मार्चचा पहिला आठवडा. कोविडचे वारे अमेरिकेत वाहू लागले होते. आता न्यूयॉर्कसाठी ‘इथं कोविड येणार की नाही?’ यापेक्षा फक्त ‘कधी’ हाच प्रश्न उरला होता आणि एक मार्चला न्यूयॉर्कमधली पहिली केस जाहीर झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहाच्या आत असलेला रुग्णांचा आकडा त्यानंतर मात्र झपाट्यानं वाढतच गेला. त्यानंतर आलेल्या महिन्यांत नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असली तरी कोविडमुळे समाजजीवनाची एकंदरीत विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याची न्यूयॉर्क शहराची झुंज अजून चालूच आहे.

न्यूयॉर्क-न्यूजर्सी राज्यांच्या सीमेवरील हडसन नदीच्या काठावर ‘जर्सी सिटी’ नावाच्या छोट्या शहरात आम्ही राहतो. खुद्द न्यूयॉर्क सिटीमध्ये नसलं तरी भौगोलिक निकटतेमुळे न्यूयॉर्क सिटीचं एक्स्टेंशन वाटावं असं हे शहर. पब्लिक ट्रान्सपोर्टकरवीसुद्धा न्यूजर्सी राज्यापेक्षा आम्ही न्यूयॉर्क शहराशी जास्त जोडले गेलो आहोत, असंच वाटतं. अर्थात गेली बरीच वर्षं आमची शिक्षणाची आणि कामाची ठिकाणंही न्यूयॉर्क शहरात असल्यानं हे अधिक तीव्रतेने जाणवत असावं.

न्यूयॉर्क सिटीमध्ये मी शेवटची गेले त्यावेळी सोशल डिस्टंसिंग संबंधित कोणत्याही चर्चा सुरू झाल्या नव्हत्या. शासनाकडूनही जनतेसाठी ‘हस्तांदोलन न करता कोपराने ग्रीट करा’, ‘चेहऱ्याला हात लावणं टाळा’, ‘रोजचं आयुष्य आहे तसंच चालू ठेवा,’ अशा मवाळ सूचना येत असल्यानं इतर निर्बंध नव्हतेच. वातावरणात एकंदर काळजीचा सूर असला; तरी रोजच्या घडामोडी मात्र अगदी हास्यास्पद वाटाव्यात एवढ्या सुरळीत चालू होत्या. मजा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात निष्काळजीपणाचा कहर वाटावा अशा हॅजमॅट पोशाखातल्या आणि खास ‘कोरोना’ ब्रँडची बिअर घ्यायच्या ‘कोरोना थीम’पार्ट्या निव्वळ गंमत म्हणून सुरू झाल्या होत्या. अर्थात त्यानंतर थोड्याच दिवसांत न्यूयॉर्कमधील केसेसच्या आकड्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली, अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली, लगोलग सगळे नॉन-इसेन्शिअल बिझनेसेस बंद करण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ‘हे प्रकरण साधंसुधं नाही’ याची सर्वांना धडधडीत जाणीव झाली.

लॉकडाऊनसंबंधित हे निर्णय घेण्यास उशीर लावल्यानंही कितीतरी नाहक बळी गेल्याच्या कडक टीकेला न्यूयॉर्क सिटीचे मेयर बिल ब्लेझिओ आणि न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो या दोघांनाही सामोरं जावं लागलं. त्यामागं त्यांची स्वतःची कारणंही होतीच. न्यूयॉर्क सिटीमधील आर्थिकदृष्टया निम्नमध्यम आणि कनिष्ठ वर्गातील कितीतरी मुलं सार्वजनिक शाळांतर्फे पुरवल्या जाणाऱ्या मील सिस्टीमवर अवलंबून असतात. शाळा बंद केल्या तर या मुलांचं काय? फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या नर्सेसपासून ग्रोसरी स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकानं कामाला येणं आवश्यक असेल तरीसुद्धा शाळा चालू हव्यात. सबवे चालू हवी. लोकसंख्येची प्रचंड घनता, पब्लिक ट्रान्सपोर्टवर विसंबून असलेली जीवनशैली अशा स्वाभाविक कारणांमुळं न्यूयॉर्कमध्ये रुग्णांची संख्या आधीच खूप जास्त होती. पण अशा इतर अनेक समस्यांवर तोडगा काढण्यामध्ये आणि सुरुवातीचे निर्णय घेण्यामध्ये न्यूयॉर्कनं जो मुबलक वेळ घेतला, त्यात रुग्णांची संख्या कैक पटीनं वाढतच गेली.

कोणत्याही गजबजलेल्या शहरात असतात तशी न्यूयॉर्क सिटीमध्ये प्रामुख्यानं अपार्टमेंट्सच आहेत. सबर्बमध्ये असतात तशी मोठमोठी घरं आणि विस्तीर्ण अंगणं नाहीत. असलीच, तर छोटीशी बाल्कनी किंवा पॅटीओ. त्यामुळं अशा लहान घरांमध्ये लोकांना बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा लोकांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास दाखवून, अगदी युद्धपरिस्थितीमध्ये असतो तसा ‘शेल्टर इन प्लेस’ म्हणजे ‘जिथे आहात तिथे अक्षरशः लपून रहा’ अशा प्रकारचा लॉकडाऊन इथं कधीच जाहीर झाला नाही. ‘लोक सुज्ञ आणि सुजाण आहेत, स्वतःचं बरंवाईट ओळखतात,’ या गृहीतकावर इथल्या सरकारचे निर्णय आधारित असावेत. उलट मानसिक आरोग्य जपण्यासाठी लोकांनी सुरक्षित अंतर ठेऊन, मोकळ्या हवेत पार्क्समध्ये फिरायला हरकत नाही, अशा सूचनादेखील येताना दिसत राहिल्या. फूटपाथवर एकावेळी जास्त लोक असू नयेत म्हणून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करून पादचाऱ्यांच्या वापरासाठी खुले केले.

या संदर्भातील सरकारचे निर्णय योग्य होते की अयोग्य हा एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण रोजच्या रोज थेट प्रक्षेपणामध्ये अगदी ‘आमचे बास्केटबॉल हूप्स पुन्हा कधी लावणार?’, ‘अमुक पिझ्झेरिया चालू करता येईल का?’ अशा अवाजवी प्रश्नांचं निरसन करण्यापासून कोरोनामुळे लग्नं खोळंबू नयेत म्हणून ‘प्रोजेक्ट क्युपिड’ अंतर्गत ऑनलाईन लग्नपरवाना मंजूर करणं, प्रसूतीच्या वेळी हॉस्पिटल्सकडून पार्टनरची उपस्थिती नाकारली जाण्यावर कायद्यानं स्थगिती आणणं, असे आम जनतेसाठी महत्त्वाचे असलेले निर्णय घेईपर्यंत सरकारनं दाखवलेली उत्सुकता आणि संयतता ही मला आवडलेली विशेष बाब नक्कीच आहे.

वैयक्तिक पातळीवर आमचं वरवर सुरळीत चालू आहे असं म्हणता येईल. सुदैवानं आम्हां दोघांचे जॉब्स चालू आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ साठी पूरक वातावरण आणि हवी ती मदत उपलब्ध करून कोणाच्या कामावर फरक पडू नये याची विशेष काळजी घेताना इथल्या सर्वच कंपन्या दिसताहेत. मेख अशी की कर्मचाऱ्यांना सर्व बाबतींत सहकार्य करायचं आश्वासन दिलं असलं तरी अखेरीस कार्यस्थळी अपेक्षेप्रमाणं काम पार पाडण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये जी कसरत करावी लागते ती मात्र मुलखावेगळी आहे. ज्यांच्या घरात विशेष समज न आलेली लहान मुलं आहेत त्या आमच्यासारख्या पालकांच्या विशेष समस्या आहेत.

माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर, सकाळी डोळे उघडले की माझ्या मुलाचं-कबीरचं-पहिलं वाक्य असतं ते “मम्मी प्ले विथ मी”.
प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मीटिंग्ज आणि त्यामागच्या विवंचना कशा काय समजाव्यात त्या बालबुद्धीला! साडेचार वर्षांच्या दिवसभर घरभर पळत राहणाऱ्या या मस्तीखोर मुलाकडून स्वतःहून १५ मिनिटं शांत बसायची अपेक्षा ठेवणं रास्त नाही, हे मला स्वतःलाच कळून चुकलं. त्यामुळं मीटिंग्ज चालू असल्या तरी त्याला ‘शांत राहा, ’ असं न सांगता त्याच्याकडून येऊ शकणाऱ्या ‘बॅकग्राऊंड नॉईझ’बद्दल मी आधीच इतरांना पूर्वसूचना देऊन ठेवू लागले. अगदी व्हिडिओ कॉल्समध्येही कधीकधी तो माझ्या मांडीवर बसून चित्रं काढ, लेगो बनव अशा गोष्टी करत असतो आणि त्याबद्दल कोणाकडूनही कधीही तक्रारीचा सूर आढळत नाही. कामातून वेळ काढून मध्येमध्ये त्याच्याबरोबर खेळणं, गोष्टी वाचणं, दुपारी छोट्या वॉकला जाणं, हे आम्ही आलटून पालटून करत असतो. हे करणारी मी एकटी नक्कीच नाही. आपल्या मुलांना पालकांनी दिलेलं हे प्राधान्य इथं बऱ्याच कार्यस्थळी मान्य केलेलं आहे.

काही वर्षांपूर्वी एका प्रोफेसरची BBC वर मुलाखत चालू असताना मागून टिवल्याबावल्या करणारी मुलं आणि त्यांच्यामागे धावत आलेली आणि त्यांना पकडून बाहेर नेणारी त्यांची आई याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आज जगातल्या कितीतरी घरांमध्ये हे चित्र सररास पाहायला मिळेल. फरक इतकाच की आपल्या सहकाऱ्यांच्या घरातलं इतरांचं वास्तव्य आपण सहजतेने मान्य करू लागलो आहोत. विलास सारंगांचं एक सुंदर वाक्य आहे: “दोन माणसं जवळ येतात; पण बोटं एकमेकांच्या बोटांमध्ये गुंतवावी, तेवढ्याच मर्यादेपर्यंत. बाकी प्रत्येकाचं अस्तित्व बोटांमागे पसरलेलं असतं, ते वेगळंच राहतं.” कोरोनाच्या निमित्तानं का असेना पण बोटांमागे पसरलेलं हे लोकांचं अस्तित्व, त्यांचा पसारा आपण आत्मीयतेने स्वीकारू लागलो आहोत, ही एक मोठी जमेची बाजू वाटते.

वैयक्तिक आयुष्यातला हा केवळ एक स्तर. इतर अनेक बाबतींत दैनंदिन पातळीवर फरक पडला आहे आणि तरीही यामधून आपणां सर्वांचंच आपापल्या परीनं मार्ग काढणं चालू आहे. नव्या जगातले नवे नियम, नव्या चालीरीती मान्य करणं चालू आहे.

आत्ताच माझा योगा क्लास झाला. अर्थात ऑनलाईन. करोनापूर्व काळात माझा हा क्लास जिथे भरत असे तिथे पायी जाण्यासाठी १५- २० मिनिटं लागत. क्लास आणि जाणं-येणं पकडून दीड तासांपेक्षा अधिक वेळ जात असल्यानं कितीही आवडीचा असला तरी महिन्यातील मोजकेच दिवस मला या क्लासला जाता येत असे. ऑफिसमधील दिवसभराच्या धावपळीनंतर घरी लगेचच आईपणाची दुसरी ड्युटी सुरू होत असल्यानं बऱ्याच वेळा ते शक्यच होत नसे. गेले काही महिने मात्र मला न चुकता अगदी एक दिवसाआड तरी हा क्लास करता येतो आहे. प्रवासात खर्ची होणारा वेळ वाचल्यानं ऑफिसचं काम आटोपलं की संध्याकाळी तासभर तरी यासाठी वेळ काढणं शक्य होत आहे.

खरंतर एका ग्रूप क्लासची गंमत अशा एकटीनं स्क्रीनकडे बघत केलेल्या क्लासमध्ये खचितच नाही. शिक्षकांचं मार्गदर्शन, सामूहिक वर्गामध्ये एकत्र योगासनं करण्यामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा अशा कितीतरी गोष्टींचा इथे अभाव आहे. पण ‘कदाचित हाच माझा न्यू नॉर्मल आहे,’ असं म्हणून त्यामधल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देत ‘हे सारं आता स्वीकारावं का’ अशा एका नाजूक पायरीवर मी आज उभी आहे. फक्त मीच नाही तर आपल्यामधले जगभरातील अनेकजण.

WHO च्या म्हणण्याप्रमाणं कदाचित कोरोनाचा विषाणू जगातून पूर्णपणे कधीच जायचा नाही. इतर अनेक विषाणूंसारखं त्याचंही अस्तित्व मान्य करून आपल्याला पुढे जायचं आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले तरी आपल्या सख्यासोयऱ्यांशी कडकडून गळाभेट घेता येईपर्यंत अजून किती वेळ जाईल याचा सध्यातरी अंदाज नाही. तसाही मनुष्यप्राणी म्हणजे नॉस्टॅल्जियामध्ये मुलखाचा रमणारा! मग भले ती दहा वर्षांपूर्वी झालेली गोष्ट असो; नाहीतर अगदी कालपरवा घडलेली. त्यामुळं ‘गेले ते दिन गेले’, ‘कधी आता आपण पूर्वीसारखे मोकळेपणानं भेटू-खेळू-बागडू! ’ असं म्हणत उसासे टाकत त्या दिवसांची वाट बघणं, हे मनुष्यस्वभावाला अगदी साजेसं वर्तन आहे.

असं असूनही आपल्या आयुष्यात झालेले हे बदल मान्य करून त्यातून मार्ग शोधत नव्याला कवटाळण्याची उमेद मला माझ्या आजूबाजूला खूप ठिकाणी दिसून येते. विशेषतः कोरोनामुळं ज्यांच्यासमोर प्रपंचाचे गंभीर प्रश्न उभे आहेत, त्यांच्याकडे कदाचित जुन्या आठवणींत रमण्याची मुभादेखील नाहीये. त्यामधील काही टक्के जनता सहानुभूती घेत, सरकारकडून आर्थिक मदत आणि स्टिम्युलस मिळण्याची वाट पाहत असली; तरी बरेच जण बाह्य गोष्टींवर विसंबून न राहता नवनवीन वाटा काढताना दिसत आहेत.

आमच्या घराजवळच माझं आवडतं एक छोटेखानी मेक्सिकन रेस्टॉरंट आहे. कोरोनापूर्व काळात इथले टॅकोज खाण्यासाठी लोक लांबून लांबून येत असत. दर शनिवारी आणि रविवारी रेस्टॉरंटबाहेर भलीमोठी रांग असे. त्यानंतर सीमलेस (इथलं झोमॅटो) आणि टेक-आऊट चालू झाल्यावरही पूर्वीच्या तुलनेत त्यांचा धंदा नक्कीच मंदावला असणार. अशीच एकदा मी चालायला बाहेर पडले; तेव्हा एका बिल्डिंगसमोर मी त्यांचा टॅको फूडट्रक पाहिला. आम्ही खूप वेळा इथं जात असल्यानं त्याचा मालकही थोडा ओळखीचा झाला आहे. ट्रकमध्ये तो दिसला तशी मी दुरूनच त्याला ‘हॅलो’ म्हणाले आणि ट्रकबद्दल विचारणा केली. त्यानं लगेचच मला एक उत्साही प्रसन्न हसू दिलं. सध्या आउटडोर डायनिंग सुरू झालं असलं; तरी त्याच्याकडे अशी विशेष जागाच नसल्यानं रेसिडेन्शिअल भागांमध्ये फूडट्रक फिरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून त्यांची येणाऱ्या आठवड्याची ठिकाणं कळतील, ‘वेनमो’वरून कॅशलेस पेमेंट करता येईल, हेसुद्धा लगोलग सांगून टाकलं. “या घडीला लोकांना टॅको खाण्याची तितकीशी गरज नसली; तरी मला मात्र ते विकण्याची नितांत गरज आहे… जर रेस्टॉरंटमध्ये कुणी येत नसेल; तर मला ते घेऊन त्यांच्यापर्यंत जावंच लागणार आहे,” असं म्हणत त्यानं डिलिव्हरीच्या ऑर्डर्स बनवायला सुरुवात केली.

बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. डार्विननं सुद्धा हेच सांगितलंय: ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट!’ फक्त सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात बुद्धिमान, सगळ्यात चपळ आहे म्हणून कुठलाही प्राणी फार काळ टिकून राहत नाही. परिस्थितीपुढे हात न टेकता, खचून न जाता, स्वतःमध्ये फेरफार करत बदल स्वीकारत राहिला तोच प्राणी तरलाय आजवर.

जसजसे दिवस लोटतील तसतसं मानवजातीला नवीन ज्ञान प्राप्त होईल… या विषाणूवर व्हॅक्सिन्स निघतील.. जाताजाता आपल्या काम करण्याच्या पद्धतींचे, मुलं सांभाळण्याचे, शिकण्या-सवरण्याचे, प्रेम व्यक्त करण्याचे नवीन प्रघात पडतील.. जुन्या जगाची आस ठेवून अश्रू ढाळत असताना, आधीच्या पिढ्या ‘नॉर्मल’ दिवसांची वाट पाहताना एकीकडे नव्या पिढीचं नवं जग यातच सुरू झालेलं असेल. जुन्या जगाचा विसर पडावा असे नवे पायंडे पडत जातील. जग पुढे चालूच राहील. यात आपण स्वतःसाठी कोणता मार्ग निवडायचा हा मात्र प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल.

1 Comment

  1. बरोबर लिहिलं आहेस. करोनाच्या महामारीमुळे शिक्षण, नोकरी, गप्पाटप्पा, गाठी भेटी, सण समारंभ, करमणूक – प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करायला शिकलो आपण. इलाजच नाही. आयुष्य एकाजागी कधीच थांबून राहू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *