रिक जाता जाता थांबला. माझ्या टेबलकडे बघत त्यानं विचारलं,
“What is that?”
टेबलावरच्या विविध गोष्टींपैकी तो नक्की काय विचारतोय हे मला समजलंच नाही. मी खुणेनंच त्याला ‘काय?’ म्हटलं. त्यानं बोट दाखवत मला परत तेच विचारलं. मी आश्चर्यचकित होऊन क्षणभर थबकलेच. खात्री करण्यासाठी तो ज्याकडे बोट दाखवत होता ती वस्तू मी हातात घेतली. त्यानं मान डोलावून तो त्याबद्दलच विचारतो आहे याची खात्री केली.
मी त्याला म्हटलं,
“Oh Rick, you are kidding, right?”

त्यानं मान हलवून नकार दिल्यावर मी हादरलेच.
माझ्या हातात, मी सकाळी खाण्यासाठी घरून घेऊन आलेला… पिकलेला पिवळा जर्द, रसाळ, अटाअल्फो जातीचा मेक्सिकन आंबा!
रिक, ऑफिसमधला साठीला आलेला सिनिअर सेल्स मॅनेजर!
मी त्याला म्हटलं,
“Rick, my dear, this is Mango.”
त्याचा चेहरा क्षणार्धात उजळला.
तो म्हणाला, “Oh, is that how the real Mango looks like? I did not know.”
दोन नातवांचा आजोबा असलेल्या त्याच्याकडे पाहात, आश्चर्य लपवत, मी विचारलं, “तुला आंबा कसा दिसतो माहीत नाही? खात नाहीस का कधी?”
तर तो म्हणाला, “आंबा तर अगदी रोज खातो. माझ्या ब्रेकफास्ट स्मूदीमधे आंबा कायम असतो.”
मग मी त्याला विचारलं, “अरे रोज खातोस तर आणत असशील नं!”
म्हणाला “हो, पण एक तर क्यूब्ड फ्रोझन आंबा आणतो किंवा आधीपासून कापून ठेवलेला प्लास्टिकमधला पॅक्ड आंबाच आणतो. नाहीतर मग मँगो पावडर. फळ कधीच पाहिलं नाही.”

ते ऐकलं आणि हसावं की रडावं… कळेचना मला. कीव आली. मग मी त्या आंब्याचं साल काढून, कापून, ताटलीत घालून बरोबर काटा चमचा ठेवून त्याला खायला दिला. बराच वेळ त्याच्या ऑफिसमधून मिटक्या मारण्याचे आवाज आले. लहान मुलाच्या उत्साहाने त्याने मला ‘काय मस्त लागतोय फ्रेश आंबा!’ असं चारदा सांगितलं.
पुढचे २-३ दिवस मी त्याला आंब्याची जन्मकहाणी सांगितली. कसे, कुठे उगवतात, कसे खातात, किती जाती असतात हे सांगितलं. आता कधीतरी ‘Real thing’ आणून बघायचं त्यानं ठरवल्यावर मगच मी त्याचं बौद्धिक घ्यायचं थांबवलं.

The real thing! कुठे गेल्या या सगळ्या रिअल थिंग्ज? टोमॅटो म्हणजे केचपची बाटली असं वाटणारी मुलं जन्माला घालणारी आमची पिढी. जमानाच गेलाय अस्सल गोष्टींचा. सगळं काही ह्याने आणि त्याने फ्लेवर्ड. मूळ स्वरूपात काहीही न खाता, विकता त्याचं शेल्फ लाईफ वाढावं म्हणून त्याला काहीतरी रूपात विकायला काढलेली जमात. मूळची गोष्ट मुबलक उपलब्ध असेल तरीही सब्स्टिट्यूटच्या नादाला लागलेली.
परवाच माझ्या मुलीबरोबर पॉपकॉर्न घेतलं. त्या बाईनं विचारलं, “बटर पाहिजे का?”
गरम गरम लाह्यांची बटरशिवाय गंमत ती काय! मी म्हटलं, “हो.”
ती आता पातळ केलेल्या लोण्याची धार तुपाच्या धारेसारखी सोडणार माझ्या पॉपकॉर्नवर म्हणून मी बघत होते. तिनं काउंटरवर ठेवलेला एक कॅन उचलला. फस्स्स्स आवाज करत तिनं माझ्या पॉपकॉर्नच्या पुड्यावर पिवळा जर्द स्प्रे मारला. बटरच्या वासाचा एक तेलकट थर त्या पॉपकॉर्नवर उतरला. ते बघून माझ्या अंगावर काटाच आला. मी तिला विचारलं, “बाई, काय केलंस हे?”
ती म्हणाली, “हा बटर फ्लेवर्ड स्प्रे आहे. बटरपेक्षाही चांगला लागतो आणि चांगला असतो तब्येतीला.”
आता मूळ बटरपेक्षा इतर काहीही चांगलं कसं बरं लागू शकेल, या संभ्रमात मी! मी तिला तो कॅन मागितला बघायला. त्याच्या घटक पदार्थांमध्ये कुठेतरी बटरचं नाव असेल तर शप्पथ! ह्याचं तेल, त्याचं तेल, लेसिथीन, डायमेथाइल सिलिकॉन आणि काय काय रहस्यमय नावं असलेले पदार्थ. माझ्या डोळ्यासमोर रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच उभी राहिली. आता बटर नसलेली ही सारी केमिकल्स बटर म्हणून खायची आणि ती तब्येतीला चांगली, असं म्हणून घ्यायची वरून? खरं बटर मुबलक उपलब्ध असताना हे कशासाठी खायचं? बरं हे मान्य, की बटर जास्त खाऊ नये. पण कुठल्याही इतर फॅक्टरी मध्ये बनवलेल्या पदार्थांपेक्षा, प्रमाणातच पण खरी गोष्ट चांगली नाही का खाण्यासाठी? आणि हे असं केमिकली बनवलेलं खाताना आत कुठेतरी समाधान नाहीच वाटत, त्याचं काय?

का खातो आपण हे सारं? कारण कुठल्यातरी कंपनीनं कुठल्यातरी जाहिरातीत सांगितलेलं असतं म्हणून? बटर चांगलं नाही आणि त्यापेक्षा जर हे पर्यायी खाल्लं तर ते तुम्हांला बारीक ठेवेल, तुमची तब्येत चांगली राहील, वजन आटोक्यात राहील, वगैरे, वगैरे आणि मग त्याला बळी पडून सुरू होते नवीन भाषा. हेल्दी, होल्सम, लाईट, कोलेस्ट्रॉल फ्री, डाएट स्मार्ट… सगळे अगदी परवलीचे शब्द! जणू काही या फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या काही शास्त्रज्ञांना कॅलरीज गायब करण्याच्या आणि तरीही चविष्ट लागणाऱ्या पदार्थांच्या युक्त्या माहीत आहेत आणि मग त्यांच्या भरवशावर येनकेन प्रकारे आपण आपल्या जिभेचे चोचले हे पर्यायी पदार्थ खात पुरवत राहतो. शिवाय मग आपली निरोगी राहण्याची जबाबदारीही आपण दुसऱ्यावर सोपवून रिकामे होतो.

आपलं अन्न आपण आपल्या घरी शिजवायचे दिवस संपत आले की काय? हे सगळं प्रीकूक्ड -प्रीपॅकेज्ड अन्न येतं तरी कुठून? त्यावर होल ग्रेन – हेल्दी लिहिलंय तर ते कितीही निकृष्ट असेल तरी खायचं? शुगरफ्री कॅंडीज, रिड्युस्ड फॅट चिप्स, डाएट सोडा , डेअरी फ्री चीज, जेवणाला पर्यायी म्हणून चॉकलेट फ्लेवरचे प्रोटीन शेक्स, लो कॅलरी फ्रूट फ्लेवर्ड पाण्याचे प्रकार आणि असे अनेक नकली, रासायनिक अन्नघटक असलेले पदार्थ. कुठून येतात हे? त्यापेक्षा मिळणारे ताजे पदार्थ योग्य प्रमाणात खाणं जास्त बरोबर नाही का? जिंजरेल मध्ये कुठेही खऱ्या आल्याचा अंश सापडेल तर शपथ. पण तरीही घरात ताजं आलं असताना पोटात मळमळत असेल तर जिंजरेलचा कॅन उघडून प्यायचा? ज्यात रासायनिक प्रक्रियेने प्रयोगशाळेत बनवलेला आल्यासारख्या लागणारा अर्क आहे म्हणून?

का प्रश्न फक्त जिभेशी मर्यदित नसून फार जास्त खोलवरचा आहे? बधिर होत चाललेल्या संवेदनांचा आहे? मूळचा पदार्थ किंवा कुठलीच मूळची संवेदना आपल्याला समाधानी करू शकत नाहीये. सगळं एक नॉच वाढवून हवं आहे? सगळ्यात उत्तेजना हवी आहे?

सकाळी सूर्य उगवून त्याची प्रखर सूर्यकिरणं डोळ्याला खुपू लागली की मगच सकाळ होते आपल्यासाठी. तोपर्यंतचा आल्हाददायक झुंजूमुंजू उजेड दिसतच नाही का? सगळं आक्रमक हवं. जोवर मिरचीचा झटका जिभेला लागत नाही तोवर पदार्थात स्वाद आहे हे मानायला तयार नसतं मन आणि एकदा का ते खायची सवय लागली की कुठल्याही सूक्ष्म चवींची जाणीव होणंही संपून जातं. मग आयुष्याच्या इतर गोष्टींवरही त्याचं आक्रमण सुरू होतं. मंद संगीताची जागा उडत्या, जलद आणि उद्दाम संगीताने व्यापली जाते. सगळ्यातच उत्तेजनेची गरज भासू लागते. कुठलंच त्याच्या मूळ शांत, भद्र स्वरूपात अपील करेनासं होतं. जीभ खवळवणाऱ्या चवी, उन्मादक संगीत, खळबळजनक बातम्या, वादग्रस्त घटना… सगळंच एन्हान्स्ड फ्लेवरचं. अगदी माणसंदेखील! भडक गॉसिपच्या रसायनात बुचकळून काढून रंगबिरंगी आणि बेरंगी केलेली. चोथा होऊन तोंडाची चव जाईपर्यंत चघळलेली.

तरीही या सगळ्या सिंथेटिक सॉल्व्हंट्स आणि प्रिझर्व्हेटिव्हजखाली दडलेली the real thing – एक खरीखुरी गोष्ट. माणसांच्या समूहात मुखवटा घालून फिरणारे पण त्यामागे दडलेले खरे चेहरे. वाट्याला येणारे निरागस क्षण आणि ताजे आंबे. थोडा फुरसतीचा वेळ काढून मुळात असलेलं ताजेपण, साधेपण रसरसून जगायला शिकणं.
या वर्तमान वास्तवातल्या नकलीपणाला आपल्या आयुष्यात किती येऊ द्यायचं आणि किती लांब ठेवायचं… प्रत्येकाने आपापली लक्ष्मणरेषा आपणच आखायला हवी.

1 Comment

  1. अगदी खरं आहे. आणि त्यात जेनेटिकली मॉडिफाईड पदार्थ – म्हणजे बघायलाच नको. कॉफी नसलेली कॉफी (डिकॅफ), त्यात दूध नसलेलं दूध (स्कीम मिल्क) घालून आणि त्यात साखर नसलेली साखर (स्वीटनर) घालून जे काही तयार होतं त्याला कॉफी म्हणता येईल का?! 🙂 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *