दक्षिण अमेरिका आणि अमेझॉन जंगल बघण्याचं माझ्या खूप वर्षांपासून मनात होतं. ते माझ्या बकेट लिस्टवर नव्हे तर ‘मस्ट सी’ लिस्टवर होतं. गेले कित्येक वर्ष मी तिथे जायचा प्रयत्न करत होते. शेवटी उशिरा का होईना (म्हणजे माझ्या सत्तरीत) योग्य संधी चालून आली आणि मी परू (Peru चा उच्चार परु असा करतात.) आणि तिथल्या अमेझॉनला जायचं पक्क केलं. सर्व बुकिंग्स केली खरी पण या ट्रीपबद्दल मनात थोडी धाकधूक वाटायला लागली. एक तर मी ह्या कंपनीतर्फे पूर्वी कधी प्रवास केलेला नव्हता आणि ही फक्त बायकांसाठी ट्रीप असली तरी माझ्या कुणीच ओळखीचं नव्हतं. दुसरं म्हणजे तिथली काही ठिकाणं समुद्रसपाटीहून प्रचंड उंचावर असल्याने तिथल्या विरळ हवेचा त्रास होईल याची भीती! (तरी मी त्यासाठी बरोबर औषधं घेतली होती). आणि मुख्य म्हणजे तिथले चढउतार दुखऱ्या गुडघ्याला कितपत झेपतील ही धास्ती!

अशा पार्श्वभूमीवर मॉन्ट्रिआलहून लीमा या पेरूच्या राजधानीच्या ठिकाणी उड्डाण करायच्या आधी कधी नं आलेला अनुभव आला. तिथे प्रवाश्यांचं सामान हुंगणारा कुत्रा घेऊन एक गार्ड फिरत होता. कुत्रा माझ्याजवळ आला तेंव्हा नक्कीच माझं सामान हुंगून निघून जाईल ही अपेक्षा होती पण तो जेंव्हा माझी पर्स दातांनी ओढू लागला तेंव्हा मी थक्कच झाले. माझ्या बॅगमधे याला काय सापडलं असा विचार डोक्यात येईपर्यंत गार्ड माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुमच्याजवळ कॅश आहे का? मी हो म्हटल्यावर त्यानं किती आहे हे विचारलं. तीन-चारशे डॉलर्स असतील असं म्हटल्यावर त्याने कुत्र्याला आवरून, माझा पासपोर्ट तपासून मला आत जाऊ दिलं. कुत्र्यांना कॅश हुंगायला शिकवतात हे मला प्रथमच समजलं.

लीमाला रात्री अकराला पोहोचून, कस्टम-इमिग्रेशन मधून बाहेर पडायला बराच उशीर झाला. सामान घेतल्यावर पर्स मधून फोन बाहेर काढला आणि घ्यायला आलेल्या व्हॅनमधे मी आणि माझी टूर मॅनेजर अशा दोघी बसलो.बाकीच्या बायका वेगवेगळ्या वेळी पोहोचणार होत्या. हॉटेलवर येऊन चेक-इन वगैरे झाल्यावर खोलीत आले आणि फोन काढायला पर्स उघडली तर तिथे फोन नव्हता. घाईत मी वरच्या सामानात ठेवला असेल म्हणून ते तपासलं तर तिथेही नव्हता. मग खाली हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कला फोन करून तो व्हॅनमधे राहिला असेल तर त्या कंपनीला विचारा असं सांगितलं. पण थोड्याच वेळात त्यांनी कळवलं की तो व्हॅनमधे सापडला नाही पण उद्या विमानतळावर फोन करून तिथे कुणाला सापडला असेल का पाहू. प्रवासात माझ्या मुलींबरोबर कायम संपर्कात राहण्याचं माझं एकमेव साधन पहिल्याच दिवशी हरवलं म्हणून मी खूप हिरमुसले पण ते लवकरच मिळेल ही आशा सोडली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी फ्री डे होता म्हणून काहीजणी मिळून हॉटेल जवळच्या भागात हिंडायला बाहेर पडलो. आमचं हॉटेल लीमाच्या मीराफ्लोरेस (miraflores) या पॅसिफिकच्या किनाऱ्यावर नव्याने उभारलेल्या सधन आणि फॅशनेबल भागात होतं. किनाऱ्यापासून जरा उंचावर पण कडेकडेने बांधलेल्या रस्त्यावरून हिंडत होतो. डाव्या बाजूला खाली शुभ्र वाळूचा किनारा आणि महासागराचं फेसाळ लाटा असलेलं पाणी दिसत होतं आणि उजव्या बाजूला छानसे बुटिक्स, कॅफे आणि रेस्तराँ असल्यामुळे सकाळची वेळ असली तरी बरीच वर्दळ होती. पुढे गेल्यावर प्रेमिकांचं शिल्पं असलेला एक सुंदरसा बगीचा लागला. तिथे क्षणभर विश्रांती घेऊन तरुण मुलांप्रमाणे आम्हीपण त्या शिल्पासमोर एक ग्रूप फोटो काढून घेतला. नंतर आम्ही होतो तिथून वरच्या रस्त्यांवर भटकायचं ठरवलं.

हा मीराफ्लोरेसचा भाग पार्कस, हिरवळी, बुलेवार्डस आणि सुबक छोट्या घरांमुळे खूप आकर्षक दिसत होता. तिथे एकमेकांना लागून दोन मोठे पार्क होते. ‘केनेडी पार्क’मधे हिंडून तिथल्या फुलझाडांकडे पहात असतांना बरीचशी फुलं ओळखीची दिसत होती. ह्या पार्कमधे काही चित्रकार आणि पेंटर्स आपल्या कलाकृती घेऊन बसले होते. अशा ठिकाणी गेले की मी नको तेवढा वेळ लावते आणि मग आवडलेला पीस घ्यायचा मोह होतो. या पार्कला लागून लगेचच ‘मीराफ्लोरेस सेंट्रल पार्क’ नावाचा मोठा पार्क होता पण तिथे वावरत असलेल्या असंख्य मांजरींमुळे तिथे फिरतांना जरा विचित्र वाटत होतं. तिथल्या झाडांवर आणि शिल्पांवरदेखील अनेक मांजरी सुस्तावल्या होत्या. आमच्या पैकी मांजर प्रेमी बायका त्यांचं कोडकौतुक करत होत्या. मी मात्र एकदोन फोटो घेऊन तिथून पळ (या वयात जमेल तसा) काढला.

एवढं चालून आता भूक लागली होती. जवळच्याच एका रेस्तराँमधे गेलो. मी मेनूत बघून काहीतरी हलकं घ्यावं म्हणून ट्राउट (trout) चं फिले मागवलं. नंतर ट्राउट हा मासा बऱ्याच ठिकाणी मेनूत होता म्हणून मला आश्चर्य वाटलं कारण तो परूचा मूळचा मासा नाही. तो प्रथम कॅनडातून इथे आणला आणि आता त्याची पैदास तिथे होते असं नंतर कळलं. आता पोट भरल्याने आणखी चालायचं ठरवलं. वाटेत लागलेल्या इंका मार्केटमधून एक फेरफटका टाकला. त्या बाजारात लामा आणि अल्पाका या परुत सापडणाऱ्या प्राण्यांच्या लोकरीपासून हातमागावर बनवलेल्या शाली, स्वेटर्स, हातमोजे,टोप्या अशा रंगी बेरंगी वस्तू होत्या. या शिवाय लाकडी आणि धातूच्या कोरीव वस्तू, चांदी-सोन्याचे मनमोहक दागिने आणि मातीचा मुलामा केलेली भांडी असे विविध प्रकार होते. पहिलाच दिवस असल्याने तिथे जास्त खरेदी केली नाही पण नंतर वाचलेल्या माहितीवरून हे परूतलं सर्वात चांगलं मार्केट आहे हे कळलं. दिवसभर खूप चालल्याने थकून जाऊन वाटेत चहा-कॉफी घेऊन हॉटेलात परतलो. आल्यावर परत हरवलेल्या फोनबद्दल चौकशी केली. पण निराशाच वाट्याला आली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच लीमा शहराची टूर होती. आमच्या स्थानिक गाईडचं नाव ‘मरी आंत्वानेत‘ होतं (Marie Antoinette, फ्रान्सच्या शेवटच्या राणीचं नाव) पण आम्हाला तिने तिला कीका (Kika) म्हणायला सांगितलं. ही एक अति उत्साही, घडाघडा बोलणारी बाई होती पण तिच्यासारखी खोल, बारीकसारीक माहिती असलेली गाईड मी पूर्वी बघितली नव्हती. तिने आमच्यासाठी दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आखला होता.

प्रथम ती आम्हाला हॉटेल जवळच्या एका मोठ्या ‘Marcado1’ नावाच्या मार्केटमधे घेऊन गेली. तिथे स्थानिक इंका विक्रेत्यांनी फळफळावळ, सुकामेवा, भाजीपाला, औषधी मुळं-पाला-वनस्पती, मास-मासे आणि इतर खाद्य पदार्थ विकायला ठेवले होते. तिथे विकायला ठेवलेल्या नाना प्रकारच्या औषधी वनस्पती पाहून आणि त्यांच्याविषयी ऐकून इंका लोकांचं शतकांपासूनचं त्याबाबतीतलं ज्ञान दिसून येत होतं. इंका लोक अजूनही कोकाच्या पानांचा (ज्यापासून रासायनिक क्रिया करून कोकेन बनवतात) चहा उंच ठिकाणी विरळ हवेचा त्रास होऊ नये म्हणून पितात. पर्यटकांसाठी सुद्धा हा चहा सगळीकडे ठेवलेला दिसतो. ह्या कोकाची वाळलेली पानं तिथे विकायला ठेवली होती. त्या बाजारात मी पूर्वी कधी न पाहिलेली फळं आणि भाज्या होत्या. निरनिराळ्या देशातले असे स्थानिक बाजार बघायला फार मजा येते. तिथे त्यांच्या खाद्य संस्कृतीचं दर्शन होतं. या मंडईत मेरीच्या छोट्याशा मंदिरासमोर मेणबत्त्या आणि फुलदाण्या ठेवल्या होत्या. सकाळच्या वेळी ही मार्केटची वारी छानच वाटली. काहीतरी वेगळं पाहिल्याच्या आनंदांत बाहेर पडलो.

नंतर कीका आम्हाला मुसेओ लारको (Museo Larco) नावाच्या एका खाजगी संग्रहालयात घेऊन गेली. सभोवताली प्रशस्त हिरवळ आणि फुलझाडं असलेल्या एका सुंदर राजशाही निवासात हे म्युझियम आहे. कोलंबस पूर्वीच्या, गेल्या पाच हजार वर्षांच्या काळातील परूच्या विविध आदिम जमातींचं जीवन कसं होतं याची कल्पना तिथे ठेवलेल्या कलात्मक आणि नित्योपयोगी वस्तूंमुळे येते. तिथे चिकण मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सुबक आणि सुंदरच नाही तर काही शृंगारीक आणि विचित्र अशा असंख्य कलाकृती होत्या. त्या परूच्या निरनिराळ्या भागात उत्खननात सापडल्या होत्या. तिथे ठेवलेली राजघराण्यातली वस्त्रं आणि सोन्याचांदीचे दागिने तर केवळ अप्रतिम होते. काही कोट किंवा जॅकेट सारखे कपडे सोन्याच्या पातळ पत्र्यावर कलाकुसर आणि रत्न लावून बनवले होते. वेगवेगळया काळातील शस्त्रं आणि अवजारं यांनी तिथल्या खोल्या भरल्या होत्या. या म्युझियममधल्या बऱ्याच वस्तूंची कीकाला अगदी सखोल माहिती होती.

लॅटिन अमेरिकेच्या बहुतेक शहरात असलेला मुख्य चौक ज्याला तिथे ‘Plaza de Armas’ म्हणतात तिथे नंतर आमचा मोर्चा वळला. या मध्यवर्ती चौकाच्या सभोवताली मुख्यतः कथिड्रल, चर्चेस, सरकारी इमारती किंवा पूर्वीचे राजवाडे असतात. लीमाच्या या चौकाभोवती सुद्धा सरकारी राजवाडा (जिथे आता परुच्या अध्यक्षांची मुख्य कचेरी आहे), आर्चबिशपचं निवासस्थान व कचेरी आणि कॅथीड्रल आहे. आर्चबिशपच्या निओ-कलोनिअल वास्तूचा दर्शनी भाग ग्रॅनाईटच्या भिंती आणि सीडर लाकडाच्या जाळीदार बाल्कनींमुळे खूप आकर्षक दिसतो. कथिड्रलच्या बांधणीची सुरवात 1535 मधे परु आणि भोवतालचा भाग जिंकल्यावर स्पॅनिश योद्धा फ्रान्सिस्को पिसारो (Francisco Pizarro) याने केली. त्याचं थडगं पण इथेच आहे. त्यानंतर झालेल्या भुकंपांमुळे कथिड्रलची बरेचदा दुरुस्ती आणि पुनर्बांधणी झालेली आहे. हे कथिड्रल भव्य तर आहेच पण आतमधे खूपच वेगळं आणि म्हणून नजरेत भरणारं आहे. मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना असलेली लहान लहान प्रार्थना मंदिरं (chapels) बारोक, रेनेसान्स, निओ क्लासिकल अशा निरनिराळ्या स्थापत्य शैलीत आणि निरनिराळ्या लाकडांनी बनवली आहेत त्यामुळे ती नजरेत भरतात. ख्रिस्ताची मूर्ती असलेला मुख्य गाभारा सोन्याच्या गिलाव्याने मढवलेला आहे. इथल्या बहुतेक चर्चेसमधे क्रिस्ती चिन्हांबरोबर इंका लोकांच्या मूळ धर्मातली चिन्हं पण दिसतात. ते लोक सूर्य, चंद्र, तारे डोंगर यांना पवित्र देवता समजत. इथे पण क्रिस्ताच्या मूर्तीमागे किरणांसहित सूर्याची प्रतिमा आहे. गाभाऱ्याच्या समोर दोन्ही बाजूंनी लाकडी कोरीव काम केलेल्या उंच भिंती आहेत ज्यावर क्वायर गाणाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे हा गाभारा अतिशय आकर्षक दिसतो.

जवळच 1674 मधे बांधलेलं ‘सान फ्रांसिस्को चर्च आणि कॉन्व्हेंट’ आहे. हे चर्च स्पॅनिश बारोक (baroque) शैलीत बांधलेलं आहे. कॉन्व्हेंटमधे प्राचीन दुर्मिळ ग्रंथ असलेली मोठी लायब्ररी आहे. तिच्यातले काही ग्रंथ स्पॅनिशांनी परू जिंकण्यापूर्वीचे आहेत. या कॉन्व्हेंटचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तळघरात सापडलेले असंख्य मृतदेहांचे सापळे (catacombs)! सतराव्या शतकापासून लीमाच्या श्रीमंत लोकांनी या जागेत बरेच पैसे देऊन स्वतःला पुरण्याची सोय केली होती. मृत देहांनी ही जागा पूर्ण भरल्यावर देखील नंतरच्या काळात इथे एकावर एक मृत देह गाडले जाऊ लागले. अशी पंचवीस हजार लोकांची हाडं या खळग्यांमधे 1943 साली सापडली. आता ती तिथेच खणलेल्या खळग्यांत एकमेकांवर कलात्मकरित्या(!) रचून ठेवली आहेत. ती बघण्यासाठी तळघरातल्या भुयारांमधून जातांना आधीच जीव गुदमरतो त्यात ही हातापायांची हाडं आणि कवट्या बघून अंगावर काटा उभा राहतो. हे असलं काही पर्यटकांना दाखवण्याची जरुरी आहे का असा प्रश्न पडतो. असं दृश्य पोलंडमधे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधे पाहिलं होतं पण ते निदान नाझी राजवटीत झालेल्या क्रूर हत्याकांडाचा पुरावा म्हणून होतं.

लीमाच्या स्पॅनिश वसाहतीच्या काळात बांधलेल्या इमारतींमधे सर्वात आश्चर्यकारक इमारत म्हणजे आलियागाचं (casa de Aliaga) पाच शतकांपासून उभं असलेलं घर! आणि कमाल म्हणजे तिथे राहणारी त्याची सतरावी पिढी! फ्रांसिस्को पिसारो (Fransisco Pizzaro) याने 1535 मधे लीमाला राजधानीचं शहर केलं त्यावेळी त्याचा जवळचा सैनिक Jeronimo de Aliaga Ramirez याला त्याने काही एकर जागा दिली होती. या जागेवर आलियागानी घर बांधलं आणि ते आजतागायत उभं आहे. अर्थात त्याची एक-दोन वेळा फेर-उभारणी झाली आहे. बाहेरून पाहिलं तर घर अगदीच सामान्य दिसतं पण आतमधे पाय ठेवल्यावर त्याच्या भव्यतेची जाणीव होते. आतमधे काळाप्रमाणे काही भागात नूतनीकरण केलेलं आहे पण तरी तिचं मूळ स्वरूप टिकून आहे. घरातली प्रशस्त दालनं, मोठे हॉल, त्यामधलं जुनं, काळ्या रंगाच्या लाकडावर कोरीव काम केलेलं प्रचंड फर्निचर आणि त्यावरल्या गाद्या, मखमली पडदे हे सर्व वसाहतवादी वैभवाची जाणीव करून देतं. या वास्तूच्या मध्यभागी एक लहानसा चौक आहे. तिथे सुंदरशी बाग आणि काही खूप वर्ष जुनी झाडं आहेत. आम्ही त्या घरात राहणाऱ्या आलियागाच्या सोळाव्या पिढीतल्या वंशजाला भेटलो. त्यांना विवाहित तरुण मुलगा आहे आणि त्यालाही एक मुलगा आहे. पाचशे वर्ष एकाच घरात राहणारी आणि अखंड चाललेली आलियागाची पिढी बघून खरोखर अचंबा वाटतो.

आमच्या अतीउत्साही गाईडने नंतर आम्हाला बारांको (Barranco) या लीमाच्या भागात नेलं. तो भाग लीमाची कलावंत मंडळी- चित्रकार, शिल्पकार,संगीतकार यांच्या वसाहतीमुळे प्रसिद्ध आहे. संध्याकाळी तिथल्या बार(bars) आणि रेस्तराँमधे वर्दळ दिसत होती. तिथल्या उंचवट्यावर लावलेल्या हिरवळी आणि बागा तिथे सोडलेल्या प्रकाशझोतांनी खूपच जादूमय दिसत होत्या. तो सगळा भागच खूप कलात्मक वाटत होता. बारांकोमधे थोडं हिंडलो पण समाधान झालं नाही. मग तिथल्या एका मोठ्या हस्तवस्तूंनी भरलेल्या दुकानात कीका आम्हाला घेऊन गेली. तिथल्या हातांनी बनवलेल्या शोभेच्या वस्तू, दागिने, कपडे तसंच अल्पाकाच्या लोकरीपासून बनवलेल्या कपड्यांकडे बघतांना तिथून पाय हालत नव्हता.
लीमा शहरात खूप पाहण्यासारखं आहे. तिथे कितीतरी खास संग्रहालये आणि मार्केट्स आहेत पण
आम्हाला तिथे फक्त दोनच दिवस मिळाले. तिसऱ्या दिवशी पहाटेच्या विमानाने आम्ही कुस्को (Cusco) शहरात पोहोचलो. इंकांच्या प्राचीन, वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कितीतरी जागा बघायला तिथूनच जायचं होतं.

27 मार्च 2020
सेक्रेड व्हॅली- पिसाक, मारास, मोराय आणि माचूपिचू
लीमाहून कुस्को शहरात सातला पोहोचण्याऐवजी दहाला पोहोचलो कारण कुस्कोला विमानात बिघाड निघाली होती. एअरपोर्टवर घ्यायला आमचा गाईड हुलिओ •(Julio: हे स्पॅनिशमधे जुलै महिन्याचं नाव आहे.) व्हॅन घेऊन आला होता. परूमधे शुद्ध स्पॅनिश, स्पॅनिश-इंका मिश्रित आणि शुद्ध इंका असे तीन प्रकारचे लोक दिसतात. शिवाय तिथे आणखीही आदिवासी जमाती आहेत. हुलिओ गोरा आणि हिरवट डोळ्यांचा होता पण स्वतःला इंकाच म्हणवून घेत होता. त्याच्या पूर्वजांमधे स्पॅनिश रक्त मिसळलं असावं. इंका लोक ठेंगणे, रंगाने सावळे किंवा काळे आणि बारीक व पसरट (slanting) डोळ्यांचे असतात. बायका रंगीबेरंगी, घेरेदार स्कर्ट आणि स्वेटर त्यावर छोटासा त्रिकोनी स्कार्फ आणि डोक्यावर हॅट घालतात. पुरुष सुद्धा पॅन्ट-शर्ट वर कधी रंगीत जॅकेट तर कधी गळ्याभोवती लोकरीचा रंगीबेरंगी स्कार्फ गुंडाळतात. इंका कपड्यांसाठी मूळ,उठावदार (basic)रंग पसंत करतात.

विमानतळावरून लगेच सेक्रेड व्हॅलीला जायला निघालो आणि अर्ध्या-पाऊण तासात तिथे पोहोचलो. सेक्रेड व्हॅली ही कुस्को शहराच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे. अँडीज पर्वत रांगाच्या कुशीतून पूर्व-पश्चिम शंभर कि.मी. लांब आणि एक कि. मी. रुंद अशा या दरीतून भरपूर पाणी असलेली उरूबाम्बा नदी खळाळत जाते. परंतु हे या दरीचं नुसतं भौगोलिक वर्णन झालं. प्रत्यक्षात ती खूपच आकर्षक दिसते. डोंगराच्या नागमोडी रांगामधून वाहणाऱ्या नदीच्या भोवतालची हिरव्या छटांची शेतं, डोंगर उतारांवर शेतीसाठी केलेल्या रुंद पायऱ्या आणि या सर्वांवर होणारा सुंदर ऊन-सावलीचा खेळ या नजाऱ्यावरून दृष्टी हलत नाही. हुलीओने आम्हाला रस्त्याच्या एका वळणावर थांबून त्या दरीचं निरीक्षण करायला भरपूर वेळ दिला.

इंका लोक या दरीला पवित्र समजू लागले कारण सुपीक जमीन, ऊरूबाम्बा नदीचं आणि अँडीज पर्वतांवरच्या बर्फाचं वितळलेलं पाणी आणि बारा महिने अनुकूल हवामान यामुळे तिथे त्यांना भरपूर पिकं काढता येत होती. आजही तिथे भरपूर पिकं येतात. इंका लोक शेती करण्यात तरबेज आहेत. ते या दरीत इ.स.1420 मधे वस्तीला आले. (त्याआधी इथे अनेक जमाती राहून गेल्या.) दरी भोवतालच्या काही गावात आता इंकांच्या दगडी बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. ते या कामामधे खूपच कुशल होते. गुळगुळीत केलेल्या लांबट आकारांचे दगड एकावर एक रचून ते भिंती उभ्या करत. तेही दगडांमधे सिमेंट-मातीचा थर न देता! इतक्या सुंदर एकसंधी (seamless) दगडी भिंती कुठेच पाहायला मिळत नसतील. त्यांची बहुतेक बांधकामं डोंगर माथ्यांवर किंवा उतारावर आहेत. त्याकाळात त्यांनी बांधकामाला लागणारे मोठे दगड वरपर्यंत कसे नेले असतील ते समजत नाही.

पिसाक (Pisac) या गावात असे बरेच दगडी अवशेष सापडतात. आमचा दिवस उशिरा सुरु झाल्याने आम्हाला ते बघायला वेळ मिळाला नाही. पिसाकला इंकांनी स्वहस्ते बनवलेल्या वस्तूंची बाजारपेठ पण आहे. मेंढ्या, लामा आणि अल्पाकाच्या लोकरीचे हातमागावर विणून केलेले विविधरंगी कपडे इथे पाहायला मिळतात. अल्पाकाच्या लोकरीचे कपडे खूप महाग तर बाल अल्पाकाच्या लोकरीचे त्याहून महाग! काही दुकानात सोन्या चांदीच्या नाजूक वस्तू आणि दागिने होते. स्मरणवस्तूंची दुकानं भरपूर होती. इथे थोड्यावेळ हिंडून आम्ही हॉटेलवर आलो. तिथे एका मोठ्या शेडच्या खाली बफे लंच आमची वाट पाहत होतं. लंचमधे प्रथमच काही मक्याचे आणि किनवाचे खास इंका पदार्थ खायला मिळाले. आमचं हॉटेल या दरीतल्या युकाय (Yucay) या गावात होतं. अठराव्या शतकातल्या मठाचं हॉटेलमधे रूपान्तर केल्याने याचं आवार खूप मोठं आणि लहान लहान वाटिका, पुलझाडं, वेली आणि कारंज्यांनी आकर्षक दिसत होतं. आवारात सुंदरसं चर्च, हॉटेलचं प्रशस्त लाउंज आणि राहण्याच्या ओळीने खोल्या होत्या. शिवाय दोन तीन रेस्तराँ आणि बार, कॉफीची दुकानं आणि भेटवस्तूंची दुकानं असल्यामुळे ही एक लहानशी वसाहतच वाटत होती. संध्याकाळी लाउंजमधे सर्वांनी परुचं प्रसिद्ध कॉकटेल ‘पिस्को सावर’ची चव घेतली. द्राक्षापासून बनवलेल्या ब्रॅंडीत, लिंबाचा रस, साखरेचं सिरप, अंडयाचा फेटलेला पांढरा भाग आणि ‘अँगोस्तुरा बिटर्स’ हे एक कडू सिरप घालून हे चविष्ट कॉकटेल बनवतात.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ‘मारास (Maras)’ या गावात मीठाचे आगर बघायला निघालो. हॉटेलपासून अर्ध्या पाऊण तासातच एक उंच डोंगर लागला आणि मग उतरणीवरून येतांना एकाएकी समोरच्या दृष्यावर नजर खिळली. खालच्या सखल भागात मीठाचे चौकोनी आणि लंब-चौकोनी आकाराचे पांढरे शुभ्र वाफे पसरले होते. काहीत मीठ तयार झाले होते तर काहींत अजून तयार होत होते. वाफ्यांच्या अरुंद काठांवरून डोक्यावर मीठाच्या टोपल्या घेऊन जाण्याची कसरत करतांना बायका-पुरुष दिसत होते. पण हे मीठ बनवायला खारट पाणी येतं कुठून? तर डाव्या बाजूच्या डोंगर माथ्यावरून खळाळत येणाऱ्या एका बारीकशा झऱ्यातून! इतक्या बारीक झऱ्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात मीठ तयार होतं यावर विश्वास बसत नाही. ते पाणी खाली आल्यावर पाटाच्या पाण्यासारखं लांबवर नेऊन त्याचे फाटे काढून एकेका वाफ्यात सोडतात. एक महिन्यानंतर त्या पाण्याची वाफ होऊन मीठ तयार होतं. ते चाळून त्याचे तीन प्रकार तयार होतात – मळकट, सफेद आणि गुलाबी! मळकट मीठ अगदी खालच्या प्रतीचं असतं. पांढरं मीठ स्थानिक लोक वापरतात आणि जास्त क्षार असलेलं गुलाबी मीठ परदेशी निर्यात करतात. हे मिठाचे वाफे चार पाच कुटुंबांच्या मालकीचे आहेत. पूर्वी मीठ आयोडाईझ करत नसत. तेंव्हा इंका लोक एक प्रकारचं प्लम आणि इतर काही फळं खाऊन ते मिळवत असत असं हुलीओ सांगत होता. (खरं खोटं देव जाणे!) मीठागरात काम करणारे लोक खूप वर्ष निरोगी राहतात असं ऐकलं.

मोराय (Moray) या जवळच्याच गावात इंकांनी शेतीचे प्रयोग करण्यासाठी खणलेल्या गोल आणि लंबगोल आकाराच्या उतरत्या पायऱ्यांची वर्तुळं ठिकठिकाणी दिसतात. प्रत्येक पायरीवर वेगळं सूक्ष्म हवामान तयार होत असल्यामुळे तिथे ते निरनिराळी पिकं लावून प्रयोग करत असत. सर्वात वरच्या पायरीवरचं तापमान आणि अगदी खालच्या पायरीवरचं तापमान यात बराच फरक आढळतो. ह्या वर्तुळाकार पायऱ्या जमिनीत खोलवर जात असून देखील तिथे पाणी न साचता त्याचा निचरा होतो हे या प्रयोगशाळेचं आणखी एक वैशिष्ट्य!

आजचा लक्ष्यात राहण्यासारखा अनुभव म्हणजे ‘मिसमिनाय’ या इन्कांच्या गावाला दिलेली भेट! गावकऱ्यांनी गावाच्या हद्दीवर आमचं वाजत गाजत, गाणी म्हणत स्वागत केलं. गावात पोचल्यावर सर्वांचा फेर धरून नाच झाला आणि मग सर्वांना मुन्या (Muña) म्हणजे पुदिन्याच्या पानांपासून केलेला चहा दिला. चिनी किंवा जपानी चहासारखा तो कधीही, कितीही वेळा पितात. नंतर गावातल्या बायकांनी मेंढीच्या लोकरीचे सूत काढून ती नैसर्गिक रंगात कशी रंगवतात आणि मग हातमागावर तिचे नक्षीदार वस्त्र कसे तयार करतात याचे प्रात्यक्षिक दाखवलं. ते मनोरंजक आणि माहितीपर होतं. ते संपल्यावर जेवणाची वेळ झाली. गावातल्या बायका-पुरुषांनी आमच्यासाठी चांगलं चार कोर्सचं जेवण तयार केलं होतं. सर्व पदार्थ खास इंका पद्धतीनेच बनवले होते. प्रथम बशीत उकडलेला बटाटा आणि मक्याच्या पिठात घोळवून तळलेली ब्रॉकली आली. त्याबरोबरचा सॉस म्हणजे पातळ कोथिंबीर चटणीच होती. फरक एवढाच की त्यात पनीरचे अगदी बारीक तुकडे घातले होते. नंतर ‘लायमा’च्या शेंगातल्या बिया आणि भोपळा घालून केलेले मक्याचे चविष्ट सूप आले. भात आणि त्याबरोबर बटाटा, मटार आणि चीज घालून केलेला रस्सा हा मुख्य पदार्थ होता. त्याचा नॉनव्हेज प्रकार मासाचे तुकडे घालून केला होता. शेवटी आलेली गोड लापशी छोटया वाळलेल्या बटाट्याच्या आतला पिठूळ भाग, साखर आणि सफरचंदाचे तुकडे घालून केली होती. असे वाळलेले बटाटे सात-आठ वर्षे टिकतात असं कळलं.
पोटभर जेवण झाल्यावर इंकांचा एक धार्मिक विधी पाहायला मिळाला. इंकाचे विश्व तीन भागात विभागलेलं आहे जे तीन प्राणी दर्शवतात. गरुड (condor) पर्वत आणि त्यांच्यावरून जाणारा स्वर्गाचा रस्ता दाखवतो. रान मांजर (puma) पृथ्वी-दर्शक आहे आणि सर्प (serpents) पाताळ दाखवतात. कॉंडोर आणि पर्वत स्वर्गाचा मार्ग दाखवतात म्हणून इंका त्यांना फार पवित्र मानतात. त्यांच्या या धार्मिक विधीत आपण पूजेत वापरतो तशी बरीच सामुग्री होती. जगातल्या बऱ्याच आद्य संस्कृतीमधे धार्मिक आणि सामाजिक समारंभात वापरलं जाणारं मादक पेय इंका देखील वापरतात. हे निरनिराळ्या पदार्थांपासून बनवतात. इंका लोकांचं ‘चिचा’ नावाचं हे पेय आंबवलेल्या मक्यापासून बनवतात. धार्मिक कार्यात ते प्रथम पृथ्वीमातेला अर्पण करून नंतर सर्वजणं घोट घोट पितात. पण कापणीनंतरच्या व इतर समारंभात हवं तितकं (किंवा नको तितकं!) पितात.

जे ठिकाण पाहण्यासाठी बहुतेक लोक परुची वारी करतात त्या माचू पिचू (Machu Pichu) ह्या डोंगरावरच्या वसाहतीवर जाण्यासाठी सेक्रेड व्हॅलीमधल्या ओयान्तायतांबो ••(Ollantaytambo) या ट्रेन स्टेशनवर जावं लागतं. इथून दोन तासात रेल्वे ‘आग्वास कालीएनतेस’ (Aguas Calientes)या माचूपिचूच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाते. हा दोन तासांचा गाडीचा प्रवास कधी संपूच नाही असं वाटतं. डोंगरांच्या रांगांमधून वळणावळणाने हळू जाणाऱ्या गाडीतून जातांना लहानपणचा दार्जिलिंगचा प्रवास आठवला. तिथे पहिले तसे इथे दरीमधले एकामागून एक सुंदर नजारे दिसतात. खळाळत वाहणारी उरूबाम्बा नदी कायम साथीला असते. गाडीत छानशी न्याहारी होती. शिवाय गाणं-बजावणं आणि फॅशन शोमुळे थोडी करमणूक पण झाली. ‘आग्वास कालीएनतेस’ला पोहोचल्यावर बसमधून धोकेदायक वळणांच्या अरुंद घाटातून पाऊण तास गेल्यावर माचूपिचूच्या पायथ्याशी आलो. तिथून वर जाण्याची वाट कच्ची, चढ-उतारांची आणि खूप कठीण आहे.

पंधराव्या शतकात जवळ जवळ आठ हजार फूट उंच डोंगरावर इन्कांनी दगडी घरं बांधून इथे वसाहत केली. बाजूच्या उंच डोंगरावरून खालच्या पठारावर असलेली ही दगडी वसाहत खरोखर अचंबित करते. ही जागा इंकांच्या राजाने आपल्यासाठी खास म्हणून वसवली होती. काही कारणांनी पुढे ऐंशी वर्षात ती ओसाड पडली. गम्मत म्हणजे जेंव्हा स्पॅनिशांनी परुमधे आक्रमण केलं तेंव्हा त्यांना या जागेच्या अस्तित्वाची अजिबात कल्पना नव्हती. नाहीतर त्यांनी इथल्या सुंदर दगडी वास्तूंची नासधूस केली असती. इतकी शतकं अज्ञात राहिलेली ही जागा अमेरिकन इतिहासकार हिरम बिंघम (Hiram Bingham) याने 1911साली जगापुढे आणली.

इथे सूर्यमंदीर, बळी देण्याची जागा, डोंगराचा भाग कोरून केलेली एक दगडी बैठक (जी धार्मिक विधीसाठी वापरत) आणि तीन खिडक्या असलेली एक खोली हे एका भागात आहे तर बाकीच्या भागात साध्या खोल्या किंवा घरं आहेत. इतक्या उंचावर बांधलेलं आणि इतकी शतकं दृष्टीआड राहिलेलं हे जगातलं सातवं आश्चर्य बघतांना मानवाच्या कुशलतेचं आणि धाडसाचं कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. माचूपिचूवरून खाली उतरतांना एक असाध्य ठिकाण जिंकून आल्यासारखं वाटून मन भरून आलं.
स्पॅनिशमधे J चा उच्चार ‘ह’ होतो
LL चा उच्चार ‘य’ होतो

3 : कुस्को शहर
26 एप्रिल 2020
माचूपिचूवरून दुपारी खाली उतरून जेवण करून आम्ही परत ‘आग्वास कालीएनतेस’ (aguas calientes) या गावात आलो. या गावाला हे नाव इथे गरम पाण्याचे झरे असल्यामुळे पडले आहे. या छोट्याशा गावात हिंडून, तिथे एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी ट्रेन स्टेशनवर आलो. तिथून ओलांतायतांबोला परतून मग कुस्को या मुख्य आणि महत्वाच्या शहरात जायचं होतं. कुस्को समुद्र सपाटीपासून 11,152 फूट उंचावर आहे. तिथे ऑक्सिजनच्या विरळतेमुळे त्रास होऊ नये म्हणून बरोबर औषध ठेवलं होतं ते उपयोगी आलं.

कुस्को शहर तेराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकात स्पॅनिश येईपर्यंत इंका लोकांची राजधानी आणि त्यांच्या वैभवशाली कारकीर्दीचं सांस्कृतिक ठिकाण होतं. त्यांनी तिथे बांधलेल्या सूर्य आणि चंद्र-तारकांची देवळं, राज-महाल आणि इतर धार्मिक आणि सामाजिक इमारतींचे आता फक्त बऱ्या-वाईट अवस्थांमधले अवशेष सापडतात. पण त्यातूनही त्यांचं दगडी-बांधकामाचं कौशल्य दिसून येतं. स्पॅनिशांनी कुस्कोचा कब्जा घेतल्यावर अर्थातच इंकाच्या बहुतेक ठिकाणांची तोडफोड केली आणि त्यांच्या भक्कम दगडी पायांवर आपल्या शैलीच्या इमारती उभारल्या.

आमचा गाईड हुलीओ प्रथम आम्हाला ‘कोरिकांचा’ (Korikancha) या इंकांच्या देवळाचे अवशेष पाहायला घेऊन गेला. या देवळाचे बहुतेक भाग पाडून त्याच्या दगडी पायावर स्पॅनिशांनी त्यांचे ‘कॉन्व्हेंट ऑफ सांतो दोमिंगो’ (Santo Domingo) हे चर्च बांधले. हे ‘कोरीकांचा देऊळ’ इंकांचा मुख्य देव सूर्याचं (Inti ) होतं. या खेरीज या देवळाच्या आवारात त्यांच्या दैवतांपैकी सृष्टी-कर्ता, चंद्र, शुक्र, मेघनाद आणि इंद्रधनुष्य यांची देवळं होती. इतिहास सांगतो की हे सूर्यमंदिर सोनं, चांदी आणि रत्नांनी अक्षरशः मढलेलं होतं. त्याच्या प्रचंड दगडी भिंतींच्या जमिनीपासूनच्या अर्ध्या भागावर आणि दरवाजांवर सोन्याचे पत्रे लावले होते. सूर्याचा लहान मुलाच्या रुपातला सोन्याचा पुतळा होता. आणखी एका खोलीत त्याचा लांब नागमोडी किरणं असलेला सोन्याचा मुखवटा होता. पूजेची आणि इतर भांडी पण सोन्याची होती. एवढंच काय तर देवळाच्या विस्तीर्ण अंगणात सोन्या-चांदीची झाडं आणि पुतळे होते. ठिकठिकाणी रत्नं भरलेले सोन्याचे कलश होते. चंद्राचं मंदिर हे पूर्णतः चांदीचं होतं. स्पॅनिशांनी कुस्को घेतल्यावर या सगळ्या मौल्यवान वस्तू स्पेनला नेल्या. आता या सूर्यमंदिराच्या फक्त काही भिंती आणि खोल्या राहिल्या आहेत. सतराव्या शतकात पाचाकुती (pachakuti ) या स्पॅनिश-इंका सरदाराने सूर्यमंदिराच्या गाभाऱ्यात मागच्या भिंतीवर सूर्य, चंद्र, तारे आणि इतर प्राण्यांच्या आकृतींचं सोन्याच्या पत्र्यावर चित्र काढून ठेवलं होतं. इंका लोक त्याला आकाशातल्या ताऱ्यांचा नकाशाच समजत. त्या सोन्याच्या पत्र्याची प्रतिकृती आता एका खोलीत ठेवली आहे.

कुस्को शहरातला मुख्य चौक (plaza de Armas) हा खूपच प्रशस्त आहे आणि इंकांच्या काळात तो आणखी मोठा होता. या चौकात इंकांच्या राजा आणि सरदारांची निवासस्थानं आणि इतर सामाजिक-सांस्कृतिक इमारती होत्या. हा चौक म्हणजे त्यांची एकत्र जमण्याची, सण-समारंभ साजरी करण्याची जागा होती. इथूनच बऱ्याच ठिकाणी जाणारे रस्ते पण त्यांनी बांधले होते. नंतर स्पॅनिशांनी हे सर्व तोडून आपल्या इमारती उभारल्या. अशीच एक इमारत म्हणजे मेरी मातेसाठी बांधलेलं कथिड्रल (Cathedral Basílica of the assumption of the virgin). हे चर्च खूप मोठं आणि अतिशय सुंदर आहे. चर्चच्या मुख्य भागात मोठ्या घेराचे बारा दगडी खांब आहेत ज्याचे दगड जवळच्याच इंका गडाच्या दगडी भिंतींमधून घेतले होते. या खांबांवर चोवीस डौलदार कमानींचे छत आहे. यामुळे या चर्चमधे इंका आणि कॉलोनिअल वास्तुकलेचं मिश्रण दिसून येतं. चर्चमधल्या मध्यवर्ती भागात मेरीचं अनेक खांब आणि महिरप असलेलं चांदीचं मोठं देऊळ आहे. मेरी देखील सुंदर कपड्यांनी आणि दागिन्यांनी मढलेली आहे. चर्चच्या डाव्या भागात क्रुसावरच्या येशूचा काळा पडलेला पुतळा आहे. तो पुतळा म्हणजे कुस्कोचा रक्षक संत (patron saint ) मानला जातो कारण तो स्पेनहून आणतांना त्याच्यामुळे जहाज फुटायचं थांबलं अशी त्याची ख्याती होती. आणि आणल्यावर सतराव्या शतकात सुरु झालेला मोठा भूकंप त्याच्यामुळे थांबला असं म्हणतात. बरीच शतकं या पुतळ्याखाली कायम मेणबत्त्या जाळल्याने तो काळा झाला आहे. आता त्याच्यासमोर मेणबत्त्या जाळायला बंदी आहे. दरवर्षी इस्टरच्या सोमवारी त्याला जागेवरून काढून त्याची मिरवणूक काढतात.

याच मुख्य चर्चच्या डाव्या बाजूला जोडून ‘The sacred family’ नावाचं लहान चर्च आहे. इथे कुटुंबात होणारे बाप्तिस्मा, लग्न इत्यादी समारंभ साजरे होतात. इथल्या मोठ्या भिंतीवर येशूच्या शेवटच्या मेजवानीचं (Last supper) खूप मोठं तैलचित्र आहे. गम्मत म्हणजे बऱ्याच चर्चेसमधे असलेल्या या चित्रात जेवणात मेंढीचं मटण दाखवतात पण इथे इंका चित्रकाराने परूत सापडणारा ‘चिंचीला’ हा उंदरासारखा प्राणी दाखवला आहे. इंकांनी काढलेल्या क्रिस्ती धार्मिक चित्रात नेहमीच त्यांच्या स्वतःच्या जीवनातल्या गोष्टी डोकावतात. मुख्य चर्चच्या उजव्या बाजूला ‘Church of triamph’ नावाचं चर्च आहे. स्पॅनिशांनी कुस्को जिंकल्यावर लगेचच हे चर्च बांधलं होतं. स्पॅनिशांच्या इंकां विरुद्धच्या शेवटच्या लढाईत लढतांना त्यांना मेरीमाता आणि सेंट जेम्स यांची मदत झाली होती या विश्वासामुळे हे चर्च त्यांच्यासाठी बांधलं आहे. मुख्य भागात मेरीचा पुतळा आहे आणि त्याच्या खाली विजयाचा क्रूस आहे. मेरी आणि बाल येशूच्या पुतळा चांदीच्या गाभाऱ्यात आहे. चर्चमधे सेंट जेम्सचा घोड्यावर स्वार होऊन इंका माणसाला मारतानाचा पुतळा पण आहे.

‘केंको’ (quenco) ही मोकळी माळरानाची जागा कुस्कोच्या जवळच आहे. तिथे आजूबाजूंच्या खडकांवरच्या दगडी अवशेषांजवळ एका उंच खडकात दोन्ही बाजूला तोंड असलेली गुहा खोदली आहे. गुहेत एका बाजूनी पायऱ्या असलेला दगडाचा लंब-चौकोनी ओटा आहे. हुलीओ सांगत होता की ही पूर्वी लामांना बळी देण्याची जागा होती. त्या ओट्यावर एका बाजूला खाली उतार आहे. लामाला ओट्यावर निजवून खालच्या उतारावर त्याचं डोकं आणि मान ठेऊन काही बलवान माणसं त्याला बेशुद्ध करत आणि त्याचं हृदय बाहेर काढत. ओट्याच्या दुसऱ्या बाजूला एक झरोका आहे जिथून सूर्यदर्शन होतं. लामाचं हृदय एका वाडग्यात ठेऊन ते त्या खिडकीतून दिसणाऱ्या सूर्याला अर्पण करीत. मग लामाला ओट्याच्या मागे खणलेल्या नालीत टाकत. नंतर त्याला नेऊन त्याचं मांस खात असत, त्याची कातडी वाळवत असत आणि त्याची हाडं अवजारं करण्याकरता वापरली जात. म्हणजे हृदय सोडून त्याचा कुठलाही भाग वाया घालवत नसत.

कुस्कोच्या उत्तरभागात एका टेकडीवर बाराव्या शतकापासून अस्तित्वात असलेला ‘साकसायवामन’ (sacsayhuaman) नावाचा गड आहे ज्याच्या आता फक्त नागमोडी वळणाच्या तीन प्रचंड दगडी भिंती शिल्लक आहेत. त्याच्या आतल्या खोल्यांमधे स्पॅनिश आक्रमणांच्या वेळी शस्त्रं आणि खाद्य पदार्थ ठेवलेले असत पण त्या खोल्या आता राहिलेल्या नाहीत. या भिंतीसाठी इतके प्रचंड मोठे दगड वापरले आहेत की काही दगड पाच मीटर उंच आणि अडीच मीटर रुंद आहेत आणि त्यांचं वजन नव्वद ते एकशे पंचवीस टनांपर्यंत आहे. इतके मोठे दगड खाणीतून इतक्या वर कसे आणले असतील असा प्रश्न पडतो. काही पुरातत्त्ववाद्यांचं असं म्हणणं आहे की ते सपाट दगडाची उतरंड करून वर ढकलत आणले असावेत.

कुस्कोच्या सकाळी सुरु झालेल्या टूरमधे असे इंकांच्या बांधकामांचे बरेच नमुने आणि स्पॅनिशांनी बांधलेली चर्चेस पाहिली. दुपारी हुलीओने आम्हाला कुस्कोपासून चाळीस कि.मी. अंतरावर असलेल्या ‘अंदावायलियास’ (andahuaylillas) या छोटया पण सुरेख गावात नेलं. तिथे सोळाव्या शतकात जेसुइट लोकांनी बांधलेलं ‘सान पेद्रो दे अपोस्तोल’ ( san pedro de apostol) नावाचं बाहेरून खूप साधं दिसणारं चर्च आहे. आत मधे मात्र ते सोन्याच्या भिंती, कोरीव लाकूडकाम आणि विविध रंगांच्या कलाकृतींनी खुपच उठावदार पण काहीसं भडक दिसतं. चर्चचं रंगीत नक्षीनी भरलेलं छत पाहून काहीजण याला पेरूतलं सिस्टीन चॅपेल म्हणतात. याच्या भितींवर इंका कलावंतांनी काढलेली बायबलमधल्या प्रसंगाची चित्रं पाहण्यासारखी आहेत. आतापर्यंत निरनिराळ्या देशातली बरीच भव्य आणि सुंदर चर्चेस पहिली पण परुमधली चर्चेस खूप जुनी, दोन संस्कृतीच्या कलाविष्कारातून घडलेली आहेत आणि म्हणून अगदी वेगळी आणि कुतूहल वाटणारी आहेत.

या सुंदर गावातलं अतिशय अभूतपूर्व असं ‘सान पेद्रो दे अपोस्तोल’ बघून परत जुन्या वास्तू-अवशेषांकडे वळलो. यावेळी इंकांच्या आधीच्या काळातल्या जमातींच्या बांधकामाचे अवशेष पाहिले. त्यांच्या दगडीकामाचे नमुने बघूनच इंकांनी आपलं अप्रतिम बांधणीकाम उभारलं होतं. ‘तीपोन’ (Tipon) या उंचावरल्या गावात इंकांनी पूर्वी उतरत्या पायऱ्यांवर शेती केली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना पाणीपुरवठा डोंगरावरल्या एका झऱ्यापासून काढलेल्या कालव्यांमधून केलेला होता. आणि अजूनही तिथे शेती अशीच करतात. या कालव्यांमधून बाराही महिने पाणी वाहतं. पुन्हा एकदा इंकांच्या एंजीनिअरिंगच्या ज्ञानाची प्रचिती येते.

कुस्को शहर आणि त्याचा आजूबाजूचा परिसर इंका संस्कृतीने परिपूर्ण आहे आणि तो सर्व एका दिवसात बघणं खरोखर शक्य नाही. जे पाहिलं ते आणि जे पहायचं राहीलं ते परत येऊन पहावं असं वाटत राहिलं. इथून पुढे आम्ही टीटीकाका या सरोवराशेजारी असलेल्या पुनो या ठिकाणी ट्रेन मधून प्रवास करणार होतो.

4
26 मे 2020
परु आणि अमेझॉन-4 (अंतिम भाग)
एके काळी इंकांच्या राजधानीचं शहर असलेल्या कुस्कोची एक दिवसाची भरगच्च आणि मनोरंजक सफर संपवून आता आम्ही पूनो या टिटीकाका सरोवराकाठी असलेल्या गावाला ट्रेननी जायला निघालो. कुस्को समुद्रसपाटीपासून 11,150 फूट उंचावर आहे तर पूनो 12,560 फूट उंच आहे. पूनोच्या बाबतीत म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल की त्या गावापेक्षा तिथे जाण्याचा रस्ताच अधिक रम्य आणि मजेचा आहे. टिटीकाका सरोवर मात्र जलवाहतुकीला योग्य असलेलं जगातलं सर्वात उंच सरोवर आहे आणि म्हणून पाहण्यासारखं आहे.

कुस्कोहून निघणारी गाडी हळूहळू वर चढत 10 तासांनी पूनोला पोहोचते. 1920 च्या काळात अमेरिकेत अस्तित्वात असलेल्या pullman train सारखी हिची ठेवण आहे. आतमधे तर ही खूप देखणी आणि आरामशीर आहे. आत बसल्यावर आपण Murder on the Oriental Express या सिनेमाच्या ट्रेनमधे तर आलो नाही ना असा भास होतो.अशा भल्या मोठ्या काचेच्या खिडकी जवळ चार आरामशीर खुर्च्या, मधल्या टेबलावर पांढराशुभ्र टेबलक्लॉथ, त्याच्यावर ताज्या फुलांची फुलदाणी आणि टेबल लॅम्प अशी सुरेख बैठक होती. शिवाय बसल्या बसल्या बाहेरची कायम बदलणारी दृष्यं पाहण्याची पर्वणी! दुपारचं तीन कोर्सचं चवदार जेवण आणि नंतरच्या चहाबरोबर छोटी छोटी सँडविचेस आणि केक, पेस्ट्रीनी भरलेली बशी अशी खाण्याची चंगळ होती. करमणुकीसाठी फॅशन शो आणि स्थानिक कलाकारांचं गायन वादन! अशा तैनातींमुळे हा दहा तासांचा प्रवास कधी संपतो कळत नाही.

सुरवातीला सोबत असणाऱ्या अँडीज पर्वतांच्या रांगा, त्यांच्यापुढे असलेल्या झाडांमधून डोकावणारी मातीची लहान लहान घरं आणि जवळून वाहणारी वातानाय (huatanay) नदी हा सीन थोड्यावेळानी बदलतो. मग बाहेर मोकळं, करड्या रंगाचं माळरान सुरु होतं आणि त्यात घोडे, अल्पाका, लामा यांचे कळप दिसू लागतात. अर्ध्या वाटेवर ‘ ला राया (La Raya)’ या स्टेशनावर गाडी थोड्यावेळ थांबते. शेजारीच स्थानिक लोकांनी हातानी बनवलेल्या लोकरीच्या कपड्यांचा बाजार असल्यामुळे हा थांबा ठेवला असावा असं वाटतं. शेवटी गाडी पूनोच्या जवळच असलेल्या ‘हुलीयाका (Juliaca)’ गावातून अगदी मुख्य बाजारातून जाते. गाडी येईपर्यंत अगदी रूळांच्यामधे विकायचं सामान ठेवलेलं असतं.

पूनो शहर केवळ टिटिकाका सरोवराच्या काठावर आहे म्हणून त्याला महत्व. पण तिथे पाहण्यासारखं विशेष काही नाही. तिथे जाण्याचं मुख्य कारण टिटिकाका सरोवरातली वेळूची तरंगती, ‘उरोस (uros) बेटं पहाणे हे आहे. ‘उरोस’ हे इंकाच्या पूर्वी अस्तित्वात असलेले आदिम लोक आहेत. आमचं हॉटेल सरोवराच्या काठावर होतं आणि तिथून 5 किलोमीटर अंतरावर ही बेटं होती. बोटीतून जातांना सरोवराचं पाणी अगदी शाईसारखं निळं दिसत होतं. एका लहान बेटावर गेलो जिथे फक्त तीन-चार कुटुंबं राहत होती. गेल्यावर आधी तिथल्या मुख्य पुढाऱ्याने आम्हाला ती बेटं कशी बनवतात याचं प्रात्यक्षिक दाखवलं. टिटिकाका सरोवरात वाढणाऱ्या वेळूच्या लांबलचक मुळांच्या गंजा एकमेकांना बांधून त्यांचा तराफा तयार होतो. तो तळ्यात खांब ठोकून त्यावर दोरीने बांधतात. ह्या झुलत्या जमिनीवर वेळूच्या लांब दांड्यांचे थर देतात. खालचे थर कुजून जात असल्याने कायम नव्या दांड्यांची भर घालावी लागते. या वेळूच्या दांड्यावर चालतांना खूपच अस्थिर वाटतं. नंत बेटावरच्या बायकांनी केलेलं कलाकुसरीचं काम पाहिलं आणि साहजिकच वस्तूंची खरेदी झाली. त्यांच्या वेळूच्या दोरांनी बनवलेल्या नावांमधून सरोवराची सैर केली. नंतर आमच्या बोटीने सरोवराच्या विरुद्ध काठावर असलेल्या एका छोट्या गावात एका घरी जेवण केलं. हा सर्व अनुभव खूपच नवीन होता.

पूनोच्या जवळ तासाभराच्या अंतरावर ‘सीयुस्तानी (Sillustani)’ नावाचं लहानसं गाव आहे. त्याच्या जवळच छोटंसं ‘उमायो (umayo)’ नावाचं तळं आहे. तिथे टेकड्यांवर टाकीसारखे गोलाकार, 2 ते 4 मीटर उंच मनोरे आहेत. ते एकावर एक दगड रचून बांधले आहेत. ती इंकांपूर्वीच्या कोला लोकांची पुरण्याची जागा होती. आत आठ-दहा लोकांना पुरत असत. ते बघून दुपारच्या विमानाने आम्ही काहीजणी कुस्कोला परत गेलो. तिथे राहून दुसऱ्या दिवशी अमेझॉनच्या जंगलात जायचं होतं. माझ्यासाठी अमेझॉनचं जंगल म्हणजे या ट्रीपचा सर्वात महत्वाचा भाग होता.

कुस्कोहून ‘पुएर्तो मालदोनादो (Puerto Maldonado)’ या गावाला विमानाच्या तासाभराच्या प्रवासानंतर पोहोचलो. या परुच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या गावातून अमेझॉनच्या दक्षिण जंगलात प्रवेश करायचा होता. आणि तो करायला ‘माद्रे दे दिओस (Madre de Dios)’ म्हणजे mother of god या अमेझॉनच्या उपनदीवरून दोन तास प्रवास करायचा होता. मला वाटलं हा प्रवास करायला छानशी चारी बाजूंनी बंद असलेली बोट असेल पण ती सर्व बाजूंनी उघडी असलेली, 15-20 लोकांना बसण्याची लाँच होती. आत चढायला कठीण आणि खाली बसेपर्यंन्त डगमगणारी! माद्रे दे दिओस नदी बरीच रुंद आणि खोल आहे पण हा तिथला पावसाचा सिझन नसल्याने नदीचं पाणी कमी होतं. आम्ही लाईफ जॅकेट घालून नदीचा काठ आणि पाणी बघत बसलो होतो. एकाएकी आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी झाकाळून गेलं आणि पाऊस सुरु झाला. आणि काही वेळाने तो अक्षरशः कोसळायला लागला. आम्ही घाबरून गेलो होतो. शेवटी अंधारात, धो धो पडणाऱ्या पावसात, खळाळत वाहणाऱ्या पाण्यात लाँच चालकाने जरा काठाला येऊन लाँच थांबवली. 15-20 मिनिटं जीव मुठीत घेऊन थांबलो. पहिल्याच ओळखीत अमेझॉननी आपला इंगा दाखवला. दोन अडीच तासांनी नदीच्या काठावर ‘Inkatera Reserva Amazónica’ हा लॉज आला. इथे आमचे वास्तव्य होते. लॉजची मुख्य इमारत लाकडी होती. आतमधे सर्व बाजूंनी उंच काचा असलेला मोठा हॉल होता ज्याच्या बाजूने बसायच्या जागा होत्या. मध्यभागी जेवणाची टेबलं आणि बार होता. या इमारतीच्या जरा लांब, पाठीमागे आलेल्या लोकांना रहायला छोट्या लाकडी झोपड्या होत्या. वऱ्हांड्यात बसायला दोन खुर्च्या, आतमधल्या खोलीत मच्छरदाणी लावलेला पलंग, त्याला लागून एक शेल्फ आणि आलमारी. त्याच्या पाठीमागल्या भागात सिंक,टॉयलेट आणि शॉवर! आणि मध्ये सिंक. वीज नसल्यामुळे कंदिलाच्या उजेडात वावरावे लागत होते. आल्या आल्या थोडं फ्रेश होऊन जेवलो आणि रात्री नदीवर प्राणी बघायला सैर होती. फ्लॅश लाईटच्या उजेडात पाण्यातले किंवा काठावरचे प्राणी दिसतात. ही रात्रीची सफर खूपच थरारक वाटत होती. गाईडने आम्हाला पाण्यातले पांढरे किंवा स्पेक्टकॅलेड केमन (caiman) हे मगरीच्या जातीचे प्राणी दाखवले. पाण्यातून सुरुसुरु जात असतांना पांढरं डोकं वर काढल्याने त्यांचे गोल गरगरीत डोळे चमकत होते. काठावरल्या उंचवट्यावर कापिबेरा (capybara) नावाचा उंदरांच्या जातींतला सर्वात मोठा प्राणी दिसला. हा प्राणी फक्त दक्षिण अमेरिकेत सापडतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘सांदोवाल (Sandoval)’ या लांबच्या तळ्यावरची सफर होती. तिथे पोहोचायला जंगलातून दोन तासांचा रस्ता होता. सुदैवाने पूर्वीची खाच खळग्यांनी भरलेली निसरडी पायवाट जाऊन आता तिथे लाकडी फळ्यांचा रस्ता (board walk) होता. तरीदेखील इतक्या लांब चालून तेवढंच परत यायचं म्हटल्यावर आधीच थकायला झालं! रस्त्यावरच्या उंच झाडांवर तीन वेगळ्या प्रकारचे फक्त दक्षिण अमेरिकेत दिसणारे red howler, squirrel आणि kapuchin हे वानर पाहिले. तळ्याच्या तोंडापाशी पोचल्यावर लहानशा नावेत बसून तळ्यावर हिंडलो. या तळ्यावर फिरायचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे नदीत राहणारे प्रचंड मोठे ऑटर्स (otters) दिसतात पण आम्हाला काही त्यांनी दर्शन दिलं नाही. सफारी करतांना किंवा मुद्दाम अमुक प्राणी दिसतात म्हणून तिथे गेल्यावर ते दिसणं हा निव्वळ योगायोग असतो. या तळ्यात आम्हाला शुभ्र बगळे, ट्रॉपिकल कॉर्मोरंट, होअझिन हे पक्क्षी दिसले. काठावरच्या एका झाडाच्या खोडावर ओळीने बसलेली लहानशी वटवाघुळं (long nosed bats) दिसली.

झाडांच्या टोकाला बांधलेल्या झुलत्या पुलांवरून चालण्याचं (canopy walk), आणि त्याच्यावरून झाडांचे शेंडे बघत चालायचं माझं स्वप्न इथे पुरं झालं. 1,135 फूट लांब अशा सहा झुलत्या पुलांवरून तोल संभाळत, कडेला धरून, झाडांच्या शेंड्यांवरून जाण्यातला थरार वेगळाच होता. शिवाय ह्या पुलांना जोडणाऱ्या लाकडी प्लॅटफॉर्मवर थोडं थांबून आजूबाजूचं निरीक्षण करता येत होतं. तसंच खूप उंच झाडांचे शेंडे बघण्याकरता दोन 95 फूट उंच लाकडी मिनार उभारले होते. त्यांच्यावरून दूरवर पसरलेलं जंगल, नदी आणि पक्षी यांचं विहंगम दृष्य दिसत होतं.

इंकातेरा लॉजची दुसरी जागा, ‘Hacienda Concepcion’ हे ठिकाण eco-friendly असून इथे बोटॅनिकल गार्डन आहे. तिथे हिंडतांना आमच्या गाईडने आम्हाला खुपश्या झाडांची माहिती दिली. बरीचशी औषधी होती. काही झाडांचा चीक जखमांवर लावल्याने त्या लवकर बऱ्या होतात. तसेच इतर काहींची फळं, फुलं किंवा मुळं वेगवेगळ्या आजारासाठी उपयोगी होती. ब्राझील नट्सचं झाड प्रथमच पाहिलं. त्याची चेंडूसारखी गोल गरगरीत, ब्राउन रंगाची फळं खाली पडतात. एक टोक पंजासारखे तासलेल्या लांब काठीने ती गोळा करतात. मग ती मशेटी नावाच्या सुरीने फोडतात. आतमधे 7-8 कडक कवचाच्या बिया असतात त्या फोडून आतल्या बिया खाण्यासाठी असतात. हे सर्व मेहनतीचं काम असल्याने ब्राझील नट्स खूप महाग असतात पण चवीला अप्रतिम लागतात.

एका रात्री जवळच्याच जंगलात फिरलो. कच्ची, खाच खळग्यांनी भरलेली अरुंद पायवाट होती. आमच्या गाईडजवळ प्रखर प्रकाशाचे टॉर्च होते. झाडाच्या बुंध्याशी उकरून त्याने आम्हाला जगात सर्वात मोठे, काळ्या रंगाचे आणि पंज्याच्या आकाराचे टारांटूला कोळी दाखवले. शिवाय तिथे pink toe टारांटूला हा त्याच्यापेक्षा लहान कोळी पण पाहिला. आणखी काही प्रकारचे कोळी आणि किडे आणि मुंगळे होते.
असे तीनचार दिवस अमेझॉनच्या जंगलात काढले तरी समाधान झालं नाही. तिथे जितकं हिंडू तितकं नवीन काहीतरी पाहायला मिळतं. Rain forest कसं असतं याची मात्र चांगलीच कल्पना आली. शेवटच्या दिवशी तिथून निघताना जड वाटत होतं. पण परु आणि अमेझॉनला भेट देण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा पुरी झाल्याचं समाधानही वाटत होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *