हरिहर महादेव मेहेंदळे! देवळातल्या पुजाऱ्याचं नाव वाटतंय ना? पण तसं नाहीये. एक शास्त्रज्ञ असण्याची ग्वाही देणारी पीएच. डी., शिवाय आणखी काही सर्टिफिकेशन्सची ‘अबकडइफ’ अक्षरांची रांग या नावापुढे झळकत्येय. लौकिकार्थाने आम्ही त्यांना ओळखतो ‘आमचे सर’ म्हणून. त्यांच्या बेटर हाफ सौ. रेखा हरिहर मेहेंदळे म्हणजे आमच्या रेखाताई! हे दोघे म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’! रेखाताई आहेत व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आणि आमचे सर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणजेच रसायनांचे माणसाच्या शरीरावर होणारे विघातक परिणाम अभ्यासणारे संशोधक. केवळ महद्भाग्याने मला, माझ्या नवऱ्याला आणि आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मेंटॉर किंवा गाईड म्हणून लाभलेले आमचे गुरू! खरं तर उणापुरा पाच वर्षांचा सहवास आमचा; पण सर… आणि ते एकटे जणू काही कमी होते म्हणून, रेखाताई हे आम्हांला सतत आमच्या अवतीभवती दिसत असतात. म्हणजे फेसटाइम वर कधी कधी दिसतातच; पण सिनेमात कसं आपलं मनच बाहेर येऊन आपल्याशी बोलतं, तसे हे दोघं सतत आम्हांला नीट वागायला भाग पाडत असतात. सर खरं तर आमचे शैक्षणिक गुरू! पण रेखाताई आणि सरांना आम्ही आमचं अमेरिकेतलं पालकत्वही बहाल केलं आणि त्यांनीही ते आनंदाने स्वीकारलं !

सरांनी आम्हांला काय नाही शिकवलं? आता पीएच.डी.चे गाईड म्हणून मूलभूत संशोधन कसं करायचं, उंदरांमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया कशा करायच्या, संशोधन निबंध म्हणजे रिसर्च पेपर कसा लिहायचा, ग्रॅण्ट कशी लिहायची, लोकांसमोर आपलं संशोधन उत्तम रीतीने प्रस्तुत कसं करायचं, अगदी झालंच तर स्लाईड्स वरती मजकूर कसा जाड टाईपचाच असला पाहिजे (गटण्यांच्या दुकानातल्या ‘साइन बोर्डा’सारखा!) जेणेकरून शेवटच्या रांगेत बसलेल्यालाही दिसू शकेल, याचा अट्टाहास कसा धरायचा, श्रोत्यांच्या प्रश्नांना मुद्देसूद आणि समाधानकारक उत्तरं कशी द्यायची आणि वेळ प्रसंगी त्यांचा मान ठेवून त्यांचा प्रश्न खरं तर कसा बालिश आहे हे आपल्या उत्तरातून कसं दाखवून द्यायचं, हे सगळं शिकवलं. सरांना कुठलीही गोष्ट तपासायला दिली की दोनच दिवसांत संपूर्ण लाल खुणांनी भरलेले कागद परत मिळायचे. गमतीने आम्ही म्हणायचो, सरांना फोनची डिरेक्टरी जरी दिली तरी त्यातही ते चुका काढून सुधारून देतील! अभ्यासाव्यतिरिक्तही असंख्य गोष्टी त्यांनी आम्हांला जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे हातचं काहीही राखून न ठेवता, कधीतरीच नकळत आणि बहुतेक वेळी ठरवूनच शिकवल्या. कलिंगड विशिष्ट पद्धतीने कसं कापायचं, जेणेकरून प्रत्येक फोडीत समान प्रमाणात गोड आणि कमी गोड भाग असेल, लॅपटॉपची बॅग योग्य तऱ्हेने कशी धरायची म्हणजे त्याचे लांब पट्टे जमिनीला घासून झिजणार नाहीत, बॉक्स पॅक करताना कुठे कुठे टेप लावायची म्हणजे तो फाटणार नाही, पत्राच्या पाकिटावरचा पत्त्याचा स्टिकरसुद्धा वेडावाकडा लावायचा नाही, अशा वाट्टेल त्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. थोडक्यात काय तर एकंदरीतच कुठल्याही बाबतीत ‘चलता है!’ हा शब्द नसलेलीच डिक्शनरी वापरायची, घरगुती कामांमध्येही कसा तितकाच रस घ्यायचा, सोशल गॅदरिंग्समध्येही भाग घ्यायचा, इथपासून ते अमेरिकेत राहिलो; तरी आपली आणि आपल्या मुलांची भारताशी नाळ कशी जोडून ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हताश व्हायचं नाही; तर आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायचं हे सगळं काही शिकवलं… कारणमीमांसेसहित आणि प्रसंगी फार मोठ्ठी किंमत देऊन, प्रात्यक्षिक दाखवून!

तसं बघायला गेलं तर आमचे सर हे विशेष विक्षिप्तपणाबद्दल जेनेटिक अनॅलिसिस करण्यायोग्य आहेत! मेहेंदळे आडनावाप्रमाणेच भेदक घारे डोळे! रोखून पाहिलं तर समोरच्याचं पाणी पाणी करणारे! विलक्षण चाणाक्ष बुद्धिमत्ता, शिस्त आणि त्यावर ‘चार चाँद’ म्हणून अतुलनीय असा उत्स्फूर्त कुत्सितपणा आणि विनोदबुद्धी!

“सर, मला आइस्क्रीम नाही आवडत,”असं म्हटल्यावर तात्काळ “ओह! रिअली? व्हॉट एल्स इज रॉंग विथ यू?” असं म्हणून खो खो हसतील आणि तुम्हांला हसवतील! रिसर्च पेपर वगैरे द्यायला उशीर झाला की म्हणतील, “यू हॅव बीन थ्रेटनिंग टू गिव्ह मी युअर मॅन्युस्क्रिप्ट फॉर सम टाइम!”
अमेरिकेतल्या लुईझियाना राज्यातल्या मन्रो नावाच्या छोट्याशा शहरातल्या विद्यापीठात आमच्या सरांचं बस्तान होतं. पुलंच्या चितळे मास्तरांचे विद्यार्थी कसे एका ओळीत नववा शब्द चुकून जरी आला तरी तो खोडून पुढच्या ओळीत लिहिल्यामुळे कुठेही एकमेकांना ओळखू यायचे, तसे आम्ही डॉ. मेहेंदळ्यांचे विद्यार्थी त्यांनी शिकवलेल्या असंख्य सवयींमुळे ओळखू येऊ शकतो. लॅबमध्ये आल्याआल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिली शिकवण म्हणजे इंग्रजी सोडून बाकी कुठलीही भाषा लॅबमध्ये बोलायची नाही म्हणजे तिथे असलेल्या भारतीय भाषा न कळणाऱ्यांचा गैरसमज होत नाही. (खरं तर कुठलीही भाषा बोलून गैरसमज करून घेऊन मी आणि उदयन त्यांना भांडणाचं जिवंत प्रात्यक्षिकच देऊ शकलो असतो; पण सरांसमोर तसं करण्याची टाप नव्हती आमची!) विनोद सोडा, पण प्रोफेशनॅलिझमचा हा अतिशय महत्त्वाचा कित्ता आम्ही सरांच्या शाळेत पहिल्या दिवसापासून गिरवायला सुरुवात केली. दुसरा धडा म्हणजे अमेरिकन ऍक्सेंट! नवीन आलेल्या राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांसाठी हा कायमचा झगडा होता! पण त्यावर कारणमीमांसेसहित सरांनी समजावून सांगितलं. सरांचं म्हणणं की उच्चार कुठला बरोबर आणि कुठला चुकीचा हा प्रश्नच नाही, तुमचं बोलणं समोरच्याला कळतंय की नाही हे महत्त्वाचं. जिथे जी भाषा आणि ऍक्सेंट प्रचलित आहेत तेच आत्मसात करायला हवेत. यावरून झालेला एक माझा स्वतःचाच ‘आँखों देखा हाल’…

आमच्या लॅबला भेट द्यायला दुसऱ्या विद्यापीठातले एक प्राध्यापक आले होते. कोणीही पाहुणा घरी आला की मोठी माणसं कशी लहान मुलांना त्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करायला लावतात; तसंच सर आम्हां विद्यार्थ्यांना आमचा रिसर्च सांगण्यासाठी प्रत्येकी पाच मिनिटं वेळ द्यायचे. हेतू दोन- पहिला हा की आम्हांला आमचा रिसर्च एका त्रयस्थ माणसाला सांगायची प्रॅक्टिस व्हावी (पब्लिक स्पीकिंग) आणि दुसरा हेतू हा की आयता श्रोता गळाला लागलाय तेव्हा त्याला आपल्या लॅबमध्ये झालेलं संशोधन सांगून शहाणं करून सोडावं! माझ्या संशोधनाचा विषय होता ‘मेकॅनिझम्स ऑफ प्रोग्रेशन ऑफ लिव्हर टॉक्सिसिटी’ म्हणजे रसायनांमुळे यकृताची हानी कशी वाढत जाते याचा अभ्यास. मी नुकतीच ‘फ्रेश ऑफ द बोट’ आलेली, माझ्या अस्सल पुणेरी इंग्रजीत घसा फोडून सांगत्येय त्यांना ‘प्रोग्रेशन ऑफ इंज्युरी’ , ‘प्रोग्रेशन ऑफ इंज्युरी’ ! त्यांना मात्र काही केल्या बोध होत नव्हता. सर आपले बघतायत माझ्याकडे रोखून. त्यांच्या नजरेतून, ती यकृतात फैलावत चाललेली इंज्युरी वाट चुकून आता माझ्यावर घसरत्येय का काय असं वाटायला लागलं(!) आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला… पुलंसारखा “फि..क्याडली” सारखा उच्चार हवा करायला! “प्फ्रोग्रेशन ऑफ इंज्युरी”! त्या पाहुण्याला माझा उच्चार शेवटी एकदाचा समजला आणि नजीकच्या भविष्यातली माझ्या वाट्याला येऊ घातलेली मोठ्ठी शाब्दिक इंज्युरी टळली! इंग्रजीत मुळात ‘प’ हे अक्षरच नाहीये. ‘प’ आणि ‘फ’ यांच्या मधला तो उच्चार आहे. माझं नाव सांगतानाही हीच पंचाईत होते! पण सरांनी केलेला एक उपदेश मी पाळत्येय. तो म्हणजे ‘शहाणे करून सोडावे सकल जन!’ अमराठी लोकांना अविरत ‘प’ची शिकवणी चालू आहे… ‘पल्लवी’ कसं म्हणायचं याची!

अत्यंत विकृत वेळी म्हणजे दर शनिवारी सकाळी नऊ वाजता आमची लॅब मीटिंग घेणं वगैरे म्हणजे सरांच्या हिशेबी अगदीच समाजमान्य रिवाज असल्यासारखं होतं. दर शनिवारी सारं जग सुट्टीचा आनंद घेत असे तेव्हा सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत मीटिंग चालायची. प्रत्येक शनिवारी एक विद्यार्थी तोफेच्या तोंडी, म्हणजे एका विद्यार्थ्याचं रिसर्च प्रेझेंटेशन. त्या विद्यार्थ्याची संपूर्ण कुंडली तिथे मांडली जायची. सरांच्या या अफाट चिकाटीमुळे सेमिनार कसा द्यायचा, या बाबतीत आम्ही तावून सुलाखून तयार झालो. श्रोत्यांच्या प्रश्नाला “या प्रश्नाचं मी तीन मुद्द्यांत उत्तर देत्येय/देतोय,” असं म्हणून “नंबर एक अमुक तमुक, नंबर दोन तमुक अमुक,” ही सरांनी शिकवलेली पद्धत. प्रत्येक उत्तराला शास्त्रीय आधार हवा, यासाठी वाचन खूप हवं हे परत परत बिंबवायचे. “Where did you pull this from? From thin air?” असं उपहासाने विचारायचे. कष्टांना पर्याय नसतो हे सुरुवातीच्याच काळात आम्हांला शिकायला मिळालं हे बरं झालं. माझी दाढ एकदा प्रचंड दुखत होती. तेव्हाही लॅब मीटिंगमधला माझा सेमिनार पुढे ढकलायला ते तयार झाले नव्हते. कधी कधी त्यांचं असं वागणं दुष्टपणाचं वाटायचं. पण यामुळेच कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करायची सवय लागली. आणि याच सरांनी माझ्या आणि उदयनच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांच्या घरी मोठ्ठी पार्टी ठेवली होती, आमची पहिली गाडी घेताना आमच्याबरोबर येऊन गाडीची पारख केली होती, आम्हांला भारतातल्या दोन कॉन्फरन्सेस अटेंड करण्याच्या अटीवर दीड महिन्यांची सुट्टीही दिली होती… भारतात आम्हांला अधिक काळ राहता यावं म्हणून. माझ्या सासूबाईंच्या कॅन्सरबद्दल कळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून टचकन अश्रू निखळला होता. जिथे ‘कठोर राहून आम्हांला योग्य दिशा दाखवणे’ हेच त्यांचं काम होतं, त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि आम्हांलाही करू दिली नाही. म्हणूनच आज आम्ही अत्यंत अभिमानाने स्वतःला डॉ. मेहेंदळ्यांचे विद्यार्थी म्हणून नावाजू शकतो!

रेखाताई फक्त आमच्या दोघांच्याच नाहीत तर सरांच्या लॅबमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या किंबहुना युनिव्हर्सिटीमधल्या सगळ्याच भारतीय विद्यार्थ्यांच्या गार्डियन होत्या. केतकीसारख्या रंगाच्या आणि तिच्यासारख्याच कायम टवटवीत राहणाऱ्या रेखाताई! प्रेमळपणाचं मूर्तिमंत उदाहरण! त्यांच्या घरी आम्हां विद्यार्थ्यांना जेवायला बोलावलं की आमच्यासाठी ती मोठ्ठी मेजवानी असे. ‘मन्रो’सारख्या गावात अत्यंत कमी भारतीय वस्तू मिळायच्या. तरीही रेखाताई फाईव्ह स्टार हॉटेलच्या तोडीचा उत्तम मेन्यू करत असत. अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने जेवायला वाढावं ते रेखाताईंनीच! रेखाताईंकडून मी काय शिकले… तर इंडिपेंडंस शिकले आणि आपल्या बेटर हाफवर आपण अवलंबून नसतो तर, त्याला कसे पूरक असतो हे शिकले. १९६०च्या दशकात लग्न करून अमेरिकेत आल्याच्या तिसऱ्या दिवशी ड्राइविंगची परीक्षा देऊन त्या गाडी चालवायला लागल्या होत्या. त्यांनी तसं केलं नसतं तर त्या घरीच बसल्या असत्या! सर कुठले त्यांची शोफरगिरी करायला! मला आठवतंय एकदा सर, मी आणि उदयन एका कॉन्फरन्सहून परत आलो होतो आणि येताना सरांच्या घरी गेलो होतो. सरांची ऑफिसची बॅग रिकामी करताना रेखाताईंना त्यात काळं पडलेलं एक केळं सापडलं. प्रवासाला निघताना विमानात खाण्यासाठी दिलेलं होतं बहुदा ते. पण विमानातही काही तरी काम करण्यात मग्न झालेले सर त्याबद्दल अर्थातच विसरले होते. डोळे बारीक करून, “तुम्ही हे खाणार आहात की केळ्यावरही संशोधन चालू आहे?” असा प्रश्न रेखाताईंनी विचारल्यावर ताबडतोब सरांनी ते केळं खाल्लं. मी आणि उदयन थक्क झालो होतो. छोट्या छोट्या गोष्टींचीही अजून किंमत होती त्यांना! फोडणी करताना त्यावर पटकन झाकण ठेवायचं म्हणजे मोहरी आणि तेलाचं घनघोर युद्ध पूर्ण कट्ट्यावर पसरत नाही, पोळ्या करताना पोळपाटाखाली किचन टॉवेल घालायचा म्हणजे पिठाचा पसारा होत नाही, स्वयंपाक करताना हातावर चटक्यांचे ब्यूटीस्पॉट्स हे काही भूषण नव्हे तर निष्काळजीपणा आहे… अशा छोट्या मोठ्या गोष्टींपासून बऱ्याच गोष्टी मी रेखाताईंकडून शिकले. सगळ्यांत मोठी गोष्ट आम्ही त्यांच्याकडून शिकलो ती म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी आणि आपल्या कुटुंबाशी घनिष्टता! आजही फोन झाला की त्या आवर्जून आधी आमच्या भारतातल्या सगळ्यांची चौकशी करतात.

सर आणि रेखाताई असे हे खऱ्या अर्थाने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:! आमच्यामध्ये नवीन चांगले गुण निर्माण करणारे, चांगल्या गुणांचं संवर्धन करणारे, वाईट गुणांचं उच्चाटन करणारे! आम्हांला हे आयुष्याचे छोटे-मोठे धडे देताना जणू काही एका मोठ्ठ्या धड्याचं प्रात्यक्षिक देण्यासाठीच की काय सरांना काही वर्षांपूर्वी वयाच्या साठाव्या वर्षी पॅरालिसिसचा गंभीर झटका आला. या झटक्याने त्यांना बऱ्याच प्रमाणात परावलंबी करून टाकलं. त्यांचं ऍक्टिव्ह रिसर्च करिअर एकाएकी ठप्प झालं. निवृत्ती घेऊन सर आणि रेखाताई आता त्यांच्या मुलांजवळ राहायला गेले. तब्येतीमुळे सरांना किती तरी गोष्टी आता करता येत नाहीयेत. पण अजूनही दोघांच्याही आयुष्यातली सकारात्मकता किंचितही कमी झाली नाहीये! परवाचीच गोष्ट… रेखाताईंनी सरांचा त्यांच्या फिजिओथेरपिस्टबरोबरचा व्हिडिओ पाठवलाय. ती फिजिओथेरपिस्ट सरांकडून व्यायाम करवून घेते आहे. समोर टीव्हीवर राज कपूरचं गाणं चालू आहे आणि सर व्यायाम करता करता त्या फिजिओथेरपिस्टला ते गाणं इंग्लिशमधून समजावून देतायेत!
‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा, दिवाना सैंकडों में पहचाना जायेगा!’

आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे, हातचं काही राखून न ठेवता सर्व काही आपल्या विद्यार्थ्यांना देणारे आणि शेकडोंतच काय करोडोंमध्ये विलक्षण म्हणून ओळखू यावेत असे आमचे सर आणि रेखाताई!

11 Comments

 1. Well written Pallavi!

 2. इतकं भरभरून लिहिलं आहेस त्यावरून लक्षात येतंय किती ग्रेट आहेत दोघं! असे सर्वगुणसंपन्न गुरू मिळायला भाग्य लागतं! फार सुन्दर लिहिलंस! 👌🏻👌🏻

  1. Thank you, Kavita tai!

 3. छान लेख!

  1. Thank you, Ulka tai!

 4. सुंदर व्यक्तिचित्रण!

  1. Thank you, Madhurani! We consider ourselves very fortunate to have them as our mentors!

 5. एका अतिशय छान दांपत्याची ओळख झाल्याचं समाधान मिळालं, पल्लवी! छान लेख!

  1. Thank you, Anil! They both are awesome personalities!

 6. सुंदर लेख! अशी काही माणसं केवळ शिक्षणच नाही तर आपल्या संपूर्ण जीवनालाच आकार आणि दिशा देतात.

  1. Thank you, Sudhir! You said it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *