ती आपल्या प्रशस्त खिडकीत उभी- एकटीच! बाहेर माणसांचा समुद्र वाहतोय. मनात विचारांचा, आठवणींचा. सूरसम्राज्ञी… स्वरकांचना, स्वरशारदा… काय काय बिरुदं दिली रसिकांनी तिला. तितकीच मानपत्रं, पदव्या, आणि रसिकांचं ओसंडून वाहणारं प्रेम! अपार कीर्ती! रात्र रात्र रसिक खोळंबून राहत तिचे मधाळ गायन ऐकण्यासाठी. अतोनात प्रेम केलं तिच्यावर. तीही भरभरून त्यांच्या ओंजळीत सुरांचं दान टाकत गेली. हातचं न राखता. एक नशा होती त्यात. रक्तात भिनत गेली ती नशा! आणखी वरचा सूर, अधिक गोलाई, अधिक करामती, टाळ्या, स्टॅंडिंग ओव्हेशन्स! तू, तूच आणि फक्त तूच! जग सांगत राहिलं. ती बेहोशीत ऐकत राहिली. मनाशी खेळत राहिली त्या विचारात. मग टाळ्यांसाठी प्रयास वाढले. हुकमी ताना शोधल्या जाऊ लागल्या. तिचं स्वरयंत्र अनंत करामती करू लागलं. मूळ गाण्याचा आत्मा हरवून गेला.

आणि मग तो क्षण आला. होत्याचं नव्हतं झालं. संपलं सगळं. सकाळच्या रियाजाच्या वेळी तारसप्तक लावला आणि स्वर हरपला. संपलाच जणू तिचा श्वास! जणू कोणी हळूच ते जादुई स्वरयंत्रच पळवलं गळ्यातून. हादरलीच ती. काय करावं? कुठे जावं? ना नातेवाईक, ना मित्रमैत्रिणी! होतं ते फक्त संगीत! आणि तेच हरपलं! मॅनेजर भला माणूस. गांभीर्य ओळखून त्याने भराभर चक्रं हलवली. देशी, परदेशी सर्व डॉक्टर, वैद्य, हकीम, गंडादोरा, सल्ले, तपासण्या. कोणाला काहीच दोष दिसेना. आवाज तर फुटेना! बातमी बाहेर फुटली तर पंचाईत. मॅनेजरने लीलया ते धनुष्य पेललं. घरातल्या नोकरचाकरांना सुटी दिली. आपल्या विश्वासाची एक बाई दिमतीला ठेवली. या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. प्रेसपासून तिला दूर ठेवलं. पण जसजसे दिवस जायला लागले, तसतसा त्याचाही धीर सुटायला लागला. कसं थोपवणार लोकांना? काय सांगायचं? नाही म्हटलं तरी दबलेल्या आवाजात का होईना, दिलेला ॲडव्हान्स परत मागायला सुरुवात झाली. अचानक जे कार्यक्रम रद्द करावे लागले, ते नुकसानभरपाईचे दावे करण्याची धमकीही देऊ लागले. बाईंनी कार्यक्रम करावा, बास! आम्ही बाकी काहीच मागणार नाही. काय सांगणार? ही तर अशी सुन्न होऊन बसलेली. पण कल्पना तर द्यायलाच लागणार. मग घाबरतच त्याने पैशांचा विषय काढला. हिला कल्पना यायला लागलीच होती. पण समस्यांना सामोरं जाणं नकोसं झालं होतं. काहीही असलं तरी निर्णय घ्यावाच लागणार होता. मग तिने स्वत:च आपल्या गायनसंन्यासाची अनाऊन्समेंट लिहिली. मॅनेजरच्या हातात दिली. “लोकांचे पैसे परत करण्यासाठी चेक्स तयार करा, मैफिलीत साथ करणाऱ्यांना पुढील वर्षाची बिदागी पोहोचवा. तुमच्याही पुढील वर्षांच्या पगाराचे चेक्स लिहा. यापुढे मला तुमच्या कोणाच्याच सेवेची गरज लागणार नाही. तुम्ही दुसरीकडे काम करू शकता.” तो ते वाचून लहान मुलासारखा रडला. पण त्याचा काही इलाजही नव्हता. तो गेला. ती बाईही. आणि ती परत सुन्न होऊन बसून राहिली. कितीतरी वेळ… दिवस… महिने.. .रडली मनसोक्त. भांडली कित्येकदा त्या विधात्याशी! हिसकावून काढूनच घ्यायचं होतं, तर असं दान दिलंसच कशाला? संपूर्ण अज्ञातवास. मन विषण्ण! बाहेर काळोख! आत काळोख! प्रकाशाची तिरीपही नाही.

गायनाशिवाय दुसरं जगच नव्हतं तिच्यासाठी. वडिलांचीच शिष्या. आईविना पोर. वडिलांनी गाणं एके गाणंच शिकवलं. पोस्ट ग्रॅज्युएशनही संगीतातच. दुसरा कसला विचारच नाही. वडील लवकरच गेले. पण तिने संगीताची कास सोडली नाही; किंबहुना संगीतानेच तिची साथ कधी सोडली नाही. संगीतच मायबाप, संगीतच सखा. इतर कोणाच्या साथीचा विचारही मनी आला नाही. ध्यानीमनी संगीत असं व्यापून राहिलं की इतर कोणाला आत शिरायला जागाच नव्हती. चाहते अनेक मिळाले. तिच्या सुरांची चाहत तिला सुखावून जायची. पण कोणी ते सोडून काही बोलू पाहिलं तर तिच्या कपाळावर त्वरित नापसंतीची आठी उमटायचीच. मग समोरचा दबून गप्प व्हायचा. पण मग त्या सुरांच्या चाहत्यांचं जणू व्यसनच लागलं. मग त्या टाळ्यांचं व्यसन लागलं. सतत प्रेस, सोशल मिडियामधे तिच्या नावाची चर्चा असण्याची सवय आणि मग त्याचंही व्यसन लागलं. संगीतापेक्षा टाळ्या, मानसन्मान महत्त्वाचे होऊन बसले.

मनाचा काटा आंतरिक सुखाकडून बाह्य सुखांकडे कधी आणि कसा झुकला हे तिचं तिलाही कळलं नाही. नकळत आपणच सर्वश्रेष्ठ असण्याच्या भावनेने जोर धरला. वागण्यात बेफिकीरी आली. साथसंगत करणारेही कलाकारच आहेत याचा विसर पडू लागला. त्यांचा बारीक सारीक गोष्टींवरून अपमान करू लागली. कलाकार दुखावले जाऊ लागले. जे मानी होते सोडून गेले. ज्यांच्या अंगात कला होती. पण आर्थिक दुर्बलता होती, ते तसेच अपमान गिळून साथीला येत राहिले. कार्यक्रमादरम्यानही हिचा तऱ्हेवाईकपणा वाढला. बारीक सारीक गोष्टींवरून पारा चढू लागला. आयोजक त्रस्त होऊ लागले. पण हिची लोकप्रियता त्यांना गप्प बसवत होती. कलाकारांच्या मानहानीची तडफड, त्रस्त आयोजकांची उद्विग्नता याचीच हाय लागली असेल का आपल्याला? असेल कदाचित. आता हे असं सुरांशिवाय जीवन. लाईमलाईट शिवाय जीवन. पाण्याबाहेरच्या मासोळीसारखी तिची तडफड! प्रेसने, सोशल मिडियाने, काही दिवस तिच्या गायनसंन्यासाचा विषय चघळला. उलट सुलट चर्चा, अफवा, यांचं पीक आलं. वाहिन्यांनी तेवढ्यापुरता टीआरपी वाढवून घेतला. नंतर नवा विषय मिळाल्यावर चघळून चोथा झालेला तिचा गायनसंन्यास विस्मृतीत गेला. पब्लिक मेमरीच ती. गेले सगळे विसरून. आठवली कधी, तर हळहळायचे चाहते. तिच्या ध्वनिफिती होत्याच ऐकायला. विचारात हरवलेली अशीच, तिचं परमदैवत, श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर भांडण काढून बसली. तो जरा
जास्तच हसतोय असा भास झाला. तिने अधिकच निरखून पाहिलं. दचकली.

‘वेडे होतोय की काय आपण?’
‘व्हायचंय काय? आहेसच की!’
‘हे कोण बोललं?’ तिने दचकून इकडे तिकडे पाहिलं. परत मूर्तीकडे. तेच काहीसं रुंदावलेलं स्मितहास्य!
‘हा बोलला? आवाज पुरुषाचा होता? की बाईचा?’आठवेना? की ठरवता येईना?
‘बाप रे! हे काय होतंय?’ पट्कन उठली तिथून. लांब जाऊन उभी राहिली तर अधिकच हसतोय असं वाटलं. डोळे गच्च मिटून घेतले तिने. गेलीच नाही परत त्या खोलीत. मनाने तिच्याशी खेळ मांडला होता. कधी देवाशी भांडायचं तर कधी हिच्याशी. सतत आरसा दाखवायचं.

एकदा स्वप्न पडलं एकेक राग समोर येऊन तक्रारी नोंदवू लागले. राग दरबारी न्यायासनावर बसला. कोणी म्हणालं ही मिश्र गाते. कोणी म्हणालं ही नुसत्या हरकती घेते. आमची ओळख हरवत चालली आहे ही. केवळ स्वर वरखाली झेपावून सुरांची सर्कस चालवली आहे हिने. एक ना अनेक तक्रारी . मग आरोप सिद्ध झाले आणि शिक्षा मिळाली. सर्व सुरांनी हिच्याशी काडीमोड घ्यायचा. हरताळ करायचा! नाही उमटणार आम्ही तुझ्या गळ्यातून यापुढे! नाहीच होणार वश तुला. दचकून जागी झाली. प्रचंड अस्वस्थ झाली. खरंच आहे यांचं! असाच तर अन्याय केला आपण यांच्यावर. योग्यच शिक्षा मिळाली आपल्याला. तिने रडत रडत मनोमन क्षमायाचना केली. काहीसं बरं वाटलं मग तिला. जरा तगमग शांत झाली. बऱ्याच दिवसांनी टेरेस गार्डन उघडली तिने. ऑटोस्प्रिंकलर सिस्टीममुळे झाडं तग धरून होती. पण अगदी मलूल. अनेक वर्षांपूर्वी लावायची, तसा पाईप लावला नळाला आणि चिंब भिजवून काढलं तिने बागेला. जसजसे पाण्याचे तुषार उडू लागले, तसतसे जलतरंगाचे स्वर ऐकायला यायला लागले तिला. तिने परत दचकून इकडे तिकडे नजर टाकली. ती वेल आनंदाने गदगदून हसते आहे असं वाटलं तिला. ‘अरे देवा! आता हे काय आणखी?’एक बारीकसं फूल दिसलं पारिजातावर, पुरेशा पाण्याअभावी खुरटली होती खरंतर.वाईटच वाटलं तिला. तिने अलगद फुलाला गोंजारलं तर सतार झंकारली कानात. भराभर, नळ बंद करून आत येऊन बसली घाबरून. पण बसून किती वेळ राहणार? मग आली स्वैपाकघरात. जिथे हात लागेल तिथे स्वरतालांनी उसळायला सुरुवात केली. प्रथम वाटलेलं भय काहीसं कमी होऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली. चिमट्याची भांड्यांबरोबरची जुगलबंदी, पोळपाटाचा लाटण्याबरोबरचा ताळमेळ. सिंकमधल्या पाण्याच्या धारेचा तबला! स्वर आणि लयीने फेरच धरला तिच्याभोवती. रक्तात भिनलेलं संगीत मनात उमटायला लागलं. काय होतंय कळत नव्हतं. पण जे होत होतं ते विस्मयकारक होतं. लहान मुलाच्या कुतूहलाने ती नवनव्या गोष्टी स्पर्शत निघाली. नवनवे स्वरताल त्यातून उमटू लागले.

काही दिवस असेच वेडावलेल्या स्थितीत गेले. झोपेतही अनेकदा हे स्वर ताल पाठपुरावा करू लागले. अलीकडे श्रीकृष्णाशी भांडल्याशिवाय चैन पडायचं नाही. पण तो हसतोय असं वाटत राहायचं. मूर्ती हसरीच होती ती. पण तिला जिवंतपणा जाणवायला लागला होता. दु:खाची परिसीमा ओलांडली की मनाचा तराजू दुसऱ्या बाजूला झुकू लागतो म्हणतात. तसंच झालं असावं तिचंही.

त्यादिवशी अशीच त्याच्यासमोर बसली हट्टाने तानपुरा घेऊन. नाहीच हलणार तुझ्यासमोरून आज. डोळे मिटून स्वरालाप आळवू लागली मनातल्या मनात. कितीतरी वेळ तंद्री लागली तिची. पूर्वी गाताना लागायची तशी. संपूर्ण शरीर चैतन्याने भरून गेलं. शरीराची प्रत्येक पेशीच जणू स्वरयंत्राशी लावली गेली. तानपुऱ्यासारखी. आणि मग शरीरभर स्वरलहरींची बरसात. मनही भरून गेलं. सगळ्या नसा स्वरमय. ती स्वत:च एक जिवंत स्वरयंत्र बनली जणू. बावीस शृती सगळ्याच वेगवेगळ्या दिसायला, जाणवायला लागल्या. बारीक कंपन जाणवू लागलं स्वरयंत्रात. तनमन स्वरमय झालं. ती मौन स्वरांची तार थेट जोडली गेली तिच्या आतपर्यंत. निर्वात पोकळीत.

‘काय गरज तुला आता बाह्य स्वरयंत्राची? तूच तर आहेस स्वत: स्वरमयी. ही खरी कलेची अनुभूती. ती बाह्य वाहवा ऐकण्याच्या नशेत, खरा सूर विसरत चालली होतीस. त्यांचे भाव विसरत चालली होतीस. प्रत्येक राग आपलं असं अस्तित्व राखून असतो. त्याचा म्हणून एक स्वभावही असतो. तो बदलून नको तिथे तू करामती करायला लागलीस तेव्हा आला असेल त्या स्वर रागांचा अहं उफाळून. मग त्यांनी पुकारला संप!

‘हे कोण बोललं?’
पण आता तो कान्हा मंद हसत होता. तीही हसली मग त्याच्याकडे पाहून आणि आपल्या आतल्या स्वरानंदात तल्लीन होऊन गेली. अणुरेणू स्वरमय झाला. आणि पाहता पाहता तिच्या गळ्यातून स्वरधारा बरसू लागल्या. अगदी सहजतेने. क्षणभर तिला कळलंच नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वरयंत्राला ग्रासलेला अहं दूर झाला आणि मधाळ स्वरधारा बरसू लागल्या. पण आता तिचा त्यांच्यावर हावी होण्याचा कोणताही मानस नव्हता. त्यांना जसं यायचं तसं ती येऊ देणार होती. तिचा गळा त्यांचं, प्रेमाने,आपुलकीने स्वागत करणार होता. एकच उरलेली आस पूर्ण झाली मग त्या कान्ह्याचा पावाही हिच्या सुरात सूर मिसळून वाजू लागला. सगळं हीन वाहून गेलं, साफ धुऊन निघालं स्वरधारांनी.

आता ती गाते मुक्तपणे. मैफिलींमध्ये गाते. रसिक भारावून जातात तिच्या गायनाने. त्यांच्याही आत कुठेतरी तार जोडली जात असावी. टाळ्याबिळ्या वाजवण्याचं भानही अनेकदा राहत नाही त्यांना. तिला त्याची गरजही नसते. कधी मंदिरात गेली, तर तिथे बसूनही गाते. मुक्तपणे आळवते परमेश्वराला. तो ही मग काही काळ भक्तांच्या गाऱ्हाण्यातून बाजूला येऊन शांतावतो. आसपासचे भक्तगण तल्लीन होऊन ऐकतात. कधीतरी त्या लांबच्या निर्जन मंदिरात तो आंधळा बैरागी रात्रीचा गातो. ती मग त्याच्या टिपेच्या सुरात आपला मधाळ स्वर मिसळून गायला लागते. पहाट कधी होते कोणालाच भान नसतं. आसमंत मधुस्वरांनी भरून राहतो. पक्षीही आपलं कूजन विसरून ऐकत राहतात. ती त्या कान्ह्याचे आभार मानते. वेळीच जागं केलंस मला. भरकटत कुठे गेले असते त्या यशाच्या नशेत कोण जाणे!
तिचा आणखी एक परिपूर्ण, स्वरमय दिवस सुरू झालेला असतो.

1 Comment

  1. Awesome post Madhu ,tuzya nawatacha madhurya aahe te likhanatahi utarale ashe, ase khup wachayala awadel wa wachan sanskrit pn tawatawi hoil 👌🏻😍😇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *