दाराशी गाडी थांबल्याचा आवाज आला तशी तन्वीनं हातातले चहाचे कप आदळलेच ओट्यावर. गळ्याभोवतीचा अ‍ॅप्रन सोडवत सोडवतच ती स्वयंपाकघरातून धावत सुटली. समोरच्या खिडकीला नाक लावून, डोळे बारीक करून ती माधवच्या गाडीकडे बघायला लागली. आज नेहमीसारखं डौलदार वळण घेऊन गाडी आत आणली नाही का बाबांनी? अगदी हळू हळू, जराशी कंटाळल्यासारखी आत आलीय गाडी. बाबांच्या गाडी पार्क करण्यावरून त्यांचा मूड ओळखायची तन्वी. अगदी जरा समज यायला लागल्यापासूनच. आई म्हणतेसुद्धा – ‘ही पोरगी नि तिचा बाबा – अगदी इनसेपरेबल.’
माधव गाडीतून उतरला नि तन्वीच्या कपाळावर आठ्या चढल्या. नाकाला केवढ्या तरी सुरकुत्या पाडल्या तिनं. फुरंगटलेल्या चेहर्‍यानंच हातातला अ‍ॅप्रन सोफ्यावर फेकला नि केवढ्यानं तरी ओरडली ती-
“हे काय, आजुडी नाही आली? ओ आय एम नाऊ सो सो मॅड”

“अगं, हळू ओरड गं बाई. कानठळ्या बसल्या माझ्या….” तिच्यामागोमाग स्वैपाकघरातून बाहेर आलेल्या प्रियानं तिचा धबधबा थोपवायचा अयशस्वी प्रयत्न केला.
“किती जोरानं किंचाळतेस गं? लग्नाला आलेली मुलगी तू. लहान का आहेस आता? नि अशीच ओरडणार आहेस का सासरी – बापटांच्या घरी गेल्यावर? बाई गं- लक्षात ठेव. कोकणस्थांचं घर आहे ते. आपल्यासारखे अघळपघळ देशस्थी गुण चालायचे नाहीत तिथे नि आजेसासूबाईही आहेत त्या घरात तुझ्या…”

“ममा प्लीज. ते तुझं नेहमीचं देशस्थ – कोकणस्थ पुराण नकोय हं मला. आपल्यासारखेच लोक आहेत ते अगदी नि नयन तर दारापासूनच येतो ओरडत आत… त्याच्या आई उलट हसतात कौतुकानं…”

” सून ओरडत आली की नक्कीच हसणार नाहीत… तुला काही कळतच नाही तन्वी…”

“ममा… असं करते, उद्या दागिने पसंत करायला जाणार आहे ना मी… ओरडतच घेते बघ एंट्री. या निमित्ताने त्यांची रिअ‍ॅक्शनही कळेल तुला. ते जाऊ दे गं. बाबा आजुडीला घेऊन का आले नाहीत?”
तन्वी पुन्हा तारस्वरात ओरडली; तेवढ्यात माधव दार उघडून आत आला.
थकलेला, ओढलेला चेहरा नि घट्ट मिटलेले ओठ…
दिवसभराचा थकवा त्याच्या चेहर्‍यावर अगदी उतरलेला दिसत होता. पण याशिवायही काहीतरी त्याला सलतंय हे मायलेकींच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.

‘लग्नाला बरीच वर्ष झाली की एकमेकांच्या मनातले भाव कसे बोलण्यावाचूनच वाचता येतात’- प्रियाच्या मनात आलं.
काय झालं असेल बरं? तन्वीनं साखरपुड्याच्या अंगठीतला हिरा हरवला म्हणून बापटांकडे कोणी काही वावगं बोललं तर नसेल ना? पण आपण तर म्हटलं होतं की दुसर्‍या हिर्‍याचं बिल तुम्ही नका देऊ म्हणून. ते साफ नाकारलं होतं तिच्या सासूबाईंनी. आजेसासूबाई तर हसून म्हणाल्या होत्या, “असू द्या हो. अल्लड आहे अजून ती. तिनं फक्त हिराच हरवला. मी तर अख्खी सोन्याची अंगठी हरवली होती…पण खरं सांगू का, मला आनंदच झाला होता… आधीचं डिझाईन नव्हतं बाई मला आवडलं.”

मग काय झालं असेल? काही अवाजवी मागण्या तर नसतील केल्या?…तन्वीलाही फार आवडलाय नयन… लग्नात आता काही विघ्न तर….

मनातलं मळभ झटकून टाकत तिनं तन्वीकडे पाहिलं. गुलाबी सलवार कमीजची आभा तिच्या गोर्‍यापान गालांवर उतरली होती. खिडकीतल्या उन्हाचा पट्टा तिचे केस आपल्या तांबूस रंगानं न्हाऊ घालत होता. मोठमोठे तपकिरी डोळे मात्र बाबाच्या चेहर्‍यावर खिळले होते.

“आज खूप काम होतं वाटतं ऑफिसमध्ये? दमलेला दिसतोयस बाबा तू. थांब! चहा गाळतच होते मी. आणतेच.”
तन्वी आत पळाली तोवर प्रियानं गार पाण्याचा पेला भरून आणला. एका झटक्यात माधवनं तो रिकामा करून टीपॉयवर ठेवला. खिशातून लाल मखमलीची छोटी डबी काढली नि चहाचा कप त्याच्या समोर ठेवणार्‍या तन्वीच्या हातात दिली.
“हे घ्या बाईसाहेब. बापटांनी हिरा परत नीट बसवून आणलाय साखरपुड्याच्या अंगठीत. पाडू-बिडू नका परत… एक महिनाच राहिलाय जेमतेम लग्नाला…”

“हो ना? मग का नाही आली आजुडी? साड्या दाखवायच्या होत्या मला तिला नि दागिनेही!शिवाय ती तिची नथ नि चपलाकंठी देणार होती मला. सांग ना बाबा. प्लीज… मनूआत्याकडेच राहिलीय का ती? आजचा दिवस? उद्या येईल ना?’
तन्वीच्या डोळ्यांतलं पाणी अगदी गालांवर ओघळायच्या बेतात होतं. माधवला आता राहवेना. प्रियाच्या नजरेतही प्रश्नांची मालिकाच होती. उजव्या हातानं त्याने तन्वीला जवळ ओढलं नि दुसर्‍या हाताने तिचे डोळे पुसले.
“उगी सोन्या. किती रडशील? अग आजी आलीय अमेरिकेहून. येणार आहे एकदोन दिवसांत. लाडक्या नातीचं लग्न नि आजी येणार नाही असं शक्य तरी आहे का? ती गेलीय सुमित्रामावशीकडे…”

“सुमित्रामावशीकडे?” बुचकळ्यातच पडली तन्वी. “सुमामावशी म्हणजे आजीची चुलतबहीण. तिथे कशाला गेलीय आजुडी आत्ता?”
तन्वीचं नाक पुन्हा फुगणार होतं – पण तेवढ्यात बाहेर कायनेटिकचा हॉर्न वाजला. रिद्धी – तन्वीची मैत्रीण आली होती. सगळ्या मैत्रिणी आज मिळून पाणीपुरी नि भेळ चापायला जाणार होत्या. घाईघाईने तन्वीनं ओढणी सावरली. पर्समधून लिपस्टिक काढून ओठांची कमान आणखी गडद केली – नि “आले गं” ओरडतच, हाताने आईबाबांना बाय करत ती बाहेर पडली.

माधवनं करंगळी कानात घातली. “केवढ्यानं ओरडते गं तुझी लेक…”
“आता तूच म्हणतो आहेस का हे? मी कितीदा सांगितलंय.. तेव्हा तूच मध्ये पडतोस…लहान आहे म्हणून!”
“लहानच आहे गं ती. जेमतेम साडेबावीस.. बापटांनी कुठल्यातरी लग्नात बघितली काय नि मागणी घातली काय! खूप भराभर ठरल्यासारखं वाटतंय गं सगळं…’ माधव एकदम हळवा झाला.
“ते असू दे. मी तर तिच्यापेक्षाही लहान होते थोडी. झालाच ना आपला संसार?” प्रियानं माधवकडे हसून बघितलं.
त्याच्याजवळ बसून त्याचा हात तिनं हातात घेतला.

“आता बोल, काय झालंय ? बापटांकडे काही घडलं का? सांग मला! ”
“नाही गं, ती बिचारी फारच सालस माणसं आहेत…”
“मग काय झालं? ऑफिसमध्ये काही…”

” नाही ग प्रिया. कसं सांगू तुला?…पण…पण…सांगावं लागणारच आहे ..सगळ्या शक्यता विचारतेयस तू… पण आई… आईबद्दल विसरलीस? आई सुमामावशीकडे गेली आल्या आल्या हे नाही खटकलं तुला?”
“अरे, असं काय करतोस? त्या आहेतच तशा मनस्वी… त्यांना वाटतं तेच करतात नेहमी…”

माधवच्या दुखावलेल्या चेहर्‍याकडे बघून प्रियाने पुढचे शब्द गिळून टाकले. सासूच्या तक्रारी सांगण्याची ही वेळ नाही हे जाणून तिनं दुसराही हात त्याच्या हातावर ठेवला अन् तसं तिचं सासूशी काही तणावपूर्ण नातं नव्हतंच. शिकलेल्या, आपल्या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या, नि पासष्टी उलटल्यावरही परदेशात संशोधनासाठी वार्‍या करणार्‍या निमाताईंबद्दल तिलाही मनातून नेहमीच आदर वाटत असे. लहात वयात वैधव्याचं दुःख झेलूनही ताठ मानेनं माधवला नि मनालीला वाढवलं होतं त्यांनी. तन्वी तर जणू त्यांच्या काळजाचा तुकडाच होती अन् तन्वीला तर आजुडी म्हणजे जीव की प्राण. त्यांच्या नात्याबद्दल कधीकधी किंचितशी असूयाही वाटायची प्रियाला.

‘आता सांगशील का प्लीज? काय झालंय आईंना? तब्येत ठीक आहे ना? सांग लवकर. उगाच जीव टांगणीला नको लावू माझा! ‘

“आई… कसं सांगू तुला? आई लग्न करतेय…पुनर्विवाह…”
एक क्षणभर काही न कळल्यासारखी प्रिया माधवकडे नुसतीच बघत राहिली. तिचा आपल्या कानांवरच नव्हे; तर माधवच्या शब्दांवर विश्वासच बसेना.
“काय सांगतोयस तू हे? आई, नि लग्न? या वयात? तुझा काहीतरी गैरसमज होतोय माधव. अरे, तन्वीचं लग्न महिन्याभरावर आलंय. काहीतरीच! कोणी सांगितलं तुला हे?”
“आईनंच गं… स्वतः आईनंच…”
प्रियाच्या मनात अक्षरशः भुईनळे फुटत होते. आई मनस्वी आहेत खर्‍या; पण या बातमीवर विश्वास बसणंच कठीण होतं.
” पण त्या कोणाशी लग्न करताहेत? नि आल्याआल्या सुमामावशींकडे का गेल्यात? काय चाललंय हे सगळं?”
एकापाठोपाठ प्रश्न विचारत भांबावून जात ती माधववर भडिमार करत होती.

“मला काही कळेनासंच झालंय गं. मला आणखी एक ग्लास पाणी आणून देतेस प्लीज?”

दोन बोटांच्या चिमटीत कपाळ घट्ट दाबून धरत माधव असहायतेने उद्गारला तशी प्रिया एकदम सावध झाली, ‘हा कमालीचा हळवा नि भावनाप्रधान आहे. मागच्या वर्षीच माइल्ड हार्टचं दुखणं होऊन गेलंय त्याला. आपणच सावरायला हवंय या क्षणी! ‘

” हे घे पाणी…” त्याला पाण्याचा पेला आणून देत प्रिया हळुवारपणे म्हणाली. सोफ्यावर त्याच्या शेजारी बसून तिनं त्याचं डोकं मांडीवर घेतलं.
“तुला त्रास होत असेल तर नको सांगू आत्ता सविस्तर… नंतर बोलूया आपण”
“नको… नको. मला सगळं सांगू दे तुला… वेड लागेल नाहीतर..”
” बरं बोल.. पण शांतपणानं हं.. ब्लड प्रेशर वाढवायचं नाहीये आपल्याला…”

“ते तर वाढलंच आहे गं… असू दे. तर काय सांगतोय… आईला घ्यायला एअरपोर्टवर गेलो वेळात. तर आई आली बाहेर. पण ती एकटी नव्हती. तिच्याबरोबर एक उंचेपुरे सौम्य गृहस्थ होते. तिच्याच वयाचे जवळपास. दोघं जवळ आले नि आईनं त्यांची ओळख करून दिली…’हे कमलेश मेहता.. माझ्याबरोबर गेले सहा महिने अमेरिकेत रिसर्चसाठी होते. त्यांना घरी सोडायचंय.'”

” मग?”
मी चालेल म्हणालो. गाडीत सामान ठेवून तिघेही निघालो. थोडं अंतर गेल्यावर आई म्हणाली. “माधव, आपण जरा जाता जाता मनालीकडे थांबूया.”
“आम्ही मग तिथून मनालीकडे गेलो. आई अगदी शांत होती. चहापाणी झाल्यावर आई म्हणाली, तुम्हां दोघांना काही सांगायचंय मला… आणि… आणि मग शी ब्रोक द न्यूज..”
“मग पुढे काय झालं…?”

“काय होणार? मनालीवर तर बाँबच पडला. तिचा स्वभाव तर तुला ठाऊकच आहे प्रिया. ती रडली, ओरडली… किंचाळली…. नाना दूषणं दिली तिनं आईला नि हे सगळं त्या नवख्या माणसासमोर. मी तर अगदी हतबुद्धच होऊन गेलो; मग तिथून आम्ही निघालो तर आई म्हणाली.. ‘यांना त्यांच्या घरी सोडल्यावर मग मला सुमित्राकडे सोड एक दोन दिवस’ …”

” ते बरोबर. त्या दोघी खूप जवळच्या आहेत एकमेकींना….नि मनाली पहिल्यापासूनच आक्रस्ताळी आहे स्वभावाने….. पण यात आता तुझं मत काय माधव?…”

सरळ उठून बसत माधव म्हणाला, ”मला काहीच कळत नाहीय गं! मी पारच हादरून गेलोय. मनालीकडून निघालो नि एवढी खंबीर आई… पण ती डोळे पुसत होती हे मला गाडी चालवताना सुद्धा कळत होतं गं! हे काहीतरीच होऊन बसलंय प्रिया अन् मला या सगळ्यात तन्वीच्या सासरचे काय म्हणतील, याची इतकी धास्ती वाटतेय की काय सांगू! ”
आता मात्र प्रिया आवेशात उठून उभीच राहिली…

” इथे मुद्दा तो नाहीच आहे माधव. आईंनी इतकी वर्षं आपलं सगळ्यांचं अगदी काटेकोरपणे सगळं केलंय. अगदी प्रत्येक कर्तव्य पार पाडलंय. विचार कर! वयाच्या पंचविसाव्या वर्षी नवरा गेला. कसं वाढवलं असेल तुला? मागच्या वर्षी तू दोन आठवडे दवाखान्यात होतास हार्ट अ‍ॅटॅकनंतर ; तर माझ्या काळजाने अगदी ठाव सोडला होता रे, कशा जगल्या असतील त्या इतकी वर्षं? घरात सारे असतात; पण आपलं म्हणवणारं माणूस आधाराला असणं नि नसणं यांतला फरक फार फार मोठा असतो. काय बिघडलं त्यांनी लग्न केलं म्हणून? अन् तन्वीचे सासरचे या कारणावरून लग्न मोडणार असतील तर आपली निवड चुकलीच म्हणायची रे मग…”

“पण प्रिया… तन्वीच्या सासरचे जाऊ दे एक वेळ… पण लोक काय म्हणतील? तिची सख्खी मुलगीच तिच्याविरुद्ध असताना? आता? या वयात लग्न? इतकी वर्षं नाही नि आत्ताच का?”

“सुख कुठल्या वळणावर आपली वाट बघत उभं असेल, काय सांगता येतं माधव? त्याला का नाकारायचं? अरे सुखा, तू उशीरा आलास माझ्या आयुष्यात म्हणून मी तुझा हात धरणार नाही हे म्हणणं न्याय्य वाटतंय तुला?”
” नि मनालीबद्द्ल बोलशील तर इतकी आत्मकेंद्रित मुलगी मी आयुष्यात पाहिली नाहीये. सॉरी… पण ती नि तिचा नवरा – संजय. त्यांचा डोळा आईंच्या त्या सुसज्ज फ्लॅटकडे आहे, हे आपणा दोघांनाही माहीत आहेच ना? तुझी बहीण म्हणून तोंड मिटते रे मी नेहमी! पण माणसाच्या स्वार्थीपणालाही सीमा असावी थोडी.”

” ते आहेच गं .. तिचा स्वभाव मीही जाणून आहे पुरता. आईला म्हणत होती. “म्हणजे आता या वयात तुझी सावत्र मुलं आमच्या इस्टेटीत वाटेकरी करणार आहेस का?” त्यावर त्या मेहतांनी स्पष्ट सांगितलं,”त्यांना एकच मुलगा आहे. तो अमेरिकेत असतो नि त्याला त्यांच्याच मालमत्तेत रस नाहीये; तेव्हा आईची सारी इस्टेट आईनं आत्ताच तिच्या मुलांना लिहून द्यावी… त्यांची यात कुठलीही हरकत असणार नाहीये म्हणाले.”
”मग आता प्रश्न कुठे उरला माधव? चल, आपण जाऊन घेऊन येऊया का आईंना? मलाही भांडायचंय त्यांच्याशी! मला नेहमी दुसरी मुलगी म्हणतात नि मग मला हे गुपित सांगावंसं त्यांना का नाही वाटलं? मी विचारणारच आहे त्यांना…”
“नको नको, आधी आपण दोघं बापटांकडे जाऊन येऊ या. मला अजूनही त्यांच्या प्रतिक्रियेचीच काळजी वाटत्ये.”
“त्यांच्या प्रतिक्रियेवर आपला पाठिंबा अवलंबून नाही हे मात्र पक्कं लक्षात असू दे माधव. आपला निर्णय झाला आहे. कुणाच्याही हस्तक्षेपानं तो बदलायचा नाहीये मला. त्यांच्या आयुष्यात येणारे हे आनंदाचे क्षण सर्वांनी मिळून स्वीकारायचे आहेत. चल निघू या नि गाडी मी चालवते रे बाबा. आजच्यापुरता त्रास पुरे आहे तुझ्या डोक्याला. ती बघ तन्वीही आलीच…! ”
“तिला घेऊनच जाऊया.. गाडीत सांगू या तिला सगळं…”
“प्रिया, तुला कसं सगळं अगदी सरळ नि सुस्पष्ट दिसत असतं गं ? मी तर बावरूनच गेलो होतो.”
यावर काहीच न बोलता प्रियानं माधवच्या खांद्यावर थोपटलं फक्त.

बापटांची प्रतिक्रिया प्रियाच्या अपेक्षेप्रमाणेच होती.
आजेसासूबाई एक क्षण घुटमळल्या; पण तन्वीच्या सासू-सासर्‍यांनी अगदी मनापासून या बातमीचं स्वागत केलं. उलट त्यांच्या नेहमीच्या गडगडाटी आवाजात हसून ते म्हणाले, “आता तन्वी नि नयनला आशीर्वादासाठी आणखी दोन हात मिळाले बरं का!”

“चला बाईसाहेब, घेऊन येऊया आता तुमच्या आजुडीला..” बापटांकडून निघाल्यावर गाडीत बसता बसता माधव म्हणाला.
त्यावर प्रिया हलकेच बोलली..
“अरे, आधी दुकानात जाऊया. आणखी एका मंगळसूत्राची ऑर्डर द्यायची आहे.”
गाडी स्टार्ट करण्याच्या आवाजात तन्वीचा आनंदाचा चीत्कार मिसळला.
“जरा हळू ओरडत जा गं …”
प्रिया नि माधव एकदमच म्हणाले.

1 Comment

  1. मस्त झालीए कथा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *