प्रारब्ध आणि पुरुषार्थ, दोघे पक्के होते दोस्त!
एकमेकांवर प्रेम करत मार्ग क्रमणारे!
हातात हात घालून एकदा ते गेले फिरायला!
वाटेत दिसला शेतकरी, मेहनत करून घामेजलेला!
त्याला कामात पाहून पुरुषार्थाला आनंद झाला,
आणि नकळत त्याच्या तोंडून आनंदोद्गार निसटला,
“वा छान मेहनत करतो आहे, श्रम त्याचे सार्थकी लागतील!
नक्की त्याचे श्रम सार्थकी लागतील!”
पण…
पुरुषार्थाचे बोल ऐकून प्रारब्धास आला राग!
खरोखर प्रारब्धास आला खूपच राग!
“अरे पण प्रारब्धात नसेल तर कसं मिळेल फळ?” वदला त्याचा जळफळाट.
“अरे पुरुषार्थच प्रारब्ध घडवते!” म्हणत पुरुषार्थ फुशारला
“अरे हट! प्रारब्धाच्या कृपेविना फळ नाही!”
प्रारब्ध फिस्कारला
दोन मित्रात मग जुंपली लढाई जशी वैऱ्यातही जुंपत नाही,
कारण रागाचा उद्भव होतो तिथे सद्भावना टिकतच नाही!
रागाच्या भरात दोघांचा सुटला तोल! अगदीच सुटला तोल,
प्रारब्धाने पुरुषार्थाचा फोडला डोळा नि पुरुषार्थाने त्याचा पाय मोडला!
तुटली मैत्री आणि झाली विपरीत शत्रुची जोडी अगदी; विपरीत जोडी!
आंधळ्या पुरुषार्थास दिसेना नि लंगड्या प्रारब्धाच्या चालण्यात खोडी!
आंधळ्यास दिसत नाही नि अपंगाच्याने चालवत नाही
म्हणूनच –
आजही आंधळ्या पुरुषार्थाच्या खांद्यावर चढलेले प्रारब्ध,
मानगूट माणसाची सोडत नाही!
अहो, मानगूट माणसाची सोडत नाही!!!