दिवेलागण झाली होती. बाजारगल्लीत सगळ्या दुकानांचे दिवे लागले होते.
आज रविवार, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला सुटी होती. वेद मनमुराद भटकत होता. त्याला संध्याकाळी भटकायला खूप आवडतं. सरकारी दवाखान्यात भरमसाठ पेशंट असतात, त्याची संध्याकाळ त्यांच्यात संपून जाते, त्यामुळे काही वाटत नाही; पण सुटीच्या दिवशी त्याला संध्याकाळी बाहेर-बाहेरच आवडायचं. नाहीतरी इंटर्नशिपचं वर्ष हे. मरमर काम करण्यासाठीच असतं. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला त्याहून जास्त काम! सवय करूनच घ्यावी.
पण काही म्हणा, संध्याकाळी भटकावंच !
दिवसभरातल्या घडामोडी, चिंता, वाद, कडवट संभाषणं, यांच्या ओझ्यानं झाकोळलेली संध्याकाळ अंगावर येते. शिवाय सूर्यास्त झाल्यानंतरचा संधिप्रकाश गूढच, म्लान करणारा. छे ! मस्त भटकावं.
तो आणखी उत्साहाने चालत राहिला. कुणी ओळखीचे लोक हॅलो, हाय करत होते. तो आनंदाने हात हलवून पुढे जात राहिला.
तो खूप खूश होता !
बाबामियाँच्या हॉटेलसमोरून जाताना, मगरीबकी नमाज पढून आलेल्या बाबामियाँने त्याला अदबीने ‘ स्सलाम वालेकुम ‘ केला.
तो ओळखीचं हसून पुढे निघाला अन् त्याने हाक ऐकली.
” डागदरबाबू, आइये, तशरीफ रख्खिये, चाय पीजिये| आपकी शाम सुहानी कर दूंगा ! ”
“नको नको बाबामियाँ … ”
पण बाबामियाँ ऐकणाऱ्यातला थोडाच होता! त्याचा पिढीजात हक्क होता वेदवर !
” अजी ऐसा एक दिन भी नहीं गया के तुम्हारे वालीदसाहब मेरी चाय पिये बगैर घर गये, खैर अब आप तो डागदर हो, फिर भी… ”
” बाबामियाँ , अंगाखांद्यावर खेळवलंस की तू मला, आप आप म्हणणं सोड बरं, तुझा वेदच मी. ”
” बैठ बैठ, वैसा नही रहता बाबू, पढाई आदमी की कद बढाती है..,! “
दादामियाँच्या आता भुवयाही शुभ्र झाल्या आहेत. दिलखुलास हसत त्याने पंप मारला, पिन मारली, स्टोव्ह पेटला. जर्मनच्या भगुन्यातलं दूध ओगराळ्याने पातेल्यात ओतलं, त्याचं खास चहापत्तीचं ‘मिच्चर’ अन् कमशक्कर चमच्याने टाकली.
एक फकीर आला. त्याने उदाचा टेंभा हॉटेलात सगळीकडे फिरवला.
दादामियाँने त्याला एक रुपयाचं नाणं दिलं. त्यानं मोरपिसाचा झाडू वेदच्या डोक्यावर टेकवला. वेदनेही नाणं दिलं.
उदाच्या मंद दरवळात मस्त कडक सोनेरी चहा दादामियाँने पेश केला.
पहिल्या घोटालाच वेदने ‘वाह ! ‘ अशी दाद देताच दादामियाँच्या चेहऱ्यावर अपार समाधान झळकलं.
” बिल्कूल तेरे वालिद जैसा है तू! तारीफ भी करता है तो तेरे अब्बा जैसी ! अच्छा ये बता, शहाभैया अच्छा है नं? ”
” हो, त्यांच्या बायॉप्सीचा रिपोर्ट चांगला आहे, म्हणजे कॅन्सर नाही. ”
“ये तो बहोत खुशी की बात है I अल्लाह तेरा शुकर है | ”
” अच्छा, दादामियाँ, चलता, फिर मिलेंगे, खुदा हाफीज. ”
” खुदा हाफीज ! “
किती साधी सरळ माणसं आली आपल्या आयुष्यात, नाही का?
भाग्यवान आहे मी, शहाकाका… दादामियाँ…
आठवणींच्या कल्लोळात डुंबत वेद पुढे चालला होता.
” काका…वेदने बॉल मुद्दाम माझ्या डोळ्यावर मारला ! ”
या द्वाड पोराला अद्दल घडवण्यासाठी वेदचे बाबा चवताळून त्याच्यावर
धावले, त्यांना खात्रीच होती आपल्या पोराच्या कारनाम्याची.
वेद अन् समीर शहा मित्रच. पण भांडणं , कट्टी – बो, रुसवे … या सगळ्या स्थित्यंतरांना त्यांची मैत्रीही अपवाद नव्हती. त्याला आठवलं , समीर कुचकं बोलला म्हणून चवताळून त्याने कॉर्कबॉल फेकला, समीरच्या डोळ्याच्या थोडा वर लागला हे नशीब, पण भराभर सूज आली अन् डोळा बारीक झाला.
आता बाबा अंगावर धावून येताना पाहून वेदला ब्रह्मांड आठवलं.
अंगणापलिकडून पट्ट्यापट्ट्यांची मळकट विजार अन् बाह्यांचं बनियन घातलेले शहाकाका पळत आले. समीरच्या डोळ्यावर रुमाल घट्ट धरून ते वेदच्या बाबांवर ओरडले,
“किशनभैया, मारू नका वेदला, मी पाहिलं, त्याने मांजरीला बॉल मारला होता, पण ती पळाली अन् पुढे समीरला लागला बॉल! कृपा करून वेदला मारू नका.”
अविश्वासाने सर्वांकडे बघत वेदचे बाबा वाड्यात गेले.
त्याचे बाबा घरी घेऊन जाताना समीर खुनशी नजरेने वेदकडे पाहत होता. वेदही त्याला खुन्नस देत होता. म्हणजे बदला घेणार तर समीर !
अकल्पित हवे तसे फासे पडल्याने वेद खूष झाला होता. पण असं घडलं कसं?
सायकलवर समीरला दवाखान्यात घेऊन जाताना त्याच्या बाबांनी वेदकडे पाहिलं, डोळे मिचकावले अन् ते गेले.
वेदला प्रचंड अपराधी वाटलं. त्याला पश्चात्ताप झाला. शहाकाकांजवळ मन मोकळं करावं ही प्रबळ ऊर्मी आली. आपल्याला आजवर असं कधी वाटलं नव्हतं याचीही त्याला नव्याने जाणीव झाली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शहाकाका ऑफिसमधून आले. सायकल पिंपळाखाली लावली. वेद वाटच बघत होता. तो मुंजाच्या पारावरून उडी मारून शहाकाकांकडे आला,
” काका…. ”
काका शांतपणे सायकल लॉक करून घरात गेले. थोड्यावेळाने, हातपाय धुऊन, देवदर्शन करून संध्याकाळचं दैनिक घेऊन ते पारावर आले. जाड फ्रेमचा चष्मा लावून पेपर वाचू लागले.
” काका… ”
” ये वेद, बस. शेंगा खा, आत्ताच भाजल्या आहेत, ” त्याला शेंगा देत शहाकाका म्हणाले.. ”
” न.. नको… काका, मला … ”
त्याला जवळ घेऊन शहाकाका म्हणाले,
” माहीत आहे मला, तू मुद्दाम मारलास बॉल समीरला, माहीत आहे समीरने तुला चिडवलं अन् तुला राग आला. मी खिडकीतून बघितलं. ”
” मग माझ्या बाबांना… तुम्ही.. खोटं.. ”
” कसं असतं बेटा, तुम्ही दोघं मित्र जरूर; पण चुकीचं वागता. अशा कुरघोड्या करून काय मिळणार आहे? तुला मी वाचवलं; पण त्याचा उपयोग होईल अशी मला खात्री कुठे आहे? नका रे भांडत जाऊ ! इतके गळ्यात गळा घालून फिरता, मग असं का? ”
” चुकलं काका ! ”
वेदच्या डोक्यावर काका मायेने हात फिरवत असताना समीरही आला.
त्यानेही चूक कबूल केली.
खजील झालेले वेद , समीर पुन्हा भांडले नाहीत.
चार दिवसांपूर्वी इमर्जन्सी रूममध्ये धापा टाकत ग्लानीत तडफडणारे शहाकाका पाहताच वेद हादरला. तोच ड्यूटीवर होता. ऑक्सिजन लावून तो पळत सिनियर डॉक्टरना बोलवायला गेला. अॅडमिट करून त्यांना सेटल केल्यावर तपासण्या झाल्या, कॅन्सरची शंका म्हणून लंग बायॉप्सी करायची ठरवली डाॅ. मारवा सरांनी.
आज समीर कच्छमध्ये कुठेतरी पाकिस्तान बॉर्डरवर सैन्यात काम करत आहे. काकी पाच वर्षांपूर्वी वारल्या. निवृत्त झालेल्या शहाकाकांना रमाबाई स्वयंपाक करून खाऊ घालत असत. त्या वेदच्या घरीही कामाला होत्या. खोकला वाढत चालल्यावर त्या सरकारी दवाखान्यात काकांना घेऊन आल्या होत्या.
काका आता स्थिर झाले होते. वेद स्वतःच डॉक्टर असल्याने आणि शहाकाका हे त्याच्या पितृस्थानी आहेत हे सिव्हिल सर्जनना सांगून वेदने शहाकाकांसाठी वॉर्डातली स्पेशल रूम मिळवली होती. शहाकाकांच्या डोळ्यांत त्याचं कौतुक नांदत होतं. सगळ्या सिस्टर्सना हे प्रेमळ काका आवडले होते.
बायॉप्सीच्या दिवशी सकाळी वेदने काकांना नीट समजावून सांगितलं होतं की, काका घाबरू नका, ब्राँकोस्कोपी, त्यातून श्वासनलिकेची बायॉप्सी ही तशी फार मोठी चाचणी नाही.
पण रुग्णाची भीती अशी जात नसते.
सर्जन डॉ.मारवा सरांची परवानगी घेऊन वेद स्वतः शहाकाकांच्या ब्राँकोस्कोपीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता. त्यांच्या
श्वासनलिकेत स्टीलचा ब्राँकोस्कोप मारवा सरांनी टाकला तेंव्हा
काकांच्या चेहऱ्यावरची मूर्तिमंत भीती पाहून वेदला गलबलून आलं.
पण सवयीने अंगी बाणलेल्या स्थितप्रज्ञतेने तो स्वतःचा चेहरा आश्वासक ठेवण्यात यशस्वी झाला.
बायॉप्सीचा तुकडा काढत असताना शहाकाकांना वेदना झाल्या; पण आवाज येऊ शकत नव्हता. त्यांचे विस्फारलेले डोळे, डोळ्यांच्या कडांनी ओघळलेले उष्ण अश्रू, त्यांनी वेदचा आणखीन घट्ट पकडलेला हात..
यांतून वेदला ते जाणवलं. दुसऱ्या हाताने त्याने स्वतःचा रुमाल खिशातून काढला, काकांचे डोळे पुसले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन तो म्हणाला,
” घाबरू नका काका, बस्स , झालंच आता, ते नळी बाहेर काढतील. मग झालंच ! ”
काकांनी परत त्याचा हात आवळून सोडला, जणू त्यांना कळल्याचं सुचवलं त्यांनी.
मग तीन दिवस वेदच तळमळत होता. रिपोर्ट फक्त मलाच दाखवा असं
सिस्टर्सना बजावून ठेवलं होतं त्यानं.
‘ बिनाईन टिशू ‘ असा रिपोर्ट पाहून वेदच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
“काका , तुम्हाला कॅन्सर नाही. घाबरू नका, तुम्ही यातून बाहेर पडणार आहात. “
त्याचा हात काकांनी घट्ट धरला.
त्याला आठवलं, पारावर त्यानेही काकांचा हात असाच घट्ट धरला होता.
वेदला वाटलं,धीर देण्याची परतफेड हा किती विलक्षण प्रसंग असतो
नाही का?
शहाकाकांनी त्याच्या नौकेला किती हळुवारपणे दिशा दिली !
होकायंत्राची सुई बघत नौका चालवायला हवी. तांडेलाला वाऱ्याची
दिशा बघून शिडाच्या दोऱ्यांची ओढाताण करावी लागते. नाहीतर
नौका दिशाहीन भरकटते.
शहाकाकांनी वेदची नौका अशीच शिडं ताणून, स्वतः होकायंत्र होऊन सावरली होती.
” काका, निश्चिंत रहा, हा खोकला थांबणार एक दोन दिवसांत आणि समीरला रजा मिळाली आहे, तो परवाच येतोय. ”
” तू आहेस ना बेटा, समीर माझ्याजवळ असल्यासारखंच आहे मला! “
खूप चालून आता वेदचे पाय भरून आले होते. काकांचा चेहरा आठवून डोळेही भरून आले होते. तो भटकत भटकत गावाबाहेरच्या टेकडीजवळ आला होता. रात्र झाली होती.
गोड आवाजात
“भेटी लागी जीssवा लागलीसे आssस.. ‘ तुकोबाचा हा अभंग कुणी पुरुष गोड आवाजात गात होतं. त्याच्या पायांनी ओढ घेतली.
टेकडीवरच्या देवळात तो आला.
‘ जू ‘ जमिनीवर टेकवलेली एक बैलगाडी त्याला दिसली.
बाजूला दोन खिलार बैल झाडाला बांधले होते.
एक तरतरीत सावळी बाई दगडांची चूल करून स्वयंपाक करत होती.
देऊळ निर्मनुष्य होतं. सभामंडपात त्या बाईचा नवरा लेकराला मांडीवर थोपटत, एकतारीवर गोड आवाजात अभंग गात होता.
गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाईच्या प्रसन्न मूर्ती समईच्या प्रकाशात उजळल्या होत्या.
तो दर्शन घेऊन आला तोवर शेतकऱ्याचं भजन संपलं होतं.
त्याचं मूल गाढ झोपलं होतं.
तो शेतकरी हसून वेदला म्हणाला,
” या मालक जेवायला, उद्या सकाळी जाणार आम्ही, चार घास
खाऊन घ्या गरिबाबरोबर.
काय वाटलं कुणास माहीत, पण वेद मांडी घालून जमिनीवर बसला.
शेतकऱ्याने पिवळीलख्ख ‘ पितळी ‘ पुन्हा पाण्याने धुऊन-पुसून अदबीनं वेदसमोर ठेवली. मीठ वाढलं, त्याच्या बायकोने गरमगरम पिठलं वाढलं, खरपूस कडक ज्वारीची भाकरी मोडून चतकोरांची चळत करून वाढली.
जणू सत्यनारायणाचा ब्राम्हण जेवू घालत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
आनंदाने त्याने ते अमृततुल्य पिठलं अन् खरपूस गरम भाकरी खाल्ली. शेतकऱ्याला समाधान वाटलं. थोडं तिखटच होतं पिठलं, पण हवंहवंसं तिखट. मंदिराजवळच्या रांजणातलं थंडगार पाणी पितळी तांब्यातून घटाघटा पिऊन वेद निवला.
त्यांच्याशी वेदने मोकळ्याढाकळ्या गप्पा मारल्या.
शेतकरी अन् त्याची बायको आपलं बाडबिस्तार घेऊन लांब सांगली सातारकडे जात होते. मजल दरमजल करत प्रवास चालू होता. गावी दुष्काळ असल्यामुळे त्याच्या गावचे सगळे कर्ते लोक ही वाट धरत होते. तिकडे ऊसतोड करण्यासाठी जावं, चार पैसे गाठीशी बांधून यावं, पुढच्या पावसाळ्यात डोळ्यांवर हात आडवा धरून फसव्या काळ्या ढगांना साकडं घालावं, बरसला तर आनंद! खरीप, रब्बी दोन्ही साधेल. नाही बरसला तर खरिपात वाट पाहायची अन् रब्बीत पश्चिम महाराष्ट्राची वाट धरायची.
आयुष्यात हेच काय ते बदल .
खंत करणं त्याच्यासारख्यांना कसं परवडेल.
आहे त्यात आनंदच !
शेतकऱ्याला जेवणाचा मोबदला ऑफर करण्याचा करंटेपणा वेद करणार नव्हताच; पण त्याला ते बरं वाटेना. रात्री ड्यूटीवर जागताना नेमकी पहाटे तीन वाजता भूक लागते, तेव्हा हॉस्पिटलचं कँटीन, बाहेरच्या टपऱ्या, सगळंच बंद असतं, ‘थोडीसी पेटपूजा… कभी भी, कहीं भी.. ‘ म्हणून त्याने कॅडबरीचं मोठं चॉकलेट घेऊन ठेवलं होतं.
” येतो दादा, ओळख असू द्या, आणि वहिनी, हे चॉकलेट तुमच्या मुलाला, माझ्यातर्फे छोटीशी भेट म्हणून द्या, झोपला बिचारा! ”
त्या मुलाला चॉकलेट देताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेदला बघायचा होता, पण आता मात्र ते जोडपं वेदच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखत आनंदी झालं होतं.
” रामराम. ”
” रामराम. येतो दादा. “
शिकायला हवं, आत्मसात करायला हवं असं आयुष्यात पावलोपावली बरंच काही मिळत असतं नाही का? आपलं मन खुलं हवं. त्यासाठी प्रतिष्ठा, मानमरातब, अहंगंड या झुली झटकल्या पाहिजेत.
शहाकाका, बाबामियाँ, शेतकरी, त्याची बायको…
किती साधी माणसं ना ही?
मला साधेपणाचे धडे द्यायचे म्हणून ही माणसं माझ्याशी इतकी प्रेमाने वागली, असं नव्हे ; तर ती तशीच आहेत!
साधी माणसं !
जमेल मला असं साधं राहा- वागायला?
का नाही? प्रयत्न तर करूया की.
हेलकावे देणाऱ्या लाटांमधून तरंगणारी आपली नौका स्थिर ठेवण्याचं सूत्र वेदला अवगत झालं.