आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याकडे अनेक माध्यमे आहेत. आपण स्वत:ची प्रगती, मग ती बौद्धिक असेल, शैक्षणिक असेल, किंवा आर्थिक असेल, करण्यात इतके व्यग्र झालो आहोत की आपल्याला त्यापलीकडेही एक जग आहे, तिथेही माणसं राहतात, तेही आपलेच बांधव आहेत, त्यांच्याही प्रति आपले काही कर्तव्य, काही जबाबदाऱ्या आहेत हे लक्षातच येत नाही.

आपण त्यांना अशिक्षित म्हणतो. आपल्या लेखी ते अडाणी असतात. आपल्याला वाटतं आपल्यासारखे सुशिक्षित लोकच संस्कृती जपतात. परंतु हा आपला गैरसमज आहे. जरी ते दऱ्याखोऱ्यांत राहत असले, आधुनिकतेपासून शेकडो मैल दूर असले; तरी ते आजही त्यांचे वेगळेपण कायम ठेवून आहेत. निसर्गपूजक म्हणून परंपरेनुसार आलेल्या रूढींचे पालन करत आहेत. कोणी त्यांना आदिवासी म्हणते, कोणी वनवासी म्हणते तर शासकीय भाषेत त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्ग म्हटलं जातं.

आदिवासी बांधव मुळात निसर्गपूजक असतात. निसर्गावर त्यांची नितांत श्रद्धा असते. धान्य, भाजीपाला यांचे सेवन करण्यापूर्वी हे लोक निसर्गदेवतेला नैवेद्य दाखवतात. त्याची संमती घेऊन मग अन्नधान्याचा वापर करतात! प्रत्येक गावाच्या वेशीवर, रानभाज्यांचं पूजन ‘निलीचारी’ या निसर्गदेवतेपुढे केले जाते. किती उदात्त विचार आहे ह्या संकल्पनेमागे! ज्या निसर्गाने धान्य, भाज्या, फळे दिली, त्यांचे सेवन करण्यापूर्वी त्याची संमती घेणे, ते धान्य शिजवून नैवेद्य दाखवणे, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे मोठेपणच आहे, नाही का?

आपल्या मनाला ज्यांचा विचारही कधी शिवत नाही अशा ह्या आदिवासींना माणसात आणण्यासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या वर्षा परचुरे ह्यांना भेटण्याचा योग मागच्या वर्षी आला. आणि त्या ज्या पद्धतीने हे काम करत आहेत ते बघून मी थक्क झाले. वर्षा परचुऱ्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या अनेक उपक्रमांतून आपल्यासमोर येते. आदिवासी लोकांसाठी काम करायला सुरुवात करण्याआधी त्या काय करत होत्या, याबद्दल सुरुवातीला बोलणे झाले.

२००० साली ठाण्यामधे ‘परिवर्तन महिला संस्था’ स्थापन करण्यात आली. उद्देश होता ‘महिलांचे सबलीकरण करणे.’ त्या अनुषंगाने ही संस्था विविध उपक्रम राबवते आहे. ‘मुक्ता बालिकाश्रम’ हा मुलींचा अनाथाश्रम ह्या संस्थेनी सुरू केला. तिथे दीडशेहून अधिक मुलीचं संगोपन आणि शिक्षण चालू आहे. त्यांचा दुसरा उपक्रम आहे दिलासा डे केअर सेंटर. इथे वृद्ध लोकांचा सांभाळ केला जातो. त्यांच्या पौष्टिक आहार आणि आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिकतेचीदेखील काळजी घेतली जाते. त्यांना आपुलकी आणि प्रेमाने वागवले जाते. त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांना समवयस्क मित्रमैत्रिणी मिळाल्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदात व्यतीत होते. एक दिवस, एक आठवडा किंवा एखाद्या महिन्यासाठी देखील त्यांची राहाण्याची सोय इथे आहे. ज्यांना काही दिवसांसाठी कामानिमित्त, कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी जायचे असेल आणि जास्त वयामुळे त्यांच्या आईवडिलांना बरोबर नेता येणार नसेल; तर अशा वृद्धांचा सांभाळही इथे होतो. सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांसाठी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून व्यवसाय सुरू करून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील.

अनेक वर्षे परिवर्तन महिला संस्थेमधे काम केल्यानंतर, तिथली घडी व्यवस्थित बसली आहे, असं जाणवल्याबरोबर आता काहीतरी नवीन काम सुरू करायला पाहिजे असं वर्षा परचुरे यांना वाटलं. ज्यांना आपल्या मदतीची अधिक आवश्यकता आहे अशा लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार करून त्यांनी आदिवासी लोकांसाठी काम करायचे ठरवले.

ह्यासाठी वर्षाताई मोखाडा येथे राहायला गेल्या. त्या भागातील आदिवासींशी संवाद साधून त्यांच्याशी मैत्री करण्यापासून त्यांनी कामाचा प्रारंभ केला. सुरुवातीला त्यांना हे खूप अवघड गेले. आदिवासींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. पण वर्षाताईंनी प्रयत्न सोडले नाहीत. रोज सकाळी गावात फेरफटका मारायचा, जे भेटतील त्यांच्याशी बोलायचं, त्यांची चौकशी करायची, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, त्या समस्यांवर तोडगा सांगायचा, मदतीचा हात पुढे करायचा, त्यांच्या मुलांशी मैत्री करायची अशा अनेक युक्त्या अंमलात आणल्या आणि बघताबघता त्या आदिवासींना आपलेसे करून घेतले. काकू, मावशी, ताई, वहिनी, आजी अशा हाका मारून मोखाडा भागातील प्रत्येक आदिवासी गृहिणीशी आज त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आज त्या महिलादेखील वर्षाताईंशी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात जणू काही त्या त्यांच्या घरच्या सदस्याच आहेत! हे सर्वात अवघड काम करून झाल्यावर मग त्या आपल्या मुख्य कामाला लागल्या.

सर्वप्रथम वर्षाताईंनी गावागावांतून बैठका घेऊन मोखाड्यातील आदिवासी तरुणांना संघटित केले. ग्रामविकासात सक्रिय होण्यासाठी तिथल्या लोकांना, विशेषतः ह्या तरुणांना प्रोत्साहन दिले. ग्रामपंचायतीचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले; एवढेच नव्हे तर त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सांगितले. आदिवासींसाठी अनेक सरकारी योजना असतात, त्यांची माहिती देऊन, त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची अंमलबजावणी कशी करायची आणि तो मिळत नसेल तर हक्कांसाठी कसं लढायचं हेदेखील शिकवलं.

महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले, मोखाड्यातील अनेक आदिवासी महिला आज शिवणकाम शिकून उत्तमोत्तम कपडे शिवतात आणि कुटुंबाचे आर्थिक सबलीकरण करताना दिसतात! रोजगार मिळाल्यावर त्यांना रोजगारीचा ताळेबंद कसा ठेवायचा, तो तपासून कसा घ्यायचा हे सुद्धा त्यांना शिकवलंय.

वर्षाताईंनी मोखाड्यातील महिलांचे अल्पबचतगट स्थापन केले आहेत. त्यांचं व्यवस्थापन त्या महिलांना शिकवलं आहे. ह्या महिला दर महिन्याला बचतगटाची सभा घेतात. अतिशय पद्धतशीर आणि शिस्तबद्धपणे ही बैठक होते. बैठकीचा प्रारंभ एका समूहगीताने होतो. हे गीत देखील वर्षाताईंनीच ह्या महिलांना शिकवलंय, हे वेगळं सांगायलाच नको! प्रत्येक वेळी बैठकीची अध्यक्षा बदलते. आळीपाळीने सर्व महिला ह्या बैठकीची अध्यक्षीय जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे बजावतात! बैठकीत इतर महिलांच्या अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढला जातो. जमाखर्च आणि इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यातल्याच एखाद्या थोडंफार शिकलेल्या, लिहिता येणाऱ्या महिलेची असते. हा जमाखर्च आणि सभेचे इतिवृत्त इतकं व्यवस्थित लिहिलेलं असतं की आपल्यासारख्याला तोंडात बोटं घालायची वेळ येते! मग बाकीच्या महिला नुसते अंगठे लावतात! ह्या तथाकथित अशिक्षित महिलांनी आयोजित केलेली ही शिस्तबद्ध सभा बघून खरोखर अतिशय कौतुक वाटतं! ह्या सगळयाचं श्रेय अर्थातच वर्षाताईंना जातं.

तिथल्या तरुणांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. बांबूच्या अतिशय आकर्षक टोपल्या आणि आकाशकंदील हे आदिवासी तरुण तयार करू लागले आहेत आणि वर्षाताई आता त्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अनेक वर्षं जिद्द आणि चिकाटीने केलेल्या वर्षाताईंच्या कष्टांचे हळूहळू चीज होत आहे. आदिवासी बांधवांनी प्रगतिपथावर कूच केलंय, ते अनुभव घेत आहेत, शिकत आहेत, प्रगल्भ होताहेत.

वर्षाताईंनी आता त्यांच्या पुढची एक फळी तयार केली आहे. त्यांना संघटित करून, त्यांच्याकडून कामं करवून घेऊन त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर केलंय, जेणेकरून भविष्यात ते स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवू शकतील. कारण त्या कायम एकाच ठिकाणी राहत नाहीत. तिथलं काम झालं, तिथले लोक सक्षम झाले, ते आपल्या मदतीशिवाय ह्यापुढची वाटचाल करू शकतील असा विश्वास त्यांना वाटू लागला की जिथे गरज आहे अशा दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या नव्याने कामाला लागतात! केवढा उदात्त विचार आहे हा! कुठल्याही पदाची आशा न बाळगता, कौतुकाची वाट न बघता, परतफेडीची अपेक्षा न करता, एखाद्या कामात झोकून देऊन, ते काम संपल्यावर, कुठल्याही प्रकारचा हक्क न गाजवता, गुंतून न पडता, तिथून काढता पाय घेणे, हे म्हणजे…लहानाचं मोठं केलेल्या आपल्या पिल्लाला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निरपेक्षपणे आपल्या प्रेमळ पाशातून मुक्त करण्याइतकंच अवघड आहे! पण वर्षाताई गेली अनेक वर्षे कुठलाही गवगवा न करता अतिशय स्थितप्रज्ञपणे गरजू लोकांना मदत करत आहेत आणि पुढेही करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.

आवश्यक असलेल्या सामाजिक गरजा ज्यांना भागवता येत नाहीत अशा दुर्लक्षित, उपेक्षितांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या, त्यांच्यासाठी झटणाऱ्या वर्षाताईंसारख्या सर्वांना माझे शतश: प्रणाम!

2 Comments

  1. सुंदर लेख! छान ओळख करून दिलीस तू! मिळालेल्या आयुष्याचं असे लोक सोनं करतात ना! ग्रेट! 🙏

  2. अतिशय आवडला हा लेख कविता!! आदर्श आहे वर्षाताई म्हणजे. त्यांना भेटण्याची संधी तुला कशी मिळाली? लकी आहेस अश्या माणसाची ओळख असणं म्हणजे!

Leave a Reply

Your email address will not be published.