आयुष्य वेचताना सौजन्य ते जपावे,
आनंद वाटताना सौख्यासवे जगावे

हास्यातुनी खुले जे माधुर्य ते दिसावे,
डोळ्यांत भावनांचे तात्पर्य आकळावे

सांजावल्या दिशांनी रंगात धुंद व्हावे,
सौंदर्य सोहळ्यांनी गाण्यासवे सजावे

गंधाळल्या क्षणांना काव्यात गुंफवावे,
धुंदीत आठवांच्या काव्यास त्या स्मरावे

प्रेमात चिंब न्हावे, थोडे तरी रुसावे,
लाडीक स्पर्श होता रोमांच ते उठावे

शब्दांस मोल भारी, तोलोनि वापरावे,
शब्दांस धार येता नाते न ते तुटावे

मौनात दुःख जागे, अश्रूंत ओघळावे,
जाणीव स्पंदनांची होऊनिया भिडावे

छायेस हर्ष वाटे, की दुःख ते असावे,
अस्तित्व का तियेचे ग्रीष्मात गौरवावे

चिंता उगाच वाटे, जीवास घोर लागे,
हे दुःख जीवनाचे कोणीतरी टिपावे

4 Comments

  1. खूप छान.. काव्य

    1. धन्यवाद, व्यंकटेश!

  2. शब्दास धार येता नाते न ते तुटावे

    अप्रतिम 👌👌

    1. धन्यवाद, राम!

Leave a Reply

Your email address will not be published.