रंगभूषा करणाऱ्या गद्रेकाकांना राधेनं वाकून नमस्कार केला. घेरेदार वळसे घालत घुंगरांची गाठ मारली. नाडा खोचून सारखा केला. सतारिये हसनचाचा आले. पाठोपाठ मोगऱ्याचा दरवळ लेऊन मीराताई आल्या. तंबोरा जुळायला लागला. फाटककाकांची थाप तबल्यावर पडली. गुरुजींनी राधेकडे शांत कटाक्ष टाकला. राधेला इशारा पुरला. ती मेकअपरूममध्ये गेली. कार्यक्रम सुरू व्हायला अजून अर्धा तास होता.
शांतपणे बसून राहायचं. मन स्थिर ठेवायचं. कसलेही विचार मनात नकोत, गुरुजींचा नियम!
राधा बसली. पापण्या मिटल्या. आतला सूर आतून धक्के मारून उसळत होता. सुरांचं आवर्त फुफाटत वर वर चढू लागलं. नादाच्या भेंडोळ्यानं तनू थरारली.
तिचे डोळे बघता बघता भरून आले. मेकअपच्या भीतीनं तिनं अश्रू दाबून ठेवले.
आठ वर्षे झाली, गुरुजींकडे राधा पहिल्यांदा आली त्याला! त्याआधी पाच वर्षं नृत्यशिक्षण सुरू झालं होतं. मध्यमा देऊन झाली होती. गांधर्व महाविद्यालयात पहिली आली होती. तडाखेबाज तत्कार, चकरी, तालावर हुकमत सगळ्या बाबतींत तिची तयारी उत्तम होती.
बाबांची बदली झाली. शहर बदललं.
प्रश्न डान्सक्लासचा होता. एका डान्सक्लासचा पत्ता कळला. ती आईबरोबर गेली.
म्हातारेसे गृहस्थ तबल्यावर होते. प्रारंभिकच्या मुलांचे तत्कार चालू होते.
वर्ग संपला. आजोबांनी भुवया उंचावत प्रश्नार्थक मुद्रा केली.
अभिमानानं सर्टिफिकेट पुढे करत राधा म्हणाली,
“उपान्त्य विशारदसाठी शिकायचं आहे. डिस्टिंक्शन आहे मला मध्यमाला… क्लासला यायचं आहे. कधी देता येईल उपान्त्य?”
शांत नजरेनं आजोबांनी तिच्याकडे पाहिलं. ते म्हणाले,
“काय करून दाखवतेस?”
“अंऽऽ, “ राधा घुटमळली.
“गणेश परन्”
गणेश परण तिच्या आवडीचा!
“पढन्त करा…”
गणानाम गणपति गणेश लम्बोदर सोवै
भुजा चार एकदन्त चन्द्रमा ललाट राजे
ब्रह्मा विष्णु महेश ताल दे धुरपद गावे
अति विचित्र आज गणनाथ मिरदंग बजावे…
मृदंगाचे बोल म्हणून राधानं दिमाखात नर्तनाला सुरुवात केली.
चार भुजा, एकदन्त लंबोदर गणेशाचं रूप खेळायला लागलं. देखणी चकरी घेऊन ती समेवर आली. नमस्कार केला. आजोबांना नमस्कार केला. अपेक्षेनं त्यांच्याकडे बघितलं. ते काहीच बोलले नाहीत.
तिनं न राहवून विचारलं, “कधी देता येईल उपान्त्य?”
त्यांचं लक्षच नव्हतं. आजोबा आपल्याच तंद्रीत बोलत राहिले.
“अतिविचित्र आज गणनाथ म्रिदंग बजावे,
विचित्र काय त्यात? काय वाजवलं गणेशानं?”
राधा नुसतीच बघत राहिली.
“धट धराधकड्धान दिन दिन दि न नागे नागे”
“यात विचित्र काय? का निवडले हेच बोल?
धट धरा धकड् धान
धट धरा, ध्यान धरा
कसं ध्यान?
दिन दिन दिन न नागे नागे,
ध्यान हलत नाही दिवसदिवस
दिन तागेना ना, एक दिवस जरी त्याला बघितलं नाही तर…
कहे किड्तक धरा न तरा न धरा न तरा न धरा न तरा
ज्यानं ध्यान धरलं नाही तो कधीच तरला नाही, तरला नाही, तरला नाही! “
आजोबा बोलत होते.
उपान्त्यबद्दलचा प्रश्न त्यांनी जणू ऐकलाच नव्हता.
“ध्यान धरा, या नादाचं, या सुरांचं! हे नादब्रह्म! हे संगीत!
गीतं वाद्यं च नृत्यंच त्रयं संगीतमित्युच्यते|
गीत, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार होतं.
तो अनाहताचा प्रवास असतो.
अनुहात ध्वनि करीत निशिदिनी
मन हे लुब्धुनि गेले तया|”
राधेला काहीही कळलं नाही. तिला अपमानित वाटत होतं. तरीही तिनं या डान्सक्लासला – नव्हे नृत्यवर्गात प्रवेश घेतला. या विलक्षण वर्गाची राधेच्या मनात भीती होती. तरीही ओढ वाटायची. विद्यार्थी फार नव्हते. एकेकाची कसून तयारी चाले. सरांना गुरुजी म्हणत सगळे. गुरुजी फारसे बोलत नसत. त्यांची बोटंं बोलायची, त्यांचे पदन्यास बोलायचे! त्यांचा अभिनय बोलायचा!
नृत्याची पद्धत वेगळी होती. अभिनयाला अधिक महत्त्व होतं.
संगीत आतपर्यंत झिरपायला हवं. गीत, गीताचा भाव, ताल आत खोलवर जायला हवा, तिथे रुजून कोंब फुटायला हवा… नाहीतर
न धरा न तरा न धरा न तरा
राधेला राग यायचा. तिच्या चकरी, तिची ताल लय यांचं काहीच कौतुक नव्हतं. यापेक्षा काही वेगळं तिथे होतं.
हसण्याचा अभिनय नको. ओठ ताणले की हसू होत नाही. हसण्यात उपांगांचं स्फुरण दिसायला हवं, यासाठी खरं हसू यायला हवं, रडू खरं हवं, राग लोभ द्वेष… अनुभवून वर यायला हवं… अभ्यास, वृत्तीचा अभ्यास, उपांगांचा अभ्यास!
कृष्ण नुसता गोड हसणार नाही. त्याचं हसणं दैवी होतं, ते दैवीपण कसं येईल हास्यात? नुसते गाल रुंद करण्याने हसणं होत नाही. हसू डोळ्यांतून आलं पाहिजे. डोळ्यांचा अभिनय महत्त्वाचा!
राधेला खूप अवघड जात होतं सगळं. रोज घरी जाताना ती ठरवायची, पुन्हा पायरी चढायची नाही वर्गाची! पण दुसर्या दिवशी ओढीने ती वर्गात दाखल व्हायची.
वर्ष असंच सरलं. मनात मूळ धरलेल्या नृत्याच्या कल्पनेला पूर्ण तडा गेला होता. उपान्त्य विशारदचा ध्यास मागे पडला होता. नृत्याची परिभाषा थोडी थोडी समजायला लागली होती.
गीतं वाद्यं च नृत्यंच…
गुरुजींनी पहिल्या दिवशी सांगितलेलं तत्त्व. संगीतातली त्रिपुटी! यात वाद्य आणि नृत्तांग अवघड वाटत नव्हतं. कठीण होते भाव, नृत्यांग! गीत समजून घेणं, आत रुजवण घालणं, किती सूक्ष्म पातळीवर जायचं!
गतभाव जगून सादर करणं माहीतच नव्हतं.
“द्रौपदी चीरहरण”
“…पण गुरुजी…”
हे केव्हाच शिकले आहे मी दुसऱ्या वर्षी, हे जिभेवर आलेलं बोलणं गिळायला ती शिकली होती.
“विचार करून यायचा उद्या!”
राधेनं कथा वाचली. प्रत्येकाच्या भूमिकेवर विचार केला.
आल्या आल्या गुरुजींनी त्रिताल धरला.
मयसभा भरलेली, कौरवांचा उन्माद, धर्माचं भ्याडपण! पडणारे फासे… हरत गेलेलं द्यूत…
कथा रंगत होती.
द्रौपदीच्या वस्त्राला घातलेला हात, अत्यानंदाने मग्रूर चेहरा, क्षणात एक चकरी आणि द्रौपदीची व्याकूळ अवस्था, तिचा संताप, एकीकडे पदर ओढणं, दुसरीकडे तिचा लज्जारक्षणासाठी धावा, बघणारी सभा…
एकाचवेळी सगळी पात्रं जगणं, नजरेतून उतरवणं, देहबोली क्षणात बदलणं…
राधा देहभान हरपून नाचत होती. चेहऱ्याची नस नस बोलत होती, व्याकुळत होती, मदानं धुंद झाली होती.. कमालीचं द्वंद्व, विरोधी व्यक्तिरेखा एकाच अंगातून उमाळून झेपावत होत्या.
अचानक…
… प्रकटला… तो सावळा श्रीहरी!
पराकोटीच्या विरोधी वृत्तींमध्ये अचानक प्रकटलेला निर्वृत्ती!
त्याचं मंद हास्य!
मऊ शाल पांघरावी, तसं तलमस्पर्शी…
लेहरा संपला. राधा भानावर आली. सभोवताल शुष्क झाला होता. राधा व्याकूळ झाली. अंतर्यामी जखम व्हावी तसा भाव मनोमन भरला. एवढा वेळ ज्यानं भारलं, नाचवलं, खेळवलं, चित्तवृत्ती दाखवल्या तो… तो… सूर कुठे गेला?
तो सूर लुप्त होणं – ती विव्हलता अंतःकरणाला डसत होती.
“सुराची एकदा का अंतःकरणाला जखम झाली की माणसाचा अश्वत्थामा होतो, सुरांची माया स्निग्धता शोधत फिरत राहतो, व्याकूळ होतो. तो श्रीकृष्ण, तो मुरलीधर.. त्याच्या मुरलीची जखम गोपिकांना झाली..
कशी? “
गुरुजींनी कवित्त सुरू केलं
मुरली की धुन सुन आयी राधे आयी राधे
जमुना के तट पर जमुना के तट पर
ती विव्हला आहे, त्या मुरलीची जखम तिला झाली आहे, ती कशी चालेल? ती लचकत चालणार नाही, ती चपला होईल…
निरत करत… गुरुजी गायला लागले… हे तर तिसऱ्या वर्षी शिकवलेलं कवित्त… ती विसरली. ती राधा झाली. राधेच्या पावलांना वेग आला, ती कृष्णाची झाली, रुसली, खेळली, नाचली…
तिहाई घेऊन समेवर आली… आणि…
पुन्हा विव्हला झाली.
तो सूर माझं चैतन्य आहे, माझ्या गाभ्यातून उसळतो आणि नाहीसा होतो. तो सूर मला हवा आहे.. माझ्या अंतर्मनात कायमचा हवा आहे!
जखम भळभळणारी, चिरंतन स्निग्धतेसाठी आसुसलेली! आठ वर्षं ती जखम तशीच वाहती!
नृत्य सादर करताना बिलगणारे, गोंजारणारे अंतर्मनातून उसळणारे सूर लोप पावतात क्षणात नृत्य संपल्यावर! उरते एक शरीरपोकळी! तिच्यातून हलकेच सूर छेडणारा तो कान्हा… तो कुठे जातो…
अनाउन्समेंट झाली. राधा हलकेच उठली.
रंगमंचावर आली. नटेश्वराची पूजा केली. धूप फिरवला. गुरुजींना नमस्कार केला. मीराताई, हसनचाचा, फाटक काकांना नमस्कार केला.
सूर छेडले गेले. शरीराच्या पोकळीतून आवर्त उठलं. मुरली वाजू लागली. दाणेदार पढन्त झाली, तत्कार झाले. पाय जमिनीवर ठरत नव्हते. सूर नाचवत होते. शरीराच्या वेणूतून झरत होते. प्रेक्षकांनी दाद देणं थांबवलं. स्तिमित होऊन राधेचा कल्लोळ ते अनिमिष नजरेनं पाहत होते.
शेवटची रचना सुरू झाली.
श्यामसुंदर मदनमोहन…
श्रीकृष्णाला घेऊन जायला अक्रूर आलेला आहे. कान्हा निघाला… आता त्याचं दर्शन… यमुनाकिनारीचा रास… ती छेडछाड…
ताक घुसळताना, पाणी भरताना तिला कान्ह्याचे भास होत आहेत… तो मुरलीधर…
रथाच्या चाकांचा आवाज आला.
हो जाणार…
चालला कान्हा.. नको जाऊ रे.. ती आकांताने धावली..
.. चालला सूर चालला.. मला एकाकी करून चालला.. संपत आली रचना. नको जाऊस ना! नको असा विद्ध करूस!
रथाच्या मागे ती धावली.. रथ उधळला.. धूळ नाकातोंडात गेली… ती खाली पडली..
अब मुझे गोकुलवास ना सुहाए.. श्यामसुंदर श्यामसुंदर श्यामसुंदर!
ती क्लांत झाली. भुईवर डोकं तसंच टेकलं…
…गेला सूर संपला… ती गदगदून रडू लागली. आता परत या शरीराची पोकळ नळी!
प्रेक्षक उठून उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला… होतच राहिला.
तिला कशाचंच भान नव्हतं. विकल होऊन ती पडून राहिली.
श्यामसुंदर मदनमोहन…
बासरीचे सूर उठले.. परत का बासरी वाजली? हे कोणते सूर?
सुरांचा कल्लोळ उठला, शरीरभर आवर्त उठलं, तनू निनादू लागली… श्यामसुंदर श्यामसुंदर…
ती उठली. वाद्यं थांबली होती.
मीराताई, हसनचाचा उठत होते.
पण…
पण सूर निनादत होते.
कुठून येतायत हे सूर!
अंगभर व्यापत गेलेला हा पाऊस…?
दिन दिन दि न नागे नागे
धट धरा
ध्यान धरा… त्या सुरांचं त्या संगीताचं ध्यान धरा.
त्या सुरांमुळे तनूची वेणू झाली, सूर अंतःकरणातून झरू लागला, शरीरातून निनादू लागला… त्याला बाह्याची गरज उरली नाही… तनू नाचू लागली, गाऊ लागली.
बिन करताल पखावज बाजे
अणहद की झंकार रे!
अनाहत!
वा!! अप्रतिम! या लेखाचा पूर्ण अर्थ लागण्यासाठी अजून खूप शिकायला हवं, पण जेवढं कळलं ते अद्भूत!