कोलाहल हा कसला
खोलवर रुतलेला
सवयीचा झालेला
शांततेची शाल पांघरलेला
बंद करतो कवाडं
मनाची
अन कानाची
मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय का ???
या प्रश्नाला हो चं नकारात्मक उत्तर देऊन
करतो फसवणूक जो तो आपल्याच ज्ञानाची
आपण आपल्या आत खोल जातो का
हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून स्वतःला तपासलं पाहिजे
खोल उतरता आलंच पाहिजे
धांडोळता आलं पाहिजे
स्वतःला समोर कान धरून उभं केलं पाहिजे
पुरे आता मी चा कैवार
कारण
मी
माणसं तोडतो
जमीन सोडतो
आणि बाहेर आणतो…
आतुन
आणि खोली सम्पवतो
खोलात जायची वृत्ती सम्पवतो
भवतालाच्या गोंगाटात शांतता ऐकू आली पाहिजे
आली तर सोसली पाहिजे सोसून घेता आली पाहिजे
कारण खरी शांतता जास्त कर्कश
गडद आणि भक्क असते.
2020-11-06