“दामिनी चल लवकर आटप, पावणेसहाला डॉट पोचले पाहिजे आपल्याला, आधीच ट्रॅफिकची वेळ आहे आणि त्यात तू किती वेळ काढते आहेस..” संकेत कारच्या किल्ल्या हातात फिरवत म्हणाला. नुकताच तो रेवाला आज्जीकडे सोडून आला होता दामिनीला घ्यायला. त्याचे कंपनीचे अनुअल फंक्शन होते आज.
“आलेच रे, फक्त हि माझी झिप लावून देतोस का प्लिज. किती वेळ प्रयत्न करते आहे, बरं झालं वेळेत आलास बघ तू” दामिनी बेडरूममधून बाहेर येत त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. तिने एक सिल्कची बॉटल ग्रीन कलरची साडी आणि त्यावर ब्लॅक स्लीवलेस घातला होता. सुंदर चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता आणि डार्क रेड कलरची लिपस्टिक लावली होती, तिच्या ब्लु लेडीचा मंद सुगंध सगळीकडे पसरला होता.
“ओह हो!!! आज सगळ्यांना घायाळ करण्याचा बेत दिसतोय माय जानू” दामिनीचे पाठीवर सळसळणारे लांब केस बाजूला करत संकेतने शीळ वाजवत झिप लावून दिली आणि “ऐक ना, आपण नकोच जायला का ह्या इव्हेंटला. तुला मस्त लॉंग ड्राइव्हला घेऊन जातो” संकेत घायाळ होऊन तिला अलगद मिठीत घेऊन म्हणाला.
“नको रे राजा, आज तुझ्यासाठी स्पेशल दिवस आहे. तुला ‘अनुअल सेल्स अवॉर्ड’ घेताना मला बघायचंय आणि सेलिब्रेट पण करायचंय. लॉंग ड्राइव्ह फिर कभी डिअर” असे म्हणून त्याला जवळजवळ ढकलत दामिनीने कारकडे नेले.
ती संध्याकाळ खूपच मस्त होती. एका हॉटेलच्या छतावर ओपन टू स्काय जागा होती, एकीकडे बार, एकीकडे बफे, एकीकडे डान्स फ्लोअर. फक्त पन्नास लिमिटेड गेस्ट होते आणि ह्या सगळ्याची सूत्रधार होती रश्मी, संकेतच्या कंपनीची एच आर हेड.
“ही बाई बहुधा हवेवरच रहाते, काय टकाटक आहे यार” संकेतच्या मित्रमंडळींमध्ये चर्चा चालू होती.
“हिचे बरंय, ना नवरा ना पोरेबाळे, मोकळी आहे, सुखी प्राणी”, बायकांच्या गटातील चर्चेचा वेगळाच सूर होता. दामिनी हसत होती आणि संकेतकडे बघत होती डोळ्याच्या कडेने.

संकेतचे व्यक्तिमत्व अगदी लगेच प्रेमात पडण्याजोगे होते. पाच आठ उंची, सरळ नाक, निमगोरा रंग, चेहऱ्यावर एक मिश्किल हसू कायमचे आणि सर्वात नजरेत भरायचे ते त्याचे केस. त्याला सारखी केसातून हात फिरवायची सवय होती.
“हाय हँडसम, आज बहोत खूब दिख रहे हो, कातील हो यार!!!” रश्मी संकेतकडे जवळ येऊन त्याच्यावर झुकून म्हणाली.
“थोडी शरम कर लडकी, मेरी बिवी है आज यहा. देख, बुलावू उसे?” संकेतही खेळात सहभागी होत थोडे कॉर्पोरेट फ्लर्ट करू लागला.
“अँड धिस इयर्स बेस्ट सेल्स अवॉर्ड गोज टू मिस्टर संकेत कर्णिक” अशी घोषणा होताच टाळ्यांचा वर्षाव झाला आणि “कम ऑन माय बॉय!!” अशी हाक मारून मिस्टर दासांनींनी संकेतला स्टेजवर पोचताच जोरदार मिठी मारली. “यु मेक मी प्राउड एव्हरी डे माय सन!!”
दासानी म्हणजे तसा श्रुड बिझिनेस माइंडेड माणूस पण संकेतने त्याच्या स्वभावाने खिशात घातलेला. ह्यामुळे संकेतबरोबर काम करणारे अधूनमधून प्रचंड जळायचेदेखील संकेतवर.
उत्तरार्धात पार्टी जास्तीच रंगली. दामिनीने एकच वाईनचा ग्लास रिचवला होता, आज संकेतचा दिवस होता एन्जॉय करायचा. जवळजवळ पहाटेचे दोन वाजले पार्टी संपून त्यांना पार्किंग लॉटमध्ये गाडीपाशी पोचायला.
“अरे ती रश्मी आहे ना तिथे रेड कारपाशी? अशी काय वाकलीय रे?”
“चल बघूया…रश्मी, ए रश्मी!!! क्या हुआ? इझ एव्हरीथिंग ऑलराईट?”
रश्मी ओणवी होऊन बकाबका ओकत होती कारपाशी.
“नॉनसेन्स!!! आपण हिला सोडलेली बरी तिच्या घरी, ह्या अवस्थेत कशी जाईल ही बाई” असे म्हणून दामिनी आणि संकेतने तिला हळूहळू आधार देत आपल्या कारमध्ये मागे झोपवले आणि घरी सोडले.
कारच्या काचा खाली घेत संकेत बोलू लागला, “दामिनी, तू एक प्रचंड गुणी मुलगी आहेस ग. आय लव्ह यु”
त्याच्या केसांशी खेळत दामिनी उत्तरली, “माहितीय मला, मी टू!!!” रात्र चढली होती आता…

“संकेत ऐक ना, आत्ताच सुरेशचा मला मेल आला आहे. मला एका अर्जेंट प्रोपोझलसाठी थायलंडला जावे लागतंय दोन आठवड्यांसाठी. बुधवारी फ्लाईट आहे आणि गुरुवारपासून रेवाची मीडटर्म आहे रे. तसा मी तिचा अभ्यास घेतलाय पण आयत्यावेळेसची रिविझन!!!” दामिनी ऑफिसमधून एका दमात एवढे सगळे बोलून गेली.
“आधी श्वास घे एक मोठा. हे बघ, जितका माझा जॉब महत्वाचा आहे तेवढाच तुझादेखील. रेवा आत्ता कुठं तिसरीत आहे, चिल यार!!! जा तू सिमरन, जी ले अपनी जिंदगी…”
“डोंबल्याची जिंदगी!!! तो वेडा सुरेश चौदा चौदा तास राबवून घेणार” दामिनी फूदफुदली.
“यार, अभी पागल बॉससे पंगा मत ले” हसत हसत संकेत म्हणाला.
दामिनीला बुधवारी विमानतळावर सोडून, तिच्या आईला म्हणजे रेवाच्या आज्जीला घेऊन मगच संकेत घरी आला. “काकू तुम्ही असलात की मी जरा निर्धास्त. दुपारी रेवा आली तर घराला कुलूप नको, तश्या मावशी येतात वेळेत पण रोज दामिनी करते ते सगळे कॉरडीनेट, त्यामुळे जरा टेन्शन”
“बाबा, आज पिझ्झा मागव ना रे. आईला आपण टुकटुक करूया फोन आला की” संकेतने लगेच फर्माईश पूर्ण केली तिची.
दामिनीने पोचल्याचे कळवले फोनवर आणि मग गेली बुडून कामात. हाच होता तिचा स्वभाव, जाईल तिकडची होऊन जायची, कामात तहानभूक विसरून जायची.
“दामिनी, काही लास्ट मिनिट चेंजेस आहेत आपल्या कस्टमरने सांगितलेले. सेल्सवाल्याने त्याला बिअर पाजून आणलेत बाहेर. आज तू आणि कन्नन माझ्या रुमवरच या. त्यातल्या त्यात माझीच बऱ्यापैकी मोठी आहे खोली” सुरेशने दाढी खाजवत खाजवत हुकूम सोडला.
“आता हा जाड्या, सांबार भात खाऊन दाढी खाजवत वर आमचा मेंदू खाणार” व्हाट्सअप्पवर संकेतला दामिनी लिहीत होती आणि रिटर्न संकेत लोटपोट हसून ईमोजी पाठवत होता. ” एन्जॉय, अम्मा!!!”
“येस येस, या या आत” सुरेशबुवा खूप साऱ्या कागदांच्या थारोळ्यात मांडी ठोकून बसला होता. त्याने त्याचे टेबल, बेड सगळे एका कोपऱ्यात हलवले होते.
रूममध्ये शिरतानाच दामिनी मात्र हादरली. मागोमाग कन्ननपण होताच, “अय्यो, वेंकटेश्वरा!!!” असा त्याने देवाचा धावा केलेला ऐकू आला तिला.
“सुरेश अण्णा, इंना इंतावोरू. पापम!!!” कन्नन दोन्ही गालांवर थपडा मारायला लागला. सुरेशने पण वळून बघितले हा कुठे बघतोय तर भिंतीकडे. दामिनी दारातच उभी होती चिडून बघत होती.
“इंना ओवीयम?!!?, मरांतूवीतू, उतsकाssरू”
“हॅलो!!! तुमची काय बडबड चाललीय? सुरेश, हे काय डिसगस्टिंग लावलंय भिंतीवर पेंटिंग?”
“मी नाही ग लावली ती इथे, च्यायला ह्या हॉटेलने लावलीय आणि तुम्ही मला का झापताय उगाच. हे बघ हवे तर त्यावर मी चादर टाकतो पण कृपा करून आपले प्रेझेंटेशन कम्प्लिट करूया लवकर. तो सेल्सवाला माझा जीव घेईल”
आता मात्र दामिनी आणि कन्नन दोघे खूप हसू लागले आणि सुरेशने खरंच चादर काढून त्या नग्न बाईच्या पेंटिंगवर टाकली. “खुश!!! आता करा काम यार!!”
पहाटे चारपर्यंत काम हातावेगळे केले तिघांनी बसून आणि मग आपापल्या खोल्यांकडे गेले. बरोबर आठ वाजता त्यांना क्लायंटकडे पोचायचे होते.
“काय ग कसे झाले प्रेझेंटेशन? ऑल वेल ना?” संकेतने उत्सुक प्रश्न टाकले व्हाट्सअप्पवर.
दामिनीने एक थंप्सअप टाकला आणि एक स्माईल.
“चलो टेक केअर, सी यु सून”
“सी यू. रेवाला सांग सरप्राईज आणणार आहे आई तुला”
“नक्की, बाय. आम्ही तिघे येतोय आणायला तुला”

खोलीवर जाऊन जरा पाठ टेकते तोच कन्ननचा फोन, “दामिनी, अम्मा तू बाहेर पडणार आहेस का? मी सुरेशअण्णा बरोबर चाललोय”
“हो मी विचार करतेय. कॅथरीनने मला इन्व्हाईट केलंय ‘थोन’ डान्स शो बघायला”
“अय्यो, कॅथरीन. ती पांढरी बाई?”
“पांढरी बाई काय रे?!? आपली क्लायन्टला सांभाळणारी बाई आहे रे ती”
“बरं, चल, एन्जॉय माडी!!!”
“यु टू, सी यु बोथ ऍट रिसेप्शन काउंटर फॉर चेक आऊट इन मॉर्निंग”
थोड्या वेळात दामिनी फ्रेश होऊन बाहेर पडली. कॅथरीनने तिला शोचे लोकेशन पाठवले होते आणि QR code वाले तिकिट पण. शो खूपच सुंदर होता. ‘रावणाने केलेले सीतेचे अपहरण’ ही होती थीम.
“रावण दुष्ट होता का ग?” कॅथरीनचे प्रश्न चालू झाले. मग एका रेस्टरांतमध्ये जेवता जेवता दामिनीने सगळ्या तिच्या शंकांचे निरसन केले.
“चल, तुला इथले नाईट लाईफ दाखवते पटोंगला जाऊया. तू पण एन्जॉय कर” कॅथरीन सिगारेट ओढत म्हणाली.
“माफ कर कॅथरीन. मला अंदाज आहे ग ह्या सगळ्याचा. पण ह्यात मला रस नाही, यु गो अहेड प्लिज. मी इथूनच कॅब घेते. थँक्स डिअर. आता तू पुण्याला आलीस की आपण खूप मजा करू. नक्की ये”
कॅथरीनने एक घट्ट मिठी मारली दामिनीला आणि गालावर ओठ टेकवले आणि अचानक कुठूनतरी कॅमेरा फ्लॅशलाईट चमकला, “हाऊ स्तूपीड दिझ पीपल आर!!!”
दामिनीने हॉटेलवर येऊन बेडवर जी काही ताणून दिली की सकाळी वेकअप कॉलनेच जाग आली तिला.
परतीचा प्रवास पटकन झाला, नेहेमीसारखाच, विमान लँड झाले आणि दामिनीने फोन चालू केला, पटापटा मेसेजेस चेक करून घेतले आणि फोन लावला संकेतला, “येतेच रे बाहेर पंधरा मिनिटात”
“बरं!” संकेतने बोलून फोन ठेवला.
“फक्त बरं? ह्याला काय झाले आता रुसायला? ह्याचा पण ना पापड मोडायला निमित्त पुरते. हेच लहान मूल आहे घरातले” मनात चडफडत बॅगा ट्रॉलीवर टाकून दामिनी निघाली बाहेर.
एअरपोर्टवरून घरी यायला खूप रात्र झाली. रेवाला झोपवून दामिनी बेडरूममध्ये आली. संकेत कपाळावर हात ठेवून झोपला होता. “म्हणजे स्वारी जागी आहे आणि रुसलेली आहे” त्याची खरी झोपायची सवय म्हणजे पोटावर पडायचे आणि एक तंगडी तिरकी करायची हे तिला माहिती होते.
“काय रे झोपला नाहीस अजून”
“हं”
“काही ऑफिसचे टेन्शन आहे का? काय झालेय? आल्यापासून बघती आहे, नुसता फुगून बसला आहेस, धड बोलत नाहीस”
संकेत उठून बसला आणि कडेचा लाईट लावला. स्वतःचा फोन हातात घेऊन फेसबुकला गेला आणि दामिनीच्या पुढ्यात टाकला फोन. “हे काय आहे?”
“काय, बघू. ओह!! अरे ही कॅथेरीन. आमच्या एशिया सेल्सहेडची इए. काय चटपटीत बाई आहे, कौतुक आहे तिचे. तिच्याबरोबर मी गेले होते थोन शो बघायला. पण मग ह्यात रुसण्यासारखे काय आहे?”
“हे बघ तू सोशल मीडियावर नाहीस ऍक्टिव्ह नाहीस पण मी आहे ना. ह्या बाईने तुला टॅग केले आहे ह्या फोटोत, हे बघ”
“मग? अरे ती तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, जेव्हा मी तिला गुडबाय केले तेव्हा. आणि तिने तो फोटो मिळवला असणार त्या फोटो काढणाऱ्याकडून. ती थायलंडमध्येच जन्मली आणि वाढलीय. पण तू का एवढा उडतो आहेस पॉपकॉर्नसारखा”
“ही बाई पूर्वी बारगर्ल होती!! डज दॅट रिंग एनी बेल इन युअर सिली ब्रेन?”
“तुला रे काय माहिती?” दामीनीचा सवाल.
असा प्रतिप्रश्न येईल अशी अपेक्षाच न्हवती संकेतची. त्यामुळे तो चपापला. पण लगेच सावरून म्हणाला, “माझ्या कॉलेजच्या ग्रुपवर उगाच चर्चेला उधाण आले आहे, तुझा हा फोटो बघून. आणि म्हणून मी चिडलो आहे. ‘दामिनी कामालाच गेली आहे ना रे?’ असे खोचक प्रश्न विचारत आहेत लोक मला. मेन तो समीर ज्याने थायलंडला वार्या केल्या आहेत.. ”
“मग दे उत्तर आणि हो मोकळा. इथे असा फुदफुदत का बसला आहेस? माझ्यावर आहे ना विश्वास तुझा? असे म्हणून दामिनी त्याच्याकडे पाठ करून झोपण्याचा प्रयत्न करू लागली.

सकाळी रेवाला शाळेच्या बसस्टॊपवर सोडून आणि काकूंना घरी ड्रॉप करून संकेत ऑफिसला पोचला. सकाळपासून घरातला तणाव उषाताईंना पण जाणवत होता पण त्यांनी मध्ये पडायचे नाही हे ठरवले होते. हे तत्व त्या दामिनीचे लग्न झाल्यापासून पाळत होत्या. संकेत एक अनाथ मुलगा असल्यामुळे त्याला नातेवाईक असे कोणी न्हवतेच. दामिनीचे वडील दामिनी अठरा वर्षाची असतानाच गेले होते आणि ती बऱ्यापैकी हेडस्ट्रॉन्ग होती त्यामुळे तिच्या सगळ्या निर्णयांना त्यांनी फक्त अनुमोदन दिले होते, अर्थात त्यातील बऱ्या वाईट गोष्टींची चर्चा करून. त्यांना दामिनीचे निश्चितच कौतुक होते आणि आपल्या जावयाचे देखील. “त्यांना काही मदत हवी असेल, चर्चा करायची असेल तर ते दोघे नक्कीच येतील माझ्याकडे. नाहीतर त्यांचे ते समर्थ आहेत, मोठे आहेत, जाणते आहेत. एवढे नोकरीतले प्रॉब्लेम सोडवतात, तर आयुष्यातील तर नक्कीच सोडवतील. माझी खात्री आहे” एक घोटभर आल्याचा चहा टाकून उषाताई स्वतःशीच गप्पा मारत बसल्या.

“काकू, थोडे बोलायचे होते” संकेतचा फोन आलाच दहा मिनिटात.
“बोल रे!!” सर्व ऐकून झाल्यावर दोन क्षण थांबून त्या बोलू लागल्या, “संकेत, आता मी जे बोलेन, ते न रागावता ऐकशील? दामिनीने तुझ्याशी लग्न ठरवले तेव्हा पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आला होता कि हा कोण संकेत, अनाथ आहे म्हणजे काय असेल ह्याचा इतिहास, कुठे जन्माला आला असे, कोणाच्या पोटी, कोणत्या परिस्थितीत, काय संस्कार असतील त्याच्यावर. आणि मी हे मोकळेपणाने दामिनीसमोर मांडले होते. त्यावर दामिनीने दिलेले उत्तर बहुधा तुला इथे उपयोगी पडेल, ‘आई, मला संकेत माणूस म्हणून आवडला आहे, त्याच्या कर्तृत्वावर भाळून मी त्याच्याशी लग्न करते आहे. आणि इतरांनी काय संस्कार केले ह्यापेक्षा त्याने स्वतःवर काय संस्कार घडवून घेतले आहेत ते महत्वाचे ना’. ह्या तिच्या उत्तरावर मी दोन तीन दिवस विचार करत होते. मला खरं तर तिचे खूप कौतुकच वाटले तेव्हा. आता बघ, ही कोण कॅथेरीन. तिचा पूर्वेतिहास काहीही असो, त्यापेक्षा ती आत्ता काय आहे ते बघ ना. दामिनीने तुला सांगितले आहेच कि कॅथेरीनला तिच्या सेल्स मॅनेजरने प्रोत्साहन देऊन शिकायला मदत केली आणि फायनान्सची डिग्री घेऊन मग नोकरीवर घेतले. त्या दोघांना आता पोरेबाळे पण आहेत. मग का बरे आपण तिच्या भूतकाळात शिरून त्यावरून आपल्या मनाला श्लेष करावे आणि आपल्या संसारात फुकाची वादळे आणावी?”

संध्याकाळी घरी जाताना संकेतने दामिनीला आवडतो म्हणून पाणीपुरीचा फॅमिली पॅक घेतला, मस्त मसाला पाने बांधून घेतली आणि घरी पोचताच आधी दोन्ही कान पकडून, “सॉरी दामिनी!!!” अशी निखळ माफी मागितली दामिनीसमोर. दामिनी उदबत्ती लावत होती देवापुढे, तिने उत्तरादाखल हसून मान हलवली.
“आई, बाबाने होमवर्क केले नाही का तू दिलेले म्हणून सॉरी म्हणतोय?” रेवाची बडबड चालूच होती पाणीपुरी खाताना. दोघांनी हसत हसत एकमेकांकडे बघितले.
जानेवारी महिना चालू झाला तशी संकेतचे कॉल्स, मिटिंग्ज, वेळी अवेळी येणे चालू झाले. सेल्स टार्गेट, फायनान्शिअल इयरएन्ड सगळे ग्रह वक्री झाले होते.
“दामिनी, आज मी घरी कधी येईन माहिती नाही ग. आज मला बजेटवर बसलंच पाहिजे फायनल करायला, चल टेक केअर. रेवुला गोड पापी दे एक माझ्याकडून” संकेतने फोन खाली ठेवला.

“किती वर्षाची आहे हो सर मुलगी तुमची?” निखिलाने, त्याच्या नवीन असिस्टंटने विचारले. निखिला नुकतीच आयआयएम मधून पोस्टग्रॅड करून त्याच्या कंपनीत जॉईन झाली होती. राखाडी डोळे, सुंदर ग्रुम केलेले केस, ब्रँडेड कपडे आणि ह्या सर्वाला योग्य असा देह मिळाल्याचा अवाजवी अभिमान नजरेतून दिसायचा तिच्या. सुरवातीलाच कंपनीच्या सिनिअर सेल्स हेड बरोबर काम करायला मिळतय ह्याचा आनंद तर होताच आणि त्याबरोबर संकेतसारखा हँडसम आणि हुशार बॉस.
“यार कसला हॉट आहे माझा बॉस!!!” रोज होस्टेलवर पोचल्यावर रुमीशी तिची चर्चा चालायची. रुमी पण मग तिला खेचायची, “मग विचार ना त्याला येतोस का डेटवर”
“चल, तू भी ना यार, छोड”
“छोड काय? अच्छा, मग त्या अमोल बरोबर लग्न कर हं”
“अमोल तो बिचारा क्लर्क. माझ्याकडे चोरून बघत असतो आणि बोलायची वेळ आली की ततपप करतो, बोबडी वळते त्याची फुल्ल”
….
“निखिला, जरा केबिनमध्ये ये. तू मगाशी ज्या फिगर्स इनपुट केल्यास त्याने आपले रेव्हेन्यू टार्गेट वन थर्ड होतंय. कम फास्ट, हरी अप!!!” संकेतने एकदम कडक आवाजात फोन करून तिला आत बोलावून घेतले.
रिपोर्टवर काम करता करता रात्रीचे दोन वाजले होते. “कशी जाणार आहेस घरी? का सोडू मी घरी तुला? आज रश्मीला सांगून ठेवायला हवे होते तुला कॅब अरेंज करून द्यायला. मी पण विसरलो आणि तिने पण विचारले नाही”. संकेतने केबिन बाहेर येऊन विचारले.
“नाही सर, मी जाईन ना”
“डोन्ट बी सिली, सोडतो मी, चल”

गेले दोन तीन आठवडे संकेत निखिलाला रोज ड्रॉप करत होता, रेडिओ एफएमवर अरिजितची लव सॉंग्स ऐकत ऐकत. कार चालवताना डोळ्याच्या कडेतून त्याला जाणवत होतं की निखिला आपल्याकडे टक लावून बघतीय.
“निखिला, आज वेळ आहे ना तुला?फायनल बजेट्स लॉक-इन केली आहेत. मौसम भी है, दस्तुर भी, चलो सेलिब्रेट करते है. कोरेगाव पार्कला नवीन ‘कश’ नावाचा रेट्रो बार ओपन झालाय नुकताच. लेट्स ट्राय दॅट”
“ओके सर, चलो” असे म्हणून निखिला निघाली संकेतबरोबर.
रश्मी तिच्या केबिनमध्ये बसून सगळे बघत होती. “नवीन पाखरू आलं वाटतं ह्याच्या जाळ्यात, अवघड आहे माणूस!!! सोड रश्मी अब वो तेरे बस की बात नाही, तू आता जपाची माळ घेऊन बस फक्त” स्वतःवरच चडफडत होती रश्मी.
‘कश’ चा माहोल अफलातून होता, अगदी झिंग आणणारा. तरुणाई उफाळून आली होती आजूबाजूला. सगळीकडे वेगवेगळ्या पेयांचे पेले रिचवले जात होते, मंद दिवे, खास वायब्रन्ट म्युझिक फ्लोअर.
निखिला ह्या वातावरणाला सराईत असावी बहुधा. संकेतसमोर बसून ती देखील धुंद झाली होती. संकेतने योग्य संधीची वाट बघून प्रश्न टाकला, “सो आर यू सिंगल?”
खळखळून हसत निखिला म्हणाली, “नो, बट आय विश आय वॉझ व्हेन एम विथ यू!!!”
तिच्या बिनधास्तपणाचे त्याला जाम कौतुक वाटले.
“दॅट इझ इंटरेस्टिंग, अँड आय टेक इट ऍझ अ कॉम्प्लिमेंट!!!” त्याच्यातला पुरुष फुत्कार टाकत होता आता.

“दामिनी, आज खूप लेट होतोय, मी ऑफिसमध्ये गेस्टरूममध्ये झोपतोय” पटकन एक मेसेज टाकून संकेतने निखिलाला मिठीत घेतले…
पुढील चार पाच महिने संकेत ह्या नवीन लाटेवर स्वार होता. दामिनीबरोबर संसाराचा खेळ खेळणे त्याच्या दाये हात का खेळ झाला होता आता. जरा लाडात येऊन बोलणे, तिच्या करियरचे कौतुक करणे, घर संसार कशी कसरत करतेस ग तू, बायको – तू आहेस म्हणून माझ्या ह्या सगळ्या उड्या, थँक्स अ टन… असली नाट्यपूर्ण वाक्य फेकली अधून मधून की कोणत्याच कामात आपला सहभाग गृहीत धरला जात नाही आणि वर नारीशक्तीचा अहंकार पोसला जातो हे ह्या ‘जातीच्या’ नराला कळून चुकले होते.
“केत, नेक्स्ट मंडे माझा लास्ट डे. मग मी जाणार जयपूरला कायमची. माझं लग्न 20 फेब्रुवारीला आहे.आय विल चेरीश दिझ मुमेंट्स विथ यू फॉर माय लाईफटाइम” संकेतच्या केसांशी खेळत निखिला बोलली.
“ओह निक, मी टू. आलीस पुण्याला की भेट नक्की”

संकेतने कामात लक्ष वाढवले. एक नवीन डील मिळत होते, दासानीला बरेच होप्स होते ह्या वेळेस.
“संकेत, यू मस्ट गो टू एल ए इमिडीएटली. तिथे आपली क्लायंट पार्टनर आहे अंजली. गेट इंटू हर गुड टर्म्स…हे डील आपल्यालाच मिळाले पाहिजे. तुझे सगळे लकी चार्म्स पणाला लाव” दासानी एकदम पेटला होता

दामिनी आणि रेवा विमानतळावर आल्या होत्या त्याला सोडायला. “बाबा, लवकर परत ये आणि मला डॉल हाऊस प्रॉमिस केले आहेस विसरू नकोस” रेवा घट्ट मिठी मारून तिची मागणी सांगत होती.
विमान लँड झाले आणि बाहेर रिप रिप पाऊस. कशीबशी कॅब घेऊन पोचला संकेत हॉटेलवर आणि दिली ताणून. पहाटे पाचलाच जाग आली एकदम…
सकाळी ब्रेकफास्ट करून खोलीच्या खिडकीतून आजूबाजूचा परिसर बघत होता संकेत. त्याच्या खिडकीतून इंटरस्तेट 5 चा मोठा लूप दिसत होता. खूप धुकं होतं तरी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, कंटेनर दिसत होते त्यांच्या लुकलूकणाऱ्या दिव्यांमुळे. त्या दिव्यांकडे बघत बघत संकेत भूतकाळात शिरला.
असेच तर होते वातावरण त्या तात्पुरत्या पालकांकडे दोन वर्षे. ते दोघे तात्पुरते पालक, दिवसभर विडी वळण्याच्या कारखान्यात जायचे, घरी म्हातारी आजी. शाळेतून यायचं, खायचं, पाणी भरायचं आणि डोंगरावर जाऊन वारा पीत बसायचं. तिथून शहर असंच दिसायचं. तिथेच तर पहिली शिकवणी मिळाली होती ना.
पंधरा वर्षाचा असेल तेव्हा तो. त्याच्या मागून जोरदार धप्पा दिला तिने, कोलमडून पडला असता तो पाठमोरा डोंगर उतारावर. पण लगेच सावरलं स्वतःला आणि वळून बघतो तर शकी. त्या वस्तीतल्या नरांच्या गरजा भागवणारी एक मुक्त मादी. असेल वयाने पंचवीशीची. शाळेतून येता जाता संकेतची नजर भिडायची तिला आणि तिलाही कळायचं काय हवंय त्याला.
आज डोंगरावरचा वारा बेभान झाला होता आणि संकेतही. शकीला ह्या पोरामध्ये एवढी उर्मी असेल अशी कल्पनाच नव्हती, तीही मोहरत गेली.

“सर, युअर कॅब हॅझ अराईव्हड” फोन किणकिणला आणि संकेत भानावर आला. कस्टमरच्या रिसेप्शन डेस्कला पोचला, कार्ड दिले आणि बसला सोफ्यावर वाट बघत मिस अंजलीची. बाहेर पावसाची भुरभुर चालूच होती, काचेवरून ओघळणारे पाणी बघत बसला तो एकटक.
टकटक टकटक बुटांचा आवाज आला म्हणून त्याने वळून बघितले तर एक मिडल एज बाई, फॉर्मल्स मध्ये येत होती त्याच्या दिशेने. मजेची बाब अशी की ती देखील तिच्या बॉबकट केसांवरून सारखी हात फिरवत होती. “हॅलो, मिस्टर कर्णिक?!, दिस इझ अंजली. हाऊ आर यु? प्रवास चांगला झाला ना?”
शेकहॅन्ड करून अंजली त्याला तिच्या केबिनमध्ये घेऊन गेली. “तुम्ही काय घेणार चहा, कॉफी? अँड देन लेट्स टॉक बिझिनेस, माझ्या दुपारी खूप साऱ्या मिटींग्ज लाईनड अप आहेत.”
पुढचा एक तास संकेतने त्याच्या कंपनीने मांडलेली प्रपॉझिशन्स तिला प्रेझेंट केली. आम्ही कसे तुमचे ‘तारणहार’ आहोत हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तिच्या कमेंट्स ऐकून तिच्या हुषारीची तारीफ ही केली. अंजली पूर्णपणे लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐकत होती. “वेल मिस्टर कर्णिक. प्रथमदर्शी तुमचे प्रोपोझल ओके वाटतंय. गिव मी अ विक्स टाइम. वी शल कम बँक टू यू”
“धन्यवाद, तुमचा बहुमूल्य वेळ आणि ही संधी दिल्याबद्दल. तुमच्या ह्या क्षेत्रातील ज्ञानाने मी खूपच प्रभावित झालो आहे. तुमच्याबरोबर ही डील करायला मजा येईल. कॅन आय ऑफर यू अ ड्रिंक समटाईम?”
“मी कळवेन तुम्हाला, नाइस टू मिट यू” कोरा चेहरा ठेवत अंजली उद्गारली आणि पुढच्या कामाकडे वळली.
संकेत निघाला पण प्रचंड तणाव घेऊनच. हे असे पहिल्यांदाच घडत होते की त्याचे अजिबात इम्प्रेशन पडले नव्हते समोरील व्यक्तीवर. दासानी मेसेज मागून मेसेज टाकत होता, काय झाले, काही फोरसाईट, क्लू मिळतोय का? आणि संकेतकडे काहीच उत्तर नव्हते. उद्विग्न मनस्थितीत कॅबवाल्याला सांगितले, “टेक मी टू डाऊनटाऊन प्लिज”

कॅब ड्रायव्हरने संकेतला ‘ब्लाइंड ड्रॅगन’ला सोडले. विचारांच्या नादात संकेत आत शिरला. संध्याकाळ अजून व्हायची होती पण आत सगळीकडे लालसर अंधुक प्रकाश पसरला होता. “Welcome Sir, my name is Alfred. What can I offer you?” बारटेंडरने फडकं मारत विचारले.
“Hello Alfred, can you get me scotch please, on the rocks” कोट काढून संकेत बसला. त्याच्या मनातली आवर्तने चालू झाली.
त्याने लहानपणापासून केलेली शिकण्याची धडपड, रगेल आणि रंगेल स्वभाव, एका कॉनफरन्सला भेटलेली दामिनी, चालू झालेले संसाराचे गाडे, करियरच्या प्रत्येक पायरीवर कुस्करलेली अनेक फुले आणि कळ्या. त्यात चूक काहीच नव्हते, त्या आपणहोवून आल्या होत्या माझ्याकडे, माझ्यावर आकर्षित होऊन. ‘कोण असतील माझे आईबाप?’ – हा वर्षानुवर्षे पोसलेला आणि फणा काढणारा प्रश्न पुन्हा वर डोकावत होता. “Another scotch please!” तो विचार कसाबसा दूर सारला त्याने.
“पण मग आज मी कुठे कमी पडलो? बिझिनेस साईड तर मी उत्तम मांडली, तिचे निखळ कौतुकही केले, तिचे मुद्दे पण मान्य केले. मग हवा तसा रुकार का नाही मिळाला एका फटक्यात. काय चुकले आपल्या अप्रोचमध्ये आज? संकेत बेटा, gather your thoughts, else that bloody Dasani will suck the blood out of you!”
अजून एक स्कॉच रिचवून संकेत हॉटेलवर निघाला कॅबने आणि फोनवर मेल नोटिफिकेशन दिसलं. “इमेल आणि ती देखील अंजलीकडून? च्यायला, देव पावला म्हणायचा!” संकेतने झटकन मेल उघडला.
‘Mr. Karnik. Let’s meet at PINK BOTTOM bar in South LA tomorrow evening 7 pm sharp. No business but just casual meet since you had offered me a drink.’
संकेतचे विचारचक्र चालू झाले, “ओह, नो बिझिनेस हं? बाई, पाव ग मला. तुझ्यापेक्षा मला ह्या डीलमध्ये जास्ती इंटरेस्ट आहे, तू फक्त एक माध्यम आहेस माझ्यासाठी.”

दुसरा दिवस फक्त दासानीला मोघम उत्तरे देण्यात; दामिनीशी, रेवाशी गप्पा मारण्यात गेला. “होईल रे सगळं नीट. Give your 100% and leave it. You either will get success or experience. All the best!!” त्याला दामिनीच्या ह्या बॅलन्सड विचारांचे फार कौतुक वाटायचे.
….
PINK BOTTOM ला पोचला संकेत आणि एक टेबल त्याच्या नावाने अलरेडी बुक केलेय असे त्याला कळले. “Hello, Mr. Karnik. Well, you are quite on time” संकेतने वळून बघितले.
दारातून अंजली येत होती. हाय हिल्स, ब्लॅक वन पीस, गळ्यात अडकवलेला रॉयल ब्लु स्कार्फ, आणि तीच ती केसातून हात फिरवण्याची स्टाईल.
ओह गॉड, हे पाखरू कधी फसणार!!! संकेत असा बघत उभा राहिलेला बघून अंजलीने विचारले, “आर यू ऑलराईट?”
“ओह, याह! मिस अंजली, हॅलो, नाइस टू मिट यू अगेन. प्लिज बसा ना” खुर्ची मागे ओढून संकेतने तिला बसवले.
“मी जसं मेल वर कळवलंय तसं आज आपण बिझिनेस अजिबात बोलणार नाही आहोत. रादर मला ते बोलणे अलाउड पण नाहीये आमच्या कंपनीच्या एथिक्स कोड प्रमाणे. पण लेट्स जस्ट टॉक नॉनबिझिनेस ऍझ फ्रेंड्स”
मग संकेतने अश्याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. अंजली त्याच्याकडे खूप निरखून बघतीय हे त्याच्या ध्यानात येत होते सारखे आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव पण खूप बदलत होते.
“संकेत, तुला…मी तुला म्हणलं तर चालेल ना?”
“हो हो, ऑफ कोर्स, व्हाय नॉट! प्लिज…”
“संकेत, इथून माझ्या घरी येशील? तुला मला काही दाखवायचे आहे”.
संकेत थोडा बावचळला पण लगेच ‘हो’ म्हणाला. दोघे निघाले, अंजली सफाईदार ड्राइविंग करत होती. एका रेसिडेंशियल एरिया मध्ये गाडी शिरली आणि एका मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली. ड्राइव्ह वे मधून आत जाऊन अंजलीने गाडी पार्क केली आणि त्याला आत घेऊन गेली.
“प्लीज, जरा बस मी आलेच” असे म्हणून ती आत गेली. संकेत सोफ्यावर बसला. एक मोठी लिविंगरूम होती ती. जागोजागी ऐश्वर्याच्या खुणा दिसत होत्या. फायरप्लेसच्या वर काही फोटो फ्रेम्स होत्या. उत्सुक नजरेने संकेत उठून त्या न्याहाळू लागला. “ओह शिट!!! How can this be possible?”
“आहे ना साधर्म्य?” मागून आवाज आला आणि संकेत गर्रकन वळाला. वॉकरचा आधार घेत एक व्यक्ती अंजली बरोबर बाहेर येत होती पार्लरमधून.
“तू म्हणजे अगदी माझा कार्बन कॉपी आहेस” ती व्यक्ती वॉकर बाजूला ठेवून खुर्चीत विसावली. शेजारी ऑक्सिजनचा सिलेंडर ठेवला होता त्यातून कृत्रिम श्वास घेऊन लागली.
“ज्या दिवशी अंजलीने तुला पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितले, शी वॉज इन बिग शॉक. अंजली माझी मुलगी. मी हर्षवर्धन देशमुख, इथे चाळीस वर्षांपूर्वी आलो आणि सेटल झालो. माया माझी बालमैत्रीण. आम्ही दोघे एकत्रच लहानाचे मोठे झालो नागपूरला. तारुण्यसुलभ भावना निर्माण झाल्या आमच्यात आणि एका अनोख्या क्षणी आम्ही एकत्र आलो. तिच्या आईवडिलांना हे कधीच मान्य नव्हते, एका मध्यरात्री तडकाफडकी त्यांनी नागपूर सोडले आणि मागे काहीच ठावठिकाणा ठेवला नाही. मी आणि माझे मित्र मिळून खूप शोध घेतला मायाचा, कुठे गायब करून ठेवली होती तिला देव जाणे. मी खूप विमनस्क परिस्थितीत चार वर्षे काढली. कशातच लक्ष लागायचे नाही माझे. वडिलांनी हाय खाल्ली माझे असे वागणे बघून. माझ्या आत्याने मला मुंबईला आणले, माझे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लावले. पुढे संधी मिळताच मी अमेरिकेत आलो आणि सेटल झालो”
मध्येच दोन क्षण थांबून ऑक्सिजनचा वापर करत हर्षवर्धनने पुढे बोलायला सुरू केली..

“दहा वर्षांपूर्वी पूजा, माझी आणि मायाची मैत्रीण मला भारतात गेलो असताना अचानक भेटली. तिच्याबरोबरील भेटीत मला सगळा वृत्तांत कळाला. रातोरात मायाला घेऊन तिची आई पुण्याजवळच्या एका छोट्या गावात गेली होती. तिथे मायाने एका मुलाला जन्म दिला आणि एका अनाथाश्रमात त्याला सुपूर्त केले. तिथून ते सगळे कुठे गेले ह्याचा त्या मैत्रिणीला काहीच पत्ता न्हवता. मी पुन्हा एकदा खूप शोधाशोध केली, नागपूरमधील जुने कॉन्टॅक्टस शोधले, तेव्हा कळले कि माया आणि तिचे कुटुंब दिल्लीला कायमचे शिफ्ट झाले होते. मायाने वेडाच्या भरात दोन तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता आणि त्यातच तिला एकदा यश आले होते” हर्षवर्धनला एवढे बोलून धाप लागली होती, त्याने परत एकदा ऑक्सिजन मास्क तोंडावर ओढला. त्याने त्याच्या हातातल्या फ्रेमकडे बघत अश्रूंना मोकळं केले.
“डॅड, प्लिज, थोडे थांबा. तुम्हाला त्रास होतोय ह्या सगळ्याचा” अंजलीने हर्षवर्धनच्या खांद्यावर थोपटले.

समोर संकेतची पण काही वेगळी नव्हती अवस्था. “संकेत, कॅन आय ऑफर यू सम ड्रिंक? इट्स टू मच टू टेक इन फॉर यू टू!!!” त्याच्या चेहेर्यावरील भाव झरझर बदलत होते. त्याच्या चेहेऱ्यावर एकाच वेळेस आश्चर्य, आनंद, घृणा, राग, संताप, दुःख सगळे उमटत होते.
अंजलीने दिलेली स्कॉच संकेतने एका दमात संपवली, त्याच्या डोळ्यात आता पाणी जमा होत होते आणि तो प्रचंड निर्धाराने ते परतवून लावत होता. हर्षवर्धनने मात्र त्याच्या अश्रूंना मुक्त वाट दिली होती. त्याच्या मास्कवरून ते वेगाने त्याच्या अंगावर पडत होते. अंजली अरतून परतून दोघांकडे बघत होती.
परत हर्षवर्धन बोलता झाला, “मी मुंबईला परत आलो आणि आत्येभावाच्या मदतीने पुण्यातल्या सगळ्या अनाथाश्रमात तुझा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण मध्ये इतकी वर्षे गेली होती कि मला काहीच यश आले नाही. पण देवाच्या मनात मात्र काही वेगळेच होते. आज अंजलीमुळे मला तू भेटलास”
अंजली संकेतकडे बघून विचार करत होती, “पुअर बॉय, कसा वाढला असेल हा? अँड किती स्ट्रगल केला असेल त्याने आत्तापर्यंत”
संकेत अंजलीकडे बघून विचार करत होता, “सगळी समीकरणच बदलली आहेत इथे. मी हिला जाळ्यात गुंतवण्याच्या हेतूने इथे आलो आणि मीच एका नवीन जाळ्यात अडकत चाललो आहे. हे सांगत आहेत ही असेल माझी जन्मकथा, तर मग अंजली?”
“काय रे, एवढ्या कसल्या गहन विचारात गुंतला आहेस? मी काही डॅडची बाय बर्थ मुलगी नाहीये. माझे वडील गेल्यानंतर आईने ह्यांच्याशी सेकंड मॅरेंज केले आणि आम्ही सॅन फ्रान्सिस्कोवरून इथे शिफ्ट झालो. माय मॉम अँड हिम वेअर लाईक कम्प्यानीयन्स. डॅड अलमोस्ट रोज माया आणि तिचा मुलगा म्हणजे तू अशी आठवण काढत असतात. हेन्स आय थॉट टू मेक यू मिट हिम. अँड आय एम हॅपी टू सी दॅट ओल्ड फेला रिलिव्हड टुडे” अंजली त्याच्या हातात स्कॉच देत बोलली.
“संकेत मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे, तू मला माफ करशील अशी मी अपेक्षाच नाही ठेवत. पण निदान मला भेटायला येशील ना रे इथे आहेस तोवर?” हर्षवर्धन अगदी विनवणीच्या सुरात बोलत होता. त्याला खूप धाप लागत होती.
“आय नीड टाईम प्लिज….मी येतो” असे म्हणून संकेत निघाला आणि भर पावसात चालू लागला. वरून पाऊस आणि डोळ्यातून वाहणाऱ्या धारा, चिंब भिजून निघत होता संकेत. “नियतीने किती क्रूर चेष्टा केली आहे माझी. व्हाय मी गॉड, व्हाय मी!!!” एका कॅबला हात करून संकेत तंद्रीतच हॉटेलला पोचला. बाहेर गारा, विजांचा कडकडाट चालू होता वादळी वारा सुटला होता, ते हायवेवरचे गाड्यांचे दिवे पण कमी होत होते. कितीतरी वेळ मेसेजचे नोटिफिकेशन येऊन गेले होते पण आज संकेत कुठल्याच मनस्थितीत नव्हता. फक्त आढयाकडे बघत पडला होता. “मी कोण, कुठचा, माझे आईबाप कोण ह्याची उत्तरं तर मिळाली मला. पण त्यामुळे माझ्यात काय फरक पडणार आहे. एक कोडं पडलं होतं ते सुटलं!” असा विचार करता करता त्याला झोप लागली.

“कुठे, आहे कुठे हा माणूस! गेले दोन दिवस फोन नाही की मेसेज नाही” दामिनी उषाताईंशी बोलत होती. “अग बिझी असेल कामात” उषाताई भाजी करता करता लेकीशी बोलत होत्या.
दामिनी तिच्या पर्समधल्या त्या पाकिटाकडे सारखे बघत होती. काल तिच्या ऑफिसमध्ये एका माणसाने ते आणून दिले होते आणि ऑफिसबॉयने ते तिच्याकडे पोचवले होते. त्या पाकिटातील ते फोटो बघून खरं तर तिची खूप चिडचिड झाली होती. त्यावर कोणाकडून आले आहे ह्याचा काहीच पत्ता नव्हता. पण मग नंतर तिने शांतपणे विचार केला, “हल्ली डिजिटल वर्ल्ड मध्ये फोटोचे मोर्फिंग आरामात करता येते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष संकेतला विचारलेले बरे, असा संशय करणे योग्य नाही. पण ह्याचा फोन तर आला पाहिजे ना आधी. व्हाट्सएप कॉल पण उचलत नाहीये हा प्राणी”

सकाळी संकेतला जाग आली ती खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या तिरिपेने. “डॅम!! नऊ वाजले पण? आज दासानीबरोबर त्याचा विकली व्हीसी होता. फटकन दात घासून, त्याने लॅपटॉप ऑन केला. दासानी आला नव्हता अजून व्हीसीवर. पटकन एक ब्लॅक कॉफी बनवून घेतली त्याने आणि दामिनीच्या व्हाट्सअप्प मेसेजला पटकन रिप्लाय केला, “ऑल ओके, लिटल बिझी ऑन ऑफिसफ्रंट. विल कॉल ऑन विकेंड”
“संकेत, सो तुझा लकी चार्म कुठाय? होतंय की नाय आपलं काम? हे डील आपल्याला नॉर्थ अमेरिकेत स्प्रेड व्हायला फार महत्वाचे आहे. सो युज ऑल युअर टॅकटिक्स अँड गेट अहेड” दासानी स्क्रीनवर फ्रुट डिश मचामचा खात खात बोलत होता. इथे संकेतचे डोके फुटतंय की काय इतपत दुखत होते. “येस सर, विल डू माय बेस्ट, सी यू लेटर”, असे म्हणून त्याने कल्टी मारली.

पुढील दोनतीन दिवसात अंजलीच्या सिनिअर कडून त्याला मेल आला “आम्हाला तुमचे प्रोपोझल आवडले आहे पण डायरेक्ट पाच वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करता येणार नाही कारण तुम्ही नवीन एजन्सी आहात. तुम्हाला आम्ही एक वर्ष टेस्ट करू आणि मग लॉंग टर्म ठरवू..You may proceed with further formalities. All the best and looking forward to quality deliverables from your company” संकेतला एकदाचं हुश्श झाले.
त्याने लगेच दासानीला कळवून टाकले. आधी तो नाराज वाटला कारण त्याची सगळी मोठी मोठी गणिते कोलमडली. पण हे ही नसे थोडके, पाय तर रोवला गेला असा विचार करून त्याने संकेतला शाबासकी दिली आणि फोन ठेवला.
“थँक्स अंजली, आय ओ यू वन. I wanted to impress you desperately but you were a complete professional. After many years, I didn’t have to play any dirty tricks in business” संकेतने प्रामाणिक कबुली दिली.
“नो मेंशन!!! मी फक्त माझे रेकमेंडेशन पुढे पाठवले होते. बाय द वे, डॅडला भेटून जा नक्की परत जाण्यापूर्वी”
“हो, बघतो, ट्राय करतो” असे म्हणून त्याने फोन ठेवला.
वीकेंडला आधी रेवाची शॉपिंग करून मग तो हर्षवर्धनला भेटून आला. “तुला काय देऊ मी, माझी आठवण म्हणून?” असे विचारता क्षणी संकेतने ती फ्रेम मागितली, मायाची. फोटोत माया कोवळ्या उन्हात हर्षवर्धनवर हलकेच झुकून उभी होती. दोघे एकमेकांकडे बघण्यात इतके गुंतले होते की त्यांना जगाची पर्वाच नसावी. नवीन नाती जोपासण्यात संकेतला काहीच रस नाही हे बघून हर्षवर्धन दुःखी झाला. पण कुठेतरी आपला मुलगा आयुष्यात यशस्वी आहे हे बघून त्याला समाधानही मिळाले.

संकेत एअरपोर्ट वरून तडक घरी निघाला. आपल्याला अचानक सापडलेल्या नवीन नात्यांनी आपली असलेली नाती त्याला फारच महत्वाची वाटू लागली होती. रेवाने डॉल हाऊस बघून बाबाला एक कडक मिठी मारली, चार पाच पाप्या दिल्या आणि ती पळाली ते हाऊस सेट करायला.
“ही घे कॉफी” दामिनीने त्याला लागते तशी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी केली होती.
“दामिनी, ही तुझ्यासाठी डार्क चॉकलेट्स. मला बाकी काही आणणे जमले नाही ह्या वेळेस, सॉरी यार”
“नो इशुज रे!!! सो फायनली तुला डील मिळाले ना?”
“हं, तो एक मोठा किस्साच आहे”…..असं म्हणून संकेतने त्याची, अंजलीची आणि हर्षवर्धनची भेट आणि त्याला झालेली नात्यांची उकल सांगितली.
“ओह गॉड!!! तुला हा सगळा प्रचंड शॉकच असेल रे. But am happy for you, now you take some rest. केवढा दमलेला दिसतो आहेस”…कॉफीचे मग उचलत दामिनी वळाली आणि तिने उशीखाली ठेवलेले पाकीट सफाईदारपणे उचलले संकेतच्या न कळत. किचनमध्ये जाऊन एकदम बारीक बारीक तुकडे करून ड्रेन करून टाकले ते फोटोज. “Poor chap, has been through a roller coaster of his life. I don’t have to add further to his trouble. I should support him now even stronger”
“संकेत आई बरेच दिवस झाले राहायला बोलावतेय, रेवाच्या परीक्षा पण झाल्या आहेत. तर आम्ही जरा चार पाच दिवस जाऊन येतो आईकडे. तुला वेळ असेल तर तू पण चल” रेवाला शाळेच्या बसमध्ये बसवून संकेत ब्रेकफास्ट करायला माघारी आला होता घरी.
“ठीक आहे, मी पण येईन एखादा दिवस. तुम्ही करा धमाल. दासानी काहीतरी टीम मध्ये चेंजेस करतो आहे, माझ्या कामाचा व्याप वाढला आहे, बहुतेक मला टीम वाढवून देईल. टेम्पोररी मानजमेंट ट्रेनी पेक्षा एक पर्मनंट कोणी मिळाले तर फार बरं”

ऑफिसला पोचला तर आज मस्त होळीचा मूड होता सगळ्यांचा. रश्मीने रंग आणले होते आणि दासानी सकट सगळ्यांना “होली है!!!” करत लावत होती. दासानीने सगळ्यांना दुपारी आईस्क्रिमची पार्टी द्यायचे घोषित केले होते.
“हॅपी होली माय लव्ह!!!!” रश्मी लाडिकपणा करत संकेतच्या गालाला गुलाबी रंग फासू लागली. तिचा हात पकडत, संकेतनेच तिला तो गुलाबी रंग फासला. “हॅपी होली माय काजूकतली”. क्षण दोन क्षण रश्मी त्याच्या डोळ्यात गुंतून गेली. “चल, हट कमीने!!” असे म्हणून निघून गेली. संकेतही त्याच्या केसांमध्ये हात फिरवत केबिनकडे वळला.

“संकेत, जरा माझ्या केबिनमध्ये ये” दासानीचा फोन.
केबिनमध्ये दासानीच्या समोर एक मुलगी बसलेली. “ये, ये संकेत. संकेत, हि रचना. लेटेस्ट आयआयएमची पास आऊट आहे. ब्रिलियट आयडीयाज आहेत ह्या तरुण पिढीकडे. तुझा एक्सपेरियन्स आणि हिच्या आयडीयाज, मजा आयेगा तुम दोनोके साथ काम करने में. सो रचना, हा तुझा डायरेक्ट बॉस आणि तसे आपल्या ऑफिसमध्ये एकदम फ्री वातावरण आहे, सो नो फॉर्मॅलिटीज. वेलकम ऑनबोर्ड वन्स अगेन. तुझी रश्मीशी ओळख झालीच आहे इंडक्शनला. सो बाकी एच आर प्रोसिजर ती घेईल करून.”
दासानीकडून निघून संकेत रचनाला घेऊन आला आपल्या केबिन पाशी. “मी इथे बसतो, आणि तुझे हे डेस्क. फील फ्री तो पॉप इन एनी टाइम. वी आर टीम नाऊ”
“थँक्स सर!”
“नो सर, ओन्ली संकेत”
“ओके सर” जीभ चावून रचना म्हणाली, “ओके संकेत”

“हॅलो रचना, ते फायनल कमर्शिअल वर्किंग कुठल्या फोल्डर मध्ये ठेवले आहेस. तुला पण आजच सुट्टी हवी होती का यार….” संकेत करवदला फोन वर. पलीकडून खूपच क्षीण स्वरात रचना बोलत होती, “फ्लू झालाय, पूर्ण झोपूनच आहे वीकेंडला पण. सॉरी संकेत”
संकेत वरमला लगेच, “सॉरी रचना. यार तू मला खूप डिपेन्डन्ट करून टाकले आहेस बघ तीन महिन्यातच. डॉक्टर काय म्हणाले, औषधे दिली आहेत ना? मला जमले तर मी येऊन जाईन भेटून तुला, कुठे राहतेस तू? … कर्वे नगर! अच्छा, प्रतिज्ञा हॉलच्या जवळ का? ठीक आहे. टेक रेस्ट”
संकेतला उशीरच झाला ऑफिसमधून निघायला आणि मग त्याला आठवले कि रचनाला भेटायला जायचे आहे. “मी जरा एका टीम मेम्बरला भेटून येतो, आजारी आहे” असा मेसेज टाकला दामिनीला आणि तो निघाला.
एका अपार्टमेंट मध्ये रचना भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होती.
“एकटीच राहतेस?”
“हो, मला जरा साफ सफाई सगळं साफ आवडते आणि रूममेट बरोबर झेपेलच असं सांगता येत नाही ना” संकेतने आजूबाजूला बघितले. खरंच घर छान ठेवले होते, कुठेही बॅचलर मुलगी राहत असल्याच्या खुणा नव्हत्या.
“हि घे कॉफी” रचना दोन मग घेऊन आली.
“अरेच्चा हे कशाला ग, तू पेशंट आहेस ना? मग तुझे खायचे प्यायचे काय?”
“वरण भात झिंदाबाद” हसून रचना बोलली.
रचना खरोखरच निरागस होती. “बरं चल, टेक केअर” रचनाला एक हलकासा हग देऊन संकेत निघाला.
काहीतरी हुरहूर निर्माण झाली होती संकेतच्या मनात. “ह्या मुलीने काय जादू केली आहे माझ्यावर. इतक्या पोरी बघितल्या आहेत, पण हि काही वेगळीच” गाडी चालवताना विचारचक्र चालू होते त्याचे.

दुसऱ्या दिवशी संकेतने एक बुके ऑर्डर केला, रचनाचा ऍड्रेस ऍड केला आणि संध्याकाळी पाठवून दिला. “गेट वेल सून” अशी नोट पण ऍड केली. रचना दोन दिवसांनी जॉईन झाली परत. “संकेत, थँक्स फॉर युअर विशेस!!!” त्याच्या टेबलवर कॅडबरी ठेवत ती पाठमोरी वळली.
“श्याह!! हि इतकी निरागस का आहे? म्हणा तोच तर तिचा यूएसपी आहे. मी तिच्याकडे खूपच आकर्षित होत चाललो आहे. साला इतकी वर्षे, एवढ्या पोरी आल्या आणि गेल्या. सगळ्या स्वतःहून वहायच्या स्वतःला माझ्या पायावर. काही माझ्या लुक्सवर खूप खुश होऊन, काही माझ्या स्किल्स वर खूश होऊन. हीच आहे जी मला बधत नाहीये. हिला कळतच नाही मला काय हवय का सोंग घेतीय?” संकेतच्या डोक्यात वादळ चालू होते.

आज रचनाला इथे येऊन वर्ष झालं होते. संकेतच्या केबिनमध्ये बसून रचना तिच्या लॅपटॉपवर काम करत होती, एक बिडिंग शीट फायनल करायचे होते संकेत बरोबर. संकेतने उठून केबिनचे काचेचं दार लोटले आणि खिडकीकडे जाऊन बाहेर बघत बोलला, “रचना लास्ट डील आपल्याला निव्वळ तुझ्या मेहेनतीमुळे मिळाले आहे. मी फक्त तुला गाईड केले त्यात. तुला मी नक्कीच चांगली रेझ देईन ह्या वर्षी, तुझा परफॉर्मन्स खूपच छान आहे”
“थँक्स अ लॉट संकेत. मी तुमच्या कडून खूप शिकते आहे रोजच”
“अच्छा, म्हणजे मी तुझा गुरु आहे तर. मग मला गुरुदक्षिणा काय मिळणार?”
“तू म्हणशील ते. तुला पार्टी हवी असेल तर फर्स्ट वीकमध्ये नक्की देईन” रचना तिच्या कामात गुंगून उत्तरली.
“हे बघ फायनल करूया का हे बिडिंग?” असे म्हणून तिने वर बघितले तर…
रचनाच्या मागे उभा राहून तिच्या खांद्यांवर हात ठेवत संकेत उद्गारला, “रचना, तू एवढी इनोसंट का आहेस ग?”
“संकेत, प्लिज. आपण काम संपवूया का?” संकेतच्या डोळ्यातला विखार आणि त्याचा बदललेला आवाज ऐकून रचना घाबरली होती. तिने त्याचे हात झटकून टाकले आणि उभी राहिली. ऑफिसात अजून वर्दळ होती, रचना वेगाने बाहेर पडली केबिनच्या आणि वॉशरूमला पळाली आणि आतून बाहेर येणाऱ्या रश्मीला धडकली. “अरे, जरा सांभाळून!!!” रश्मीने रचनाला सावरले. चेहऱ्याकडे बघते तर रचनाचे डोळे भरून आलेले. सगळा प्रकार कळताच रश्मी तडक संकेतकडे गेली. “हे बघ संकेत, आत्तापर्यंत तुझे खेळ चालू शकले, कारण त्यात मुलींची मर्जी होती. कोणी तक्रार केली नव्हती. पण आता तुझं धाडस वाढत चाललंय. ऍझ एचआर हेड, ही फर्स्ट वॉर्निंग समज माझ्याकडून. ती मुलगी इंडक्शनला पण नोट्स काढत होती, किती सिन्सीअर आहे बघ. तिने POSH कडे कॉम्प्लेट केली तर…. बास कर तुझे प्रताप, no good will come out of it”
“Rashmi, this is all bullshit!!! तिला पण मी आवडतोय, म्युच्युअल कनसेन्टने काही घडले तर तुझं काय जळतंय? ओह, मी तुला कधी दाणे टाकले नाही म्हणून …”
“ओह, शट अप संकेत. मला हवे तर मी तुला कधीच उध्वस्त करू शकले असते…”
…..
संकेत तिरिमिरीत निघाला, रंगाचा बेरंग झाला होता. संकेतचा इगो हर्ट झाला होता, तो चवताळला होता आता. “ही कालची मुलगी मला नाही म्हणते, मला, संकेत कर्णिकला!?”
संकेतने रोज रचनाला फुले पाठवायला सुरवात केली. तिच्या घरी वेळी अवेळी जाऊन दारात उभं राहू लागला. रचनाने शेवटी घर बदलले. एक दिवस मिटिंगचा बहाणा करून संकेतने केबिन मध्ये बोलवून तिला सांगितले, “रचना, तू मला हवी आहेस. काहीही करून तुला मी मिळणारच. मी एवढा चार्मिंग आहे, तुही यंग अँड हॉट आहेस, स्मार्ट आहेस. आय लाईक यू अ लॉट. अँड नो स्ट्रिंग्स, जस्ट मजा करायची, ऐश करायची बॉस बरोबर, बस्स!!” रचना खुर्चीवरून ताडकन उठली आणि तिरिमिरीने बाहेर आली.

दासानीच्या कंपनीत ‘पॉश’ कमिटी पुढे आज संकेतची केस मांडली गेली होती. ‘मी टू’ च्या वावटळीला नुकतीच सुरवात होत होती जगभरातून आणि त्या पार्श्वभूमीवर खुद्द दासानी, एक इंडिपेंडंट डायरेक्टर आणि रश्मी, रचनाने रेकॉर्ड केलेला ऑडिओ ऐकत होते. संकेतने उघडपणे केलेल्या मागण्या ऐकून दासानीचा चेहरा वाकडा होत होता.
संकेतला ऑफिसमध्ये येण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली होती आणि त्याने रचनाशी संपर्क साधू नये अशी वॉर्निंग पण दिली गेली होती. इंडिपेंडंट डायरेक्टरने फायनल रिपोर्ट शेअर केला दासानीकडे.
“Is there no other option?”
“Not really, if you want to safeguard your company’s image and brand”
“Hmm, it’s quite a difficult decision for me to ask him to resign”
“Yes but that is decent than getting kicked out, isn’t it?”
दासानीने संकेतला फोन करून राजीनामा देण्यास सांगितले. त्याला त्याचा पुढचा सहा महिन्यांचा पगार दिला जाईल ह्याचे आश्वासनही देण्यात आले. रचनाशी त्याचा कोणताही संपर्क होणार नाही असे लीगल डॉक्युमेंटवर लिहून साइन करून, ते एच आर फाईलला जमा केले गेले. तसेच ह्या प्रकरणाची पब्लिकली तो कुठेही वाच्यता करणार नाही ह्याची हमी घेतली गेली.

“गुड लक संकेत, लेट्स कीप इन टच” सगळी फॉर्मल बोलणी झाली आणि संकेत त्याचा बॉक्स घेऊन निघाला, रश्मीने लांबून त्याला हात उंच करून बाय केले.
…….
उद्विग्न मनस्थितीत घरी पोचतो तर, टी पॉयवर पडलेली चिठ्ठी दिसली त्याला, “संकेत, गेले कित्येक महिने मला निनावी पाकिटे येत आहेत. त्यात तुझे वेगवेगळ्या बायकांबरोबर असलेले फोटो असायचे, कधी कुठे बार मध्ये, कधी हॉटेलमध्ये, कधी कारमध्ये तर कधी पार्किंगमध्ये. मी इग्नोर करत राहिले कारण मी तुझ्या प्रेमात आंधळी होते. माझ्यासाठी ‘विश्वास’ आणि ‘खरे बोलणे’ किती महत्वाचे आहे हे तर तुला माहितीच आहे. आज त्याला पूर्ण तडा गेला आहे. मी कायमची आईकडे जाते आहे, रेवाला घेऊन. तुला मी डिओर्स देणार नाही कारण मला रेवाचे बालपण कुस्करायचे नाहीये. तिच्यासमोर तुला बापाची इमेज मेंटेन करायची आहे, हे एक काम मात्र तू मनापासून करशील अशी विनंती. काळजी घे स्वतःची….”

संकेत आढयाकडे बघत उताणा पडला होता बेडवर….आयुष्याच्या वळणांवर प्रवास करताना केलेल्या सगळ्या बेरजा वजाबक्या मांडत होता…..शिलकीत काय राहिले, एकटेपण आणि बरबाद झालेले करियर.
…..
“संकेत, कसं वाटतंय आता तुला? सहा महिने तू आमच्या कार्यशाळेत आहेस, तन मन शुद्धीकरण, आपल्याला स्वतःला ओळखण्यात तुला नक्कीच ह्याची मदत होईल अशी मी अपेक्षा करते…गुरुमय्या अगदी तन्मयतेने बोलत होत्या.

“संकेत, तू नक्की माझ्याशी लग्न करशील ना रे?” आश्रमातील अशोकाच्या झाडाखाली बसून जान्हवी संकेतला विचारत होती.
“हो ग, पण इथले माझे ट्रेनिंग तर संपू दे”
“नाही, लवकर करावे लागेल. माझे पिरिअड्स आलेले नाहीत दोन महिने” गुरुमय्यांची मुलगी जान्हवी त्याच्या मांडीवर डोके ठेवून आडवी झाली होती.
संकेतने अस्वस्थ होत केसांमधून हात फिरवले… रावण मेला नव्हता…

3 Comments

  1. अभिनंदन, खूप खूप अप्रतिम जमली आहे कथा.
    अत्यंत आवडायचं अजून एक कारण म्हणजे माझा एक बॉस होता असलाच. सेम मेंटलिटी. डोळ्यासमोरून गेलं सगळं झरझर.
    हे रावण मरत नसतात ग,प्रॉब्लेम हा की त्यांना कायम मंदोदरी मिळते जी एकनिष्ठ असते त्याच्याशी
    परत एकदा कॉंग्रेट्स.

  2. Akdam sunder. Vachatana sagala dolyasamor ghadtay asa vatat hota. Congratulations Bhavana.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *