सकाळी दहाची वेळ होती. बिल्डिंगखालच्या एस्‌.पी. कॉलेजकडून नागनाथ पाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाहायला लागली होती. अविकाका आणि मी त्या गर्दीकडे बघत काचेचा स्लायडिंग दरवाजा असलेल्या मोठ्या खिडकीसमोर उभे होतो. गुरुवार असल्यामुळे अविकाकांना सुट्टी होती. समोरच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या आणि नेहमीच अगदी तुरळक गिऱ्हाईक असलेल्या भास्कर ऑटो सेंटरकडे बोट दाखवून काका म्हणाले, “आपटे, बघितलंत का? आमच्या भास्करचे गॅरेज. अख्ख्या पुण्यात असं गॅरेज नाहीये. बघ, कसं स्वच्छ आहे. ग्रिसचा एक डाग नाही. हत्यारं एकदम चकचकीत. कधीही इकडे तिकडे पडलेली नसतात. भिंतीवर नेहमी ओळीत लटकलेली. इतकं काम असतं त्याला की कधीही जा; वेळ नसतोच त्याला!”
मला पुण्यात येऊन दोन चारच दिवस झाले होते; त्यामुळे भास्करला त्याच्या नकळत दिलेले हे शालजोडीतले कळायला मला एक मिनिट लागलं आणि पुढचे चार-सहा महिने अगदी धमाल येणार याची खात्रीच पटली.

भागवत म्हणजे माझ्या आत्याचं सासर. सदाशिव पेठेतल्या देशमुखवाडीत भागवतांचं मुख्य घर होतं. माझ्या लहानपणी ते दोन मजली अस्सल पुणेरी घर होतं. लाकडी जिना असलेलं. मी मोठा होऊन पुण्यात येईपर्यंत इतर वाड्यांसारखंच त्याचं पाच सहा मजली अपार्टमेंट झालं होतं. भागवतांचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता. खरं तर भागवत कुटुंब तसं बरंच मोठं. परंतु नियतीच्या विचित्र खेळामुळं बॅचलर राहिलेले किंवा झालेले तीन भागवत बंधू त्या प्रशस्त फ्लॅटमधे राहत होते. माझ्या दिवंगत आत्याचे यजमान नंदाकाका, त्यांचे थोरले अविवाहित भाऊ बंडूकाका आणि बऱ्याच तरुण वयात विधुर झालेले त्यांचे धाकटे बंधू अविकाका. बाकी भागवतांचा गोतावळा पुण्यातच होता, अजूनही आहे. पण का कोणास ठाऊक भागवतबंधू राहत असलेल्या देशमुखवाडीतल्या त्या घराला हेडक्वॅार्टर्सचं स्वरूप होतं. मी अमेरिकेत ग्रॅज्युएट स्कूलसाठी लागणाऱ्या जी आर ई परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात जायचं ठरवलं. नंदाकाकांनी अगदी हक्कानं ‘त्याला आमच्याकडेच राहू दे’ असं आईबाबांना सांगितलं आणि मी ह्या तीन बॅचलर काकांच्या घरात राहायला आलो. मी भागवतांकडे सगळे मिळून फक्त सहा-आठ महिने राहिलो; पण त्या थोड्या काळानं माझी विचार आणि आचारपद्धत संपूर्ण बदलून टाकली.

तीन सख्खे भाऊ. साठ ते सत्तरच्या घरातले. आपापली आयुष्यं वेगवेगळी जगून म्हातारपणी पुन्हा एकत्र येऊन राहिलेले. वर वर तिघांचे स्वभाव वेगवेगळे. नंदाकाकांचं वर्णन ‘देवमाणूस’ ह्या एका शब्दात करता येईल. संतप्रवृत्तीची जी काही अगदी थोडी माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत, त्यांपैकी नंदाकाका अग्रणी. अत्यंत मृदू स्वभाव आणि तसंच वागणं. मी पुण्याला आल्यावर त्यांनी काही न बोलता माझी ‘जबाबदारी’ घेतली आणि ती मी पार अमेरिकेत पोचेपर्यंत निभावली. मी अमेरिकेला जायची बॅग भरली ती ह्याच घरात, एअरपोर्टसाठी मुंबईला जायला निघालो, तेही ह्याच घरातून. त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष असायचं माझ्या नकळत. दोन दिवस मी जरा टंगळमंगळ केली की “आनंद (माझं घरातलं नाव), क्लास कसा चालू आहे? किती दिवस राहिले रे परीक्षेला?” असं विचारून माझी गाडी रूळावर आणायचे. बंडूकाका मुंबईच्या कीर्ती कॅालेजमधून भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचा थाट एकदम साहेबी होता. रोज सकाळी हाफपॅंट, टीशर्ट आणि टेनिस शूज असा पांढराशुभ्र पोशाख करून हातात टेनिस रॅकेट घेऊन गोरेपान बंडूकाका एस् पी कॉलेजवर टेनिस खेळायला निघाले की सदाशिवातले भागवत जात नसून कोणी इंग्रजी साहेबच चालला आहे असं वाटायचं. रोज चहा आणि गॅसवर अतिशय काटेकोरपणे कणभरही न जाळता भाजलेला टोस्ट हा नाश्ता. त्याबरोबर इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र. सगळं अगदी शिस्तीत. बंडूकाकांनी का कोणास ठाऊक पण मला गणित शिकवायची जबाबदारी घेतली. ह्या विषयातील माझी गोगलगती काय विचारता? लहानपणी मला गणित यावं म्हणून दरवर्षी नवी शिकवणी लावत असू. दरवर्षी मार्क तेवढेच पडायचे. काठावर पास होण्यापुरते. शेवटी प्रॅाब्लेम शिक्षकात नसून विद्यार्थी मठ्ठ आहे हे लक्षात आल्यावर घरच्यांनी तो नाद सोडला. हा सारा इतिहास माहीत असूनही बंडूकाकांनी उतारवयात हे धाडस केलं. इतर वेळी मस्त गप्पा मारणारे बंडूकाका शिक्षकाच्या अवतारात मात्र कडक असायचे. त्यांचं शिकवणं उत्तम होतं. माझा ‘बेसिक में राडा’ आणि परीक्षेत काय अपेक्षित आहे हे दोन्ही लक्षात घेऊन त्यांनी शिकवलं. मला जी आर ई च्या गणिताच्या विभागात पडलेले मार्क हे माझ्या अख्ख्या आयुष्यातल्या अनेक गणित परीक्षांपैकी सगळ्यांत जास्त होते ते केवळ बंडूकाकांच्या ट्रिक्समुळं. अविकाका हे वेगळंच प्रकरण. ते अनेक वर्षं एका खाजगी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत मोठ्या पदावर कामाला होते. गुरुवार सोडून इतर दिवस ते कामाला जात. नंदाकाका आणि बंडूकाका यांच्याशी गप्पा व्हायच्या; पण माझं स्ट्रेस रिलीज मेकॅनिझम होतं ते अविकाका! इतक्या पुणेरी गप्पा मारणारा माणूस मी आयुष्यात बघितला नाही. अतिशय बुद्धिवादी सखोल विनोद. विचार करायला लावणारा; पण तेवढाच मनापासून हसवणारा. त्यांची पत्नी त्यांच्या लग्नानंतर लवकरच गेली होती. अविकाकांनी ते दु:ख कसं पचवलं कोणास ठाऊक. पण एक विलक्षण स्थितप्रज्ञता आणि तेवढाच मिस्कीलपणा यांची सरमिसळ त्यांच्या स्वभावात होती.

खरी गंमत होती ती त्या तिघांच्या मूळ भागवती स्वभावाची. एकही शब्द न बोलता एकमेकांशी संवाद साधण्याच्या अफाट कलेची. त्या सहा महिन्यांत आणि नंतरही मी त्या तिघांना एकमेकांशी गप्पा सोडा पण एक-दोन वाक्यांपेक्षा जास्त बोलताना कधीही पाहिलं नाही. बाहेरच्याला वाटावं, तिघा भावांचं एकमेकांशी पटत नाही; पण त्यांची एकमेकांबद्दलची आपुलकी, आदर, प्रेम हे शब्दांत व्यक्त करण्याच्या पलीकडचं होतं. तिघांनी ते घर ‘वाटून’ घेतलं होतं. लौकिकार्थानं नाही; तर रोजच्या जगण्याच्या पद्धतींनी. कोणाला काय, केव्हा, कसं हवं हे इतकं ठरलेलं होतं की सगळं न चर्चा करता घडत असे. खरं तर तीन बॅचलर म्हाताऱ्यांचा संसार! पण घरात बाई माणूस नाही ह्याची बाहेरच्या माणसाला शंकासुद्धा येणार नाही इतकं सुंदर, नेटकं घर. कुठंही अडगळ नाही की धुळीचा कण नाही. हा विभाग अविकाकांचा. रोज सकाळी संपूर्ण घराचा केर काढत. फरशी पुसत. मला लाज वाटायची. मी करतो म्हटलं तर “आपटे, आपण केर काढला तर तेवढंच अंग वळत राहतं!” हा त्यामागचा विचार. स्वयंपाकाच्या बाई येत. रोज वेगळी भाजी, कधी उसळी, कधी आणखी काही. तोच तोचपणा अजिबात नाही. दर रविवारी सकाळी संतोष बेकरीतले पॅटीस. न चुकता. हे काम होतं बंडूकाकांचं. नेहमीच्या जेवणाशिवाय दाण्याचे आणि इतर प्रकारचे लाडू, भडंग वगैरे घरात कायम असायचे. घरात काय आहे, काय नाही ह्याची कधीही चर्चा ऐकली नाही. अचानक गोष्टी संपल्या आहेत असंही कधी झालं नाही.

अशा त्या शांत, सुव्यवहारी घरात मी राहायला गेलो आणि बरीच धमाल उडाली. एकतर माझा स्वाभाव भयंकर बडबड्या. त्यात पुणं मला नवीन. जोरात चर्चा चालायच्या. म्हणजे मी बोलायचो, ते तिघे ऐकायचे आणि माझ्याशी छान गप्पा मारायचे. पण एकमेकांशी गप्पा मात्र नाही. रोज संध्याकाळी सातच्या सुमाराला ह्या बॅचलर काकांचे असेच दुर्दैवानं बॅचलर झालेले एक मामेभाऊ श्यामकाका घरी यायचे. त्यांचं तिथं जवळच रेणुका स्वरूप शाळेपाशी स्टेशनरीचं दुकान होतं. त्यांच्या इतकंच प्राचीन. श्यामकाका रोज आमटीभात खायला आणि मराठी बातम्या ऐकायला यायचे. हा वर्षानुवर्षांचा प्रघात होता. किंबहुना भागवतांकडच्या सगळ्याच गोष्टी एक प्रकारे प्राचीन काळापासून चालत आलेल्या होत्या. श्यामकाका आणि बंडूकाका ह्यांच्या राजकीय चर्चाही व्हायच्या. ते श्यामकाकांचे निवृत्तीच्या जवळचे दिवस होते. त्यांचं दुकान अगदी छोटं आणि आसपासच्या नव्या चकचकीत दुकानांपेक्षा बरंच जुनं. त्यामुळं गिऱ्हाईक ही बेताचंच. पण अविकाकांकडून “अरे, प्रचंड गर्दी असते. शाळा सुरू होतात तेव्हा तर नागनाथपारापर्यंत लाईन लागते” अशी जहिरात ऐकायला मिळायची.

मी अविकाकांना, ‘तुम्ही रिटायर का होत नाही?’ असं विचारलं तर, “आपटे, कंपनी बंद पडेल” असं उत्तर मिळायचं. गंमत म्हणजे ती अगदीच अतिशयोक्ती नव्हती. काका कंपनीच्या मालकांचा उजवा हात होते. पुढं कित्येक वर्ष ते काम करत राहिले.

मी भागवतांकडून काय शिकलो हे शब्दांत पकडणं अवघड आहे. परिस्थितीवर मात कशी करावी हे शिकलो. जे काही आहे त्यात आनंद कसा शोधावा हे शिकलो. शिस्त शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार न मानायला शिकलो. तसं पाहिलं तर नंदाकाकांना दोन मुली, जावई, नातवंडं असा गोतावळा होता. काहीतरी भविष्य होतं. बंडूकाका आणि अविकाकांना तसं काहीच नव्हतं. पण म्हणून त्यांनी आशा सोडली नव्हती. रोज नवा दिवस ते तेवढ्याच उत्साहात आणि आनंदात सुरू करत आणि पूर्ण जगून, थकून झोपी जात. त्या सुंदर घरात कणभरही औदासीन्य नव्हतं. होता तो एक वेगळाच उत्साह! स्वत:च्या नियमांनुसार मनसोक्त जगण्याचा. कोणतीही गरज नसताना रोज सातला बूट चढवून टेनिस खेळायला जायचा. वयाची साठी उलटली तरी रोज न चुकता घराचा केर काढण्याचा आणि एम् एटीवरून आनंदानं कामाला जाण्याचा.

आज एखाद्या दिवशी सगळ्याचा कंटाळा येतो, छोट्यामोठ्या कारणानं उदास वाटतं; तेव्हा मी न चुकता मनानं देशमुखवाडीतल्या खिडकीत जाऊन उभा राहतो. खालची रहदारी बघत. नंदाकाका वॅाशिंग मशीनला लावायला कपडे मागतात, अविकाका काहीतरी मजेशीर कॉमेंट करतात, बंडूकाका छोट्या वाटीत दाण्याचा लाडू देतात आणि आलेले मळभ दूर होतं. मी पुन्हा जगायला लागतो.

2 Comments

  1. सुंदर लिहिला आहेस लेख – अजून पुढचा भाग लिही!

Leave a Reply

Your email address will not be published.