“सोप्पं तर असतं ना रे व्याटसन्या”, हे आपले परवलिचं वाक्य शेरलॉक होम्सनी मिशीतल्या मिशीत हसत म्हटलं. त्यामुळे त्यांच्या  पिवळा उंट ब्रॅंडच्या पायपातून, बकरी छाप १२०-३०० जातिची तंबाखू, तिच्या विशिष्ट अशा राखाडी रंगात जळत पडली. हा तिचा विशिष्ट असा राखाडी रंग फारच विशिष्ट असून, तो नीट काळाही नसतो, आणि नीट पांढराही नसतो. तसाच तो इतर राखाड्यांसारखा ही नसतोच. तो अतिविशिष्ट राखाडीच असतो. अर्थात, पायपातून जमिनीवर खाली पडताना, त्या राखेला, हे सगळे श्री. शेरलॉक होम्स यांना आधीच माहीत असून, त्यांनी ते त्यांच्या, ‘तीस छाप, ते तीनशे’ या गाजलेल्या पुस्तकात, केव्हाच छापलं आहे, याची नीट जाणीव असतेच. जगातल्या कुठल्याही राखेला, या पुस्तकात जसं लिहिले आहे, त्यापेक्षा, वेगळे राखवून घेता येत नाही.

जमिनीवर पूर्णपणे आडवा झोपून, हातात जाड भिंग घेउन, खालच्या कार्पेटवर, भिंगातून सूर्याचे किरण रोखून, जाळून भोके पाडणे हा त्याचा आवडता खेळ होता. आमची म्हातारी, श्रीमती हडसन, त्यामुळे रोजच वैतागून जात असे. पण काय करणार, तिला या २२१ब, बकरे आळी, पुणे ३०, या पत्त्यावर दुसरा भाडेकरूही मिळत नव्हता. आता त्याचे कारण म्हणजे जाउंबो (जागतिक उंदीर बोर्ड) यांनी प्रजनन आणि वस्तीवर्धन या कारणासाठी या जागेची निवड केली होती. पण ते वेगळे, परत कधीतरी. आजही म्हातारीची उंचटाच एका भोकात अडकून, तिच्या हातातला चहा होम्सभाउच्या अंगावर सांडला. आपल्या पांढऱ्या सदऱ्यावर पडलेला तो ७०,१७२,१७२ डाग बघून तो शांतपणे फक्त, “तीस टक्के दार्जिलिंग द्वितीय, आणि सत्तर टक्के नीलपर्वत प्रथम” असे म्हणाला. मग तो शर्ट शांतपणे काढून त्याने म्हा. हडसन हिच्या अंगावर फेकला, आणि म्हणाला, “३ ग्राम सर्फ आणि २ ग्राम पिवळा ५०० बार, यांचे तेवीस टक्के मिश्रणात, २७.३३ तास भिजवून ठेवा” मग तो आपल्या चेमिस्ट्रिच्या प्रयोगात पूर्ण गुंतून गेला. त्याला, मला, नक्की काय सोपे होते, हे सांगायचे अजून राहिले आहे हे ही आठवेना.

तसं याचं खरं नाव काही शेरलॉक होम्स नाही. माझही व्याटसन तर मुळीच नाही. मी म्हणजे भिका जगदाळे. आणि हा…… ते गुपित. याचे खरे नाव कुणालाच माहीत नाही. पण आता आम्ही एका खोलीत, पार्टनरशिपमधे भाडेकरू, तेव्हापासून हा मला कायम व्याटसन्याच म्हणतो. आमची मालकीण ही पण काही हडसन वगैरे नाही, वर ती पूर्णपणे म्हातारिही नाही झालेली. ती आपली एक साधी विधवा आहे. पतिच्या मृत्यूनंतर तिनी हे पिजी ठेवणे सुरू केले. ती आपली जमेल तेवढे आम्हा तरुणांवर इंप्रेशन पाडायचा प्रयत्न करत असे. म्हणून या उंचटाचा वगैरे. कारण ती काही उंचटाचा घालण्याइतकी तरुणही नाही. ही असली आचरट नावे याला कुठून सुचली असावीत हा एक संशोधनाचाच विषय आहे.

पण प्राणी आहे मात्र हुषार. घरात उंदीर झाले, तेव्हा फक्त त्यांच्या लेंड्या बघून याने ती उंदरीण आहे, आणि तिचे वय सहा महिने असून, तिने नुकताच २२१ब वर जाउंबो (जागतिक उंदीर बोर्ड) कडून वैधानिक ताबा मिळवला आहे असे नीट ओळखले. तसेच तिला पनीरबटरची ॲलर्जी असून ही फक्त त्यानीच जाईल असेही सांगितले. रात्री तिच्या घरासमोर आम्ही पनीरबटर ठेवले. तर सकाळपर्यंत ती बया निघून गेली होती. मी होम्सभाउला हे सांगायला गेलो, तर त्यानी ओठातल्या ओठात हसत, माझ्यासमोर, ‘उंदरांच्या मिशांची लांबी, आणि त्यांच्या ॲलर्जीज’ असा एक मोठा ठोकळा माझ्यासमोर फेकला. लेखकाचे नाव अर्थातच…… चक्क संकेत विसपुते होतं….. बरं ते जाउंदे, सांगायची गोष्ट ही नाहीच आहे.

झालं काय, की आमचा तो दिवस भलताच विशिष्ट निघाला. सकाळीच खिडकीतून बाहेर नजर टाकत होम्सभाउ खदाखदा हसायला लागले. मी दचकून त्याच्या पांढऱ्या शर्टावर चहा सांडून घेतला, आणि या वेळी मिश्रण ३२.४१ टक्के का होतं, असा विचार करायला लागणारच होतो, तेवढ्यात होम्सभाउ मला म्हणाले, “ती लाल रंगाची साडी घातलेली स्त्री दिसते का?” मी लगोलग गवाक्षापाशी जाउन रस्ता धुंडाळू लागलो. तर होम्सभाउ म्हणाले, “आता कसा आलास… ते सोड तो चॉकलेटी पॅंट घातलेला माणूस दिसतो का?”
“तो काय आपल्याकडे येतोय की काय.”
“नाही. त्याचे बूट बघ”
“तुला दिसतायत?”
“ही स्टाईल बाटानी खास काही लोकांसाठीच काढली होती. त्याला त्यांनी पुल बूट नाव दिलं होतं. पुणे लखपती बूट चे सूक्ष्मरूप. ही त्यांनी पाच वर्षांपूर्वी बंद केली. म्हणजे या माणसानी मागच्या पाच वर्षात नवे बूट नाही घेतले, पण त्याला पाच वर्षांपूर्वी हे परवडले होते. म्हणजे तो नवदरिद्री आहे. हा कशाला येईल आपल्याकडे?”

मला कधी कधी हा म्हणजे लैच, म्हणजे लैच फेकत असावा असं वाटायचं. मला त्या माणसाची पॅंटही अजून चाॅकलेटी आहे का तेसुद्धा दिसत नव्हते, यानी तर बुटाचे बंद मोजले इथून. ती लाल साडीवाली बया तर मला न दिसताच सटकली. याला काय काय न काय काय दिसतं ना!
“पण त्याचा पलिकडचा, आपल्याकडे येतोय”
“कशावरून?”
“त्याचा उजवी बाही बघ, ती डाव्या बाहीपेक्षा तंग आहे. म्हणजे हा माणूस उजव्या हातानी काही कायम उचलून नेतो. तोच त्याचा धंदा असणार. म्हणून उजवा हात डाव्यापेक्षा सुदृढ. वर तो आपल्या दारावर लावलेली, मनपाची, “उंदरांपासून सावधान” ही पाटी वाचत येतोय. म्हणजे हा उंदराच्या पिंजऱ्यांचा विक्रेता आहे नक्की. त्याला आपल्याला एक पिंजरा विकायचा असणार”
“ह्या होम्सभाउ, हा तं नक्की आपल्याकडे येत नाही” आता तो आश्चर्यानी माझ्याकडे बघत होता. “त्याच्यापलिकडे बघा, ते अस्लमभाई दिसले का? ते मगापासून तुम्हाला हात हलवून बोलावत आहेत” होम्सभाउनी डोळे बारीक करून बघितले. मग दोन मिनिटानी म्हणाला, “मला तर नाही बाबा दिसत” “जरा नीट बघ की. कराचीच्या बंदरावर आत्ताच पोचल्येत……”

त्यानी माझ्याकडे असं खाउ की गिळू बघितलं ना….. तेवढ्यात घंटी वाजली, म्हणून मी वाचलो. आमच्या हडसनताईंनी दार उघडून आम्हाला, कुणी यल्ल रेड्डी आल्येत म्हणून सांगितले. होम्सभाउंनी तिला हातानीच त्यांना पाठवून द्या म्हणून सांगितले. तर तो मगाचा चाॅकलेटी पॅंटवाला इसम आला. आमच्या दोघांकडे संशयाने बघून तो म्हणाला, “तुमच्यापैकी….” “मी, मीच..” फारच लगबगिनी होम्सभाउ म्हणाले. आणि पुढे होउन त्यांना बसायला खुर्ची दिली. त्या इसमानी मग खिशात हात घालून एक पुडी बाहेर काढली आणि ती आमच्यापुढे ढेवली. होम्सभाउंनी ती हळुवार उघडली. तर आत अत्यंत काळजीपूर्वक पॅक केलेल्या दोन बाकरवड्या होत्या. आम्ही त्या बाकरवड्यांकडे अत्यंत चकित होउन बघत होतो.

माझी आई अधून मधून मला लाडूबिडू करून पाठवते. पण ते असे मोजून दोनच नसतात. होम्सभाऊला तर कुणी असेल असं वाटत नाही, कारण त्याला कोणीच  काही पाठवत नाही. या आईनी पाठवल्या असतील तर उरलेल्या या डुकरानी खाल्ल्या की काय, मी त्याच्याकडे खाउ का गिळू बघायला लागलो.
तेवढ्यात तो म्हणाला, “यातली एक खरी आहे, आणि एक खोटी. ओळखा पाहू” हा नुसतं कोडं घालायला आमच्याकडे आला असेल हे काही मला पडेना. पण होम्सभाऊ  फारच गंभीर होउन त्या दोन वड्यांकडे पहात होते. मधेच त्यानी चॉकलेटी पॅंटिकडे बघून विचारले, “मागच्या पाच वर्षांत नक्की काय झालं? म्हणून तुमच्यावर हे दिवस आले?” तो चॉकलेटी एकदम विस्मयाने ताडकन उठला. “तुम्हाला कसं….. काय काय माहिती आहे?” दातातल्या दातात हसून होम्सभाऊ म्हणाले, “व्याटसन्या, हे त फारच सोप्पय!. पण आधी तुम्ही सांगा”

कुणी यल्ल रेड्डीनी खाली मान घालून सांगायला सुरुवात केली. पाच वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला माझी बायको गेली. माझी मुलगी आणि मी या दोघांना तो एक मोठा धसका होता तो. इतक्या तरुण वयात ती गेली, हे मला आणि माझ्या मुलिला पचवायला जड जात होते. मी हे दुःख पचवायला कामात गुंतून घेतलं, आणि मुलिनी बाकरवडीत. गेल्या पाच वर्षात माझी खूपच बरकत झाली, कारण मी सारखं कामच करत होतो. पण मुलिकडे दुर्लक्ष झालं. अर्थात तिनी स्वतःला बाकरवडीत गुंतवून घेतलं. तिच्यासाठी मी नवा बाकरवडीचा कारखाना काढला. तिला खूप आनंद झाला. पण गेल्या काही दिवसापासून या बाकरवड्यांमधे फरक पडतोय. त्यांची चव एकदम वेगवेगळी येते आहे. याचे कारण कळत नाही. माझी मुलगी वेडिपिशी होउन जाते, चव वेगळी आली की. म्हणून मी तुमच्याकडे आलोय.

होम्सभाऊ  गंभीर झाले. मग तो त्याच्याकडे गर्रकन वळून, त्याच्यावर बोट रोखून जोरात म्हणाला, “तुम्ही खोटं बोलताय” हे तो नवा पिंक पॅंथरचा चित्रपट बघितल्यानंतर शिकला होता. असं केल्यावर मोठे मोठे गुन्हेगार दचकून खरे बोलून जातात म्हणे. माझा फक्त दोनदा चहा सांडला होता. पण, कुणी यल्ल रेड्डी मात्र चांगलाच दचकला, आणि ओरडला, “हो हो, माझं माझ्या सेक्रेटरीवर प्रेम आहे, हो हो.” होम्सभाऊचा चेहरा एकदम बघण्यासारखा झाला. आंधळा मागतो एक डोळा, आणि देव दुसराच दाखवतो सिनेमा असं त्याचं झालं. “मी त्याबद्दल विचारत नाही. हे बूट तुम्ही पाच वर्षांपूर्वी विकत घेतले. त्याच्यानंतर तुम्ही नवे बूट घेतले नाही हे खरं की नाही, ते सांगा” “खोटं, खरं” तो अजूनही दचकलेलाच होता. “दोन्ही कसं असेल?” “म्हणजे बूट मी नाही घेतले. ही माझ्या बायकोची माझ्या वाढदिवसाची शेवटची भेट होती. त्याच दिवशी ती गेली. तिची आठवण म्हणून मी हेच बूट घालतो, नेहमीच. आणि नविनही नाही घेउ शकत. तिची इतकीच तर आहे आठवण.” तो जवळपास रडणार होता.

मला खरंतर खूप. हसू येत होतं. पण असं लोकांसमोर होम्सभाउची अगदीच नको नं काढायला, म्हणून मी गप्प बसलो. पण होम्सभाऊ  मात्र गंभीर झाले. “मी घालीन लक्ष या प्रकरणात”, ते म्हणाले “पण माझ्या काही अटी आहेत. आणि मी एक लाख रुपये सुरूवातिला घेईन” त्या कुणी यल्ल रेड्डिनी खिशातून एक पुडके काढून समोर टेबलावर टाकले, आणि म्हणाला, “धन्यवाद” असे म्हणताच तो आला तसा निघून गेला. त्याच्या मागे होम्सभाऊ, “अहो, अहो, यल्ल रेड्डी, ते फेके हुए… अहो, ते फेके हुए……..” पण यल्ल रेड्डी ज्या तडफेनी निघून गेले, त्यानं मलातर वाटलं, की त्यांना बायकोची आठवण अनावर झाल्यामुळे ते लगोलग आता सेक्रेटरीकडे जाणार बहुतेक. आता होम्सभाउंचा पोपट झालेला. एकतर त्याला, “फेके हुए पैसे मै उठाता नही” हा डायलॉग मारताच आला नाही. वर तो माणूस अटी न ऐकताच गेला, याचेही वैषम्य होते. शेवटी त्यानी यावर पर्याय म्हणून, “व्याटसन्या, ते पैशे उचलून कपाटात ठेव” अशी शक्कल लढवली. वर आता अटिंचे पत्र मलाच लिहून पाठवायला लागणार असे दिसत होते.

होम्सभाऊ  मग मला म्हणाले, “व्याटसन्या, माझी लोकांची डिक्शनरी काढ बर. हा रेड्ड्या कुठे रहातो ते बघू. हा काहिच न सांगता गेला. याची फॅक्टरी कुठे तेही आपल्यालाच शोधावं लागणार” मी डिक्शनरी काढून शोधाया लागलो. “होम्सभाउ यात तर नाही” मी म्हणालो. “शक्यच नाही” भाउ करवादले. “खरंच नाही. के येल रेड्डीमधे काहीच नाही आहे” “के कुठून आला?” “मग कुणी यल्ल रेड्डी, के येल रेड्डी….” भाऊ इतके का करवादले मला कळलंच नाही. माझ्या हातून खस्सकन ती डिक्शनरी हिसकावून घेतली. त्यातली चार पानं माझ्या हातातच राहिली. त्याचं त्यांना काहीच नव्हतं. मग जोराजोरात पान हिकडं तिकडं करून म्हणाले, “हं. इथे रहातो तर हा यल्ल रेड्डी. चला जरा घर बघून येउ. व्याटसन्या घाला चड्डी, आणि चला”.
आता यावरून तुमचा गैरसमज होईल. पण मी घरात काही तसाच बसत नाही. मी इतरांसारखाच असतो. पण हे घाला चड्डी म्हणजे, बाहेर जायची चड्डी घाला असं असतंय. प्रेमानी ते अद्धारुत सगळं बोलत नाहीत इतकंच. सूज्ञ वाचकांनी गैरसमज करून घेउ नये.

तरी मला कुणी यल्ल रेड्डी चा हा यल्ल रेड्डी कधी झाला कळलंच नाही. गोष्ट मीच लिहितोय बरंका, तरी. आता मला पक्की खात्री की होम्सभाऊ  चुकीच्या  माणसाच्या घरी पोचणार म्हणून. तरी मी आपला गेलोच संगं! आता मी व्याटसन्या नाय का, मला काय दुसरं काम. मी आपला माझी काठी घेउन निघालो. होम्सभाऊ  आता नुसते विचार करणार. सगळी व्यवहारी कामं आता मी करायची. मग काय मी एक रिक्षा थांबवली. मी थांबवली हे जरा अती होतंय. कारण मी हात आडवा करून गेली पंधरा मिनिटे उभा होतो. सगळे रिक्षावाले माझा आडवा हात बघत, असुरी हसत बेदरकारपणे सरळ निघून जात होते. त्यातला एक आमच्यावर दया येउन थांबला. याला रिक्षा मी थांबवली असं म्हणता येईल का? याचे होम्सभाऊंना काहीच नव्हतं, ते विचारच करत होते. रिक्षावाला वाट बघतोय. मी आपला होम्सभाऊला, “पत्ता सांगता का” यावर तत्परतेनी होम्सभाऊ  म्हणाले, “२२१ब बकरे आळी, पुणे ३०” असे म्हणून गेले. मी त्यांना सांगणारच होतो, की आपण तिथेच आहोत, आणि कुठे जायचंय याचा पत्ता सांगा, त्याच्या आतच रिक्षावाला तडफेनी, “तिथं नाही येणार” असं म्हणून, उजवा पंजा पिरगाळून चालता झाला. आता त्याला कसं सांगू की बाबा तू तिथंच होतास म्हणून. ते जाउंदे. मी परत होम्सभाऊला सगळा पत्ता नीट विचारून घेतला. आणि रिक्षा थांबवली. यावेळी त्याला सगळा पत्ता नीट सांगितला, आणि विचारलं, “काय जाशील का?” रिक्षावाला म्हणाला, “जातो की. माझी सासुरवाडी जवळच आहे” असे म्हणून तो तडफेनी उजवा पंजा पिरगाळून चालता झाला. आम्ही बाहेरच. आता काय करावं? परत ही अशीच चढाओढ चारपाच रिक्षावाल्यांबरोबर केल्यावर एक रिक्षा अशी मिळाली, की जो आम्हाला जायचे तिकडे जायला तयार होता, मीटरप्रमाणे पैसे घ्यायला तयार होता, आणि ज्यानी आम्ही बसल्याशिवाय उजवा पंजा पिरगाळला नाही. अशी देवमाणसे जरा हल्ली कमीच मिळतात नाही का?

तर अशा देवमाणसानी आम्हाला मदत केल्यामुळे आम्ही शेवटी रविवार पेठेत आलो. होम्सभाऊंनी शोधून काढलेल्या पत्त्यावर बाहेर ‘बाकरवडेकर वाडा, १५ य रविवार, १२२७ ट गणेश पेठ पुणे’ अशा पाटी होती. मला आता हा यल्ल रेड्डी कुठे शोधायचा असे झाले. रेड्डी बाकरवडेकर वाड्यात  का बरे राहील अशी शंका माझ्या मनात येत होतीच, तोवर चक्क लेखक बदलून होम्सभाऊंनी  ‘टॉक्क’ केलं. जिभेच टोक वरच्या दातांच्या मागे लावून मग सगळी शक्ती एकवटून ते जोरात सोडले की मग हा आवाज येतो. पण याचा लेखक वेगळा आहे. तरी होम्सभाऊंनी  हा आवाज कसा काय काढला ते मला कळेना. अशी परवानगी आहे का हे ही मला माहीत नव्हते. माझ्या बालमनात हा गोंधळ चालू आहे तोवर माझ्या खांद्यावर प्रेमानी हात टाकून होम्सभाऊ  म्हणाले, “व्याटसन्या, मिळाला बरंका पत्ता” आणि त्यानी दार ठोठावले.

माझा शर्ट मागून कुणीतरी खेचला. म्हणून मी मागे बघितलं तर, तो दुसरा रिक्षावाला होता, जो आम्हाला न घेताच निघून गेला होता. मी चिडून त्याला बोलणार इतक्यात तो मला म्हणाला, “काय भाऊ  हिच का इमानदारी. तुमच्यासाठी पार इतपात्तूर आलो, तर तुम्ही मधेच गायब? आणि आता दुसऱ्या रिक्षातून येताय? काय समजायचं काय मी भाऊ ?” माझा आ जो वासला गेला तो बराच काळ तसाच होता. तरी याला नीट समजावून सांगण्याइतका वेळ माझ्याकडे कुठे होता. होम्सभाऊ  तर आधिच आत निघून गेलेले. मी मुकाट्यानी त्याला भाडे काढून दिले. तोवर अजून दोघे आले. त्यांचे ही तेच म्हणणे होते. मी शक्कल लढवून त्यांना मी एकाला पैसे दिलेले आहेत आता तुम्ही ठरवा ते कुणाचे. असे उत्तर दिल्यावर, त्यांचे आ, मागे माझा वासला होता तसे वासले गेले. आणि ते आपापसात भांडू लागले. याचा फायदा घेऊन  मी ताबडतोब होम्सभाऊंच्या मागे वाड्यात जायला लागलो, तर……
होम्सभाऊ  अजून बाहेरच उभे होते. त्यांना दार कुणी उघडलंच नव्हतं. मग माझ्याकडे बघून ते म्हणाले, “व्याटसन्या, वाड्यावर दोन पत्ते दिसत आहेत. म्हणजे हा दोन पेठांमधे पसरलेला आहे. आपण मागून जाउन बघूया ” असे म्हणून ते तरातरा चालत गणेश पेठेत गेले. मी ही त्यांच्यामागे तुरूतुरू निघालो. जाताना होम्सभाऊ आजूबाजूला फारच बारीक लक्ष ठेवून होते. आमचा अनुभव असा होता, की जो पत्ता दिलेला असतो, तो नुसता गंडवायला असतो, आणि खरी गंमत आजूबाजूलाच असते. एखादी बँक तरी लुटायची असते, किंवा एखादे जवाहिऱ्याचे तरी दुकान असते. पण इथे तसे काहीच नव्हते. तरी आम्ही चाणाक्षपणे बघत होतोच. मागचा दरवाजा, भला मोठा होता. त्याच्यातच एक छोटा दिंडी दरवाजा पण होता. तो उघडाच होता. होम्सभाऊ  त्या दरवाज्यापाशी ताडकन थांबले. सर्रकन खाली झोपले, आणि डोळा बारीक  करून त्याचे भिंग करत काही तपासू लागले. तोंडाने ते, “च्या…… हंम्म्म्म….. चक्क” वगैरे आवाज काढत होते. हळूच मग त्यांनी जमिन चाटून बघितली. तर त्यांची जीभ तिथे चिकटून बसली. त्यानंतर मात्र ते, “यालवव.. बबब… यायव” वगैरे असे आवाज काढू लागले. या आवाजांवरून मला, त्यांना  तसेच बसायचे आहे, का मी त्यांना  तिथून सोडवायचे आहे हे नीट कळेना. मी त्यांच्या  तोंडाजवळ कान नेउन नीट ऐकू लागलो. तरी मगाचपेक्षा काही वेगळे ऐकू येईना. तेवढ्यात एका माणसानी माझ्या खांद्यावर टकटक केले, आणि माझ्या हातात एक बबलगम देउन म्हणाला, “त्यांना म्हणावं ते कुणितरी थुंकलेलं द्या सोडून, मी हे नवीन देतो ते खा” असं म्हणून निघून गेला. मग मात्र मी होम्सभाऊंना  जिवाच्या आकांतानी डोक्याला धरून वर ओढलं, तेव्हाकुठे त्यांची जीभ सुटली. मात्र सुटल्या सुटल्या पहिले काही ते मला म्हणाले असतील तर, “व्याटसन्या, आपलं कोड सुटलं” आणि ते त्या दिंडीदरवाजातून वाकून आत तरातरा निघून गेले. मला मात्र बाहेरच थोडावेळ थांबावे लागले. रस्त्यावर कुणीतरी  थुंकलेले बबलगम चाटताना हे कोडे कसे सुटले याचे मी निरिक्षण करत होतो. मला मात्र हे कोडे अजून सुटलेले नाही.

मग मात्र मी ही त्या दरवाजातून आत गेलो. तर तिथे होम्सभाऊ कुणा कामगाराशी बोलत होते. मी ही त्यांच्याजवळ गेलो. मी पोचताच होम्सभाऊ  म्हणाले, “चला व्याटसन भाऊ ” आणि माझा हात धरून तरातरा निघाले. मला ही खरेतर त्या कामगाराशी बोलायचे होते, ते राहूनच गेले. इथे बबलगम कोण खातो हे मला त्याला विचारायचे होते. सगळे कोडे तिथेच सुटेल असे मला वाटत होते. पण होम्सभाऊ  मात्र मला तरातरा ओढत कुठेतरी घेउन जात होते. त्यांनी मला त्या वाड्याच्या अंगणात नेले. तिथे उभे राहून थोडा वास घेतला. यांचे  नाक मात्र कुत्र्याच्या वर्ताण होते. त्यांचे ‘वास घेण्याची शक्ती कशी वाढवावी’ हे पुस्तक २२१-ब, बकरे आळीत  जगप्रसिद्ध होते. मग त्यानी वास घेत मान गोल फिरवली, आणि उजवीकडे निघाले. मी त्यांच्या मागेमागे. उजवीकडच्या दारातून आत जाताच मात्र मला बाकरवडीचा एकदम भपकारा आला, आणि माझ्या पोटात एक विचित्र कालवाकालव झाली. मी काही होम्सभाऊंसारखा या सगळ्या प्रकाराकडे तटस्थपणे बघू शकत नव्हतो. मला माझ्या आवडी निवडी होत्याच की. समोर इतके भरलेले बाकरवडीचे ताट असताना…. आयला हे काय भलतंच. होम्सभाऊंनी  चक्क त्या ताटात हात घालून एक बाकरवडी उचलली, आणि तोंंडात टाकली. असं कसं झालं. हा तर तटस्थ माणूस. स्थितप्रज्ञ. मग हे काय. हे तर वेडच ना? मग मी ही निश्चिंतपणे एक…… मूठभर बाकरवड्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या. याला म्हणतात काम. हे असलं काम घेतले तर मी कुठेही जायला तयार आहे. झकास, मी पुढच्या ताटातल्याही मूठभर बाकरवड्या घेतल्या आणि खिशात टाकल्या. दुसरी मूठ भरून होम्सभाऊंच्या खिशात टाकल्या. त्यांनी परत पुढच्या ताटातूनही एकच वडी घेउन खाल्ली. हा काही कामाचा भाग होता असं मला अजून वाटत नाहिये. पण तरी मला आवडत होतं हे. मी अटी पाठवायच्या होत्या हा यल्ल् रेड्डीला, त्याच्या ‘बाकरवडी वाट्टेल तेवढ्या खायला मिळाव्यात’ ही अट टाकून द्यायचे ठरवले.

इकडे होम्सभाऊ प्रत्येक ताटात हात घालून खातच होते. मला याचे फारच वैषम्य वाटत होते. सगळी ताटे संपल्यावर मी बघितले तर त्याच्या चेहऱ्यावर फारच काळजी दिसत होती. मी त्यांच्याच  खिशातली एक बाकरवडी काढून त्यांना  दिली. ती त्यांनी  सहज प्रतिक्षिप्त क्रियेनी तोंडात टाकली. तरी चिंता होतीच. मला काय करावे ते कळेना. एकदम होम्सभाऊ  मला म्हणाले, “चल व्याटसन्या, फाँड ऑफ बाकरवडीला भेटूया. मग आम्ही हा गणेशपेठेकडचा कारखान्याचा भाग ओलांडून रविवार पेठेच्या घराच्या भागाकडे आलो. घराकडे जायच्या बोळातच आम्हाला एक बैल भेटला. पण त्याने कुत्र्यासारखे आमच्यावर भुंकून विचारले, “कोण हवंय?”. मग आमची ओळख पटल्यावर मात्र त्यानी आदरानी आत नेऊन  आम्हाला, कुमारी फाँड ऑफ बाकरवडी हिच्याकडे पोचवले. हा यल्ल रेड्डी आम्हाला तिथेच सापडला. आम्हाला बघून तो एकदम खूष झाला. त्याने आमचे यथार्थ स्वागत केले. आणि आम्ही देवदर्शन झाल्यासारखे जागीच थांबलो.

फाँड ऑफ बाकरवडी, समोरच्या खाटेवर बसली होती. अजस्त्र, या एकाच विशेषणानी तिची ओळख करुन देता येणे शक्य आहे. तिने  तो दुपटीतला  पलंग जवळ जवळ सगळा व्यापला होता. आणि तिच्या समोर, कारखान्यातून आत्ताच आणलेली बाकरवडीची   थाळी  होती . आमच्यासमोरच एकजण रिकामी थाळी  घेऊन  परत गेला. मला त्या थाळांमधल्या लुशलुशीत बाकरवड्या बघून परत तोंडाला पाणी  सुटले. पण तेवढ्याच होम्सभाऊंनी  मला कोपरखळी मारली. या बयेच्या खोलीत  कारखान्यात येत होता तसाच वास येत होता. होम्सभाऊ  तिच्या शेजारी जाऊन  बसले आणि त्यांनी अत्यंत नाजूक आवाजात तिला विचारले, “बाळ, तुला कुठल्या बाकरवड्या आवडतात, आणि कुठल्या नाहीत, ते जरा सांगशील का?” तिनी आपल्या वडिलांकडे  बघितले. त्यांनी मान हलवल्यावर मग तिनी हातातली बाकरवडी होम्सभाऊला  दिली आणि म्हणाली, “ही आवडते” नंतर थाळातून अजून एक काढून ती होम्सभाऊंना देउन म्हणाली, “ही नाही आवडत”. तिचा आवाज तिच्या आकाराला अजिबात न शोभणारा होता. अगदी नाजूक. हा यल्ल रेड्डी चमकून आम्हाला म्हणाला, “पण याचे सँपल तर मी तुमच्याकडे पोचवलंय!” होम्सभाऊंनी नुसतीच मान हलवली. त्यांची शोधक नजर सगळीकडे फिरत होती, आणि गिधाडाच्या नजरेनी ते सगळे टिपत होते. त्यांच्या नजरेतून पलंगाचे पाय खालच्या गालिच्यात पार रुतले आहेत हे निसटलेले नसणारच होते. त्यावरुन कळतच होते की ही बया पलंगावरून फार काळ बाजूला जात नसणार. तिच्या पलंगाच्या अगदी समोर तिच्या आईचे छायाचित्र लटकवलेले होते. एकेकाळी ही आपल्या आईसारखी सुंदर असावी, असा विचार माझ्या मनाला शिवून गेला. पण मी परत तिच्याकडे बघितल्यावर, मला काही तसे वाटेना. पलंगाच्या उजव्या बाजूकडे त्या गालिच्यात बुटाचे छाप होते. म्हणजे हा यल्ल रेड्डी आल्यावर बरोबर एकाच जागी उभा रहात असावा. यावरुन तो किती नियमपाळ होता ते कळत होते. होम्सभाऊबरोबर राहूनही मला काहीच कळत नव्हते असे नाही. पण तेवढ्यात होम्सभाऊ  तिथून निघाले. आणि त्वरेनी घरी निघाले. यावेळी त्यांनी रिक्षा वगैरे कसलेच भान नव्हते. तरातरा चालत ते घरी आले. घरी पोचताच मला म्हणाले, “व्याटसन्या, झोपून घ्या. रात्री खूप काम आहे.” असं म्हणून त्यांनी गादीवर अंग टाकले, आणि झकास ताणून दिली.

मी बराच वेळ जे झाले त्याचा विचार करत होतो. मला ही बया काहीच न करता नुसत्याच बाकरवड्या खात बसते, याचा खूपच त्रास होत होता. आणि हे नक्की कळत नव्हते की तिचा राग, मला हे करता येत नाहीये म्हणून होता, का अजून कुठल्या कारणामुळे होता. मी त्याच चिंतनात झोपी गेलो आणि अचानक मला कोणीतरी  लाथ मारली तेव्हा अचानक जाग आली. मी चिडूनच उठलो, तर समोर होम्सभाऊ  होते. “चल, व्याटसन्या, कामाला निघायचंय.” मला उठलो की लगेचच जरा जावं लागतं. तशी मी होम्सभाऊंना  विनंती केली. तर त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले, मला म्हणाले, “व्याटसन्या ते विसरा, नाहीतर पाखरू हातातून निसटून जाईल.” म्हणून त्यांनी मला जवळ जवळ ओढतच बाहेर काढले. मला तरी अस्वस्थ वाटतंच होते. कधी प्रेशर येईल, आणि कधी पंचाईत होईल याची काहीच खात्री नव्हती.

आम्ही रात्री सकाळसारखी खळखळ न होता जागेवर पोचलो. रिक्षावाला खळखळ न करता येऊ शकतात हे दिसल्यामुळे मला गहिवरून आले. मी पोचेपर्यंत अर्धा गहिवरलेला, आणि अर्धा प्रेशरच्या काळजीत होतो. मला तसा तो प्रवास त्रासदायकच झाला. प्रत्येत खड्डा माझ्या पोटातले सामान इकडे तिकडे हलवत होते. आणि मग मी गच्च आवळून बसत होतो. दुपारी खाल्लेल्या बाकरवड्या आता बाकरवड्या न रहाता, सगळ्यांचे मलात रुपांतर झाले होते आणि त्याच क्षणी मला साक्षात्कार झाला. किती खातो काय खातो याचा काय संबंध. शेवटी सगळे मलरुप होऊन मातीचे धन होणार आणि हा साक्षात्कार होताच माझा हात खिशात गेला. तिथे बाकरवड्या उरल्या होत्याच. त्यातली फक्त प्रतिक्षिप्त क्रियेनी मी एक उचलली आणि तोंडात टाकली. यात  आता मगाचा  माझा लासवटी लोभ नव्हता, तर फक्त एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. मी अत्यंत निर्गुण निराकार निर्मोही होत त्या बाकरवड्या खात होतो.

आम्ही गणेश पेठेतल्या कारखान्यात पोचलो. हा कारखाना रात्रीही  चालू  होता. ही बातमी होम्सभाऊंनी  मला दुपारिच दिली होती. कुमारी रेड्डी खाते त्या बाकरवड्या सकाळच्या फेरीत  तयार होतात. पण मग रेड्डीला त्या विकायच्याही होत्या. सगळ्यात धंदा बघणारा माणूस तो, इतर पाळ्यात तो जादा बाकरवड्या तयार करून विकायचा. वर होम्सभाऊंनी  मला हे ही सांगितले की या बाकरवड्या सगळ्या मिठाई तयार करणाऱ्यांकडे जातात, आणि मग ते फक्त आपला शिक्का वर मारून त्या विकतात. हे मला जरा फारच वाटले. कारण सगळ्या मिठाईवाल्यांची बाकरवड्यांची चव तर वेगळी असते ना. मग असे कसे होईल?  पण होम्सभाऊंच्या  विरोधात उगाच कशाला जायचे, म्हणून मी गप्प बसलो.

तर, त्या रात्री आम्ही कारखान्यामसोरच्या खोलीत , अंधारात काही होण्याची वाट बघत होतो. नक्की काय होणार आहे हे मला माहीत नसल्यामुळे मी पूर्ण निर्विकार मनानी अधून मधून खिशात हात घालून एखादी बाकरवडी तोंडात टाकत होतो. नुसते वाट पहाणे हे रिक्षा प्रवासासारखे नसल्यामुळे माझे पोट जरा शांत होते. या अशा परिस्थितीत बाकरवड्या खाऊ  नयेत असे मी मला पटवत होतो. मग माझा हात जरा जास्त वेळानी खिशात जायचा. मग तोंडात बाकरवडी गेली रे गेली की मला पश्चात्ताप व्हायचा, आणि मी परत मला नीट पटवायचो की हे किती वाईट ते म्हणून. मग परत बराच वेळ हात खिशात जायचा नाही. माझ्या खिशातल्या संपल्यावर, मला आठवले की मी होम्सभाऊंच्या खिशातही बाकरवड्या टाकल्या होत्या म्हणून. त्या वाया जायला नकोत म्हणून केवळ मी त्यांच्या  खिशात हात घालून बाकरवडी उचलली आणि अत्यंत निर्विकारपणे तोंडात टाकली.

तेवढ्यात माझा हात खेचून होम्सभाऊ  म्हणाले, “चला व्याटसन्या. वेळ झाली” मी बघितले तर कारखान्यातून तीन कामगार बाहेर पडले होते. आणि ते बाहेर निघाले. आम्ही त्यांच्या मागे चालायला लागलो. त्यांचा पाठलाग करायला लागलो. त्यांच्यातले एक एक, एका एका गल्लीत  जायला लागले. शेवटी एकजण उरला. त्याच्यामागे आम्ही जायला लागलो. तो ही मग एका गल्लीत घुसला. आम्ही त्याच्यामागे गेलो. तो मग एका वाड्यात घुसला. आत जाऊन त्याने दार लावून घेतले. आता काय करायचे मला कळेना. पण होम्सभाऊ  पुढे गेले. त्यांनी दिंडी दरवाजा थोडा ढकलला, तेव्हा हात आत जाईल इतकी जागा झाली. त्यातून आत हात घालून त्यांनी कडी काढली, आणि दार उघडले. पुण्याची ही गुप्त पद्धत होम्सभाऊंना माहीत होती तर. आम्ही त्या दारातून आत घुसलो. तो माणूस एका घराचे दार उघडून आत जात होता, तेव्हाच त्यानी आम्हाला पाहिले. माझ्या पोटात एकदम खड्डा पडला, आणि माझ्या प्रेशरनी शेवटची शिट्टी वाजवली. होम्सभाऊंनी  पुढे होऊन  त्याला विचारले, “सावंत, तुम्हीच का?” आणि त्याच वेळी मी हाताची दोन बोटे वर करून विचारले, “याची काही सोय आहे का?” त्यानी होम्सभाऊला हो अशी मान हलवत उत्तर दिले, आणि त्याच्या घरापासून मागे जाणाऱ्या बोळाकडे बोट दाखवून मला उत्तर दिले. मी कुणाशी न बोलता तसाच त्या बोळातून पळत सुटलो. मागे तीन संडास एका रांगेत होते. तिघांची दारे विचित्र पद्धतिनी कुजली होती. खालून. बसलेल्या माणसांचे नको ते भाग नीट दिसावेत अशी सोय होती जणू. पण आत्ता रात्र होती. मी निश्चिंत होउन बसलो. अंधारात अनोळखी ठिकाणी असे काही करणे हे किती अवघड  असते याची कल्पना तुम्हाला येणार नाही. वर मी काही विचार न करता बसलो होतो. आता इथे टमरेल आहे का ते मी चाचपडून बघायला लागलो. तसेच नळाला पाणी असेल का अशी एक शंका मला येऊन  गेली. पण मला मागच्या बाजूला टमरेल, आणि पाण्यानी अर्धी भरलेली बादली मिळाली. तेव्हा मग काळजी गेली. मी मग निर्धास्त झालो.

बाहेर येतो तर होम्सभाऊ त्या सावंत का कोण त्याचा निरोप घेत होते. त्यांनी  माझ्याकडे बघून, दोन्ही हात उचलून, काय व्यवस्तित का? असे खुणेनीच विचारले. मी ही त्यांना त्याच पद्धतीन होय सगळे व्यवस्थित असे उत्तर दिले. त्यांनी  मला, “बादलीत  उंदीर नव्हता ना मेलेला? कधी कधी असतो, म्हणून विचारले” असा एक अस्वस्थ प्रश्न विचारला. माझी स्वस्थता समूळ नष्ट करून गेला हा प्रश्न. आता मला दिवसभर हे छळत राहिल. उंदिर मेलेल्या बादलीत हात ……… छी…

होम्सभाऊंच्या  चेहऱ्यावर मात्र पूर्ण काळजी होती. त्याच काळजीत ते तरातरा चालत परत कारखान्यात आले आणि स्वतःकडची कुलुप उघडायची साधने वापरून त्यांनी ह्या  यल्ल् रेड्डीची केबिन उघडली. मग दिवा न लावता आम्ही त्या केबिन मधे उभे राहून कारखान्याचे काम बघायला लागलो. हळूहळू होम्सभाऊंना  काही कळायला लागले असे मला वाटायला लागले. मग त्यांनी खिशातले भिंग काढून त्या कारखान्याकडे बघितले. भिंगाचा काहीच  उपयोग होणार नाही, हे त्यांना थोड्यावेळातच कळले. मग त्यांनी  यल्ल रेड्डीच्या टेबलावरून दुर्बिण उचलली, आणि त्या दुर्बिणीतून निरीक्षण करायला सुरुवात केली. जसे जसे ते  बघत गेले  तसे तसे त्यांचे  समाधान झाल्यासारखे वाटायला लागले.

अचानक त्यांनी  ती दुर्बिण परत टेबलावर फेकून दिली आणि, “चला व्याटसन्या, झाले काम” असे म्हणून निघाले. जाताना कारखान्यात जाऊन  काही विशिष्टच ताटांमधल्या बाकरवड्या त्यांनी  खाऊन  बघितल्या, आणि खुशीनी  मान डोलावत घरी निघाले . मी परत सगळे खिसे बाकरवड्यांनी भरून घेतले.

घरी आल्यावर आमच्या वाड्यातल्या एकुलत्या एका संडासात, आपला पाईप घेऊन जाताना मला होम्सभाऊ  म्हणाले, “व्याटसन्या, उद्या सगळ्यांना कारखान्यावर बोलव. आपण प्रकरणाची गुत्थी तिथेच उलगडू,” असे म्हणून ते समाधिस्त झाले. अर्थातच ही सगळी जमवाजमवी करायचे काम आता माझे.

दुसऱ्या दिवशी सगळेजण कारखान्यात जमले होते. आम्हाला बोळात भेटलेला, आणि त्याच्यासारखेच अजून तीन पैलवान, या चौघांनी कुमारी रेड्डीचा पलंग उचलून कारखान्यात आणला होता. तो मधे ठेवून, त्याच्या बाजूला सगळे जमले. सगळ्यांकडे  समाधानाने नजर टाकत होम्सभाऊंनी  खिशातून रेड्डीनी दिलेल्या दोन बाकरवड्या काढल्या, आणि म्हणाले, “या दोन बाकरवड्यांचे गुपित आता मी तुमच्यासमोर उघड करतो. पण त्या आधी सावंतला काही सांगायचे आहे.” सावंत एकदम रडायला लागला. मग त्यानी आधी हा यल्ल् रेड्डीचे पाय धरले, मग कुमारी रेड्डीचे पाय पकडले, आणि हजारवेळा, “मला माफ करा, मला माफ करा” असे म्हणत राहिला. मग रेड्डीनी  त्याला अभय दिल्यावर तो बोलता झाला, त्याचवेळी होम्सभाऊंनी  पाईप पेटवला, आणि मी हात खिशात घालून एक बाकरवडी तोंडात टाकली. आमच्या दुर्दैवानी यावेळी सगळ्यांची नजर आमच्याकडे होती. रेड्डी मनातल्या मनात हसला, आणि कुमारी माझ्याकडे खाऊ  की गिळू अशी बघायला लागली. हिला बहुतेक बाकरवडीवर वाढवलेली कोंबडी चालत असावी न्याहारीला, असे तिच्या त्या नजरेकडे बघून मला वाटून गेले.

सावंतनी आपले बोलणे सुरु केले म्हणून मी वाचलो. त्याची गोष्ट अशी. बाकरवडी कारखान्यात नोकरीला लागल्यावर सावंत तसा खूष होता. बरा पगार, घराजवळ काम, आणि सगळा कारखाना स्वयंचलित असल्यामुळे तसे फार काम नसायचे. यामुळे त्याचे तसे बरे चालले होते. त्याच्यात एकदा त्याच्या बायकोला हा कारखाना बघायची इच्छा झाली, म्हणून तिने हा स्त्रीहट्ट चालू केला. शेवटी मुकादमाची परवानगी काढून सावंत औपचारिक पद्धतिनी बायकोला कारखान्यात घेऊन  आला. तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. ती इतक्या सगळ्या बाकरवड्या बघून हरखून गेली. मुकादमाच्या परवारगीने तिनी एक बाकरवडी उचलून खाल्ली आणि तिचा चेहरा एकदम बदलला. काहीतरी  एक उर्मी तिच्या मनात होती. घरी गेल्यावर तिने नवऱ्यामागे एक भुणभुण लावली.

“इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे.” होम्सभाऊ  मधेच म्हणाले. “कारखान्यात तयार झालेली बाकरवडी, नुकतीच तळलेली असल्यामुळे जर गरम खाल्ली तर ती कडक झालेली नसते. ती त्यामुळे लुसलुशीत आणि मऊ लागते. तिला वाळायला थोडा वेळ दिला की मग ती कडक होऊन तिला बाकरवडीचा  नेहमिचा स्वाद, आणि ती कुरकुरीत चव येते. माझ्या तीक्ष्ण निरिक्षण…….”
“हो हे आम्हाला माहित आहे. म्हणूनच माझी नोकरांना सक्त ताकीद असते, की त्या नीट कुरकुरीत झाल्या की मगच माझ्याकडे आणा..” कुमारी मधेच बोलली. तिला असे मधे बोललेले होम्सभाऊंना  आवडत नाही हे माहीत नव्हते. हे सांगणे माझे काम होते. ते करायला मला वेळच झालेला नव्हता. म्हणून मग होम्सभाऊंची  ती रागीट नजर मला सहन करायला लागली. आम्हाला अटी सांगायला वेळच झाला नव्हता, हे होम्सभाऊ  सोयीस्कररीत्या  विसरले. पण त्यांनी मग सावंतला पुढे सांगण्याची खूण केली.

सावंतच्या बायकोला, ती लुशलुशीत बाकरवडी फारच आवडली होती. तिची आता सावंतकडे भुणभुण सुरु होती, की तिला तशीच लुशलुशीत बाकरवडी रोज हवी आहे. सावंतला आता प्रश्न पडला. रोज बाकरवडी घरी न्यायला कुणी नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. पण ती घरी नेईपर्यंत थंड होउन कुरकुरीत होउन जाणार, आणि मग तिचा लुशलुशीतपणा संपणार. हे कसे जमवावे हे त्याला कळेना. मग त्यानी परत हा यल्ल रेड्डीकडे बघून त्याची क्षमा मागत म्हणाला, “मालक, मी इथेच चुकलो, आणि तुम्हाला आणि बेबीला त्रास होईल असे वागलो, याची क्षमा मागतो…” समोरच्या अगडबंब आडव्या तिडव्या आकाराला बेबी म्हणायचे धारिष्ट्य याच्याकडे कुठून आले कुणास ठाउक. मी चमकून सगळ्यांचे चेहेरे न्याहाळले. कुणाच्याच चेहऱ्यावर काही वेगळे दिसत नव्हते. मग मला कळले की या प्रचंड देहाचे लाडाचे नाव बेबी हे होते.

मग मालकांना न विचारता सावंतनी काही प्रयोग चालू केले. त्यामुळे थंड झालेल्या बाकरवडीची  चव बदलायला लागली. ती एकदम सगळ्या लॉटची बदलू नये, म्हणून मग सावंत एकेका लॉटवर प्रयोग करत होता. यंत्रामधे बाकरवडी तळायची वेळ, आणि तापमान हे कायम केलेले होते. याचा फायदा घेऊन  त्यानी बाकरवडीची बाहेरची पारी, थोडी बारीक करायचा एक प्रोग्राम यंत्रात सेट केला. त्यानुसार वेगवेगळ्या जाडीची  पारी करून त्यानी प्रयोग केले. मग त्याच्या लक्षात आले की एका ठराविक जाडीची  पारी केली, की बाकरवडी थंड आणि कुरकुरीत झाल्यावरही थोडी मऊ  रहाते. मग त्यानी ती बाकरवडी बायकोला दिली. तिला ती प्रचंड आवडली. तेव्हापासून, कुणाला न सांगता तो एक लॉट या सेटिंगवर काढून घ्यायचा, आणि परत मूळ सेटिंग लावायचा. हे तो कुणाला कळणार नाही अशा पद्धतिने करायचा. प्रोग्राम तोच करत असल्यामुळे हे कुणाच्या लक्षात आले नाही. पण बेबीला मात्र हे लगेच कळले. तिला मऊ  बाकरवडी अजिबात आवडली नाही. त्यामुळे हे प्रकरण रेड्डीसाहेबांपर्यंत पोचले. ते त्यांच्यापर्यंत पोचल्यावर सावंतला भिती वाटली, आणि त्यानी बायकोला समज द्यायचा प्रयत्न केला. पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे त्याला नाईलाजानी हे काम सुरु ठेवायला लागले.

रागानी लाल झालेल्या बेबीच्या सांगण्यावरून सावंतला काढून टाकण्यात आले आणि तिथे प्रकरण संपले. आम्ही समाधानानी घरी परत आलो. पण मला त्या सावंतला काढून टाकले याचे फारच वाईट वाटत होते. त्याची ती मऊ  बाकरवडी मलाही आवडली होती. या प्रकरणाचे गोष्ट लिहिताना, मी होम्सभाऊला ही गोष्ट सांगितली. तर त्यांनी  हसत मला एक पत्र वाचायला दिले. ते पत्र सावंतकडून आले होते. हा यल्ल रेड्डीनी ब्रांडनेम बदलून मऊ  बाकरवडीचा  नवा कारखाना काढला होता, आणि त्याचा मुख्यपदी सावंतची नेमणूक केली होती. हे वाचून मात्र मला बरे वाटले आणि होम्सभाऊंनी  अजून एक प्रकरण यशस्वीरीत्या  संपवले. पण हे कसे, हे मला अजून नीटसे कळलेले नाही. होम्सभाऊ  माझ्याकडे बघत, पाईप ओढत दातातल्या दातात हसत होते. मग मात्र त्यांनी सांगायला सुरुवात केली.

मूळ बाकरवड्यांमधे दोन चवी होत्या. एक कुरकुरीत आणि एक मऊ. कुमारीच्या  खोलीत सगळ्या टाकलेल्या बाकरवड्या या मऊ  होत्या. म्हणजे मूळ रेसिपी ही कुरकुरीत असून, तिला नंतर मऊ  केलेले असावे हे ही मला लगेच कळले. गणेश पेठेत पोचलो तेव्हा मला डांबर उकरल्यासारखे दिसले. हे कुठल्यातरी उंचटाची बाईचे काम असावे असे मला तेव्हाच वाटले. त्यातच मला काहितरी पडलेले दिसले. ते बबलगम असावे असे मला वाटले. पण नुसते बघून कळेना. म्हणून जरा चाखून बघितले. तर ते बबलगमच होते. कारखान्यातला कुठलाच कामगार बबलगम खात नव्हता. म्हणजे हे कुठल्यातरी बाईचे काम असणार हे नक्की. ही बाई म्हणजे कामगाराची बहिण किंवा बायको असायची शक्यता जास्त. मला तेव्हाच कोणीतरी , ज्याला रेसिपीवर कंट्रोल आहे, तो जबाबदार असेल असे वाटत होते. पण तसे दोघे तिघे होते. त्यामुळे सगळ्यांवर नजर ठेवणे गरजेचे होते. आपले नशीब म्हणून आपल्याला पहिलाच माणूस फळला. तू कर्तव्य करायला गेला होतास, तेव्हा मला सावंतनी सगळे सांगितले. माझा कयास खरा ठरला. त्याच्या बायकोनेही सगळे खरे सांगितले. माझे कार्यकारण सांगितल्यावर त्याला रेड्डिला सगळे पटेल हे कळले, आणि तो खरे सांगायला तयार झाला. त्यामुळे काम सोपे झाले. नाहीतर तसे माझ्याकडे काहीच  नव्हते.

असे म्हणून ते  परत पाईपात मग्न झाले  आणि मी हळूच  त्यांच्या खिशातून, मऊ बाकरवडी………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *