बर्थडे पार्टी संपवून आम्ही घरी आलो. गिफ्ट्सनं भरलेल्या पिशव्या आधी आत नेऊन ठेवल्या. उरलेला केक, स्नॅक्स, डेकोरेशन्स वगैरे गाडीतून बाहेर काढून आत नेईपर्यंत आमच्या पाच वर्षांच्या ‘बर्थडे गर्ल’ नं गिफ्ट्सवर आक्रमण सुरू केलं होतं. गिफ्ट बॅग्जमधून भेटी भराभर काढल्या जात होत्या, रॅपिंग पेपर टराटरा फाडले जात होते, टाळ्या पिटत पिटत एकेक गिफ्ट उघडली जात होती आणि या सगळ्या पसाऱ्यामुळं आमच्या लिव्हिंग रूमला रणभूमीचं स्वरूप आलं होतं. आम्हीही काही वेळापूर्वीच्या बर्थडे पार्टीमधलं कौतुक वगैरे विसरून ओरडलो, ”हे काय चाललंय? आपलं ठरलं होतं नं, आज फक्त दोनच गिफ्ट्स ओपन करायच्या म्हणून? नेहमी सगळ्या गिफ्ट्स एकदम उघडतेस, एक-दोन दिवस खेळतेस आणि मग त्या क्लोजेटमध्ये तशाच पडून राहतात! यावेळी ते नकोय. बाकीच्या बॅग्ज आत ठेवून दे…” . पण आमच्या ओरडण्याकडं साफ दुर्लक्ष करून तिनं एक बाहुली बाहेर काढली आणि तिच्याकडं बघण्यात ती रंगून गेली.

“आई, बाबा, लुक शी इज सो कूल!” ती म्हणाली.

“काय डोंबलाचं कूल?” असं आम्ही म्हणालो खरं, पण तिच्या हातातली बाहुली बघून आम्हीही थबकलो. ती एक बार्बी होती, पण ‘बार्बी म्हणजे निव्वळ स्त्रीच्या शरीरसौंदर्याला अवास्तव महत्त्व देणाऱ्या बाहुल्या’ या आमच्या समजुतीला काहीसा छेद देणारी! ती होती एक ‘Entomologist Barbie’ (कीटकांचा अभ्यास करणारी शास्त्रज्ञ बार्बी)- फिल्ड वर्क करायला योग्य पोशाख घातलेली, भिंग, दुर्बीण, कॅमेरा बरोबर असलेली. लॅबमधलं छोटंसं वर्कस्टेशन, जंगलात जाऊन काम करायला एक झाड, त्यावर मधाचं पोळं, झाडाच्या ढोलीत लपलेलं फुलपाखरू आणि इतरही छोटेसे किडे या सगळ्या सामानासहित…आम्हांलाही ही बार्बी एकदम आवडलीच!

योगायोगानं नंतर काही दिवसांनी एनपीआर रेडिओवर ‘वेट वेट डोन्ट टेल मी’ नावाच्या विनोदी क्विझ शो मध्ये इथल्या यूटा (Utah) युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या नलिनी नाडकर्णी या अस्सल मराठमोळ्या नावाच्या प्रोफेसरची मुलाखत ऐकली. तेव्हा कळलं की ही Entomologist Barbie तयार करण्यात त्यांची मदत झाली होती. त्यांची मुलाखत ऐकताना हेही लक्षात आलं की या बाई खरंच एक ग्रेट संशोधक आहेत! त्यांचं मराठी नाव, त्यांचा रिसर्च, मुलाखतीत त्यांनी दाखवलेली तल्लख विनोदबुद्धी या सगळ्यामुळं त्यांच्याबद्दल आणखी माहिती मिळवावीशी वाटली, आणि जे काही वाचायला मिळालं ते फारच आवडलं.

डॉ. नाडकर्णींचं संशोधन ‘कॅनॉपी’ या विषयावर आहे. कॅनॉपी म्हणजे झाडाचा सर्वात वरचा भाग. जंगलातल्या कॅनॉपीजवर वाढणाऱ्या वनस्पती, तिथं राहणारे प्राणी, त्यांचे परस्परसंबंध, जंगलतोडीचे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे त्यावर होणारे परिणाम, वृक्षांच्या आणि जंगलांच्या संवर्धनाची गरज अशी यांच्या रिसर्चची व्याप्ती बरीच व्यापक आहे. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन राज्यात आणि कोस्टारिकातल्या जंगलांत त्यांचा फिल्ड रिसर्च चालतो. शंभराहून अधिक पेपर्स, असंख्य लेक्चर्स, चारपाच पुस्तकं, प्रतिष्ठेची गुगनहैम फेलोशिप, इतरही खंडीभर पुरस्कार, भूषवलेली महत्त्वाची पदं, दोन सुंदर टेड टॉक्स… असा त्यांचा रेझ्युमे नेत्रदीपक आहेच; पण डॉ. नाडकर्णींच्या कामाचं महत्त्व आणि वेगळेपण यातच नाही, तर ते त्यांनी विज्ञानाला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत घेऊन जायला केलेल्या अथक आणि कल्पक प्रयत्नांमध्ये आहे. ज्या लोकांना विज्ञानात रस नाही असं सामान्यतः समजलं जातं त्यांच्यापर्यंत आपलं काम पोचवायचं, आणि तेही त्यांना महत्त्वाचे वाटतील अशा उपक्रमांमार्फत पोचवायचं, ही डॉ. नाडकर्णीची तळमळ आहे. त्यामुळं त्यांच्या कामाची दखल अगदी ‘नॅचरल हिस्टरी मॅगेझीन’ पासून ‘प्लेबॉय’ पर्यंत घेण्यात आली आहे. अनेक धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन त्यांनी वृक्षांची आध्यात्मिक प्रतीकात्मकता, प्राचीन धर्मग्रंथांतून केलेलं वृक्षांचं चित्रण अशा विषयांवर व्याख्यानं देऊन धार्मिक लोकांची या विषयातली रुची वाढवली आहे. याचबरोबर चक्क तुरुंगांना भेटी देऊन तिथल्या निर्ढावलेल्या कैद्यांबरोबर त्यांनी वनस्पती आणि प्राण्यांच्या काही दुर्मीळ जाती वाढवण्याचे प्रोजेक्ट्स केले आहेत. मंदिरं आणि तुरुंग म्हणजे रूढ अर्थानं पापपुण्याच्या रेषेची दोन विरुद्ध टोकं… पण डॉ. नाडकर्णींनी दोन्हीकडं तितक्याच आत्मीयतेनं काम केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की निसर्ग माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतो, आपसांतले भेदभाव मिटवतो, आपल्याला एकत्र आणतो…

याखेरीज डॉ. नाडकर्णींची आणखी एक तळमळ आहे की स्त्रियांनी, विशेषतः गोऱ्या सोडून अन्य वर्णांच्या स्त्रियांनी, विज्ञानाच्या क्षेत्रात काम करावं. आणि याचं मूळ त्यांच्या लहानपणात आहे. त्यांचे वडील मोरेश्वर नाडकर्णी मूळचे ठाण्याचे. १९४६ मध्ये अमेरिकेत येऊन त्यांनी पीएचडी केली. त्यांची बायको गोल्डी ही ज्यू. त्या दोघांची अमेरिकेतच भेट झाली.

“आमचं लहानपण खूप साधेपणात गेलं. माझे वडील गांधीवादी होते, त्यामुळं मला खेळायला बार्बी किंवा महागडी खेळणी देणं त्यांच्या तत्त्वात बसणारं नव्हतं. उलट ते आणि आई आम्हांला सांगायचे – तुम्ही तुमचे खेळ शोधून काढा. माझ्यासाठी खेळ असायचा, झाडावर चढून बसणं. ते फक्त माझं जग असायचं. त्यात मी तासंतास रमायचे. वडील हिंदू आणि आई ज्यू अशा मिश्र वातावरणात वाढल्यानं आमच्या विचारांत मोकळेपणा होता, आपल्यापेक्षा वेगळे विचार, गोष्टी समजावून घ्यायची, स्वीकारायची एक नैसर्गिक ओढ होती.” डॉ. नाडकर्णी म्हणतात.

पुढं नाडकर्णींची मुलगी लहान असताना तिनं त्यांच्याकडं बार्बीचा हट्ट केला. तेव्हा त्यांनी विचार केला,” लहान मुलींना बाहुल्या आवडतातच. हिला ‘नाही’ म्हणण्यापेक्षा आपणच हिच्यासाठी वैज्ञानिक बार्बी बनवली तर?” आणि त्यांनी चक्क शिवणकारागिरांच्या मदतीनं एक बार्बी तयार केली: त्यांच्यासारखे फिल्ड बूट्स, क्लाइंबिंग पँट्स, व्हेस्ट, हेल्मेट, दुर्बीण, आणि झाडावर चढण्यासाठी अंगाला बांधलेला दोर अशा जामानिम्यातली…ट्रीटॉप बार्बी! ती त्यांनी आपल्याबरोबर कॉन्फरन्सेसना घेऊन जायला सुरुवात केली आणि चक्क लोक त्यांच्याकडं या बार्बीच्या ऑर्डर्स द्यायला लागले. बार्बी बनवणाऱ्या मॅटेल या कंपनीला हे कळल्यावर सुरुवातीला त्यांनी बरीच कुरकुर केली, पण डॉ.नाडकर्णींचा यात पैसे मिळवणं हा हेतू नव्हता; त्यामुळं तेही गप्प बसले. गंमत म्हणजे दहा वर्षांनी मॅटेल आणि नॅशनल जिओग्राफिक यांनी एकत्र येऊन सायन्स आणि एक्सप्लोरेशनवर आधारित बार्बी सेरीज लाँच करायचं ठरवलं आणि त्यासाठी सल्लागार म्हणून डॉ. नाडकर्णींनाच पाचारण केलं. या सेरीजमध्ये अंतराळवीर, मरीन बायोलॉजिस्ट, निसर्ग छायापत्रकार आणि माझ्या मुलीला भेट मिळालेली एंटॉमॉलॉजिस्ट बार्बी अशा बार्बीज आहेत.

“बार्बी ही शेवटी प्लॅस्टिकची बाहुली आहे आणि कुठल्याही डिझाईनमध्ये तिच्या शरीरसौष्ठवावर भर दिलेला असतो हेही मला माहीत आहे; पण लहान मुलींना शास्त्रज्ञ आणि संशोधक बाहुल्यांशी खेळायला आवडतं आणि अशा बाहुल्यांनाही चांगलं मार्केट आहे,याची दखल मॅटेलसारख्या कंपनीला घ्यावीशी वाटणं हेच खूप मोठं पाऊल आहे,” डॉ. नाडकर्णी म्हणतात.

अशा नवनवीन मार्गांनी विज्ञान लोकांपर्यंत नेलं पाहिजे, हा अंत:स्रोत डॉ. नाडकर्णींच्या कामातून नेहमी जाणवत राहतो. त्या म्हणतात, “आम्ही शास्त्रज्ञ लोकांनी आपापल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून फक्त आपल्या संप्रदायासाठी काम करायचे दिवस गेले. आता आम्ही लोकाभिमुख झालं पाहिजे, विज्ञानाला लोकांपर्यंत पोचवायची पूर्वी कधी नव्हती तेवढी गरज आत्ता आहे.” स्वार्थासाठी किंवा अहंकारापोटी विज्ञानाकडं पाठ फिरवून लोकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानणारे सध्याचे राजकारणी पाहिले की याची निकड नक्कीच पटते.

सध्या मुलीच्या चित्रांमध्ये आणि ‘तुला कोण व्हायचंय?’ या प्रश्नाच्या नेहमी बदलत राहणाऱ्या उत्तरांमध्ये ‘सायंटिस्ट, एक्सप्लोरर’ वगैरे गोष्टी डोकावायला लागल्या आहेत. मूल वाढवताना चांगली उदाहरणं द्यावीत किंवा आदर्श समोर ठेवावेत अशी माणसं पटकन सापडतातच असं नाही, पण डॉ. नाडकर्णींकडं पाहिल्यावर मात्र आवर्जून म्हणावंसं वाटतं, “शी इज माय हिरो!”

6 Comments

  1. एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! बार्बीचिया बाहुल्या मला कधीच आवडल्या नाहीत… पण ही नवीन सीरीज इंटरेस्टिंग आहे… भेट म्हणून आवर्जून दिली पाहिजे अशी आहे! 👌🏻👌🏻

    1. धन्यवाद कविता!

  2. सुंदर लेख.

    1. धन्यवाद उल्का!

  3. फार छान व्यक्तीशी ओळख करून दिलीस, गौतम! विज्ञानावर निष्ठा बसवण्याची खरंच जगभर खूप गरज आहे आणि जसजशी वैज्ञानिक प्रगतीचा वेग वाढतोय तशी ही गरजही वाढतीये! अजब अस्वस्थ करणारं आहे हे. आणि अशा परिस्थितीत डॉ. नाडकर्णी जे काम करताहेत ते खरंच स्पृहणीय आहे!

    1. धन्यवाद अनिल! खरंय तुझं. मला खूप मस्त वाटलं होतं त्यांच्याबद्दल वाचून!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *