मम्मट हे संस्कृताचार्य. अकराव्या शतकातील काश्मीरी पंडित. त्यांच्या ‘काव्यप्रकाशा’मुळे संस्कृत काव्यशास्त्र अतिशय प्रगल्भ झालं.
अकराव्या शतकात मम्मटानं काव्यबंधांविषयी बरंच लिहिलेलं आहे. त्याला मम्मट शब्दचित्रालंकार म्हणतो.
खड्गबंध म्हणजे खड्गाच्या आकारात रचलेले काव्य,
मुरजबंध म्हणजे एका वाद्याच्या आकारात रचलेले काव्य,
सर्वतोभद्रकाव्य आणि पद्मबंध काव्य
असे वेगवेगळे चित्रालंकार त्यानं सांगितले आहेत.
यात शब्दखेळाची मजा आहे. रसविचार फारसा नसावा.
मला पद्मबंध त्यातल्या त्यात सोपा वाटला.
यात संकल्पना आकारानुरूप असावी असं काही माझ्या वाचनात आलं नाही. तरीही पद्मासंबंधी म्हणजे कमळासंबंधी रचना करावी, असं मनात आलं.
कमळ म्हटलं की भुंगा आठवतोच.
नामकमळ आणि ईश्वर हा नामामध्ये अडकलेला भुंगा! गोंदवलेकर महाराजांची ही उपमा! मला खूपच हुरूप चढला. चार ओळींत मांडायचंय. सोपं तर आहे!
छंद घेतला अनुष्टुभ. म्हणजे कोणता?
भीमरूपी महारुद्रा, नमोदैव्यै हे याच छंदातलं.
सोपंच मग!
पहिली चार अक्षरं कशीही लिहायची.
दुसरी चार, पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत लगगग,
दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत लगलग
तर तीन गोष्टी नक्की झाल्या.
१) पद्मबंध
२) मनाच्या सरोवरात उमललेलं नामकमळ, अडकलेला ईश्वर.. भुंगा
३) अनुष्टुभ छंद
पेन वही सरसावून आत्ता या भुंग्याला पकडते म्हणून बसले.
मग या कमळाच्या तळात खोलखोल रुतत गेले.
काहीही साधेना!
या मम्मटबुवांनी सांगितलेले नियम काही वाचनात आले नाहीत. लिहिताना भंबेरी उडाली.
मम्मटबुवांचं काव्य म्हणजे सभेचं तौलनिक वर्णन आहे.
भासते प्रतिभासार |रसाभाताहताविभा|
भावितात्मा शुभा वादे|देवाभाबत ते सभा|
बराच वेळ विचार केला. मग थोडं फार समजलं.
पहिलं अक्षर कोणतं? भा!
पहिल्यानंतर चार अक्षरं सोडून परत तेच अक्षर म्हणजे भा यायला हवं.
भा वितात्माशु भा वादेदेवा भा बततेस भा
इतकंच नाही, तर
उलट्या क्रमाने अक्षरं येतील त्याला अर्थ हवा.
उदा. भासते(सुरुवात) >ते सभा(शेवट)
प्रति भासार> रसाभा
हताविभा >भाविता त्मा
शुभावादे> देवाभा
या उलटून सुलटून उड्या मारताना हैराण झाले.
पण झपाटल्यासारखं झालं होतं.
नामकमळ ही संकल्पना सोडायची नव्हती.
मूळ ठरवलेलं अक्षर ‘ना’ हेही बदलून बघितलं. पण मठ्ठ मेंदूला काहीही सुचेना.
अर्धं त्यजति पण्डितः|
पंडित नसूनही तडजोड करायला हवी हे कळलं. भुंग्याला तिलांजली दिली. तरीही साधेना!
मग ‘नामसारस’ ‘ रसा मना’ देणारे असूनही त्या सारसाला म्हणजे कमळालाही निरोप दिला.
तरीही…
शेवटी नाम घट्ट राहिलं यात आनंद आहे.
तर खाली रचना दिली आहे. त्याचं चित्र सोबत जोडलं आहे.
नामसारीं मना दास
सदा नासाग्रि, उन्मना
नाम उन्मनि नादे ते
ते दे नादवसा मना
मुख्य अक्षर – ना
उलटसुलट
मना दास > सदा ना
उन्मना> नाम उन्
नादे ते> ते दे नाद
वसा मना> नामसारीं
अर्थ : ईश्वराचं नाम हेच सारसर्वस्व आहे. मनाला या नामाचा दास करावं. हे नाम कसं घ्यावं, सतत घेत राहिलं की नासाग्री दृष्टी स्थिर होऊन लय लागतो. मनाचं उन्मन होतं. ईश्वराशी लय साधतो. या लयानं नाम अनाहत गुंजत राहतं. हा अनाहत नादवसा मनाला लाभतो.
रचना कशीबशी जमवली. आठ तास लागले असतील. पण लिहिलेलं साधायला आठ जन्म पुरतील का? मनात कमालीची अस्वस्थता!
सोबत चित्र जोडलं आहे.
पूर्वेपासून सुरुवात करायची. पहिलं अक्षर ना वाचायचं.
ना> मसा> रीम> परत ना
पुढची पाकळी > दास तिथे परत उलटा बाण.
म्हणजे दास चा
सदा> ना> साग्रि> उन् म >परत ना> तोच बाण उलट> ना> म उन् > शेजारी मनि> परत ना> देते > उलट बाण ते दे> परत ना > दव
इथे शेजारी परत पहिली पाकळी > साम ना
तिथे बाणांनी कसं वाचायचं ते सूचित केलं आहे. काही बाण शेजारी जायची दिशा दाखवतात, तिथे शेजारच्या पाकळीतले शब्द वाचायचे.
दोन्ही रचनांचे फोटो सोबत जोडले आहेत.