काही नाती ही अलगद जपायची असतात. त्यात अपेक्षा, आढेवेढे ह्यांना स्थानच नसते मुळी! ही नाती कधी जुळतात हे फक्त ज्याचे त्याला कळते. तुमच्या मनातही रुजलेली अशी नाती असतील ना?
स्वप्ने काही, काही जाणिवा
नाजूकशी नाती
नकोच पकडू शब्दांमध्ये
गुदमरून जाती ॥१॥
स्तब्ध जलावर प्रतिमा उमटे
नको जाऊ ती धरू
स्पर्श जाहता तरंग उठती
झणी लागते विरू ॥२॥
शब्दांचे घर, पोकळ वासा
छिद्रे त्यात हजार
कशा राहाव्या त्यात भावना
क्षणात होती पसार ॥३॥
दुवा अखंडित अपुल्यामध्ये
जसा दरीवर पूल
दिसे कधी तो कधी हरवतो
धुक्यात देऊन हूल ॥४॥
नकोच टाकू पाऊल त्यावर
ऐक जरा माझे
सोसवेल का त्याला अगणित
अपेक्षांचे ओझे ॥५॥
अंगणातले वृंदावन, तसे
काही आपुल्यात
चिणू नको त्यां, शब्दांमधल्या
विषण्ण थडग्यात ॥६॥
आठवणींच्या ओलाव्याने
तुझ्या मोहरावे
अश्रू बनुनी तुझिया गाली
मुग्ध ओघळावे ॥७॥