सदाला? त्याच बळावर तिनं बेल दाबली. दार कुणा परक्या चेहे-याच्या इसमानं उघडलं, आणि आतल्या खोलीकडे बोट दाखवलं.
बाप रे. म्हणजे बॉडी आतमध्ये आहे की काय? नको होतं यायला आपण. एकटीनं.सदाला म्हणायला हवं होतं तसं… काय उरलं असेल आता? नकळत तिची नजर हॉललगतच्या टेरेसकडे वळली.झोका हलतोयसं वाटलं…

‘लाटांची मंजुळगाणी, वा-याच्या लहरीवाणी, हलकेच येत भरभरूनी, गहिवरल्या अंत:करणी…’ मनोजचाच आवाज हा. ‘कविता-बिविता ताई आता फक्त थोडा वेळ. तुमच्यासाठी. पिताश्री म्हणतातच ना, माणसाला कधीतरी मोठं व्हावं लागतं. आता आपलं टार्गेट एकच. रगड पैसा कमवायचा; काय?’

‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि …’ स्वत:च्याच आवाजाला अलका भ्याली. आपण इथंच काय उभ्या राहिलोत, वेंधळ्यासारख्या.आत जायला हवं.पदर दोन खांद्यांवरून लपेटून घेतला. कशासाठी?एकाच खांद्यावर असेल तर आपल्याला दु:ख कमी झालंय असं वाटेल? आतून आईंचा विचित्र विलाप… अरे कुणी तरी मला न्या रे.माझं बछडं. वाट बघत असेल रे… अरे आई रे मी त्याची…. असा कसा पडला रे…अरे मला न्या रे.. त्याला माहितीये, एक आईच रे बाळा तुझी… अरे बाळा समजतं..मला सगळं समजतं… अलका आत शिरून आजूबाजूला कुणाकडे न बघता खाली सतरंजीवर बसली. कुणाला तरी सुचलंच असेल, येणाऱ्या -जाणाऱ्यांच्या उपचारापुरती सतरंजी अंथरायचं. सगळ्या नजरा आपल्यावरती तर रोखल्या नसतील ना?
अरे बाळा समजतं.. मला सगळं समजतं… या हे मला उद्देशून तर म्हणत नसतील? मीनल कुठे आहे?तिनं अर्धवट नजर वर उचलून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. समोरच होती.डोळे नुसतेच भकास वाहत होते.तोंडातून अवाक्षर नाही. ताठर बसलेली. हिलाही तसंच वाटतंय? हिच्याजवळ कुणी कसं नाही?मी तिच्याजवळ बसायला हवं होतं? की पुढे होऊन आईंना सावरायला हवं?जमलेल्या मावश्याकाक्यांना सुचू नये?

मूर्ख. भेकड मुलगा मनोज. पुचाट.अरे हे काय करून बसलास?एकुलत्या एका लेकाच्या आईबापांनी आता कुणाकडे बघायचं? पुचाट.. शेपूट पायात घातलेला…
‘पुचाट. शेपूट पायात घालू नकोस. घरी जा तुझ्या नीट , आणि काय सांगायचं ते तिला सांग समजावून. मला आत्ता इथे तुझा तमाशा नकोय….’

अलका पुन्हा स्वत:च्याच आवाजाला भ्याली. तिच्या पोर्चमधे गस्तीवरच्या दोन पोलिसांनी आणून उभा केलेला मनोज. ‘५६०-इ म्हणाले पत्ता. बऱ्या घरचा माणूस दिसतोय म्हणून केस न करता आणला इथं बघा. जास्त झालेली दिसते.’ त्यांच्या हातावर चिरीमिरी ठेवून तिनं फाटक लावून घेतलं. नाइटगाऊनमध्येही राणीच्या रुबाबात वावरणाऱ्या अलकाचा हात धरायला मनोज पुढे झेपावला. थोड्या जरबेनं, थोड्या मायेनं तिनं त्याच्याकडे पाहताच वरमून मागे सरला. पोर्चवरच्या वेताच्या खुर्चीत ढेपाळला. जड जिभेने जुळवाजुळव करीत काही बोलायचा प्रयत्न करीत असलेल्या, गुडघ्यात तोंड घालून बसलेल्या मनोजचे खांदे घुसळून ती करारीपणाने म्हणाली, ‘ रात्र फार झाली आहे. सदा घरी नाही. कॉन्फरन्सला गेलाय बंगलोरला. राजाला तुला घरी सोडून यायला सांगते. पुन्हा असा तमाशा होता कामा नये. कह्यात ठेव स्वत:ला. कविता केल्या तरी मला घर संसार आहे, आणि तुलाही. ऊठ. बागेतल्या नळावर तोंड धू. मी फोन करते राजाला. पुचाट कुठला, पुचाट! शेपूट पायात घालू नकोस. घरी जा तुझ्या नीट, आणि काय सांगायचं ते तिला सांग समजावून. मला आत्ता इथे तुझा तमाशा नकोय…

चारच दिवसांपूर्वीचं ते दृश्य आठवलं. आणि आज हा आत्मघात. मी लोटला का त्याला ? इतकं टोकाला कधी, कसं गेलं सगळं? एरवी स्वत:च्या भानावर असण्याचा कोण अभिमान होता अलकाला. इतके कसे वेडेवाकडे गुंतत गेलो? “कसे जिवांना झुलवत जावे… तुझ्या कलेतच तुजला तृप्ती, फक्त रिते हे माझे जीवन..” काही दिवसांपूर्वी मनोजनं वाचून दाखवलेली विंदा करंदीकरांची कविता. म्हणजे मीच जबाबदार का या झाल्या प्रकाराला? असं कसं असेल?

‘या आमच्या गृहकृत्यदक्ष.’ सदा तर नेहमी तिच्याविषयी किती विश्वासाने, अभिमानाने सांगत असतो सर्वांना. त्यावरची मनोजची मल्लीनाथी :अहो घर नीटनेटकं ठेवण्यापासून ते नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या सोळा कला, इथपर्यंत ताईंच्या आसपासच्या बायका-मुली त्यांचा सल्ला घेतात, होय ना सदादा?
‘पण खरंच ताई. तुम्ही इतकं सगळं तोलदारपणे कसं पेलता?तुम्ही घराबाहेर पडून नोकरी धंदा करायचा नाही, या सदादांच्या कुंपणामुळे केवढी जखडणूक होतेय तुमच्या कर्तबगारीची. तुमच्या कलागुणांची! तुमचं व्यक्तिमत्त्व इतकं बोलकं, प्रभावी आणि तरी दुसऱ्याला सहज आपलंसं करणारं…’

‘अरे अरे, मध्ये श्वास घ्यायला थांबशील की नाही मनोज?’ त्याच्या उघड स्तुतीने खुशालून जाऊन अलकानं म्हटलं होतं. पोर्चवरच्या झोक्यावरच्या लोडाशी रेलून तळहाताच्या आधारे अर्धवट पहुडल्या पोझमधला फोटोच काढला होता एकदम मनोजनं. किती ओढला गेला होता अलकाकडे. किती सुखावणारं होतं अशी मार्मिक, सुजाण संगत मिळणं. वयात आल्यापासून निव्वळ तिच्या दिसण्यावर, हसण्यावर, चालण्यावर भाळणारे बरेच भेटले. सदाही त्यातलाच पण मनोज मनकवडा मित्र झाला. नुसती चर्या ताडून पुष्कळ समजून जायचा. शब्दही न बोलता आपलं कौतुक, कळकळ पोचवायचा. मनस्वी, स्वप्नं जगणारा मनोज.

‘हा मनोज शहा. आपल्या फॅक्टरीशेजारचा गाळा घेतलाय यानं. केमिकल इंजिनियर आहे. फाडफाड इंग्रजी बोलतो. तुलाही हरवेल. इथे त्या सान्यांकडे पेइंगगेस्ट राहतोय.’ सदाने ओळख करून दिली होती एक दिवस उशीरा संध्याकाळी, त्याच्या टोळक्यातल्या या नव्या मेंबरची.
‘हो का? नमस्कार. सडेच वाटतं अजून?’
‘अगं आता कुठे धंद्यात जम बसवतोय.आईवडील कोल्हापूरला नि अधूनमधून दादरला असतात ’.

तेवढ्यात जमलेल्यांपैकी कुणीतरी ‘वहिनी आज तुमची खेकडाभजी खायचीत बघा. मस्त पाऊस पडतोय. मेहेंदी हसनची ती कॅसेट लावा ना जोडीला.’ तिनं ते ऐकलं न ऐकलंसं केलं. पण लगेच सदानं नेहेमीप्रमाणे,‘ हो. करील की. मस्तच करते.’ मानेला एक नापसंतीचा झटका देत ती आत वळली. नेहमीचंच आहे याचं. मी सदैव शोभेची बाहुली किंवा रिसेप्शनिस्ट याच दोन भूमिकांत दिसते सदाला. हाताशी नोकर चाकर असले तरी याचा शीण येतो, हे कधीच कळत कसं नाही याला. मला विरोधही करता येत नाही. सर्वांच्या मते असा सुतासारखा सरळ, पैसेवाला नवरा मिळायला भाग्य लागतं.
‘तुला गं काय कमी आहे!’

काय कमी आहे? हे तोंडाने सांगावं लागलं तर काय चव आहे ती कमतरता पूर्ण करण्यात?
पण जेव्हा भजी आणि वाफाळते चहाचे कप भरलेला ट्रे घेऊन आलेल्या सुमाबाई मागोमाग हॉलमधे आली ती तेव्हा अगदी अवाक होऊन जाऊन मनोजने म्हटलं, ‘आमच्यापायी तुम्हाला भलत्यावेळी त्रास…’ त्याला मधेच काटत सदा म्हणाला, ‘अरे, त्यात काय एवढं? काम काय आहे दुसरं? तुला त्या सान्यांकडे भटी जेवून कंटाळा आला ना तर बिनधास्त ये इथे. होय ना बायको?’ तीही हसली. मनातल्या मनात आपल्यालाच समजावीत! जाऊ दे, सदाची जित्याची खोड आहे, म्हणत.

किती आदराने घेऊन गेला होता मनोज पहिल्यांदा त्याच्या आई-भाईंना भेटायला. जरा शोधकपणेच बघत होत्या आई, अगदी पहिल्या भेटीतही. भरमसाठ काहीतरी भारावून सांगितलं होतं मनोजनं त्यांना अलकाविषयी. नंतर एकदा तिला फोन करून म्हणाल्याही, ‘आता तुम्हीच जबाबदारी घ्या मनोजच्या लग्नाची. ताईंसारखी मुलगी भेटली तर करीन डोळे मिटून, म्हणतोय. ताईंची पेंटिंग्स, ताईंची बागपासून ते ताईंच्या हातचं विरजलेलं दहीच कसं परफेक्ट…’ अलका खळखळून हसली होती. समोरच बसला होता मनोज. बच्चमजी. पण मनोमन सुखावलीच ती. तरुण, तरल वृत्तीचा मनोज असा आपल्या व्यक्तित्त्वाच्या प्रेमात पडलेला जाणवून तिला पावतीच मिळाल्यासारखं वाटलं तिच्या तथाकथित ‘गृहकृत्यदक्ष’पणाची. किती कौतुक वाटायचं मनोजला तिच्या सुगरणपणाचं, सौंदर्यदृष्टीचं, कलात्मकतेचं.

‘काय सांगता, कपड्यावर क्रायलिननी केलेलं पेंटिंग हे? कहर आहे. फोटो वाटला मला… ताई पोळीला इतके तलम पदर कसे सुटतात तुमच्या?… तुमची झाडं, रोपं म्हणजे तुमची बाळंच असल्याइतकी छान निगा राखता त्यांची…’
छोट्या छोट्या बाबीही त्याच्या नजरेतून निसटत नसत. याउलट सदा. तिनं काहीही नवं , चांगलं केलेलं त्याला लक्षात आणून द्यावं लागे. आणि तरी त्यावर तो,‘ हो छानच की’ पलीकडे नोंद घेऊच शकत नसे. फॅक्टरीच्या सरळ व्यवहारी जगात रमलेला जीव तो. मित्रमंडळ जमवावं, त्यांच्या आनंदासाठी दिल खोलून खर्च करावा. छान खावं-प्यावं.महागड्या हॉटेलात किंवा खर्चिक रिझॉर्टमधे वातानुकूलित खोल्यांत आरामात एखादी हलकी फुलकी फिल्म पहावी. यापलीकडे त्याची सुखाची व्याख्या जात नसे. हं, अलकाला आवडेल त्या गोष्टींवर खर्चायला त्याची ना नव्हती. घरातलं तिच्या रसिकतेनं जमवलेलं उत्तम फर्निचर,रंगसंगती साधून सजवलेली दालनं, अद्ययावत स्वयंपाकघर, हव्व्या तेवढ्या साड्या-दागिने कशालाही सदानं तिला ना म्हटलेलं आठवत नव्हतं तिला. आणि तरीही;
‘जायचे होते कुठे अन् चालले आहे कुठे…’ सारखी तिची कविता मनोजला पुष्कळ काही तिनं शहाणपणानं ओठांआड ठेवलेलं जाणवून देई, तो अस्वस्थ होई.

कोणता चेहरा खरा आहे तिचा? जो तिनं कसोशीनं उभारला, जोपासला, सांभाळला आहे तो, की त्याच्याखाली प्रत्येक थरामधे अस्पष्ट होत गेलेले ते दुसरेच चेहरे तिचे आहेत? त्या साऱ्या चेहऱ्यांच्या आठवणी पुसून काढण्याच्या खटाटोपात यशस्वी झाल्याला किती वर्षे लोटलीयत्. सुरुवातीला ज्या सुजाण, कर्तबगार, कलासक्त ताईंचं एवढं अप्रूप होतं मनोजला त्या मागची तिची घालमेल जाणवून सदाशी भांडावं, तिला न्याय मिळवून देण्यासाठी, आपल्यालाच तिची योग्यता कळलीय, हे जाणवून द्यावं त्याला; असा खुळा आवेश त्यानं एकदा तिच्यापुढे आवेगाने बोलून व्यक्तवला. तेव्हा किती ठामपणे तिनं रोखलं होतं त्याला.
अं हं!

उगाच सुरळीत चाललेल्या संसाराची घडी विस्कटायची नव्हतीच तिला. ‘अरे, संसार म्हणजे तडजोडी आल्याच. तुला आवडतंय ना खायचे प्यायचे लाड करून घ्यायला इथे. सदाचीही आडकाठी नाही. मलाही तुझ्या संगतीमुळे साहित्य, कलाक्षेत्रात काय नवं नवं घडतंय ते समजतं. आपण एकत्र बसून चांगल्या कविता, गाण्यांचा, सिनेमा, पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकतोय. तुला काय आवडतं ते मला आणि मला काय खुपतंय ते तुला कळतंय, एवढं पुरेय की.’
पण मग ती अनुभवाची पकड, व्यतिमत्त्वाचा भरवसा, कुठे कसा विसविशीत झाला? त्या कालच्या पोरीला, मीनलला अलकाचा मत्सर म्हणावा इतका तिटकारा कसा येऊ लागला? आपल्याही नकळत इतके रुजलो का आपण एकामेकांत? नाही. सावध होती अलका. मर्यादांचं भान कधी सुटलेलं तिला आठवेना. पण मनोज मनोमन तिच्यात गुंतत चाललेला मात्र आवडतच होता का तिला? दिसायला मनोजला शोभेशी, सरळ-साधी वाटली होती तिला मीनल. माहेरी श्रीमंतीत वाढलेली. मनोजच्या कुणा नातलगानं स्थळ सुचवलं, आई-भाईंना पसंत पडलं, शिवाय त्याच्या फॅक्टरीसाठी मोठं भांडवलही गुंतवलं सासरेबुवांनी. मनोजनं ताईंना विचारा, त्यांना आवडली तर माझा होकार, असं म्हटलं, त्याचा मान राखून त्याच्या आईंनी एकदा चहाला बोलावलं होतं दोघींना. अबोल वाटली थोडी, पण आपण ‘छान आहे जोडी ’म्हणण्यातच शहाणपणा आहे हे समजून होती अलका.

लग्नानंतर पार्ल्यालाच एक फ्लॅट भाड्यानं मिळवला मनोजनं सदाच्या मदतीनं. अंधेरी एम आय डी सी जवळ पडते, म्हणून आईभाईंनाही ते पटलं. एकटा एक लाडाकोडाचा मनोज. असू दे त्या नव्या जोडप्याला स्वातंत्र्य; नाहीतरी ते जास्त करून कोल्हापूरलाच असत. फार दूर नव्हता नवा फ्लॅट ताई-सदाच्या घरापासून, ही मनोजसाठी जमेची बाजू. मनात आलं की कधीही पहिल्यासारखाच फेरफटका मारता येईल,म्हणून. आईभाईंनाही ताईंचा आधारच वाटला एकपरीने. मीनलला म्हणालेही दोघं. ‘घरचेच आहेत सदानंदराव आणि ताई आपल्याला. तुला कंटाळा आला तर जाता येईल कधीही त्यांच्या घरी. तुझ्या डेंटल क्लिनिकसाठी जागा पाहायला, क्लाएंट मिळवायलाही मदतच होईल त्यांची.’ तिनंही आडकाठी घेण्याचा प्रश्नच नव्हता.

किती उत्साहाने नव्या जोडप्याला जेवायला बोलावलं अलकानं. आपलं सगळं पाककौशल्य, सुगृहिणीपण मिरवून आदरसत्कार केला. मीनल तिच्याहून शिकलेली, उच्चविद्याविभूषित म्हणून तिचं कौतुक करायलाही विसरली नाही. औचित्यपूर्ण उत्तम भेटवस्तू निवडण्यात तर हातखंडाच होता तिचा. अर्थात चाळिशी उलटलेली असली तरी आपल्या ‘ठीक चिऱ्यावर चिरा’ यष्टीची , आणि कार्यक्षमतेचीच पुरेशी चर्चा होईल, असाच वावर होता तिचा. मनोजने मीनलला म्हटलं, ‘आहेत की नाही ताई ग्रेसफुल, तुला म्हटलं तशा?’ तेव्हा तिला अपेक्षित दाद मिळाल्याचं समाधान झालंच. मग जेवणं झाल्यावर खुलून जाऊन तिनं आपलं स्केचबुक काढलं. मीनलचा पदर ठाकठीक करून तिला पोझ दिली, आणि तिचं रेखाटन करायला बसली. सदा, ‘फार झालं बुवा जेवण.मी जरा पडतो आता,’ म्हणत कधीच खोलीत गडप झाला होता. तिच्याशेजारी खुर्ची ओढून मनोज स्केचबुकात डोकावू लागला. ‘तुला कळेलच हळूहळू ताई किती हरहुन्नरी आहेत ते. घर आवडलं ना तुला? फार संसारदक्ष आहेत ताई! अरे वा, ही तिची चुकार बट नेमकी उमटली की तुमच्या कागदावर…’ तो काहीबाही पिटपिटत राहिला.

मीनलला आलेली जांभई आवरेना. कसंबसं हसून साजरं केलं तरी कधी एकदा घरी जाऊन कोरे कपडे उतरवीनसं झालं होतं तिला.
‘बाकीचं स्केच परत कधीतरी करा पुरं ताई. आता निघायला हवं आपल्याला’, ती मनोजकडे पाहात उद्गारली.
‘निघताय इतक्यातच?’ मिश्किलीनं तिच्याकडे पाहात डोळे मिचकावले ताईंनी.तिला थोडं अवघडल्यागत झालं. मनोजकडे वळत ती म्हणाली, ‘चलताय ना?’ तोही पटकन् उठला, तिचा दंड धरून म्हणाला ‘तेथे चल राणी…’

‘कुठे?’ चमकून आलेला मीनलचा प्रश्न. अलकाला हसू आवरेना. तिनं हेरलं, बाळबोध दिसतंय गाडं.फार पॉलिश मारायला लागणार मनोजला.
नंतर काही दिवसांनी एकटा मनोज आला होता दुपारी. थोडा पडलेला चेहरा घेऊन. आधी काही विशेष नाही म्हणाला, पण चहा घेताना चुळबुळत म्हणाला. ‘काही कळत नाही मला ताई मीनलचं.आज बरीच तणातणी झाली उगाचच्या उगाच.’ काही न बोलता अलकानं वाट बघितली,तसा म्हणाला,‘ दुसऱ्याची किंमत कळायला आपल्यात थोडा गुण असावा लागतो हो ताई. परवा तुम्ही दोघी आणि आई मिळून दादर मार्केटला गेल्या होतात ना खरेदीला. आज म्हणते तिला अजिबात पसंत नाही पडलेले ते पडदे आणि इतर फर्निशिंग. तुमच्या निवडीला आईंनी मान डोलावली म्हणून गप्प बसली म्हणे. मी म्हटलं, मला आवडले, तर , ‘‘आवडणारच तुला. ताई बोले आणि दळ हाले. मी म्हणते काय हौस असेल घर सजवायची ती स्वत:च्या घरावर भागवा की. सदादांची काही ना नाही. ज्यात त्यात लोकांना सल्ले देत सुटतात.’’ बदलून आणणार आहे म्हणाली. मी म्हटलं काय हवं ते कर. नसता वैताग. दुसऱ्याच्या अकलेनं चालण्याइतपत शहाणपण गाठी असेल तर ना.’ यावर अलकानं समजूत घातली त्याची.
‘नसेल जुळली आवड. तू इतकी डोक्यात राख काय घालून घेतोयस.’

पण मग प्रसंगा-प्रसंगांतून तिच्या लक्षात येऊ लागलं, की मुद्दा पडदे किंवा घरसजावट नव्हताच. मीनलला झोंबत होता तो मनोजचा ताईंविषयीचा ओढा. वेळीच दूर सरायला हवं होतं का? पण अतिपणानं कधी वागल्याचं अलकाला स्मरेना. एखाद्या पट्टीच्या गायकाला योग्य जागी दाद मिळाली की जसं भरून पावतं तसं व्हायचं तिला मनोजच्या संगतीत. तिला आठवलं, एकदा कशी मीनलला चक्क झोपच लागली होती दीनानाथला अजोय चक्रवर्तींच्या कॉन्सर्टमधे. मग परतताना वरमून म्हणाली होती, ‘आज क्लिनिकमधे फार दमणूक झाली.’

‘हिच्या शाळेत ‘गाण्याने श्रम वाटतात हलके…’ शिकवलेलं दिसत नाही’, मनोज हसत म्हणाला होता. त्यावर पुन्हा तिच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह!
अलकानं त्याला डोळ्यांनी दटावलेलं लक्षात आलं तिच्या. त्या कोजागिरी पार्टीमधे तर पार वैतागली होती मीनल. यांचे आपसातले विनोद डोक्यावरून जातायत असं वाटून एकदम बिथरली. ‘मी घरी जाते. तू ये सावकाश’ म्हणत चिरडीस आली. तेवढ्यात सदाच्या कुणा मित्रानं तिला दातांच्या निगेविषयी काही सल्ला विचारायला घेतला, म्हणून प्रकरण निवळलं.

आणखी एकदा तर मीनलनं सरळ तिला फोनवर सुनावलं, “ताई तुम्ही तसदी घेऊ नका इडल्या न् दहीवडेबिडे पाठवायची! मला जमेल तसे करीन मी. नाहीतर ‘रामकृष्ण’मध्ये जाता येतं की.”

अलकाला जुने दिवस आठवले. किती जिव्हाळा वाटायचा मनोजच्या आईंच्या वागण्यात. दादरला त्यांच्या घरी झोकाळ्यावर झुकून आलेल्या शेवग्याच्या सुकुमार पालवीसारख्याच आठवणी होत्या. त्यांना कोण कौतुक होतं अलकाच्या कलागुणांचं ! आपल्या लेकाला आवडलेली माणसं म्हणून नेहमी आगतस्वागत करीत तिचं नि सदाचं. मनोजच्या लग्नाआधीपासून कितीतरी दिवस अलका नि मनोजने काळजीपूर्वक एकमेकांच्या चांगल्या कवितांची निवड करायला घेतली होती. ‘साद-प्रतिसाद’ अशा शीर्षकाने दोघांचा मिळून संग्रह काढायचा बेत होता. प्रकाशनासाठी दोघं मिळून खर्च करू, एखादा चांगला प्रकाशक गाठू, असे बेत चालत. त्यावर दादरला एकदा मनोजच्या भाईंनी त्यांना सुनावलं होतं.
‘काय करायचेत हे नस्ते उद्योग? धंद्याकडे लक्ष दे त्यापेक्षा मनोज. कविताबिवितांनी पोटं भरतात काय? चार दिवशी लग्न होईल, प्रपंच वाढेल, तेव्हा चार पैसे जास्ती कसे मिळवता येतील ते बघा मनोजराव आता.’

असं काही झालं की मनोजचा भारी विरस होई. हळवाच होता. नंतर एकदा तिच्या घरी संध्याकाळी म्हणाला. ‘जगण्याचे हिशेब करताना माणसं जगणंच कसं काय सोडून देतात हो ताई? पैशापुढे सगळं गौण आहे का? सदादांच्याबरोबर तुमचा विसंवाद होत नाही का?’ ‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही. पुढे पस्तावशील…’ ‘हे तुम्ही म्हणावंत ताई? मग काय राहिलं हो? समोर आलेला प्रत्येक क्षण सर्वार्थाने साजरा केला पाहिजे. मुर्दाडपणे दिवस ढकलण्यात काय मजा आहे?’

पटत होतं आणि नव्हतंही. मीनलच्या सहवासात मनोजचे आतले झरे सुकता कामा नयेत, म्हणून तिनं अधिकाधिक घट्ट केली का त्यांच्या नात्याची वीण? की तिच्या तुलनेत आपलं वरचढपण उजळीत राहण्यातलं सुख सोडवलं नाही अलकाला? का वेळेवर बाजूला होता आलं नाही?आताशा दोनचार वेळा तिच्या ध्यानात आलं होतं की मनोज एकदोन पेग चढवून यायचा. एक-दोनदा तिनं छेडलंही. त्यावर म्हणाला, ‘अटीतटी न घालता आपलंसं करते ताई मदिरा. काय बिनसलं? शुद्धीत राहून काय दिग्विजय गाजवणार आहे? काळजी करू नका. काही असभ्यपणा करणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर येणार नाही इथे.’

‘अरे तसं नाही, पण पकड ढिली होते स्वत:वरची.’
‘ नाही. …ऍं: पुढचं कशाला बघायचं. आत्ताचा क्षण आपला. तो पुरा भोगून मी मोकळा. आणि आयुष्य असलं किंवा नसलं, तरी आपला मृत्यू नक्की आपल्या हातात असतो, ताई! पस्तावायला वगैरे उरलो तर ना! ’ खळाळून हसण्याच्या धडपडीतूनही डोकावलेलं विमनस्कपण जाणवून ती उगी राहिली.

आणि मग चार दिवसांपूर्वीचा तो प्रसंग. तिरीमिरीत आला होता मनोज, ‘ ताई माझ्या सहनशक्तीचा अंत बघतेय मीनल. गेले काही दिवस रोजचा वाद आहे. इथला गाशा गुंडाळून दुसरीकडे अंधेरी वेस्टला वगैरे राहायला जाऊ, म्हणून डोकं खातेय. का तर तिकडे ताईंचं घर नसेल. आज तर कहर केलान्. म्हणाली आपल्या येणा-या बाळावर ताईंची छाया नकोय मला.’

‘तू काय पुचाटपणा करतोयस.ठणकावता येत नाही?पुरुषासारखा पुरुष तू. दूर गेलास तरी मनातून काढता येईल का मला?आपापल्या आयुष्याचे तिढे आपणच सोडवले पाहिजेत. जा घरी. समजाव तिला.’ पण ते व्हायचं नव्हतं. रात्री पुन्हा ते हवालदार घेऊन आले त्याला… आणि आज हे विपरीत. बांध फुटल्यासारखी अलका हमसून हमसून रडायला लागली. जमलेल्या सगळ्या मंडळीत तिचा आक्रोश निनादला. आईही दचकून रडे विसरल्या. मीनल तिथून उठून गेली. उरी फुटून अलका बेभान झाली. बाहेर सदा आला होता. कुणीतरी पाणी पुढे केलं. सदानं तिला अळेबळे दोन घोट घ्यायला लावले आणि सावकाश हाताला धरून तिला उभी केली. जमलेल्या लोकांना हात जोडून तिला बाहेर घेऊन गेला. परतीच्या वाटेवरही तिला रडे आवरेना.
रात्री घराच्या पोर्चवर कितीतरी वेळ मुकाट बसून राहिली. सदानं हलकेच म्हटलं, “वाईट झालं. ‘उमदा मुलगा. असा अतिरेक नको होता करायला. बिचारी मीनल. चल झोपू या. उशीर झाला.”
तशी एका उद्रेकानं अलका म्हणाली.
‘त्यानं नाही झोकून दिलं, मी, मी लोटलं त्याला. माझ्या अनाठायी सत्तालालसेचा बळी ठरला माझा मनोज. अटक करा मला. इथून पुढे झोप येईलच कशी? त्या लेडी मॅकबेथसारखा घात. घातच केलाय मी झोपेचा! कायमचा!’

1 Comment

  1. अस्वस्थ करणारी कथा – अशी कितीतरी विजोड जोडपी दिसतात मात्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *