ही कथा आहे सामान्यांच्या असामान्यत्वाची!

प्रत्येक गावाची मुलांना शाळेत सोडण्याची एक खास पद्धत असते. काही ठिकाणी शाळेची बस येते. काही ठिकाणी ४-५ आईवडील एकत्र येऊन एक वाहन आणि विश्वासू चालक ठरवतात. शाळा जवळ असेल तर मुलं आजूबाजूच्या मोठ्या मुलांबरोबर चालत जातात तर कधी घरातली वडीलधारी व्यक्ती सोबत जाते. खास त्यासाठी एक माणूस ठेवणं हे मात्र मुंबईत, विशेषतः गिरगावात खूप असायचं. माणूस म्हणजे बाईच. गिरगावातली अंतरं विचित्र. एकटं चालत जायचं तर मोठा रस्ता ओलांडून जावं लागायचं. बस/टॅक्सी करावी तर इतकी लांब काही शाळा नसायची. अशा वेळी ओळखीतल्या कोणी ताई, मामी, काकू चार पैसे मिळवण्यासाठी अशी काम करायच्या. तर यशोदा अशीच एक ताई. नवरा व्यसनी निघाला म्हणून माहेरी परत आली आणि गिरगावात पुन्हा रुजली. तशी भांडी घासायची कामं करते पण मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांना शाळेत सोडल्याने शाळा आणि चांगली कुटुंबं परिचयाची होतात, आणि त्यांना सोडून परत येताना बाजारहाटदेखील करता येते .

काही वर्षांपूर्वी काय झालं, ती अशीच मुलांना सोडून परत येत होती. वाटेवर नेहमीप्रमाणे एक आंध्रकडचा भाजीवाला आणि त्याची चार वर्षांची चुणचुणीत मुलगी तिला भेटले. ती छोटी मुलगी- वेलू, कधी बाबांना भाजी भरायला मदत करायची, तर कधी नुसतीच बागडत राहायची. यशोदा त्यांच्याकडून भाजी घ्यायची आणि मग त्या गोड मुलीचं दक्षिणी हेल काढत हिंदीमिश्रित मराठी ऐकत गप्पा मारायची. तिची त्यांच्याशी चांगलीच ओळख झाली होती, वेलू तिची वाट पाहायची. एक दिवस असंच शाळेतून येताना तिला ती दुक्कल दिसली. तो ओरडत होता, वेलू रडत भांडत होती. आधी यशोदाला हसू आलं पण तेवढ्यात त्याचा आवाज चढला आणि रागाच्या भरात त्याने तिला मारायला हात उगारला. यशोदा धावत जवळ गेली. दारूचा वास आधी जाणवला. ती चिडून म्हणाली:
“कशाला उगीच मारता तिला? इतकी गोड मुलगी आहे, लहान आहे…”
तो म्हणाला, “मी काय करू, ऐकत नाही. तिला मी म्हटलं अर्धा तास थांब, मग आपण घरी जाऊ या.”
“ घरी आई नाही का? तिला सांगत जा की जेवण करून हिला घ्यायला ये.”
“छे, आई नाही. ती कसली (शिवी हासडून)! ही जन्मताच ती पळून गेली. मीच वाढवतोय हिला. मध्ये एकदा आली होती नुसती भेटायला. मी दिली हाकलून, असली आई काय कामाची?”

त्यादिवशी वेलूचा मार चुकला पण परिस्थितीने अगतिक होऊन दारूच्या नशेत तो वेलूवर राग काढायचा हे यशोदेला वरचेवर जाणवू लागलं.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अठरापगड जातीजमातींची माणसं आपलं नशीब घेऊन राहतात, वळचणीच्या आसऱ्याला आणि दुर्दैवाने चव्हाट्यावर आपला संसार थाटतात. पण नेमक्या याच कुटुंबाशी यशोदेचे लागेबांधे का असावेत याला उत्तर नाही. दिवसेंदिवस ती दोघांच्यात गुंतत गेली. एक दिवस तिला काय वाटलं कोण जाणे – आजमितीला तीदेखील सांगू शकणार नाही – तिने त्या भाजीवाल्याला त्याच्या वागण्याचा जाब विचारला आणि वर चिडून सांगितलं, “सोन्यासारख्या मुलीचे तू हाल करतो आहेस. मीच हिला घरी घेऊन जाते. तुझ्या मारापासून तरी तिची सुटका होईल!”
थेट घरी येऊन हा निर्णय तिने वृद्ध वडील आणि शेजारीपाजारी यांच्यापुढे जाहीर केला. बापरे! धक्क्यातून सावरल्यावर सर्वांनी तिला मूर्खात काढलं.
“वेड लागलंय् का तुला?”
“कसली गटारातली घाण घरी आणतेस?”
“इथे तुझं जेमतेम भागतंय त्यात हे लोढणं कशाला?”

रागाच्या भरात केलेली वाच्यता भीष्मप्रतिज्ञा ठरली. भाजीवाला बिचारा परिस्थितीने गांजलेला! गरिबी आणि व्यसन दोन्ही पाचवीला पुजलेलं. तो तयार झाला. यथावकाश -कुठलाही करारनामा ना होता – वेलू यशोदेकडे आली. गटारातली घाण नसली तरी तशीच मळली होती. तिचं शरीर खसाखसा घासून नखशिखान्त स्वच्छ करण्यात यशोदेचे ३ दिवस, अनेक बादल्या पाणी आणि खंडीभर साबण खर्ची पडले. सुरुवातीचे ते काही दिवस कसे गेले असतील मी कल्पनाच करू शकत नाही. भाषेची अडचण होतीच. तिला मराठी शाळेत घालायचे ठरवले. ‘तुला काय आवडतं?’ हा प्रश्न फार पुढचा, त्याआधी ‘तू कोण’ हे महत्त्वाचं. ते ठरेपर्यंत काही दिवस, महिने गेले. दोघींची मैत्री दृढ होत गेली. माझी आणि वेलूची भेट होईपर्यंत दोघीही ह्या आगळ्यावेगळ्या नात्यात स्थिरावल्या होत्या. भाजीवाला अधूनमधून मुलीला भेटायला यायचा. कधी घरखर्चासाठी थोडेफार पैसे द्यायचा. यशोदाचा पोतच वेगळा! ती सांगायची; मुलीला काय द्यायचं ते दे किंवा तिच्या नावावर बँकेत टाक, पण मला मिंधेपणा नको आहे. मी स्वेच्छेने तिला घरी आणले आहे. मग तो घरच्यांसाठी भाजी आणू लागला.

वेलू हळूहळू तिच्या नव्या घरात आणि वाडीतल्या माणसांत रुळली होती. शाळा, घरी मदत करणं आणि अभ्यास यांत दिवस, आठवडे, महिने आणि वर्षं गेली. ही कथा मी माझ्या – त्रयस्थाच्या – भूमिकेतून सांगत आहे. तिच्या मनाचा मला थांग लागण्याची शक्यता नाही. तिला आश्रितासारखं वाटलं का? आपण यशोदावर भार टाकतो आहोत, ही अपराधी भावना तिला डाचत होती का? की बाकीच्या मुलांना नाही का हे सुख मिळत मग मी का नको ते मनसोक्त उपभोगू- हा बालसुलभ स्वच्छंद विचार तिच्या मनाला चाटून गेला? हे विचारांचे काहूर फक्त माझ्या मनातले. शाळा, घरी मदत करणं आणि अभ्यास यांत दिवस, आठवडे, महिने आणि वर्षं गेली.

कल्पितापेक्षा वास्तवही भयानक असतं याचा प्रत्यय आणणारी एक घटना.
एक दिवस यशोदा कामावर गेली होती. वेलू घरी मित्रमैत्रिणींबरोबर खेळत होती, अभ्यास करत होती. सात-आठ वर्षांची असेल. अचानक तिची आई दत्त म्हणून हजर. तिने आईला ओळखले.
आई म्हणाली, “चल माझ्याबरोबर. या लोकांचा आणि तुझा काही संबंध नाही. तुझा बाबादेखील कामाचा नाही. तू माझ्याबरोबर चल.”
वेलू घाबरली. तिने ठाम नकार दिला. आणि मग आईने बळजबरी करून, तशीच तिला रडत मारत बुकलत, घराबाहेर काढली.
खेचतच टॅक्सीत कोंबली. ती रडत जाते बघितल्यानंतर नंतर आजूबाजूचे लोक बघायला आले. नात्याने आई असली तरी तिने वेलूकडे पाठ फिरवली होती. तिची (कु)ख्याती होती. वाईट वळणाची ही स्त्री, कुठल्या तरी पुरुषाबरोबर आली आणि धाकदपटशा दाखवून मुलीला घेऊन जात होती. त्यामुळे लांबून बघणाऱ्या शेजार्‍यांना काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. त्यांना झाला प्रकार कळेपर्यंत टॅक्सी निघाली.

आरडाओरडा सुरू झाला. कोणी यशोदेला कामावर फोन केला, कोणी सायकलवर टांग मारून टॅक्सीचा पाठलाग केला; पण मुंबईच्या गर्दीने कधीच त्या टॅक्सीला गिळंकृत केले. या गोंधळात काही तास गेले. इथे यशोदाची घालमेल. वर नावं ठेवायला लोक टपलेच होते..; “नसती ब्याद कशाला आणलीस? हे लोकच असले! म्हणून सांगत होतो, वेळीच दत्तक घे, निदान तिचे हक्क तरी स्वत:कडे घे… आईने मुलीला कुठे नेली असेल, यावर अनेक तर्कवितर्क झाले. काहीजणांनी पोलिसांना फोन केला. सगळ्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. व्हीटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावर शेजारचे लोक जाऊन शोधू लागले. गर्दीच्या लोंढ्यात एक भेदरलेली मुलगी कशी सापडणार? पण तेवढयात वाडीच्या नावाचाच टी-शर्ट घातलेली वेलू लांबून कोणाला तरी दिसली आणि त्याने जिवाच्या आकांताने तिला हाक मारली. ती हाक ऐकली आणि ती तीरासारखी धावत त्याच्याकडे गेली. सर्वांनी तिला जवळजवळ नाचतानाचत घरी आणली. ही घटना ऐकताना मी जितकी अवाक् झाले तितकीच आताही आहे.

याही घटनेला खूप वर्षं झाली. यशोदा वेलूला घडवते आहे. एकीकडे लाड तर दुसरीकडे परिस्थितीची जाणीव आणि त्याहीपेक्षा बाहेरच्या जगात सुखाने जगण्यासाठी लागणारे धडे वागण्यातून घालून देत आहे. ती १०-११ वर्षांची असताना मला एकदा रस्त्यात भेटली. रद्दी विकायला चालली होती. पण नेहमीच्या ठिकाणी गेली नाही. मी यशोदाला विचारलं. म्हणाली, अगं जरा पुढे गेलं की भाव चांगला येतो असं तिला कळलं म्हणून दोन दुकानं फिरली. घालून दिलेले धडे गिरवले जात होते.

वेलूला यंदा विसावं लागेल. यशोदा आतापासून तिच्या लग्नाचा विचार करते आहे. नोकरीत पक्की झाल्याशिवाय लग्नाचा विचार सुद्धा करू नकोस, हे ती वेलूच्या कानीकपाळी ऐकवत असते. तुटपुंज्या पगारातून तिला चांगला कॉम्प्युटर घेऊन दिला आहे. शिक्षण आणि नोकरीचा मार्ग सुकर होतो आहे. तिचा भाग्योदय झालाच आहे, भरभराट होईल याबद्दल शंका नाही. यशोदचं वय फार नाही पण तिचं आयुष्य कष्टमय होतं आणि अजूनही आहे. हा प्रेमाचा झरा तिला सुखद गारवा देतो.
पुढे काय? मिळालेलं प्रेम, आईने केलेले कष्ट, आपलेपणाची भावना हे किती खोलवर रुजलंय हे काळच ठरवेल.
‘तुला म्हातारपणात आहे की ही आधाराची काठी’, मी तिला म्हटलं.
कुठल्याही प्रकराची योगसाधना न करूनही यशोदा समाधानी आणि निर्मोही आहे. ती फक्त हसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *