हे ओठ जरासे हसले, अर्थ किती निघाले
डोळ्यांत लपले पाणी, जे बोलत काही नाही.
तो फसवी मजला कळते, परी त्यास ते न कळते
कसे वेड पांघरून घेते, मी बोलत काही नाही.
जो येतो तो तो सांगे, आपुलीच नित्य कहाणी
असतात कान मिटलेले, मी बोलत काही नाही.
तो सागर हाका देई, ओढाळ नदी धावते
मीलनात मरण दिसते, ती बोलत काही नाही
त्या अतृप्त आकांक्षांची, पिंडाला वचने देती
जो देह टाकुनी गेला, तो बोलत काही नाही.
तू मला दिलेली वचने, विस्मृतीत तुझ्या गेलेली
पण आब राखण्या त्यांचा, मी बोलत काही नाही.
साकारतो तुला म्हणोनी, छाटतोच फांद्या साऱ्या
रडते, झाड कळवळते, ते बोलत काही नाही.
ते फिरती उगा कुठेही, रस्ताच चुकला म्हणती
पावलांशी तरीही दोस्ती, तो बोलत काही नाही.
त्या आणा भाका शपथा, रक्तात गोठवून घेते
त्यागाचे लेऊन शेले, मी बोलत काही नाही.
कल्लोळ आत बाहेरचा, दार ऐकत असते सारे
कहाण्यांस सर्व साक्षी, पण बोलत काही नाही.
भरलेल्या त्या शिडांचे, आवाज किती बोलके
लाटांना नावच भिडते, ती बोलत काही नाही.
तुज उगाच वाटते रे, फुलते तुझ्याचसाठी
हा बहर माझ्यासाठी, जरी बोलत काही नाही.
खूप सुंदर कविता!