गझल
भावनांना धार आली.. लेखणी तलवार झाली
शब्द आता सूर्य झाले अक्षरे अंगार झाली !
तापलेल्या काळजाला निश्चयाचा जोर आला
शोषितांनी सोसलेली वेदना एल्गार झाली !
काय सांगावी कुणाला बेगडी नीती जगाची
‘मी’ पणाचा आव नुसता, माणसे लाचार झाली
कोण आले? कोण गेले?, भास नुसते वेढणारे…
चार भिंती, एक खोली, शेवटी आधार झाली
झाकल्या डोळ्यांत आता चेहरा दिसतो कुणाचा?
अंतरंगी का तुझी ती आकृती साकार झाली?
कोंडलेल्या भावनांनी केवढा कल्लोळ केला..
शेवटी ही लेखणीही लाजुनी बेजार झाली !