मी ज्या शाळेत शिकले तेथे- २०१९च्या नोव्हेंबरमध्ये भारतात गेले असताना जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरातच असलेल्या त्याच संस्थेच्या महिला महाविद्यालयात – माझ्या आईवडिलांच्या नावे मी देणगी देऊन आर्थिकदृष्ट्या गरजू आणि हुशार अशा विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. त्या संदर्भात माझे तेथे काम होते. त्या महाविद्यालयात ज्यांना भेटायचे होते ते कार्यालयात येण्यास वेळ होता. तेवढ्या वेळात त्याच आवारात असलेल्या माझ्या शाळेत फेरफटका मारण्याचे मी ठरवले.

सकाळची वेळ होती. शाळेच्या मैदानावर निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज किंवा निळी सलवार, पांढरा खमीज, केसांच्या वेण्यांना लाल रिबिनी किंवा आखूड मोकळ्या केसाला लाल हेअरबॅंड, आणि पायात पांढरे बूट, पांढरे मोजे – अशा गणवेषात मुलींचे घोळके दिसत होते. एका बाजूला पीटीचा (Physical Training/व्यायाम, कवायती इत्यादींचा) तास चालू होता. दुसऱ्या बाजूला ‘रनिंग ट्रॅक’वर काही १०-११ वर्षे वयाच्या मुली हसत, खिदळत, मजेत पळत होत्या. त्यांचे निरागस हसू पाहून मलाही हसू फुटले. नकळत मी त्या मुलींमध्ये स्वत:ला पाहत भूतकाळात शिरले.

“काय आजही उशीर? तरी बरं, आठवड्यातला एकच दिवस सकाळची शाळा असते!” – इयत्ता पाचवीच्या वर्गाचे ‘पीटीचे सर’ नेहमीप्रमाणे तिरकस शब्दांत बोलत होते.
या पीटी मास्तरांकडून मला व्यायामाचे कोणते धडे मिळाले, ते आठवत नाहीत. मात्र तिरकस बोलण्याकडे कसे दुर्लक्ष करावे, याचे बाळकडू निश्चितच मिळाले. मी आपल्याच नादात, जांभई आवरत, नाकासमोर बघत घाईघाईने माझ्या इयत्ता ५ वी अ – या वर्गाच्या दिशेने चालू लागले.
“अगं मी तुझ्याशी बोलतोय!”- माझ्या पाठीमागून पुन्हा पीटी मास्तरांचा कडक स्वर कानी पडला.
जांभई ऐन मध्यावर आली असताना मी तोंडावर हात ठेवून ९० अंशात उजवीकडे मान वळवली. दबलेल्या जांभईने ऐनवेळी घात केला, अन्‌ दीर्घ आssहाss असं उत्तर दिलं. ‘जांभईमुळे मानेच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो का?’ असला एक निरुद्योगी प्रश्नही माझ्या मनात पिंगा घालत चेहऱ्यावर उमटला.

“अहो स्कॉलर, काय सगळी पुस्तकं डोक्यात कोंबली? म्हणून डोकं जड होऊन उशीरा जाग आली?” – मास्तर जरा आवाज वाढवून म्हणाले.
माझ्या जांभईने त्यांच्या तापटपणाचा पारा आणखीनच चढला असावा. या पीटी मास्तरांना शाळेतील इतर विषयांचा अभ्यास करणे आवडत नसावे, म्हणून आपल्याला कवायती, खेळ शिकवतात आणि बाकी वेळात रागावतात, असे आम्हां काही मैत्रिणींचे एकमत होते. मात्र खरे कारण असे, की त्या मैत्रिणीही सकाळी शाळा असल्यास उशिरा येण्याच्या बाबतीत पटाईत होत्या.
“अं नाही सर… अं होय सर!” – मी पुटपुटले.
“नाही काय? होय काय?” – सर रागानेच बोलत होते.
“सर, सगळी पुस्तकं नाही वाचली, पण काल ‘वीरधवल’ पुस्तकातली काही पाने वाचली, आणि अजूनही जात नाहीत डोक्यातून.” – इति मी.
सरांच्या चेहऱ्यावर जरासे स्मित दिसले. पण माझे लक्ष जाताच ते चेहरा गंभीर करून म्हणाले,
“पळ, जा, ग्राऊंड भोवती फेरी मारून ये अन्‌ वर्गात जाऊन बैस! पुन्हा उशीर करू नकोस. शाळेत वेळेवर येत जा गं, कितीदा सांगायचं हे!”
“होय सर”, असे म्हणून मी खेळाच्या मैदानाकडे वळले. मैदानाभोवती माझ्याप्रमाणेच शाळेत उशीरा आलेल्या अजून दोघी विद्यार्थिनी रमत गमत पळत होत्या. थंडीचे दिवस होते. सकाळी माझ्या वर्गात तेव्हा रुक्षपणे इंग्रजी व्याकरण शिकवणाऱ्या बाईंचा तास चालू होता. त्या तासाला बसणे ही एक शिक्षाच वाटायची आम्हा विद्यार्थिनींना. त्यापेक्षा उबदार कोवळ्या उन्हात मैदानावर पळणे- हे शिक्षा असूनही आवडायचे.

आम्ही मुली खेळाच्या मैदानाभोवती पळत असताना तेवढ्यात पलीकडच्या झाडीतील एक पिवळे – काळे अशा मिश्र रंगाचे फुलपाखरू उडत उडत पुढे जात निमाच्या डोक्यावर नाचू लागले. मागची प्रभा ते पकडायला निमाच्या मागे टाळ्या वाजवत फिरू लागली. त्यामुळे त्या दोघींच्या अंतरात आणि पळण्याच्या वेगात गडबड झाली. त्यांच्या मागून मी पळत येऊन दोघींना धडक दिली आणि जरा पुढे जात अचानक ब्रेक लागल्यासारखी थांबले. निमा आणि प्रभा दोघीही पुन्हा पळू लागल्या. आणि मधेच मी खांबासारखी उभी राहिल्याने आता त्या दोघींनीही मला धडक दिली. पुढच्या क्षणी आम्ही तिघींनीही जमिनीवर लोळणफुगडी केली. त्याबरोबर माझे लक्ष माझ्या पायांतील एका बुटाकडे गेले. कारण त्याभोवती फुलपाखरू फडफडत होते. ‘हे इथे कसं आलं?’ जमिनीवर पडल्यापडल्या मी विचारात पडले. काल शाळेत डब्यात आणलेल्या पोळीबरोबर सुधारस होता. तो चाखत असताना काही थेंब पडले असावेत बुटावर, असाही विचार मनात आला. फुलपाखरासाठी प्रभा पुन्हा आता माझ्या बुटाकडे मोर्चा वळवते आहे असे लक्षात येताच ताबडतोब मी जोरजोराने पाय हलवत फुलपाखराला हाताऐवजी पायानेच टाटा केले. फ़ुलपाखरू जवळच्या झाडीत अदृश्य झाले. प्रभाच्या हाती फुलपाखरू न लागल्याने, ती दोन्ही हात स्वत:च्या कमरेवर ठेवून रागाने माझ्याकडे पाहू लागली.
“काय चाललंय काय तुमचं? नाकासमोर पळत मैदानाभोवती अजून एक फेरी मारून वर्गात जाऊन बसा.” – पीटीच्या सरांनी दुरूनच पुन्हा आवाज वाढवला. आम्हांला मजा म्हणून नव्हे तर सजा म्हणून पळायला सांगितले आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. गुपचूप मैदानाभोवती पळत आणखी एक फेरी पूर्ण करून आम्ही तिघी आपापल्या वर्गात जाऊन बसलो. हातातले दप्तर मी पुढे डेस्कवर ठेवले आणि सहजच वर्गभर नजर फिरवत एकीकडे वही काढण्यासाठी दप्तरात हात घातला. पुढच्याच क्षणाला चटका बसल्यासारखा मी हात मागे केला.

तेव्हा शनिवारी आमची शाळा सकाळी असे. त्याचबरोबर महिना अखेर असल्यास शाळेचे तासही कमी असत. त्याच कारणाने मी नेहमीच्या दप्तराऐवजी लहान आकाराचे दुसरे दप्तर शाळेत आणले होते. ते दप्तर म्हणजे आईने लाल, काळ्या मजबूत दोऱ्यांनी स्वत: विणून घरीच बनवलेली एक मध्यम आकाराची सुबक पिशवी. त्याला आतल्या बाजूस मजबूत अस्तर आणि वर स्टीलच्या दोन मोठ्या कड्याही होत्या, ऐटीत धरायला. आम्हा बहिणींना ती पिशवी फार आवडायची. आम्ही ती पिशवी कधी खेळताना आणि कधी बागेत जातानाही वापरत असू. शाळा अर्धवेळ असली तर त्या पिशवीचा मी दप्तरासारखा वापर करत असे. त्या शनिवारीही मी ती पिशवी दप्तर म्हणून शाळेत आणली होती; पण सकाळी उशीरा उठल्याने दप्तरात आपण हवी ती वह्यापुस्तके ठेवली ना, याबद्दल मी पूर्णपणे विसरून गेले होते. आता, आपण पूर्ण केलेला गृहपाठ शिक्षिकेला दाखवता येणार नाही, मग कधी नव्हे ते आज मला या कारणाने शिक्षा होणार, वर्गातील काही चुकार मुलींना आज ही मजा पहायला मिळणार… असे विचार मनात येऊ लागले. माझ्या डोळ्यांतून गंगायमुना वाहू लागल्या. खरंतर आमच्या वर्गशिक्षिकेची मी लाडाकोडाची विद्यार्थिनी. माझा गृहपाठ त्या तपासत आणि मग त्या मला आणि वर्गातील आणखी दोन मुलींना आपापल्या रांगेतील विद्यार्थिनींनी गृहपाठ केला आहे की नाही, हे तपासायला सांगत.

मी रडू लागल्याने वर्गशिक्षिकेने फळ्यावर लिहिणे थांबवले. त्या जवळ आल्या आणि रडायला काय झालं, असं विचारू लागल्या.
“बाई, मी पळत घरी जाते आणि दहा मिनिटांत परत येते. चालेल का?” मी रडतच विचारलं.
“आत्ता, यावेळी तुला वर्ग सोडून कशासाठी घरी जायचं आहे?” त्यांनी विचारलं.
“बाई, माझ्या वह्या, पुस्तके, कंपासपेटी सगळं घेऊन येते पट्‌कन”, असे म्हणत एकीकडे माझे मुसमुसत रडणे चालूच होते!
“अगं शाळेत वह्यापुस्तकांशिवाय यायला, आज काय पिकनिक होती का आपली?” बाई आश्चर्याने विचारू लागल्या.
मी त्यांना माझे दप्तर उघडून दाखवले. ते पाहून बाई हसू लागल्या आणि मग वर्गातील इतर मुलीही मागून टाचा उंचावून, माझ्या पिशवीत कोणते विनोदी नग भरले आहेत, या विषयी कुतूहलाने पाहू लागल्या, पाहिल्यावर खुसुखुसू हसू लागल्या. दप्तरात वह्यापुस्तकांऐवजी ३-४ छोटे छोटे दगड आणि माझ्यापेक्षा लहान बहिणीची काही खेळणी होती! घरी गेल्यावर बहिणीला कसं रागवायचं, हा प्रश्नदेखील मला सतावू लागला.
बाईंनी अगोदर वर्गाला शांत केले. मग माझ्याकडे वळून म्हणाल्या,
“रडू नकोस गं. माझी खात्री आहे, तू गृहपाठ पूर्ण केला असणारच. आज तुझ्या मैत्रिणीची- नीताची- रफवही घे वर्गात लिहिण्यासाठी आणि पुस्तकं दोघी मिळून एकत्र वाचा. सकाळी उशिरा उठल्याने मैदानावर पळून आलीस, तेवढी शिक्षा आज पुरे, होय ना? सोमवारी दाखव गृहपाठ. पण असं दररोज चालणार नाही, बरं का! आणि हो, आठवड्यात एकच दिवस आपली शाळा सकाळी असते. तेव्हा यापुढे लवकर उठून, आवरून वेळेवर येत जा हं. नाहीतर पीटीच्या सरांना सांगावं लागेल, तुझ्याकडून चार फेऱ्या मारून घ्या मैदानाभोवती!”
“मुलींनो, लक्षात ठेवा, कुठेही जाताना हातात पिशवी, दप्तर, मोठी बॅग काहीही असो, उचलण्यापूर्वी नीट तपासून मगच ती वस्तू घेऊन घराबाहेर पडावं.” बाईंनी सौम्य आवाजात बजावून सांगितलं. मग आम्हां विद्यार्थिनींकडे पाठ करून त्या फळ्यावर लिहू लागल्या, अभ्यासाचा विषय समजावून सांगू लागल्या.

माध्यमिक शाळेत शिकत असताना घडलेल्या या प्रसंगातून मी कुठल्या सवयी अंगी बाणवल्या? या प्रश्नावरून मला एका जगप्रसिद्ध साहित्यिकाचे एक विधान आठवले. १७व्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक, कवी, नाटककार जॉन ड्रायडन म्हणालाय, “We first make our habits, then our habits make us.” संस्कारक्षम वयात मिळालेल्या त्या शिक्षेमुळे, माझी सकाळी जरा उशिरा उठण्याची सवय गेली का? या प्रश्नाचे उत्तर – “नाही.” अर्थात, “लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य, संपत्ती, ज्ञान लाभे”, हे सुवचन पिढ्यान्‌पिढ्या शाळकरी मुलांना ऐकवले जाते. मलाही ते पाठ होते. पण केवळ पाठांतरापलीकडे जाऊन सुवचनामागची कारणमीमांसा फारच थोडे शिक्षक स्पष्ट करतात. त्यामुळे मी शाळेत असताना अनेक म्हणी, सुभाषिते बहुधा चांगली सवय म्हणून पाठ करून घेतली जात. त्या बालवयात, ‘अर्थस्य मूढाः खरवत् वहन्ति‘ (शास्त्रांचा खरा अर्थ न जाणणारा गाढवाप्रमाणेच शास्त्रांचे निव्वळ ओझे वाहतो) अशीच काही सुवचनांबाबत माझी अवस्था होती. कालांतराने त्या सुभाषितांमागची शास्त्रीय बैठक स्वत:हून समजून घेतल्यावर काही चांगल्या सवयी बाणण्याबद्दल स्वारस्य वाटू लागले.

खरंतर ‘सवय ही दणकट गोफासारखी असते. दररोज आपण त्याचा धागा विणत राहिलो, की शेवटी ती पक्की बनते, ’असं मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांचेही सांगणे आहे. काही का असेना, लहानपणी उशीरा उठण्याच्या सवयीमुळे, शाळेत मैदानाभोवती फेऱ्या मारण्याची मिळालेली शिक्षा मात्र माझ्या सवयीची बनली, हे नक्कीच चांगले झाले. त्यामुळे आजवर मी स्वखुशीने रोज किमान दोन मैल मोकळ्या हवेत किंवा घरी ट्रेडमिलवर पळते किंवा चालते. तसंच, वर्गशिक्षिकेने माझ्या दप्तराच्या गंमतीशीर प्रसंगानंतर, मला नीट समजावून सांगितल्याने, घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या पिशवीत किंवा पर्समध्ये सर्वसाधारण आवश्यक वस्तू आहेत ना, हे तपासून पाहण्याची चांगली सवय जडली. घराबाहेर पडताना पर्स माझ्यासाठी अत्यावश्यक वस्तुभांडारच असते. मात्र काहीवेळा अत्यावश्यक सदराखाली, पर्समध्ये अनेक वस्तू भरण्याच्या सवयीमुळे ती पर्स इतकी फुगते, की अगदी अचानक ठरले तरी मी केवळ तेव्हढया पर्ससह दूर परगावचा प्रवासही करू शकेन. थोडक्यात :
काही सवयींची मी, काही सवयी माझ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *