दाही दिशा उजळवून टाकणारी रोषणाई, झगमग, पणत्या, रंगरंगोटी, रांगोळी, फराळ, फटाके आणि भरपूर आनंद! देशातली असो वा परदेशातली, सभोवती वा आठवणींच्या प्रांगणात दिवाळी सजते.
दिवाळी अंक २०२० मुखचित्र दिवाळीच्या भावना वेगळ्या ढंगाने, अंमळ अमूर्तरीत्या मांडते आहे.
चित्रातल्या प्रत्येक गोष्टीला म्हटलं तर अर्थ आहे, म्हटलं तर सारेच कसे एकमेकांत मिसळून, गुंफून गेलेले आहे. डावीकडची अर्धवर्तुळाकृती सजावट दसरा ते दिवाळी सणांशी निगडित संकल्पनांचा आभास देते आणि उजवीकडची पणती (जे मामबोचे नवे बोधचिन्हही आहे) ती खास दिवाळीच्या औचित्याचं प्रतिनिधित्व करते. कोपऱ्यातला सजलेला मयूर प्रसन्न मोरपंखी मन दाखवतो आहे. त्यामागे दिसतं अमेरिकन कॉंग्रेस लायब्ररीच्या ग्रेट हॉलचं शाही रेखाटन. वाचनालय जे मामबोसारख्या वाचन-लेखनप्रेमी वल्लींसाठी निश्चितच धाम असेल आणि त्यातच एखाद्या भव्य साहित्यिक, सांस्कृतिक प्रासादाचा भास व्हावा, जो दिवाळीच्या निमित्ताने जणू वैभवाने लखलखतो आहे.
जगात सर्वदूर पसरलेल्या मामबोकर परिवारांत हे चित्र पाहून दिवाळीचा सोनेरी भाव अलगद उचंबळून यावा या आशेसह, दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभकामना!
या मुखचित्राची संकल्पना प्राजक्ता पाडगांवकर आणि सायली मोकाटे-जोग यांची असून निर्मिती सायली मोकाटे-जोग यांनी केलेली आहे.
सुंदर संकल्पना आणि सुरेख शब्द मांडणी