भारतात दख्खनच्या पठारावर,गंगेच्या दोआबात आणि किनारी प्रदेशात पावसाळा संपला की हवा आर्द्र व्हायला लागते. उन्हाचा वाढता दाह काही दिवस फार फार तापदायक होतो. थंडी आणि परतीच्या पावसादरम्यानचा हा दाह खरंच खूप क्लेशदायक असतो. यादरम्यान पूर्व किनारपट्टी आणि पूर्व घाटांच्या परिसरात उत्तर पूर्व मान्सूनचा प्रभाव जाणवायला लागतो. साधारण ऑक्टोबरच्या ह्या काळात एकदा का उत्तरेकडून वाहणारे शीत वारे हिमालयाची अभेद्य रांग ओलांडून भारतात प्रवेशले की उन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळायला लागतो. काही दिवसांतच सूर्याच्या दक्षिणायनाबरोबरच उत्तरपश्चिमेकडूनही शीत वारे उपखंडात प्रवेश करतात आणि खऱ्या अर्थाने इथली हवा कोरडी होऊन देशाच्या बहुतांश भागात गारवा जाणवायला लागतो. हेच वारे तैगा प्रदेशातून आणि पूर्व युरोपातून येणाऱ्या काही रानबदकांच्या पंखांना आणि आणखी काही पक्ष्यांना अजिंक्य हिमालय ओलांडायचं बळ देतात. मीलन काळात स्वगृही, तैगा प्रदेशात गेलेल्या पाखरांची वीण पूर्ण झालेली असते. एव्हाना त्या भागातले तापमान गोठणबिंदूखाली गेलेले असल्यामुळे या पक्ष्यांना हिवाळी निवासाची ओढ लागते. आपल्या बच्च्यांसकट ते दक्षिणेचा प्रवास सुरू करतात. आपल्याकडल्या रानात, शेतात, पाणथळ जागी चांगलाच गारठा जाणवायला लागतो आणि शेकोटीच्या सुंदर, हव्याहव्याशा दिवसांना सुरुवात होते. अनेक ब्रिटीश आणि भारतीय निसर्गलेखकांनी लिहून ठेवलंय की चार महिन्यांच्या सततच्या पावसाच्या कंटाळवाण्या दिवसांनंतर अशा सर्द दिवसांची लोक आतुरतेने वाट पाहत. रब्बीचा हंगाम सुरू होई. पूर्वीच्या अधिकाऱ्यांचे हिवाळी दौरे सुरू होत. मृगयामोहिमांनाही सुरुवात होई. रानात तंबू पडत. शेकोट्या धगधगायला लागत.

अशा सर्द दिवसांत माझे मनही आपसूक रानाकडे ओढले जाते. रानाकडे रात्रीच्या समयी केलेल्या शेकोट्या आठवायला लागतात. उन्हाळ्या-पावसाळ्यानंतरच्या थंडीची चाहूल रानच पहिल्यांदा देतं. आदल्या रात्री रानातल्या एखाद्या कुटीत झोपलं असता फारच काहिली होत असते जिवाची. वारा पडलेला असतो, हवेतली उष्णता फार वाढलेली असते. झोप लागत नसल्याने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत राहावे लागते. खिडक्या,तावदाने सताड उघडी टाकून रानावर पडलेल्या दुधाळ चांदण्याच्या साक्षीने झोपायचा प्रयत्न चाललेला असतो. पानगळीचा हंगाम असल्याने सुकलेली पाने भिरभिरत खाली येत असतात. उत्तररात्री कधीतरी वाऱ्याची मंदशी झुळुक सागातून वा एखाद्या आंब्याच्या पानांतून आपल्यापर्यंत पोहोचते आणि डोळा लागतो. पहाटे झुंजूमुंजू व्हायला थोडा अवधी असता हलका गारवा जाणवायला लागतो आणि आपोआप झोपेतच हात दुलई शोधायला लागतात. दवाने चिंब झालेल्या रानावर सर्द दिवसाच्या चाहुलीचे निरसे सूर्यकिरण पडलेले असतात. सकाळच्याला वारा वाहत असतो, मात्र तो आदल्या दिवशीसारखा तप्त नसून अंगाला झोंबायला लागलेला असतो. वाफाळता चहा घेत समोरचं आरसपानी सौंदर्य बघत आपण फिरून त्या दुलईत केव्हाच शिरलेलो असतो. थंडी चोरपावलांनी रानावर उतरत असते. तिची चाहूल देणाऱ्या ‘कापरा’ पक्ष्याचे आगमन तो शीळ देऊन रानाला कळवत असतो. तृणांवर पडलेल्या दवाचं प्रमाण वाढतं. रानामधून रेखत गेलेल्या पाऊलवाटेवर पानांचा थर जमा होऊ लागतो. रात्रीच्या शेकोटीसाठी सुक्या लाकडांच्या जमवाजमवीसाठी तिथले चौकीदार इतस्ततः पांगतात.

अशा रात्रीत रानात शेकोटी ही ठरलेलीच. दुपारच्याला उष्मा बऱ्यापैकी जाणवल्यानंतर निरभ्र संध्याकाळी अगदी पहाटेचीच पुनरावृत्ती होते. कातरवेळी रानातला प्रकाश कमी कमी होत असतो. पाखरांचे थवे आपल्या निवाऱ्याला परतत असतात. ओल्या गवताचा अत्तरवास सर्वत्र उधळलेला असतो आणि गारठा पडायला सुरुवात होते. मग आधीच साठवून ठेवलेल्या सुक्या लाकडांपैकी काही मजबूत लाकडे त्रिकोणात रचून त्यांचा जाळ केला जातो. चढत जाणाऱ्या रात्रीत रानाच्या अंतर्भागातील वनकुट्यांच्या अंगणात मस्तपैकी शेकोटी धगधगायला लागते. हातपाय शेकत शेकत त्या तांबड्या पिवळ्या ज्वालांभोवती कित्येक तास समाधिस्थ अवस्थेत बसावसं वाटतं. वाऱ्याने दिशा बदलताच आगीचा खरपूस धूर डोळ्यांत जातो आणि मस्तपैकी चुरचुरायला लागतात डोळे. आजूबाजूने येणाऱ्या वन्यजीवांचे खडके सावध करत असतात. मध्येच एखादं मत्स्यघुबड डोक्यावरून उडून बाजूच्या हळदूवर बसून घुमायला लागतं. सर्रकन काटा आलाच म्हणून समजा अशा वेळी! अशा रानातल्या शेकोट्यांभोवती यार दोस्त असले की आहाहा! रानातले किस्से, आठवणी रंगात येतात. विस्मृतीत गेलेल्या काही जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळतात. वाघा बिबट्यांंच्या गोष्टी रंगतात. क्वचित भुताखेतांच्याही गोष्टी ऐकवल्या जातात. या शेकोट्या कुठल्याही रानात लावल्या जात असोत, गप्पांचे विषय थोड्याफार प्रमाणात सारखेच असतात. वन्यप्राणी आणि त्यांच्याभोवती गुंफलेल्या असंख्य गोष्टी अगदी वनमजुरापासून ते मोठ्या साहेबापर्यंत सगळे घोळवतात. साहेबांचे जुने, उमेदवारीचे दिवस ताजे होतात. मन तरुण होतं. डोळ्यांत चमक येते. उमेदीच्या दिवसांतल्या रानांचे उन्हा-पावसांतले, रानात केलेल्या भ्रमंत्यांचे किस्से परत परत ऐकवले जात असले तरी ते कंटाळवाणे नसतात.

मग तिथेच जेवणखाण उरकलं जातं. कोण मोठा साहेब आला तर खास बेत होतो. कडक मद्याचे पेले उंचावले जातात. शेकोटीची ऊब चांगलीच जाणवायला लागलेली असते. काही अर्धवट जळलेली लाकडं पुन्हा व्यवस्थित मध्यात घेतली जातात. शेकोटी जोमाने पेटलेली असते. गरमागरम फुलके आणि अशीच एखादी रानभाजी पोटाच्या खळग्यात स्वाहा होत असते. पोटात अन्न गेल्यावर थंडी अणखीनच जाणवायला लागते. दूरवर रानात गेलेलं मन बाहेर येतं. डोळ्यांत झोप मावत नसते. आपसूक ते मिटायला लागतात. “चला आज शेकोटीभोवतीच मस्त ताणून देऊया,” म्हणत वनाधिकारी आग्रह धरतात. स्लीपिंग बॅगमध्ये पटापट शिरून दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वनभ्रमंतीचा प्लॅन ठरतो. एव्हाना शेकोटी विझत आलेली असते. खालच्या लाकडांच्या लाल निळ्या ज्वाळा मस्तपैकी तडतडत असतात. वनपाल त्यात एखादं लाकूड टाकून रात्रीपुरती ती आग धगधगत ठेवतो जेणेकरून कोणी प्राणी जवळपास येऊ नये. रात्रीच्या भयानक गारठ्यात रातव्यांच्या किंवा रातकिड्यांच्या साथीत कूस बदलताना अर्धवट जाग येते. स्लीपिंग बॅग थंड झालेली असते. अर्धवट पेटत्या शेकोटीचा मंद पिवळसर प्रकाश आजूबाजूचं रान उजळवत असतो.आकाशात लक्षावधी नक्षत्रं उमललेली असतात. एखादं गोड स्वप्न पडलेलं असतं. एकदम पहाटे पक्ष्यांच्या कूजनाने डोळे उघडतात. रानबदकांचे थवे डोक्यावरून उडत जाता जाता एक नाद करत असतात. हे शेकोटीचे दिवस खासच असतात.

रानातल्या, पहाडातल्या अशा मनोहारी शेकोट्यांचे अनेक अनुभव माझ्या गाठीशी जमा झालेले आहेत. प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन आणि निराळा. काही वर्षांपूर्वीची थंडीतली एक शेकोटी माझ्या चांगलीच स्मरणात आहे. आसामात ब्रह्मपुत्रेच्या काठावर एका रानाच्या तुकड्यातली ती अविस्मरणीय शेकोटी कोण विसरेल? संध्याकाळचं पक्षीनिरीक्षण आटपून आम्ही विश्रामगृहात परतलो होतो. काही गेंडे आणि पाडे (हॉग डियर) पाणथळीत चरत होते. ब्रह्मपुत्रा, नदी कसली नदच तो! तिच्या उत्तरेच्या काठावर दोनशे मीटर आत ते विश्रामगृह होतं. तराईचं हत्तीगवत इतस्ततः वाढलेलं. दूर तिथे गर्द झाडोरा. नदीचा आवाज अगदी आमच्यापर्यंत येत होता. तीन वनकुट्यांचा तो परिसर. एक पाळीव हत्ती तिथे बांधलेला. भोवताली चार ते पाच झिलाणी. थंडीचे स्वप्नील दिवस, हवेहवेसे. निरभ्र आभाळ, त्यात नक्षत्रांचा सडा पडलेला. गवताचे विविध सुगंध येत होते. इथे आसामात थंडीत तर पाचलाच मिट्ट काळोख. बाजूला मस्त शेकोटी लागलेली, एका वनपालाने लुगरी आणलेली! (rice beer). वाह क्या बात! इथला टापू वेड लावणारा. देवधानात रानबदकं आश्रयाला गेलेली. टिटव्यांचा कोलाहल सुरू होता. सरत्या संध्येबरोबरच शेकोटीच्या ज्वाळा पेटलेल्या. मजबूत थंडी, दात एकमेकांवर वाजायचे थांबत नव्हते.

आमच्या बाजूच्या गवतात कोणीतरी असल्याचा संशय आला. मोठ्या कमांडर टॉर्चचा झोत त्या दिशेला गेला तसा एक हत्तीचा कळप चरत चरत आमच्याकडे सरकत असलेला दिसला. दात भीतीने आणखीनच वाजायला लागले. त्यांनी आम्हांला पाहिले आणि सगळे उधळले. आम्ही आत धावलो, एकाच्या दोन शेकोट्या झाल्या. सर्वत्र कोलाहल,आमचे आवाज, हत्तींचे जोराचे चीत्कार, डबे बडवायचे आवाज. पार काला झाला होता. कळप अगदी जवळ आला होता; पण शेकोटीला पाहून थबकला आणि वळला. ते दूर निघून गेल्यावर आम्ही निःश्वास टाकला. इथल्या कर्मचाऱ्यांसाठी बहुधा ते नित्याचंच असावं. विझणारी शेकोटी आम्ही परत चांगलीच पेटवली. रात्री कधीतरी आमचा डोळा लागला तरी आमची ती झोप सावध होती. जरा खुट्ट झालं तरी आम्ही उठायचो. सकाळी जाग आली तेव्हा शेकोटीची राखच फक्त शिल्लक होती आणि त्या कळपाचा कुठेही मागमूस नव्हता.

माझ्या अशा अनेक सर्दभऱ्या रात्री शेकोटीभोवती गुंफलेल्या आहेत. हिवाळ्यात दिवसभराच्या थकव्यानंतर रानात फुलणाऱ्या अशा शेकोट्या केवळ एक गरज नसून इथल्या वनकर्मचाऱ्यांच्या सुखदुःखाच्या सांगाती असतात. दिवसभर दमून परत आल्यावर विरंगुळ्याचं साधन असतात आणि किर्र रानात रात्रीच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या सख्याही असतात. या शेकोट्यांभोवतीचं वातावरण म्हणजे एक जिवंत, हवाहवासा अनुभव असतो. रानातल्या अनेक अनाकलनीय आणि हरखून टाकणाऱ्या गोष्टी मी अशा शेकोट्यांभोवतीच ऐकल्या आहेत,रात्रभर गप्पा आणि किस्से घोळवले आहेत, अनेक वन्यजीवांचं दर्शन घेतलं आहे, पहाटेच्या विझत आलेल्या शेकोटीजवळचे उघड्यावर झोपून काही सनसनाटी अनुभव घेतलेले आहेत, त्या ज्वाळेकडे एकटक पाहत समाधिस्थ झालो आहे. हिवाळ्यातल्या अशा सर्द दिवसरात्रींची आणि शेकोट्यांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *