तसा मी शांत आहे ना !
तुला माहीत आहे ना !
सुन्या वाटा पुढे जाती
धरोनी सावली हाती
मनाची गोठली काया
किती एकांत आहे ना !
उरी काहूर एकांती
ढवळली अंतरी शांती
अशी आंदोलने येता
स्थिराया वेळ द्यावा ना !
पुन्हा तो कोरडा टाहो
उदासी भेदुनी जाओ
अशी ही भाबडी आशा
तुझा विश्वास आहे ना ?
नको ना संभ्रमी राहू
मनाच्या निग्रहा पाहू
नियंत्याची असे मर्जी..
जरा समजून घेऊ ना !
कुणाला काय मागावे
कुणाला काय मी द्यावे
कुठे धागे.. कुठे दोरे
पुन्हा हा प्रश्न आहे ना !
छान, समंजस तरीही मनाचा आर्त व्यक्त करणारी कविता!