आम्ही नोकरीनिमित्त कोईंबतूरला आठ वर्षे होतो. तिथे मराठी फारसं ऐकायला आणि बोलायला मिळायचं नाही. प्रत्येक वेळी फोन करून अगदी जवळच्या म्हणजे बहीण, भाऊ आदी लोकांना त्रास देणं एका मर्यादेनंतर योग्य वाटत नव्हतं. करमणूक म्हणून सुरुवातीला फेसबुकवर वेळ घालवणं सुरू केलं. काही मित्र-मैत्रिणींना प्रतिक्रिया म्हणून दोन चार ओळी लिहायला लागले.
सुरुवातीला अगदी यमक जुळवलं म्हणजे झाली कविता इतकंच समजत होतं. शाळा सोडून खूप दिवस झाल्यामुळे तसा कवितांशी काहीच संबंध उरला नव्हता. मनात ज्या भावना येतील त्या उतरवायच्या असं चाललं होतं.
त्यातल्या काही मला बऱ्या वाटलेल्या कविता मी कोईंबतूरला गणपती उत्सवात वाचल्या. तेव्हा मामबो मधील श्रुती गद्रे हिने मला या समूहात सामील करून घेतले आणि कवितेचा खरा प्रवास सुरू झाला. साप्ताहिक संकल्पनेमुळे वेगवेगळे विषय मिळत गेले आणि विचारांना चालना मिळाली. मी केलेल्या रचना इतरांना आवडत आहेत हे कळल्यावर आत्मविश्वास वाढत गेला.

कवितेची वेगवेगळी रूपं अनुभवायला मिळाली. मामबोमधील खेळीमेळीचे,आपुलकीचे आणि मैत्रीपूर्ण वातावरण माझी कविता बहरायला पोषक ठरले. सुरुवातीला टीका स्वीकारायची माझी क्षमता नव्हती, म्हणजे एकदम आत्मविश्वास कमी व्हायचा; मग लेखणी अगदी काही दिवस रुसून बसायची. पण तिलाही आता कळू लागलंय की कविता म्हणजे फक्त ट ला ट नि र ला र जोडणे नव्हे. त्या कवितेला विविध शब्दांनी आकार देऊन घडवलं पाहिजे,अलंकारांनी सजवलं पाहिजे,अगदी दुसऱ्या हृदयात झिरपेल असा भावनांचा ओलावा तिला असला पाहिजे.
मामबोमध्ये अनेक उत्कृष्ट कवी आणि कवयित्री आहेत.प्रत्येक कविता वाचली की “श्या! मला इतकं छान लिहिताच येत नाही बुवा, ” अशी भावना येते आणि ती भावनाच उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी साथ देते.
मामबोची लाडकी कवयित्री वैष्णवी अंदूरकर हिच्या कडून मी मुक्तछंद शिकले. मुक्तछंद असा थेट हृदयाला भिडतो हे त्यापूर्वी अनुभवले नव्हत. काही प्रयोग मीही केले आणि ते वाचकांना पसंत पडले.

मग भुरळ घातली ती अत्यंत अभ्यासू, जिज्ञासू सुषमा जोशीच्या लेखन आणि काव्याने. सुषमाच्या वृत्तबद्ध कविता वाचल्या की हे काहीतरी खास आहे असा भास व्हायचा. त्यावेळी शाळेत शिकलेल्या एका वृत्ताची ओळ आठवायची, ‘मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले, ‘ यापलीकडे वृत्तबद्ध काव्य कसे रचतात ते पार विसरले होते आणि हा काही आपला प्रांत नाही आपण आपलं आवडीसाठी लिहायचं बाकी इतके कठीण प्रयोग काही करायचे नाही हे ठरवून टाकलं.
एक दिवस पुन्हा सुषमाचे वृत्तबद्ध काव्य वाचण्यात आले आणि वाटलं की हा प्रकार यायलाच हवा. ‘कवयित्री म्हणतात सगळे आणि आपल्याला तर काहीच येत नाही, ते काही नाही आळशीपणा सोडून वृत्तबद्ध काव्य रचना शिकायलाच पाहिजे.’ मग लगेच सुषमला मेसेज केला. तिने लगेच व्हाट्सअप ग्रूपवर मला सामील करून घेतले आणि आमचा वृत्तं शिकण्याचा क्लास सुरू झाला.

सुरवातीला खूप कठीण गेलं. कारण एरवी कविता अगदी मनात येते आणि पाच मिनिटांत कागदावर उमटते, नंतर तिच्यात कधी कधी थोडा फेरफार होतो. पण इथे तसं नव्हतं. मात्रांचा विचार करून शब्द शोधावे लागत होते, तोपर्यंत मनातला भाव विरून जाईल की काय अशी भीती वाटत होती. शब्दमर्यादा खूप जाणवत होती. पण हळूहळू सवय झाली
सुरुवातीच्या दोन ओळी लिहिल्या की मग रचना जमू लागली. शब्दांची सांगड घालताना भाव टिकवून ठेवणे, हे जर चांगले जमले तर ती वृत्तबद्ध रचना उत्कृष्ट होते नाहीतर ओढूनताणून केल्यासारखी वाटते, ही जाणीव झाली आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न केले.
काही वाचकांना वृतबद्ध कविता वाचताना त्याची चाल समोर येते पण भाव तितकासा भिडत नाही, असेही जाणवले. मला सुद्धा सुरुवातीला हे जाणवले; पण वृत्त माहीत असले तर एखादा विषय सुचला तर त्यावर आपण काव्य रचना करू शकतो. शब्दसंग्रह भरपूर असला तर वृत्तबद्ध कविता आखीव,रेखीव,देखणी आणि तितकीच नादमय होते हे ही तितकेच खरे.

सुषमाने बरीच वृत्ते घेतली,सोबत अभंग,गझल हेही प्रयोग झाले.
हे सगळं शिकून खूप समाधान वाटले.
त्या शिक्षणाचा नमुना म्हणून श्रवणाभरण वृत्तातली एक रचना ‘शिवस्तोत्र’
इथे देते.

दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण

नजजजजजजलग
यती :७,६,६,४
२३ अक्षरी
चाल: अयि गिरिनन्दिनी

शिव शिव सुंदर सांब जटाधर चंद्र शिरावर शोभतसे
जप तप साधक योग सहायक नाग गळ्यावर डोलतसे
त्रिगुण स्वरूप नि देव महेश्वर भस्म सुशोभित अंग दिसे
जय जय नायक क्लेशविनाशक मोक्ष प्रदायक रुद्र हरे

त्रिभुवन गर्जत नाम चिदंबर नाम उमावर शैलपते
जगत गुरूवर तूच कृपाकर बिल्व दला प्रिय अर्पियते
हर हर शंकर ईश सदाशिव भैरव त्र्यंबक अंतक रे
जय जय नायक क्लेशविनाशक मोक्ष प्रदायक रुद्र हरे

घुम घुमतो स्वर नाम शुभंकर देव सुरेश्वर घोष करे
तन मन अर्पण मग्न मुनीवर हे परमेश्वर धाव त्वरे
मदन विनाशक दीन दयाकर भूतपती मज पाव हरे
जय जय नायक क्लेशविनाशक मोक्ष प्रदायक रुद्र हरे

डम डम वाजत तांडव मांडत नृत्य करी अति मोहक रे
भवभयहारक पापविमोचक दुःखनिवारक मुक्त करे
तव शरणागत मूढ मती जन हे शिव सत्वर दर्शन दे
जय जय नायक क्लेशविनाशक मोक्ष प्रदायक रुद्र हरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *