मामबोव्या अर्थात ओवीबद्ध ‘मा म बो’

मा म बो गावाची
सांगाया महती
शब्दबळ तेही
फिके पडे ।। १

पडतात इथे
शब्दांच्याच राशी
देवी सरस्वती
नित्य वसे ।। २

वसती इथेच
भावाचे पुजारी
नित्य प्रतिभेची
पूजा साजे ।। ३

साजिरे वैभव
किती वर्णू येथे
शब्द अलंकार
शोभती ते ।। ४

शोभिवन्त ग्राम
स्वच्छ नि सुंदर
सुबक , निर्मळ
अक्षरे ती ।। ५

‘अ’क्षर येथेची
साहित्यानुभूती
नित्य नूतन ती
घडतसे ।। ६

घडी घडी येथे
उलगडे लडी
रेशमी शब्दांची
निरंतर ।। ७

निरंतर गाती
सुश्राव्य कवने
वाचुनी आनंदे
तोषविती ।। ८

प्रवास वर्णन
कथा,कविताही
ललित संग्रही
असे गृही ।। ९

प्रगल्भ विचार
सुयोग्य आचार
कौतुक साचार
होत असे ।। १०

हवे ते वाचावे
चांगले ते घ्यावे
उन्नत करावे
आपणांसी ।। ११

अभ्यासू मंडळी
अनुभवी किती
सांभाळून घेती
प्रेमभावे ।। १२

सान- थोर भेद
ठाऊक तो नसे
विशाल हृदये
सामाविती ।। १३

कधीही पाहिले
नसले तरीही
मैत्रभाव मनी
जागा असे ।। १४

मा म बो ह्या गावी
मुक्काम करण्या
भाग्यवान हवा
माझ्यापरी ।। १५

साहित्य संस्कार
रोज येथ होती
धाडसही जिवी
येत असे ।। १६

माम्बोवासीयांना
अनंत शुभेच्छा
सतत लिहिता
हस्त लाभो ।। १७

स्वल्पबुद्धीची ही
अक्षरांची पूजा
गोड मानुनी घ्या
विनवणी ।। १८

Leave a Reply

Your email address will not be published.