खूप वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे ही. मी आजोळी सोलापूरला वाढले. प्रत्येक सुट्टीची मी आवर्जून वाट पाहात असे. कधी एकदा सुट्टी येते आणि मी गुलबर्ग्याला माझ्या आईवडिलांना माझ्या इतर भावंडांना भेटते असे होई मला. उन्हाळा, दसरा, दिवाळी, नाताळची मी आतुरतेने वाट पाहात असे.
दुसरी तिसरीमध्ये असेन. दसऱ्याच्या सुट्टीत मी नेहमीप्रमाणे गुलबर्ग्याला गेले. शेजारी नवीन कुटुंब आले होते राहायला. पण ते लोक कानडी होते. मला कानडीचा गंध नव्हता म्हणण्यापेक्षा थोडीच कल्पना होती; म्हणजे ‘तुझे नांव काय?’ ‘माझे नांव हे आहे’, ‘तू काय करतेस’ ह्या पलिकडे येत नसे. वरुन मराठी अॅक्सेंटने बोलते म्हणून सगळे हसायचे म्हणून मी विशेष कोणाशी बोलायला जात नसे. पण ह्या नवीन कुटुंबातील सुमारे माझ्याच वयाची मुलगी मला खूप आवडली. तिला कानडीत मी विचारणार, “निंदु हेसरुं येनु?” (तुझे नाव काय आहे?) तेवढ्यातच तिची आई बाहेर आली आणि तिला तिने म्हटले, “ए रंडी, ईले बा”, ती घरात पळाली. मला तिचे नाव तिला विचारायच्या आधीच कळले होते.
सायंकाळी पाचच्या दरम्यान ती बाहेर एकटीच खेळत होती. तिची आई बाजूलाच कट्टयावर बसली होती कोणाशीतरी बोलत. ती एकटीच खेळत आहे म्हणून मला तिची कीव आली. आम्ही तिघी बहिणी खेळत होतो म्हणून मी त्या कानडी मुलीला ‘आमच्या जवळ ये’ म्हटलं कानडीतच. “ए रंडी, ईली बा”… माझे वाक्य पुरे होते न होते तोच तिची आई रागात माझ्याजवळ आली. मला माझ्या वेणीने ओढत ओढतच ती माझ्या आईजवळ गेली. ती खूप चिडली आहे हे तिच्या बोलण्यावरुन, वागण्यावरुन मला कळत होते. पण माझे काय चुकले ते काही कळेना. माझ्या आईचे कानडी म्हणजे माझ्यासारखेच. आईला पण कळेना ती काय बोलतेय ते. शेवटी आईने माझ्या आजीला बोलाविले. आजीच्या लक्षात आले त्या बाईचे म्हणणे. ती बाई अजून माझी वेणी ओढतच होती. आजीने तिला समजावले. “छे! सुरेखा असं कधीच म्हणणार नाही, तिला तो शब्दच माहीत नाही.” ती बाई जास्तच चिडली; आणखी तिने माझी वेणी ओढली. “येथेच खरंखोटं करा. मी स्वतः ऐकले. विचारा तिला. म्हणे तो शब्दच तिला माहीत नाहीय.” आजीने मला विचारले, “मी काय हाक मारली तिला.” मी आजीला सांगितले. आजी म्हणाली, “असं तू तिला का बोलवलंस?” मी म्हटलं, “ह्या मावशींनी तिला ह्याच नावाने सकाळी हाक मारली होती. मला वाटले, ते तिचे नांव आहे. ती बिचारी एकटीच खेळत होती म्हणून मी तिला आमच्याजवळ बोलाविले. कानडीत ‘खेळायला ये’ हे कसं म्हणतात हे माहीत नव्हते; म्हणून मी ‘येथे ये’ म्हटलं.” माझ्या आजीने त्या मावशींना माझे म्हणणे सांगितले. ती बाई जोरजोरात हसायला लागली आणि त्याचवेळेस तिने माझी वेणी पण सोडली. मग आजीने त्या मावशींना कानडीत जरा सुनावलेच. “मुलांना चांगले वळण लावायचे असेल तर मोठ्यांनीच आपली भाषा सुधारायला पाहिजे.”
आठवीत मी गुलबर्ग्याला आले आईच्या आग्रहास्तव. आईचे म्हणणे, “लग्न झाले की मुली सासरी जातात मग माझ्याकडे तू कधी राहाणार?” गव्हर्नमेंट शाळेत माझ्या दोघी बहिणी जात असत म्हणून माझे नाव पण त्याच शाळेत घातले. तेथे ‘कानडी’ हा एक विषय घ्यावा लागे. मला कानडी म्हणजे भीतीच वाटे. पूर्ण उन्हाळा आईने मला कानडीची ट्यूशन लावली. ‘अ आ’ पासून सुरुवात केली. दोन अडीच महिन्यांत मी बरीच प्रगती केली. पण आठवीचे कानडी कितपत जमेल ह्याची शंकाच होती. बहिणी खूप मदत करीन होमवर्कसाठी पण परीक्षेत कसे होणार? आमच्या सरस्वतीबाईंनी पण वर्षभर शाळा सुटल्यानंतर मला शिकविण्याचा खूप प्रयत्न केला. मी अगदी हिरीरीला पेटले होते. कानडीवर प्रभुत्व मिळवायचेच. तीनमाही, सहामाही, नऊमाही प्रत्येक परीक्षेत मी नापास म्हणजे मला पाच, सहा, आठ मार्क मिळाले. नऊमाही परीक्षेत ‘गायी’वर निबंध लिहायचा होता. सगळ्यांनी एकाहून एक सुंदर निबंध लिहिले होते. ‘गाय हिंदुंना का पवित्र आहे’ वगैरे. काही जणांचे निबंध बाईंनी वर्गात वाचून दाखविले. अर्थात् ९०% माझ्या डोक्यावरुनच गेले. बाईंनी माझा पेपर घेतला आणि वाचायला सुरुवात केली. पहिलीतली मुलगी जसे लिहिते तसं मी लिहिलं होतं. ‘गाईला चार पाय असतात, एक पोट असते, एक शेपूट असते’ वगैरे.
कानडीत ‘शेपटी’ला काय म्हणतात, हे माहीत नसल्याने मी कानडीत ‘शेपूट’ असे लिहिले. बाईंनी विचारले, “शेपूट म्हणजे काय?” कारण बाईंना तो शब्द माहीत नव्हता. मी बाईंना माझ्या मणक्याच्या खाली हात लावून सांगितले, “ते ह्याला जोडलेले असते असे.” कारण पूर्ण कानडी भाषेत सांगणे अशक्यच. सगळ्या मुलींनी आतापर्यंत हसणे रोखून ठेवले होते; पण त्यांच्यामते हे अतीच झाले होते. बाईंसहित सगळ्याजणी हसायला लागल्या आणि मीही हसायला लागले. इतर विषयांत मी टॉपर होते. वार्षिक परीक्षेत मला कानडीत एकोणीस मार्क मिळाले. बाकीच्या विषयात फर्स्टक्लास.
मला परत वर्ष रिपीट करावे लागणार हे पाहून शेवटी माझी आईच हेडमास्तरांकडे गेली आणि तिने त्यांना सांगितले, “तुम्ही सुरेखाला दहा वर्षे जरी आठवीत ठेवले तरी ती आठवी कधी पास होणार नाही आणि नववीत जाऊ शकणार नाही.” हेडमास्तर म्हणाले, “आमची गव्हर्नमेंट शाळा असल्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत. आम्ही कायदा मोडू शकत नाही; पण मी एक करु शकतो, सुरेखाला काठावर पास करतो म्हणजे ती आठवीतून नववीत जाऊ शकेल. नववीतही असंच करु मग ती दहावीत जाऊ शकेल. पण दहावी बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ती दहावी कधीच क्लिअर करु शकणार नाही तर तुम्ही असं करा, सुरेखाला प्रायव्हेट शाळेत घाला. तेथे तिला कानडी विषय घ्यावा लागणार नाही.” त्यानंतर माझी नूतन विद्यालयमध्ये रवानगी झाली.
त्यानंतर मी कानडीचा धसकाच घेतला. कानडी म्हटले की कानाला खडा लावायची. आम्ही कर्नाटकात राहायचो पण घरात मात्र पूर्ण मराठीच होते. शिवाय गुलबर्ग्याला मराठी खूपजण बोलतात त्यामुळे कानडीशिवाय कधी कोठे अडले नाही. आता कधी कधी वाटते, आपण कानडी शाळेत नाही तरी निदान शेजाऱ्यांशी कानडीत बोलून आपली कानडी सुधारायचा चान्स घालविला!