बावीस मार्चपासून भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘आता महिनाभराची निश्चिंती झाली’ असं म्हणून माझा बगूनाना नव्या कोऱ्या कार्पेटवर स्वतःला तत्परतेनं लाटून घेता झाला. पण मनातले हे मांडे खाऊन खाऊन फुगत चाललेली माझी पोळी बायकोनं नेहमीप्रमाणे लाटण्याच्या टोकानं तत्परतेनं फोडली.

“आता काय करणारेस?” इति शाब्दिक लाटणं.
“काय म्हणजे? आधी विचार करणारे काय करायचं याचा”
“तुझा ‘विचार: पोच्ड इन वाईन’ होईपर्यंत लॉकडाऊन संपेल. त्यापेक्षा काहीही करणार नाहीयेस असं सरळ का नाही सांगत?”, लाटणं माझ्या प्रामाणिकपणावर वरवंट्यासारखं फिरलं. माझं वर्म त्या वरवंट्याखाली चिरडून साजेसं दुखावलं.

त्याला कारणही तसंच होतं. एकतर हे संभाषण या संदर्भित लॉकडाऊनपासून साधारण बारा हजार मैलांवर घडत होतं, जिथं मुळात लॉकडाऊनच नव्हता. चोवीस फेब्रुवारीला पुण्याहून तीन आठवड्यांच्या कामासाठी अमेरिकेला आलेला मी कोविडकृपेनं माझ्या पोर्टलंडच्या घरीच अडकून पडलो होतो. माझ्याआधी तीन आठवडे बायकोची चाकं इथं टेकली होती. आणि तिच्या नेहमीच्या झंझावाती झपाट्यानं तिनं तीनच आठवड्यात आमचं गेली बारा वर्षं भाड्यानं दिलेलं घर ताब्यात घेणं, ते साफ करणं, कार्पेट बदलणं, असल्या डागडुज्या करतानाच नोकरीही मिळवून ती चालूही केली होती. असल्या सपाटबंद रोडरोलरला तिच्या नव्या कार्पेटवर नुसताच सपाट झालेला नवरा पाहवला असता तरच नवल! पण त्यामुळे माझ्या आलस्यसाधनेत व्यत्यय येत होता, हे माझ्या वर्माला रुचत नव्हतं. त्याच्या दुखावण्याचं दुसरं कारण म्हणजे या परिस्थितीत आपण निश्चित आता काय करायचं हा प्रश्न मुळातच त्याला सतावत होता.

मुलीच्या जन्मापासून ती आता मिशिगनला शिकायला जाईपर्यंतच्या सतरा वर्षांमध्ये, आम्ही दोघांनीही आपापल्या करिअर्स खुंटीला टांगून ठेवल्या होत्या. आता पिल्लू उडून गेल्यावर सुन्या सुन्या झालेल्या घरट्यातले आम्ही कावळाचिमणी (बायको कितीही चिमणीसारखी आटोपशीर आणि गोड असली तरी स्वतःला चिमणा म्हणायला माझी चोच धजावत नाही. नशीब कावळ्यावर थांबलं, गिधाडापर्यंत पोचलं नाही!) आता परत पूर्णवेळ करिअरचे विचार करायला लागलो होतो. मी अजून कुठे केवळ ‘चला, आता जरा विचार करावा’ अशा विचारापर्यंत कसाबसा पोचत असताना, बायको दोन-दोन नोकऱ्या मिळवून मोकळी पण झाली होती. आणि आमच्या घरचं अंमळ जास्तच ‘स्पर्धात्मक’ वातावरण माझ्यामागून मला खदाखदा हसतंय असा भास होऊन माझं वर्म आळसावलेल्या अवस्थेत जमेल तितकं पिसाळत होतं.

“हे बघ बाबा, आपल्या तिघांमधे आता फक्त तूच निरुद्योगी आहेस.” मी विचारांच्या तव्यावर कोमटत असताना कन्याफळ तिथं उद्भवलं. कार्टीला नको तिथं मिठाळ झोंबणारे मराठी शब्द बरे चपखल सुचतात. युनिव्हर्सिटीतले सगळे क्लासेस ऑनलाईन झाल्यामुळे हे बाळही सध्या घरीच पडीक होतं.
“मग?” मी जराशी वाफ फुत्कारली.
“मग काही नाही. मूव्ह युवर कोपियस अमाउंट ऑफ बट् अँड  डू समथिंग!”, ती दवदार थंडपणे उद्गारली. “मला भरपूर अभ्यास आहे. सेमेस्टर अजून संपायची आहे. त्यानंतर इन्टर्नशिप असणारे. मला टेबलखुर्ची पाहिजे. मॉमाची पण तीच स्थिती आहे. तू काहीही कर; पण टेबलखुर्च्या आण.”

फर्निचर?!? माझा वीक पॉइंट!! मी अंमळ जास्तच दाबल्या गेलेल्या स्प्रिंगसारखा ताड्कन् उठून बसलो! लॉकडाऊनकडे तात्पुरत्या चष्म्यातूनच पाहात असल्यामुळे आपल्या घरात आयकेयाहून घाईत आणलेल्या दोन पलंगांव्यतिरिक्त काहीही फर्निचर नाहीये, हे अजून मी फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. आता अचानक दोघींना टेबलखुर्च्या आणायच्या म्हणणं ठीक होतं; पण ते प्रत्यक्षात आणणं कठीण होतं. त्यांचं दिसणं, डिझाईन, आर्थिक आणि पर्यावारणिक किंमत, अशा सगळ्या निकषांची गाळणी लावल्यावर मी सुचवलेले जे थोडे पर्याय उरले ते दोघींपैकी एक तरी नेमानं हाणून पाडत होती. दोन दिवस वादावादी झाल्यावर मी उठलो आणि तडक माझ्या काशीत (होम डीपो नावाचं बांधकामसाहित्याचं दुकान) घुसलो. करवती, हातोडे, खिळे, स्क्रू, डिंक वगैरे जुजबी सामानाबरोबरच लाकडाचे अनेक तुकडे घेतल्यावर माझ्यातला सुतारवेताळ संतुष्ट झाला. अमेरिकेतल्या पहिल्या अठरा वर्षांच्या आयुष्यात मी बरंच काही सुतारकाम केलं असलं तरी पुण्यातल्या आयतेपणाला मी गेल्या पंधरा वर्षांत चांगलाच सोकावलो होतो. पण मूळचा चक्रम स्वभाव, पुणेरी शिक्षण, इंजिनिअरी पेशा, आणि सोप्या गोष्टींतून अवघड प्रश्न निर्माण करून मग ते सोडवण्यातच छाती फुगवण्याची जन्मजात खोड, हे सगळं त्या सरावलेपणावर मात करायला पुरेसं ठरलं.

“हे काय?” बायकोनं तोंडाची करवत सुरू केली.
“टूल्स. मीच बनवणारे आता तुमची टेबलं.” या माझ्या आत्मविश्वासी बाणेदारपणाला अडकून करवत क्षणभर करकरत थांबली. पण क्षणभरच.
“तू?!?!”
“हो… का? काय शंकाय का काय तुला?”
“शंका नाही… होतील ना. फक्त माझा सीझनल जॉब संपायच्या आत कर म्हणजे झालं! आणि स्वतः तयार करून जे पैसे वाचवशील त्याच्या दसपट पैसे सगळ्या वेगवेगळ्या टूल्सवर घालवू नकोस!” माझ्यावर कुठलाही वार करवत नाही असं या करवतीला कधीच होत नाही.

अर्थात ही पैशांना येऊ घातलेली धार मला आधीच दिसली होती. त्यामुळे मी आधीच स्वस्तातली हस्तसाधनं आणली होती. लाकूड कापायच्या करवती, तासायचा रंधा, स्क्रू ड्रायव्हर्स, हातोडे, गुळगुळीतीकरणाच्या घासण्या असा सगळा हस्तसाधनांचा जामानिमा तयार झाला. यात विजेवर चालणारं एकही हत्यार नव्हतं. होम डीपोमधली सगळी अत्याधुनिक यंत्रावजारं डोळे भरून पाहताना त्या दुकानातल्या गल्ल्या माझ्या लाळगळतीमुळे कितीही गुळगुळीत झाल्या असल्या; तरी ती सगळी विकत घेण्याचा पराकोटीचा मोह मी निग्रहानं टाळला होता. पैसे वाचवण्याबरोबरच ‘सोप्या गोष्टी अवघड करून संपवण्याची खाज,’ हे त्याचं अर्थातच मोठं कारण होतं.

सकाळच्या न्याहारीनंतर बायको आणि मुलगी आपापल्या लॅपटॉप्समधे अंतर्धान पावल्यावर मी सुरू होता होता थांबलो. फर्निचर करायच्या आधी एक छोऽऽऽटीशी पण महत्त्वाची गोष्ट लागते आणि ती म्हणजे त्याचं डिझाईन. केवळ डोक्यानं करायच्या कुठल्याही कामाला सुरुवात करायच्या आधी प्रचंड वेळ सगळ्या कामाचं डिझाईन, आखणी, विचार, प्रश्न आणि सगळी उत्तरं केवळ डोक्यातल्या डोक्यातच सोडवण्याची मला सवय आहे. यासाठी मला कसलाही कागद, पेन्सिली, कंप्यूटर्स लागत नाहीत. दिवसचे दिवस मी फक्त डोकं, पाय आणि तोंड हे अनुक्रमे चालवण्यासाठी, चालण्यासाठी, आणि चरण्यासाठी (विचार करता करता) वापरतो. मला एका जागी बसून विचारच करता येत नाही. सतत येरझाऱ्या घालून गरगरल्याशिवाय माझा मेंदू कामच करत नसावा. कित्येक वेळा सुरवातीला बायको विचारायची:

“तुझं काय चाललंय काय निश्चित गेले दोन दिवस?”
“काय म्हणजे? काम चाललंय. विचार करतोय मी”
“हा असा गरागरा गोलगोल फिरून? चुकून परत परत तोच तोच विचार नाही ना करतएस?” जन्मजात खवचटपणा यालाच म्हणतात.

पण हातानं करायचं कुठलंही काम म्हटलं की मला धीरच धरवत नाही. साधारण साडेतीन मिनिटं कागदावर रेघोट्या मारल्यावर माझा पेशन्स संपतो. करवत, कानस, आणि रंधे हे मला टाळ-चिपळ्यांइतकेच पवित्र वाटतात. लाकडाला तासंतास तासून गुळगुळीत करायचा मला काडीचाही कंटाळा येत नाही. खरकागदानं घासून गुळगुळीत केलेल्या लाकडाचा स्पर्श मला बायकोच्या पहिल्या स्पर्शाइतकाच रोमांचक वाटतो (मागे एकदा माझा स्पर्श खरकागदासारखा वाटतो, असं बायको मला म्हणाली होती; तेव्हापासून हे वाक्य माझ्यात दबा धरून बसलेलं आहे). असो. तर त्यामुळे कागदावर रेघोट्या मारण्यापेक्षा हे स्पर्शसुख अनुभवायला मी विलक्षण उतावीळ होतो. तसंच याही वेळी झालं. पाच फूट दोन इंची बायकोला किती उंचीचं टेबल लागेल हे ठरवणं माझ्या दृष्टीनं पुरेसं होतं. त्यानंतर पुढचे तीन तास लाकूड कापणे, तासणे, चिकटवणे, रंधा मारणे या बरोबरच टेबलाचं डिझाईनही मनातल्या मनात समांतर रेषेत चालू होतं. हे वाचायला विचित्र वाटलं तरी अरेंज्ड  मॅरेजपासून मला याची सवय आहे. तेव्हाही मी बायकोचं ‘ओरिजिनल डिझाईन’ थोडाच वेळ पाहून, साधारण ‘रूपरेषा’ लक्षात घेऊन, कळायच्या आत लग्न करूनही टाकलं होतं. त्या अनोळखी पोरीचे आधी न कळलेले अनेक कंगोरे कापून, तासून, घासून, तिच्यातून आपल्याला हवी तशी बायको, तिच्याबरोबर राहत असतानाच ‘रियल टाईम’ डिझाईन करण्यासारखंच आहे हे. ती पोरगी आपल्याला हवा तसा आकार घेईलच असं नसतं; त्यामुळे जशा नवीन ‘गाठी’ सापडतील तसं डिझाईन बदलावं लागतं. लाकडाचंही तसंच आहे. सरळ वाटणाऱ्या फळ्या वाकुडतात, त्या कापल्यावर त्यातल्या आडमुठ्या गाठी अचानक दिसतात, तासल्यावर त्यातले ग्रेन पॅटर्न्स विचित्रच वाटतात, काही ठिकाणी लाकूड खिळ्यांना जाम दाद देत नाही, असं वाट्टेल ते होत असतं. त्या प्रत्येक आव्हानाला चुचकारून वेळप्रसंगी मनातलं ‘डिझाईन’ बदलावंही लागतं!

दोन फळ्या एकाशेजारी एक जोडल्या की मला त्यांच्यातला जोड रंधा मारून एकसंध केल्याशिवाय चैनच पडत नाही. यात मात्र मी लग्न आणि सुतारकाम यात गल्लत करत नाही. लग्नातल्या दोन फळ्या कधीही एकसंध होणार नाहीत, हे आता मला कळून चुकलेलं आहे. पण फर्निचरमधल्या फळ्यांना तसं अभय देता येत नाही. रंधा मारणं ही एक कला आहे. आधी रंध्याचं पातं त्याच्या लाकडी ठोकळ्यातल्या खाचेतून अगदी नेमक्या प्रमाणात बाहेर काढावं लागतं. ते कमी झालं तर रंधा लाकडावरून नुसताच सुळकन् फिरतो. तासलं काहीच जात नाही. ‘मित्रांबरोबर ट्रीपला जायचा विचार आहे’ हे वाक्य पहिल्यांदा उच्चारतो, तेव्हा ते बायकोच्या कानावरून असंच सुळकन् फिरून अदृश्य होतं; कारण ते लाकूड या दडलेल्या भित्र्या पात्याला अजिबात नडत नाही. आपलं येडं अजून ‘विचार आहे’ वगैरे शब्दप्रयोग करतंय म्हणजे ते अजून घाबरत घाबरत अंदाज घेतंय हे बायकोला माहीत असतं. पण तेच पातं जर ठोकळ्यातून जास्त बाहेर काढलं तर लाकूड त्याला टेकल्या टेकल्या नडतं. ‘हुंकार म्हणजे होकार नव्हे, ’ हे ज्ञान मला गेल्या अठ्ठावीस वर्षांत पुरेपूर होऊनही मी तसाच घाबरत घाबरत प्लॅन करत जातो. आणि मग ‘येत्या शुक्रवारी निघतोय आम्ही, ’ असं निर्वाणीचं पातं बाहेर काढलं की बायको तिची खरी गाठ दाखवते. तिला रंधणं शक्य नसतं! पात्याला माधार घ्यावीच लागते. ही लढाई नेहमी अशीच निर्णायक होते.

“अरे किती वेळ चालणारे तुझी घासाघीस? बारा वाजलेत. भूक लागलीये”, आमचं ‘डिझाईन’ पुन्हा एकदा कामात आणि विचारात खीळ घालतं झालं. वीज गेलेल्या करवतीसारखा मी थांबलो. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं कारण ती मला भक्षक म्हणून आमंत्रण देत्ये का भक्ष्य म्हणून हाके घालत्ये हेच मला पटकन् कळलं नाही.
“तू सकाळी म्हणाला होतास ना, दुपारचं लंच तूच करणारेस म्हणून?” असा काही विचार एकेकाळी माझ्या डोक्यात शिजून जिभेवर फसफसून गेला होता हे मीच विसरलो होतो.
“ऑं? बारा वाजले ऑलरेडी? तुझं टेबल करण्यात लक्षातच आलं नाही!” बायकोच्या शाब्दिक फटीत पाचर ठोकत तिला फार अवधी न देता मी पुढे विचारलं, “सांग, काय करू?”
“ऑमलेट सोडून काहीही कर. मला शक्य नाहीये आत्ता काहीही करणं. भुकेनं मरण्यापेक्षा तुझ्या दूधभाताचा लगदा खाऊन का होईना; पण जगेन तरी”, बायकोनं माझ्या पाककौशल्याची टरफलं एका फटक्यात कचऱ्यात लोटली. पण मीही काही पाककलेत अगदीच कच्चा कांदा नव्हतो. बत्तीस वर्षांपूर्वीच्या ऑस्टिनच्या विद्यार्थिदशेतल्या ला फिएस्टा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधे मी केलेल्या हिरवे मूग, सिमला मिरची, बटाटा आणि काकडीच्या एकत्र भाजीचे सुवास अजूनही दरवळतात. (ते दरवळत नसून शनिवारवाड्यातल्या नारायणरावाच्या भुतासारखे अजूनही फिरत असतात याचं कारण, ‘मला तेवढी एकच भाजी करता येत असे’, हे माझ्या रूममेट्सचं प्रतिपादन मात्र धादांत खोटं आहे. )

त्यावेळी माझ्या स्वयंपाकाची सुरुवात नेहमीच विचारहीन कांदा कापण्यापासून होत असे. तो कापून झाला की फ्रिज धुंडाळून फोडणी देण्यासारखं त्याच्यात काही सापडतंय का याची पाहणी मी करत असे. मग तेल, हळद, मोहरी, जिरं, आणि हिंग यांची फोडणी न चुकता करून (यात कधीही काडीचाही फरक केल्याचं मला आठवत नाही) त्यात कांदा आणि उरलेलं मिळेल ते पाच मिनिटं परतलं की त्याच्यात पाणी, गूळ, तिखट, आणि मीठ घालून उकळलं की थोड्या वेळात पातेल्यात आपोआप भाजी उद्भवत असे. त्याला भारदस्तपणा आणायला मी कधीकधी रॅंडमवेळी पातेल्यावर त्याचंच झाकण उलटं ठेवून त्यात पाणी घालून, ‘ही कोकणस्थांची खास रिव्हर्स कूकर मेथड आहे’ असं ठोकून देत असे. या उतरंडीमुळे निश्चित काय होतं, याचा मला अजूनही पत्ता लागला नाहीये; पण ‘साला इसको आता कुछ नहीं, मगर ट्राय तो मारता रहता है’ एवढी सहानुभूती माझ्या रूममेट्सकडून उकळायला त्याचा उपयोग होत असे. माझ्या कुकिंगच्या पद्धतीचं ‘सेरांधीपिटी’ असं नामकरणही मी केलं होतं. सेरेंदिपिटी या माझ्या आवडत्या इंग्रजी शब्दाला खुबीनं ‘रांधून’ शिजवलेल्या या सुंदर नव्या शब्दाला ‘दरवेळी त्यातून अचानक भेटणारा एक नवीन फ्लेवर’ असा सुंदर अर्थ होता. माझे मित्र मात्र त्यातल्या ‘पिटी’ या शेवटावरच जास्त भर देत असत. या असल्या भाजीबरोबर मग आम्ही टॉर्टीया नामक नऊवारी नेसलेल्या मेक्सिकन मडमांसारख्या पोळ्या खात असू. त्या दिसल्या नाहीत, (किंवा बुरशीचं हिरवं लुगडं नेसून बसलेल्या असल्या) तर भात आणि दूध हा बेस म्हणून मी वापरत असे. दूधभाताबरोबर मी जगातलं काहीही खाऊ शकतो. ऑस्टिनच्या दोन वर्षांत मी दूधभाताबरोबर सलामीचे तुकडे, अंडाभुर्जी, बेडेकर लोणची, पाव, अनेक चित्रविचित्र भाज्या, सफरचंदादी फळं, एवढंच काय तर उरलेला बर्गरही खाल्ला आहे. पोटभरीला भात, ओलाव्याला दूध, पोषणाला असलं काय मिळेल ते आणि या लगद्यावरून लक्ष जास्तीतजास्त उडावं म्हणून डोक्याच्या खाद्यासाठी पुस्तक असा चौरस आहार मी असंख्य वेळा केला आहे.

माझ्या सुदैवानं असल्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा माझ्या रूममेट्सनी बायकोला हिरिरीनं सांगितल्यामुळे मी पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात गेलो तरी बायको कासावीस होते. अपवाद फक्त ऑमलेट करायला गेलो तर. पण ते कधी खावं याचे तिचे काही अगम्य निकष आहेत. आजची वेळ त्या निकषांत बसत नव्हती आणि बायको मुळात नको तितक्या आत्मविश्वासानं केलेल्या कामाच्या कमिटमेंट्सखाली अडकली होती. आज पहिल्यांदाच बायको घरी असताना स्वयंपाकघर माझ्या ताब्यात होतं! आता बायकोला माझी तीही क्रिएटिव्हिटी दाखवायची संधी मिळाली होती.

कॉर्दन ब्लेऊ, बोउइलाबास, लेमन बटर बेउर्रे ब्लांच् अशा शिव्यासदृश अनुच्चरणीय बोबड्या शब्दांची अनेक भुतं माझ्या मनात थयथया नाचून गेली. पण त्यांची स्पेलिंगं सोडली तर त्यांच्या उच्चारापासून मला त्यांची काहीही तोंडओळख नव्हती. त्यांच्या व्युत्पत्ती मनात जुळवत मी कांदा कापायला घेतला. फ्रिजमधे अॅस्पॅरॅगस (शतावरी), मशरूम्स, ब्रसेल स्प्राउट्स, कॉलिफ्लॉवर, आणि शुगरस्नॅप पीज् अशा भाज्यांची पाकिटं मिळाली (यातली काही नावं त्या पाकिटांवरूनच साभार घेतली आहेत). रिकाम्या घरातही फोडणीचं सामान बायको लपवून ठेवू शकते हे कोडं मला तेव्हातर सुटलं नव्हतंच, अजूनही नाही. शेवटी घरातल्या एकमेव कढईत अतिकुमारी ऑलिव्ह ऑईल घालून तापवलं. त्यात मीठ, मिरपूड, आणि लसूण परतलं. कांदा परतला. उपरिनिर्दिष्ट भाज्या परतल्या. परतताना रेस्तरॉंमधले आचारी लोक हॅंडलच्या कढया जोरजोरात शेगडीवर घासत पुढे मागे हलवत ठणाठणा आवाज करतात तसा मनसोक्त आवाज केला. असं करताना गॅसच्या शेगडीखालून एकदम जाळ मोठा होऊन भक्कन् वर येतो हे पाहून मी जबरदस्त खूष झालो. तेल तापवून त्याच्यात आधी मीठ आणि मिरपूड टाकली तर त्याचा अतिशय खमंग धुरंधर सुवास येतो, हे मला पहिल्यांदाच कळलं. कढई जोरजोरात पुढेमागे हलवताना ती जवळ ओढून शेगडीवर आपटली की त्यातल्या भाज्या जागेवरच टुणकन् उडी मारून उलथ्यापालथ्या होतात हा खेळही मला पहिल्यांदाच समजला. त्यामुळे पळ्या, डाव, उलथण्यांनी त्यांना परतत बसायचे कष्ट कमी तर होतातच पण आपल्यालाही जबरी मास्टरशेफ झाल्यासारखं वाटायला लागतं. भाज्या परतत बसण्यातही समाधिआनंद मिळू शकतो हे मला पहिल्यांदाच कळलं.

“अरे काय किचन डोक्यावर घेतोयस का काय?” अशा शब्दांनी बायको मास्टरशेफची शेळी करत स्वयंपाकघरात घुसली खरी; पण एकदम थबकली. परतलेल्या भाज्यांचा अतिशय खरपूस सुवास सगळीकडे पसरला होता. सोशल मीडियांना टांगून पोरीचंही विमान लगेचच खाली उतरलं. दोघी त्यांची गोंडस नाकं हुळहुळवत भुवया उंचावून एकमेकींकडे बघत राहिल्या. “आता याच्याशी काय खायचं?” हे विचारलं म्हणजे जिभा चटावल्या हे उघड होतं. पण सॉटेड व्हेजिटेबल्स करण्याच्या नादात त्या कशाशी खायच्या त्याचा विचार करायचं मी विसरूनच गेलो होतो. मग ब्रेड, गोट चीज् वगैरे नेहमीच्या गोष्टींची साथ मिळाली.

मार्चच्या एका दिवशी अनपेक्षित सुरू झालेलं हे रंधणं आणि रांधणं अजून अव्याहत चालूच आहे. टेबलांपासून सुरुवात होऊन आता सगळं किचनच मी या हातांनी नवीन केलंय. ते करताना जवळजवळ दहा हजार डॉलर्स वाचवले आहेत. बाथरूम्स, इतर फर्निचर आणि मग पुढचं आवार हे सगळे नंबर लावून उभे आहेत. आणि याचबरोबर रोज दुपारचं जेवण रांधताना माझ्या पाककौशल्याची पताका रोज वरवरच फडफडत गेल्ये. दिसतील त्या भाज्यांना मीठ मिरपुडीवर परतण्यापासून उत्तरोतर प्रगती होऊन ॲस्पॅरॅगस पोच्ड इन वाईन, यंग जॅकफ्रूट बर्ब्लांक, ग्रिल्ड पोर्क चॉप्स विथ टोस्टेड वॉलनट्स अँड  क्रॅनबेरीज्, टोस्टेड सारडो अँड  ॲसॉर्टेड सीफूड स्कॅंपी अशा अचाट नावांचे पदार्थ मी त्यांच्या उच्चारांसहित बनवले आहेत. त्याबरोबरच भाकऱ्या (यात मोहन घालू नये… पाप लागतं!), काचऱ्या, कांद्याचं तिखट असल्या लोकप्रिय पदार्थांशीही माझी दोस्ती झाली आहे. आणि मुख्य म्हणजे हे सगळं ‘सेरांधीपिटी’तून घडलंय आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे बायकोच्या लुसलुशीत पोटात गुदगुल्या करून गेलंय!

कोविडआधी मला वेगवेगळे लोक इंजिनिअर, मॅनेजर, व्हेंचर कॅपिटलिस्ट, उद्योजक अशा अनेक वेगवेगळ्या लेबलांनी ओळखायचे. गेल्या सहा महिन्यांत मी सुतार, प्लंबर, आचारी वगैरे बिरुदंही गोळा केली आहेत. विचारांत व्यत्यय आणणारी कुठलीही कामं मला यापूर्वी आवडत नसत. डोकं चालवायला न लागणारी कामं मी बिनबोभाट विनातक्रार करत आलोय (उदा: धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे, व्हॅक्यूम करणे वगैरे). पण रंधताना आणि रांधताना एकाच वेळी लागणारी क्रिएटिव्ह बुद्धता आणि रिपिटिटिव्ह निर्बुद्धता यांच्या मिलाफानं मला आता जबरदस्त मोहिनी घातली आहे. कारण हे दोन्ही महिनोन् महिने हिने रोज नीट केल्यामुळे ‘याला आता काय बोलणार?’ या विचारानं बायकोला आलेली कॉन्स्टिपेटिव्ह हतबुद्धता मला फार फार चवदार लोभसवाणी आणि मौलिक वाटायला लागली आहे!

5 Comments

  1. व्वा! फर्निचर स्वतः बनवलंस तू! ग्रेटच… मस्त लेख आहे.

  2. मस्त खुसखुशीत लेख! भाजीत काकडी घालणे, उर्वरित बर्गर खाणे वगैरे भयंकर प्रकार करून जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन आणि देवाचे आभार! अनेक नवे नवे वाक्प्रचार खूपच आवडले! झक्कास लेख!

    1. धन्यवाद सुधीर! आपण सगळ्यांनी हे असले उद्योग केलेच असणारेत. अर्थात तू इकडे आलास तेव्हा लग्न झालं असेल तर असले प्रसंग आले नसतील तुझ्यावर 🙂

Leave a Reply

Your email address will not be published.