‘ हॅलो ! उदगीरकर साहेब, मी देशमुख बोलतोय !’
‘ बोला ! ‘
‘ एक विचारू का ?’
‘ दहा विचारा ! बोला ! ‘
‘ वेळच जाईना झालाय हो ! तुमचं कसं ?’
‘ मला वेळ पुरेना झालाय !’
‘ आं ? काय आयडिया केली हो ! आम्हालाही टीप द्याकी ! ‘
‘ उपयोग नाही !’
‘ असं का म्हणता हो ?’
‘ तुम्हाला चहा करता येतो ?’
नाही गड्या !’
‘ कुकर लावणे, एखादी भाजी करणे, निदान निवडून देणे, चिरणे इत्यादि ?’
‘ छ्या ! ती बायकांची कामे आपण नाय करत ! ‘
‘ ती मी करत असतो ! त्यांना मदतही होते, आपला वेळही चांगला जातो !’
‘ तुम्ही भाज्या चिरून देता ?’
‘ करतो देखील !’
‘ अरारारा ! काय वेळ आली हो तुमच्यावर ! हे कुठं शिकलात ?’
‘ पोहायला कसे शिकलात ?’
‘ त्यात काय ! पाण्यात पडलं की पोहायला येतं !’
तसच प्रत्येक बाबतीत असतय देशमुख साहेब !’
‘ म्हणजे भांडीही घासत असणार तुम्ही ! तुमचं काय सांगता येत नाही !’
‘ होय ! ‘
‘ माझ्याजवळ बोललात ते बोललात , दुसर्‍याकडे बोलू नका ! लोक हसतील !’
‘ आपण फोनवर बोलत असलो, तरी तुम्ही हसू दाबून ठेवत असल्याचं लक्षात आलय माझ्या !’
‘ खरच हसू यायलय !’
‘ फोन जरा स्पीकर वर टाकता का ?’
‘ का ?’
‘ आपला संवाद जरा वहिनींच्या कानावरही जाऊ द्याकी ! दोन मिनिटात हसू गायब होईल !’
‘ भावजी ! यांनी फोन स्पीकरवरच ठेवलाय मघापासुन ! तुमची फजिती ऐक म्हणाले ! ‘
‘ असं ?’
‘ आता ह्यांच्याकड बघते, आणि तुम्हाला फोन करून सांगते , फजिती कुणाची झाली ते !
‘ अगं अगं ! असं का करायलीस , ओ उदगीरकर , फोन ठेवतो आता, च्यायला हे वेगळच लचांड लागलं माझ्या’!’
नंतर दोन दिवसानी –
‘ हॅलो ! वहिनी, देशमुखसाहेब आहेत का ?’
‘ आहेत पण जर्रा बिझी आहेत !’
‘ काय विशेष ?’
‘ तसं कांही नाही. त्यांची भांडी झालीच आहेत, शेवटचं पातेलं घासल की ते मोकळेच आहेत तसे ! ओ, राहुद्या, भाऊजीचा फोन आहे , तो घ्या आधी ! ‘
‘ हॅलो ! ‘
‘ काय देशमुख ! आवाज असा ओढल्यासारखा का येतोय ?’
‘ च्यामायला ! आग लावून परत विचारताय ? पाप लागल पाप ! ‘
‘ मी काय केलं ? मी फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली ! तुम्हीच स्पीकर ऑन ठेवला होता !’
‘ होय हो ! काय दुर्बुद्धी सुचली मला देव जाणे !’
‘ बरं ते जाउद्या, वेळ कसा चाललाय ?’
‘ झाडू मारून कंबरड मोडलं हो माझं ! शिवाय भाज्या निवडणे म्हणू नका, भांडे म्हणू नका ! झक मारली आणि तुम्हाला त्या दिवशी फोन केला ! सगळा कडता निघायलाय बघा !’
‘ मी विचारलं की वेळ कसा चाललाय ?’
‘ तुमचच उत्तर तुम्हाला ! वेळ पुरेना झालाय ! ‘
‘ थोडक्यात, वळणावर गाडी आली म्हणायची !’
‘ च्यायला ! एवढे करोनाचे दिवस संपू दे ! तुम्हाला इंगा दाखवतो !
‘ हा,हा हा !’
ये है करोना इफेक्ट !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *