‘मानव हा कपीसारखा आहे हे सर्वमान्य असले; तरी मानव हा एक कपीच आहे ही जाण क्वचित आढळते…’
रिचर्ड डोकिन्स
माणूस हा विचित्र प्राणी आहे. सद्यःपरिस्थिती न स्वीकारता सतत आवश्यक-अनावश्यक धडपड करण्याची पराकोटीची क्षमता त्याच्यात आहे. आपण कोणीतरी वेगळे आहोत ह्याचा एक अखंड ध्यास त्याने उगाच (?) घेतला आहे. म्हणजे आपण आभाळातून पडलेलो आहोत असा एक ठाम विश्वास आहे त्याच्याजवळ (कदाचित हे खरे असू शकते; कारण एका सिद्धांतानुसार जीवनाचे मूलभूत घटक पृथ्वीबाहेरून – अवकाशातून आले असण्याची शक्यता आहे. ). कदाचित अनादी कालापासून, मानवी उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर त्याची (वेगळेपणाची) चाहूल त्याला लागली असेल कधी तरी आणि मग तो कधी न संपणारा वेगळेपणाचा ध्यास अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा भळभळतोय. कदाचित उत्क्रांत होताना होणाऱ्या बदलांपैकीच एक (अस्तित्वासाठी) काहीसा उपयोगी असावा म्हणून टिकला असावा किंवा मुख्य प्रतिभांबरोबर ओघाने आलेला पण फारसा अपायकारक नसलेला म्हणून चिकटला असावा. हा ध्यास सगळ्या विचारवंतांनी, तज्ज्ञांनी वेगवेगळ्या मुशीतून समोर ठेवला. अगदी, ‘माणसालाच भाषेचे ज्ञान आहे’ , इथपासून ते त्याला वेळेची (त्रिकालाची) वेगळी विशिष्ट जाण आहे ह्यापर्यंत.
भाषा व लिपी ह्यांविषयी काही ठाम समजुती उराशी बाळगून ती लक्षणे फक्त मानवाला चिकटवण्याचा निरर्थक प्रयत्न अजूनही होतो. भाषा ही संकल्पना खूप विस्तृत आहे. तसेच लिपीही. ह्या दोन्हींच्या/दोन्हींतील संज्ञा (ज्यांनी भाषा व लिपी बनते) वेगवेगळ्या स्वरूपात सर्व प्राणिमात्रांना अवगत आहेत. त्या ध्वनी, दृश्य, स्पर्श, वास, व चव अशा कुठल्याही स्वरूपात असू शकतात. ह्या सर्व संवेदनांतून व्यक्त होणारे ज्ञान हे त्या त्या संवेदनांतील (ध्वनी, दृश्य, चव ….) भाषेशिवाय शक्य नाही. भौतिक परिस्थितीचे ज्ञान सर्व इंन्द्रियांनी होते ते त्यांच्या त्यांच्या (संवेदनेतील) अंगीभूत भाषेमुळेच. त्या संज्ञांच्या परस्पर संबंधांतून होणाऱ्या अर्थबोधातूनच. फक्त ध्वनीने व्यक्त होते ती भाषा किंवा मानवी लिपी (लिखित), ती भाषा ही समजूत वास्तवाला धरून नाही. त्यामुळे ह्यांची रूपे नानाविध तर आहेतच; पण काही तर सामान्य कल्पनाशक्तीच्या पलीकडचीही आहेत. मधमाश्या रिंगण घालून बोलतात, काही जातींतील बेडूक पुढच्या पायाने हवेत गोल काढून प्रतिस्पर्ध्याला काहीतरी सांगतो, मुंग्या रासायनिक माग सोडतात, कीटक स्पर्शिकांनी परिसराची चाचपणी करतात…
भाषेची मजा अशी की अस्तित्वाची स्पर्धा जिंकण्याच्या ‘स्वार्थी’ धडपडीत त्याचा उगम आहे. म्हणजे संज्ञांना अर्थ तेव्हाच प्राप्त होतो; जेव्हा त्यांचा उपयोग अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी होतो. उदा. वाळूतील प्राण्यांच्या पावलांचे ठसे आफ्रिकेतील झुडूपवासी परवचा वाचल्यासारखा वाचेल… पण आम्ही तुम्ही?
भाषेतीलच उपभाग म्हणूया हवं तर – त्यातील संज्ञा व चिन्हांच्या स्वरूपाविषयीच्या समजुतीसुद्धा अशाच ठाम विश्वासावर आधारित आहेत – म्हणजे एखाद्या चिन्हाचा/भाषेतील संज्ञेचा कोठलीही संकल्पना दाखवायला मानव त्यांचा उपयोग करू शकतो. उदा. गाढवाला सिंह असे संबोधन सुरू केले तरी फार फरक नाही पडणार (वेगवेगळ्या भाषांतील वेगवेगळे शब्द ह्याचेच द्योतक आहेत), किंवा गाढव ही संज्ञा एक प्राणी व कमी बुद्धी असलेला माणूस(प्राणी) ह्या दोन्ही संकल्पनांसाठी अगदी सहजगत्या वापरली जाऊ शकते. भाषेतील संज्ञा आणि त्यांचा परस्परसंबंध (वाक्यातील एका संज्ञेचा दुसऱ्या संज्ञेशी), तो संबंध दर्शवणारे त्याच्या स्वरूपातील बदल (व्याकरण) ह्या रूढी आहेत. संज्ञा व तिने दर्शवलेली संकल्पना ह्यांचे नाते खूप ठिसूळ असते. हे तत्त्व मानवाला माहिती आहे; पण हे फक्त त्यालाच माहिती आहे, ह्या अनाठायी विश्वासाला – खरं तर प्रौढीला – पुरेसे तडे गेले आहेत. एकंदरीत भाषा आत्मसात करण्याचा गुण हा निसर्गदत्त आहे व सर्व प्राणिमात्रांत त्याचा कमी-अधिक आविष्कार दिसतो. क्षमतेची मात्रा कमी अधिक प्रमाणात आहे आणि भाषेचं स्वरूप वेगळं एवढंच!
जीवशास्त्रीय उपयुक्ततेशिवाय सौंदर्य किंवा सौंदर्यदृष्टिकोन अस्तित्व शक्य नाही. (मन हे इंद्रियसुद्धा जैविक आविष्कारच नाही का!) म्हणजे त्याचा शरीराला व मनाला काही उपयोग (ऐहिक आणि औत्क्रांतिक ह्या दोनही दृष्टिकोनांतून) नसेल तर त्याचा (अशा गुणांचा) आविष्कार हा मातीमोल ठरतो. तेच तत्त्व फारसे ओढून ताणून न वापरता कलेला लागू पडते. म्हणजे जैविक उपयुक्ततेशिवाय कलामूल्याचे अस्तित्व कठीण आहे. प्रथमदर्शनी रसनिष्पत्ती, व मूलभूत स्वरूपात प्रत्यक्ष संवेदनांशिवाय (दृश्य, ध्वनी, स्पर्श …इत्यादी) त्यांची अनुभूती कलासक्त मनास देणे हा कलेचा उद्देश आहे. त्यामुळे – उदाहरणासाठी म्हणून – वीररस निष्पत्ती करणाऱ्या आविष्काराने, कलासक्त प्रत्यक्ष युद्धात भाग न घेता वीरश्री अनुभवू शकतो. अशा अर्थाने कलेचा संबंध अप्रत्यक्ष ऐहिक अनुभवाशी असल्याने कला किंवा तसा दृष्टिकोनही (सौंदर्यदृष्टिकोनासोबत) सर्व प्राणिमात्रांत थोड्या फार फरकाने असावा. प्राण्यांचा (त्यांच्या जवळ असलेला) सौंदर्यदृष्टिकोन हा तर थेट अस्तित्वाशी निगडित कसा, हे जास्त ठळकपणे जाणवतेही. पक्षी सुंदर घरटी करतात, काही तर खूप छान सजावट करतात, पक्षीण ते घरटं तपासते व नाही आवडलं तर दुसरं किंवा दुसऱ्याचं, काही प्राणिगण मृत्यूचं नाटक करून स्वतःचा बचाव करतात, घरट्यातील पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यापासून लक्ष वेधून घेण्यासाठी खूप जखमी होऊन तडफडल्याचे नाटक पक्षीण अचूक वठवते. (हे मी प्रत्यक्ष बघितलंय व व्यवस्थित फसलोय पण). नृत्य, गायन ह्यांची तर असंख्य उदाहरणे आहेत; पक्षिगणांत नृत्य व गायन हा शब्दशः जीवनमरणाचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट सांगण्यासाठी गायन, कवन, नृत्य यांचा एकत्रित केलेला उपयोग (जे भारतीय नाट्यशास्त्रानुसार नाट्यकला म्हणून संबोधले जाते – एखादी कथा प्रभावीपणे सांगण्याची कला) हासुद्धा प्राणिमात्रांच्यात नवीन नसावा. कांगोच्या एखाद्या भागात दोन वानर गटांत चार वर्षं चाललेल्या युद्धाची महाकथा एखादा वानर चवीने सांगत असेल व श्रोतृगण त्या महायुद्धातील ‘भीष्म’पराक्रम अगदी चवीने ऐकतही असेल.
मानवाला वेळ ह्या संकल्पनेची विविक्षित जाण आहे. भूत वर्तमान आणि भविष्य ह्या त्रिकालांची सांगड तो घालू शकतो. त्याचा अर्थ त्याला खूप चांगला कळतो. त्यामुळे एक पिढीचे ज्ञान दुसऱ्या पिढीत संक्रमित होऊ शकते. किंवा (ह्या थोड्या स्वैर सिद्धांताचा जरा अचूक अवतार म्हणजे) गतकाळातील गोडकटू अनुभवांप्रमाणे तो आडाखे बांधून गतअनुभवसदृश परिस्थितीत (तशा पुनरावृत्तीत) आपली वर्तणूक बदलू शकतो. ह्या सिद्धांतातील तथ्यही बाकी जैविक गुणांसारखेच मात्रास्वरूपात आहे. म्हणजे हे कसब फक्त मानवच बाळगून आहे; हे म्हणणे खूप धाडसी आहे. हे धाडस मानव खूप काळ बाळगून होता; पण आता ते मतही बदलत आहे. प्राणिमात्रांत स्मरणशक्तीची जाण आहे हे, मानव चांगलेच जाणतो. ती स्मरणशक्ती काळ संकल्पनेच्या परे आहे हे म्हणणं विरोधाभासी होईल. वर्तणुकीत कालानुरूप बदल करणे हा भाव प्राणिजगतातही पुरेसा आढळून येतो (आजतागायत एवढे दुर्लक्ष व पूर्वग्रह असूनदेखील). काही पक्षी त्यांचे खाद्य कधी, कुठे, कुठल्या प्रकारचे लपवले आहे, ते लपवताना कोण बघत तर नव्हतं ना, व त्यानुसार नवी जागा शोधावी का, इतका इत्थंभूत विचार करतात. अशी घटना-घटक स्मरणशक्ती सर्व सस्तन प्राण्यांत आढळते. मांजर पाठीवर बसलेलं लाटणं आठवून कट्ट्यावर कधीही फिरकत नाही. एवढा सहज नित्य अनुभव काही निरीक्षकांना/अभ्यासकांना पुरे होतो. असे असले तरी, त्याविषयी (काळाची जाण) सर्व प्रयोग थांबतील/थांबावेत असं काही नाही; पण त्याचे कारण ‘मानव वेगळा आहे का’ ह्या उत्साहापोटी आहे, का एखाद्या घटनेच्या मागचे मूलभूत तत्त्व समजून घेण्यातील आनंद आहे, हे सांगणं अवघड आहे!
आता भाषा, कला, इत्यादी तथाकथित मानवी गुणधर्म असे मोडकळीत निघाल्यावर बाकीच्या विषयी लिहिणे आवश्यक नाही खरं तर, पण संस्कृती हा असाच एक बोजड शब्द मानवासाठी, काही वेळा तर फक्त भारतीय मानवासाठी वापरला जातो – भारतात संस्कृती नांदते वगैरे, किंवा पश्चिमात्यांकडे काही संस्कृतीच नाही, ही वाक्यं सहज कानावर पडतात. संस्कृतीची सोपी व्याख्या ‘जीवनपद्धती’ अशी आहे. त्यात जोड अशी की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, किंवा समाजातील एक घटकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होणारे जीवनपद्धतीचे ज्ञान अशीही आहे. (जे निसर्गदत्त/जन्मजात/उपजत आहे त्याला संस्कृती नाही म्हणत – केसांचा रंग ही संस्कृती नाही, त्याची रचना कशी ठेवतात हा संस्कृतीचा भाग).
अन्नग्रहण, त्याच्या पद्धती, वहिवास व वहिवाट, कृत्रिम साधने वापरण्याचे कौशल्य … अशी अनेक कौशल्यं ज्या एका मानवी पिढीकडून दुसऱ्या पिढीला (किंवा एक घटकाकडून दुसऱ्याला) मिळतात तशा त्या प्राण्यांतही मिळतात. अनुकरण करण्याची निसर्गदत्त प्रवृत्ती हे त्याचे मूळ लक्षात घेतल्यावर बाकी विश्लेषण सोपे होते. काहीसे, प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय अनुमानही पुरेसे होते, तसे.
ह्या ऊहापोहाचे कारण एवढेच की;
कुठल्याही जैविक घटकाच्या कुठल्याही क्षमता (शारीरिक, मानसिक, बौद्धिक ज्या काही असतील त्या) उत्क्रांतीच्या प्रेरणा व प्रक्रियांच्या फलनिष्पत्तीचा भाग आहेत. कमी अधिक प्रमाणात सर्व प्राणिमात्रांत त्यांच्या त्यांच्या अस्तित्वाशी निगडित गुणधर्म ठासून भरलेले आहेत.
एखाद्या प्राण्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता जैविक उत्क्रांतीच्या मर्यादेत सीमित असते (एखादा वर्ग इतकाच बुद्धिमान किंवा ढ असतो जितका उत्क्रांतीच्या प्रक्रियेत शक्य आहे). त्यामुळे मानवाचे जे काही वेगळेपण भासते, ते औत्क्रांतिक उपपत्तीच समजणे व मात्रास्वरूपात बघणे सयुक्तिक ठरते.
टीप – ह्यातील दाखल्यांचे वेगळे संदर्भ दिलेले नाहीत. थोडयाफार प्रयत्नाने सहज मिळतील. वरवरचे हवे असल्यास बातमी स्वरूपातील, सखोल हवे असल्यास शोधपत्रक/निबंध स्वरूपात. आळसाने ह्या आवृत्तीत नाही लिहिले.