पहाट अजून आळसावली होती. रस्त्यावर रेंगाळणाऱ्या काळोखात. काही अपवाद सोडले तर दुकानांच्या पायऱ्यांवर निजलेली बहुतेक श्रमिक मंडळी अजून निद्रेच्या आधीन होती. अहमदमियाच्या टेंपोचा आवाज ऐकला तसा भुऱ्या लगबगीने टेंपोकडे धावला.
भल्या पहाटे आलेल्या अहमदमियाच्या टेंपोतले अंडी, ब्रेड, चिकन वगैरे उतरवून घ्यायचे. हाॅटेलात खेपा घालीत तो माल आत नेऊन ठेवायचा आणि या सगळ्या मदतीचा मेहनताना म्हणून कधी मिळालेला आम्लेट-पाव, कधी खिमा-पाव आणि चहा असा नाश्ता करीत दिवसाची सुरुवात करायची. ऋतू कुठलाही असू दे, भुऱ्याच्या दिवसाची ही सुरूवात कधी चुकली नाही! अहमदमियाच्या हाॅटेलात नाश्ता करून टुणटुणीत झालेली भुऱ्याची स्वारी मग चौरसिया पान भंडारातल्या बजरंगबलीला ‘जय बजरंगबली, काट दे दुश्मन का नली!’ अशी आरोळी ठोकत नमस्कार करायची आणि पानठेल्याखालच्या कोनाड्यात ठेवलेलं पोतं खांद्यावर टाकून कागदं-डबे-बाटल्या अशी गावभरची रद्दी गोळा करायला बाहेर पडायची!

रोज उगवतो तसाच भुऱ्याचा आजचाही दिवस उगवला. गल्लोगल्लीचे उकिरडे धुंडाळीत भुऱ्या एका नवख्या गल्लीत शिरला तसा त्याच्याच सारख्या चार-पाच मुलांचा एक घोळका त्याच्याभोवती गोळा झाला.

“झिलप्या, ये कौन मैमान आयेला है बे अपने मुहल्ले में?” भुऱ्याकडे पाहून त्यातल्या एका टग्याने टोळक्यातल्या कुणाला तरी विचारले.
“भूल गया क्या, उस्ताद? मैं बोला था नं? येच तो वो भैंचोद है, परसू के मोर्चे में मेरेसे पंगा ले रहा था|”
“क्यों बे टिल्ले? बहोत चरबी चढेली है क्या बे हरामी? मेरे दोस्तसे पंगा लेता है भैंचोद?”

ते टोळकं आक्रमक होतंय हे पाहून भुऱ्यानं लागलीच तिथून काढता पाय घेतला. ती मुलं पाठलाग करताहेत बघून समोरच्या लोखंडी कंपाउंडवरून त्याने सरळ रेल्वेच्या हद्दीत उडी मारली. लोकलच्या पहिल्या रेल्वे लाईनचे रूळ पार केले. तो त्या रुळांना समांतर धावत राहिला. त्याच्या सुदैवानं तेवढ्यात एक फास्ट लोकल शेजारून धडाडत गेली आणि टोळक्यातल्या पोरांनी पाठलाग सोडून दिला! पोरं दृष्टीआड झाली तसा भुऱ्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याची पावलं मंदावली. पाठीवरचं फारसं न भरलेलं पोतं सावरत तो ‘बिडी जलाय ले’ गाणं गुणगुणत रमतगमत जाऊ लागला. मध्येच दिसलेली एखाददुसरी रिकामी बाटली वगैरे रद्दीचा फुटकळ आयटेम दिसला की त्याच्या योग्यतेची शहानिशा करायची आणि किंमत येईल असा वाटला तर पोत्यात भरायचा. नाही तर तो फालतूचा आयटम, गुणगुणत असलेल्या गाण्यातला एखादा शब्द मोठ्यानं उच्चारून नजीकच्या रेल्वेच्या खांबाकडे भिरकावून द्यायचा.

अचानक त्याची नजर एका वस्तूवर पडली. रुळांच्या जवळच टाकलेल्या खडीवर एक चामड्याची पर्स पडलेली त्यानं पाहिली! भुऱ्या धावत त्या पर्सजवळ पोहोचला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. त्याला एक फास्ट लोकल दुरून येताना दिसली. पाठीवरचं पोतं त्यानं झटकन पर्सवर टाकलं. लोकल जवळ आली. दारात उभ्या असलेल्या काही उनाड तरुण मंडळींनी केलेल्या हातवाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत भुऱ्या लोकल पास होण्याची वाट पाहू लागला. लयबद्ध नाद करीत लोकल पुढे निघून गेली. भुऱ्यानं पोतं उचललं. पोत्याखालची पर्स उचलली. इकडेतिकडे पाहत चटकन ती पर्स त्यानं पोत्यात टाकली आणि कंपाउंड ओलांडून तो त्याच्या गल्लीत परत आला!
गल्लीच्या टोकाला एक आडोसा होता. हे आडोशाचं ठिकाण भुऱ्याच्या अत्यंत आवडीचं होतं. गोळा केलेल्या कचऱ्याची छाननी करायला या जागेवर त्याला हवा तेवढा निवांतपणा मिळायचा. इथे तर्र डोळ्यांच्या व्यसनी पोरांची वर्दळ नव्हती की उद्दाम पोरांची दादागिरी! सापडलेला ऐवज घेऊन भुऱ्या त्याच जागी आला. कुणी आलंच तर लपवायला सोपं जावं म्हणून त्याने पोत्यातले कागद, बाटल्या मुद्दाम जमिनीवर पसरल्या. पोत्यातून पर्स बाहेर काढून पुढ्यात ठेवली. क्षण दोन क्षण त्याने पर्स न्याहाळली. त्याचे हात थरथरत होते! पर्स उघडायची हिंमत होत नव्हती! त्यानं कशीबशी हिंमत गोळा केली आणि पर्स उघडली! इतर वस्तू बघण्यापूर्वीच आतल्या करकरीत नोटा त्याच्या मनाला खुपू लागल्या! माईचे शब्द कानात घुमू लागले – इमानाची रोटी, सुखाची नीज! बेइमानी पोटी भयाचे बीज! सापडलेली पर्स इमानाची की बेइमानीची? मातेच्या दुधातून लाभलेल्या संस्कारांना त्याचे मन सहजासहजी झिडकारू शकत नव्हते!

बाबूजी धडधाकट होते तोवर शेतमजुरी करून कुटुंबाला पुरवीत होते. तसं कुटुंब – बाबूजी, माई आणि दोन भाऊ असं चौघांचं! ह्याची कातडी पांढरी म्हणून हा भुऱ्या झाला! भैय्या विशीत आला तेव्हा तो सुद्धा बाबूजींबरोबर शेतावर जाऊ लागला. पुढे भैय्याचे लग्न झाले. भौजी घरात आली पण माईची जागा रिकामी झाली! बाबूजींना अपघात झाला. ते जायबंदी झाले. भैय्याच्या वाढत्या संसारात त्याची मजुरी पुरेनाशी झाली. ‘ई तो अभी बच्चा बा’ म्हणून भुऱ्याला काम मिळेना! अखेरीस इतरेजनांप्रमाणेच, भैय्यावरचा भार हलका करण्यासाठी भुऱ्याने गावकऱ्यासोबत मुंबईची वाट धरली. पण गावकऱ्याची साथ मुंबईपर्यंतच मिळाली. पुढची वाटचाल भुऱ्याची स्वत:चीच होती! कोवळं वय! कुणी तरी पाठीवर कचरा गोळा करायला पोतं दिलं! चौरसियाने रात्री अंग टाकायला पानठेल्याचं फळकुट आणि कचऱ्याचं पोतं अन् कपड्यांचं गाठोडं ठेवायला फळकुटाखालचा कोनाडा दिला! विकता येईल असा कचरा गोळा करायचा, जाता जाता आणखी चार पैसे झोळीत टाकील अशी छोटीमोठी कामं करायची आणि वयाचं गणित दिवसागणिक वाढवत जायचं! एका छोट्या त्रिज्येच्या वर्तुळात मावेल इतकंच भुऱ्याचं जग उरलं!

त्याच्या पोत्यात ती हॅंडल तुटलेली पर्स काय आली अन् भुऱ्याच्या छोट्या जगात अचानक भूकंप होऊ लागले.
“एवढे पैसे? किती असतील सगळे मिळून? आपल्याला तर मोजताही येत नाही…
यातल्या बहुतेक नोटा तर आपण कधीच पाहिल्या नाहीयेत. ही कुणाची चोरी तर नाही? पोलिसांनी चोराला पकडलं तर पैसे कुठे टाकले हे तो सांगणार. मग पोलिसांचा कुत्रा त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवणार! म्हणजे संपलंच सगळं!

हे पैसे घेऊन गावी गेलो अन् पैसे बाबूजींना दिले तर? पण पोलीस तर तिथेही पोहोचतील आणि बाबूजींना पकडतील?’
माई म्हणायची, आपण रामलल्लाच्या गावचे. आपलं पाप रामलल्लाला कमीपणा आणील. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे तर महापाप!”
भुऱ्याला मनाचा कौल मिळेना. त्यानं नोटा पुन्हा पर्समध्ये कोंबल्या. पर्स पोत्यात कोंबली आणि चौरसिया पान भंडारचा रस्ता धरला! दिवस मावळला तरी भुऱ्याच्या मनाची घालमेल थांबली नव्हती. नोटांना हात लावण्याचं धाडस झालं नव्हतं. रात्रभरात पाणी पिण्याच्या निमित्तानं भुऱ्यानं दहा वेळा पर्स चाचपून पाहिली होती! माई खरंच सांगायची, ‘इमानाची रोटी, सुखाची नीज!’

दुसऱ्या दिवशी भुऱ्याचं रुटीन सुरू झालं. ब्रेड-आम्लेटचा नाश्ता होईस्तोवर भुऱ्याचा निर्णय पक्का झाला होता. तो घाईघाईने पर्स सापडली होती त्या जागी आला. त्यानं दोन्ही दिशांना एक नजर टाकली अन् एक दिशा मनाशी पक्की करून भुऱ्या त्या दिशेनं चालू लागला. लोकल गाड्यांची वर्दळ वाढली होती. भुऱ्या रेल्वे रुळांच्या सोबतीने चालत राहिला. स्टेशनला पोहोचल्यावर पहिल्या प्लॅटफॉर्मवर त्यानं आधी पोलीसचौकीचा शोध घेतला. चौकीत टेबलावर पर्स ठेवून त्यानं भडाभडा सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली.

“साब, कल हमको ये पैसे का बॅग मिला. हमको ठीक से गिनती नही आती, साब, इसलिये अंदर कितने पैसे है वो तो मालूम नही”
‘बॅग मिला है’ हे ऐकल्याबरोबर ऐकणाऱ्या अधिकाऱ्याने समोर उभ्या असलेल्या हवालदाराला हाक मारली.
“जाधव, आत्ता ज्या बाई इथून गेल्या त्या दिसताहेत का बघा जरा”
भुऱ्याची कहाणी टिपून घेत असतानाच हवालदार जाधव बाईंना घेऊन हजर झाले.

“तुमचं नशीब जोरात आहे, मॅडम! ही तुमचीच पर्स नं? या पोराला कचऱ्यातून रिसायकलचे आयटम पिक करताना सापडली ही. हा म्हणतोय यानं पैशाला हात लावला नाहीये. पोरगं गरीब दिसतंय. खरं बोलत असावं. प्लीज, पैसे मोजून घ्या आणि वस्तू चेक करून घ्या”
काय विलक्षण योगायोग! लोकल मधून जाताना हॅंडल तुटून पडलेल्या पर्सबद्दल कंप्लेंट लिहायला आलेल्या बाईंना आनंदानं रडूच कोसळलं. त्यांनी पर्स चेक केली. सर्व आलबेल होते. पैसे मोजले. पगाराची पूर्ण रक्कम जशीच्या तशी होती!
पोलिसांनी केस क्लोज केली. पोलीस चौकीत जो तो भुऱ्याचं कौतुक करत होता. बाईंनी पर्समधून शंभरच्या दोन नोटा काढल्या. त्या नोटा भुऱ्याच्या हातात ठेवून बाई निघून गेल्या.

“सुन रे, भुऱ्या. अभी तू किधर छुट्टा मांगते फिरेगा? ऐसा कर, ये साब के साथ जा. ये तेरे को छुट्टा कर देंगे. जाधव, याच्या सुट्टयांचं बघा जरा.”
हवालदार जाधव तत्परतेने भुऱ्याला ॲाफिसच्याबाहेर घेऊन गेले. त्यांनी शंभराच्या दोन्ही नोटा भुऱ्याकडून घेतल्या आणि वट्ट दहाच्या दहा नोटा त्याच्या हातात ठेवत म्हणाले,“खूष?”

येवढ्या नोटा मिळाल्या हे पाहूनच भुऱ्याला आनंद झाला. जाधवांना ‘थ्यांकू साब’ म्हणत त्यानं पोतं पाठीवर घेतलं. नोटा खिशात कोंबून तो वडापावच्या स्टाॅलकडे चालू लागला.
आपल्या आवडत्या आडोशाच्या जागी भुऱ्या आला. बांधून आणलेले वडापाव त्याने आधाशासारखे संपवले. कागदावरची लाल चटणी संपवताना त्याचं लक्ष वडापाव बांधून आणलेल्या कागदाकडे गेलं. परवा ज्या मोर्चात सामील व्हायला त्याला बोलावलं होतं त्याच मोर्चाचा फोटो त्या कागदावर छापला होता. भुऱ्यानं मोर्चात फुकट मिळालेली खिशातली टोपी डोक्यावर चढवली आणि मुक्तकंठाने ओरडून मोर्चातली घोषणा दिली, “मै हूॅं ऽऽऽ अन्ना ऽऽऽ”
त्याच्या आवाजानं पलीकडे रस्त्यावर निजलेलं कुत्रं दचकून उभं राहिलं.

बाकी रस्ता निर्मनुष्य होता!

(सत्य घटनेवर आधारित)

5 Comments

  1. काय सुंदर कथा आहे ही ! भुऱ्याचा प्रामाणिकपणा त्याला सन्मार्ग आणि स्थैर्य देईल असा आशावाद देणारी कहाणी.

  2. आई गं! प्रामाणिकपणाचा काय मोबदला मिळाला बिचार्‍याला!
    हृदयस्पर्शी कथा!

  3. छान कथा!

  4. हृदयद्रावक कथा – साध्या माणसाची सचोटी आणि सचोटी जपण्याचं काम असणाऱ्या माणसांची बेईमानी हा विरोधाभास काळजावर घाव घालून जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.