“ए सांग ना, सांग ना, झालं का लिहून? कर ना लवकर पूर्ण.” अल्पा फोनमध्ये बुडालेली मान वर न करताच गंधारला आग्रह करत होती. गंधार त्याच्या पाचव्या चित्रपटाची पटकथा लिहिण्यात मग्न होता; तर वेशभूषेच्या कल्पना करत अल्पा उतावीळ झालेली!

“तू कशाला इतकी मागे लागली आहेस? पटकथा लेखन सोपं नसतं राणी.” अल्पाला राणी म्हणत गंधारने वहीवर अलगद हात फिरवला. वहीचं पान नाकाजवळ घेऊन त्याने डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. अल्पाची फोनमध्ये अडकलेली मान तितक्यात वर आली.

“कर, कर चुंबनांचा वर्षाव त्या वहीवर. तुझी राणी ती वही आहे की मी? त्या वहीला स्पर्श करतोस ना तसा कधीतरी बायकोलापण कर. सर्वस्व ओतल्यासारखं चाललंय वहीबरोबर.” लाह्यांसारखे शब्दांमागून शब्द फुटायला लागले. निर्जीव वहीबद्दलचा हेवा अल्पाच्या शब्दांतून पाण्याला उकळी फुटल्यासारखा बाहेर उडत होता.

“अजरामर कलाकृती निर्माण केली आहे मी क्षणभरापूर्वी. माझ्या मनातला एकेक शब्द ही वही मोत्यासारखा झेलते, शोषून घेते, त्यातच विरघळून जाते. वही, माझी वही.” अल्पाकडेही कधी पाहिलं नसेल इतक्या प्रेमाने वहीकडे पाहत गंधारने पुन्हा एकदा वहीला जवळ घेतलं. झेलणे, शोषणे, विरघळणे यातलं आपण काय करत नाही याचा विचार काही क्षण अल्पाने केला; पण वेळ अमूल्य होता. शत्रू गंधारच्या छातीपाशी जाऊन पोचला होता. याक्षणी छाती दूर करायला हवी होती. छाती कशी दूर करणार? वही, वही दूर करणं भाग होतं. वेळीच परिस्थितीचा ताबा घेतला नाही तर गंधार वहीच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही हे अल्पाच्या लक्षात आलं. वहीअधीन गंधार तिच्या डोळ्यांसमोर नाचायला लागला. आपल्या भविष्याला आकार आपणच द्यायचा हे कुठेतरी वाचलेलं अल्पाला एकदम ’स्ट्राइक’ झालं, आठवलं. गंधारच्या भविष्याला पूर्णविराम देता आला तरच तिला तिच्या भविष्याच्या घड्याला आकार देता आला असता. गनिमी काव्याचा आधार घेत ती भविष्य थोपवायला उठली.

“तुझं झालं असेल लिहून तर मला पात्रं ठरवायची आहेत.” अल्पाने नयनबाण वापरला. गंधार घायाळ झाला. हातात घट्ट धरलेली वही सोडून अल्पाला घट्ट धरावं असा गंधारला मोहही झाला पण अल्पाच्या तोंडून निघालेल्या नऊ शब्दांमध्ये प्रचंड डाव शिजत असल्याचा सुगावा त्याला लागला. त्याने बचावात्मक पवित्रा घेतला.

” तू पात्र ठरव पण तुझ्या माहेरच्या कोणालाही यात भूमिका मिळणार नाही. त्यांनी कितीही पैसे माझ्या अंगावर फेकले तरी.”
“अंगभूत कला आहे आमच्या घरात. पैसे फेकायची वेळ येतच नाही कुणावर.” कलेचं अपूर्व तेज अल्पाच्या चेहर्‍यावर झळकलं.
“कधी काम केलंय कुणी नाटक सिनेमात? मला कसं माहीत नाही?” अल्पाच्या माहेरचे जावयाचं नाक खाली करायचं म्हणून नाकावर टिच्चून काहीही करतील; याची त्याला पक्की खात्री होती. तो जावई आहे अशी नुसती आवई; मान शून्य हे त्याचं ठाम मत त्याने बिनदिक्कत जाहीरपणे अनेकदा अल्पासमोर मांडलं होतं. खरंच हे लोक आपल्या क्षेत्रात घुसून तिथेही आपल्याला नामोहरम करणार की काय? या शंकेने गंधारच्या मनाचा ताबा घेतला. अल्पाच्या मनाचा तळ गाठण्यासाठी त्याने तिच्याकडे बघितलं. बेदरकारपणे अल्पानेही डोळ्याला डोळा भिडवला.
“कलेचा बाजार नाही करत आमच्या घरात. आम्ही खाजगीत आमची कला दाखवतो.” अल्पाच्या कलेचं पाणी गंधारच्या अंगावर उडालं.
“तुमच्या कला खाजगीतच फुलू देत. कुठून आणणार आहेस तुझी पात्रं?” त्याने आक्रमक उत्सुकतेने विचारलं.
“तुझ्या घरातून.” गंधारची चाळवलेली आक्रमक उत्सुकता गार पडली.
“वा. सुदिन उगवला. माझ्या घरातल्यांवर एवढं प्रेम?” गार पडलेल्या उत्सुकतेला त्याने उपरोधिक ’टच’ दिला. अल्पालाही क्षणभर उत्तर सुचेना.
“खोटं बोलत होतीस ना?” गंधारने मनातल्या मनात आनंदाने उड्या मारल्या.
“खोटारडा तू आहेस. मी नाही.” अल्पाला गंधारच्या खोटारडेपणाची माळ कांद्याच्या माळेसारखी त्याच्यासमोर टांगावी असं वाटत होतं.
“मी नरो वा कुंजरो वा करतो, ” हार न पत्करता कावेबाजपणाने गंधार उत्तरला.
“त्यालाच आम्ही मराठीत खोटं बोलणं म्हणतो,” ती बाणेदारपणे म्हणाली.
“आपण बोलत काय होतो?” अल्पासमोर आपला पाडाव लागणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य पुन्हा समोर दिसायला लागल्यावर गंधारने तात्पुरती माघार घेतली. त्याच्या प्रश्नावर त्याच्यासकट तीही विचारात पडली. दोघांनाही ते आठवेना. अल्पाने आपलं घोडं पुढे दामटवलं.
“मी तुला झालं का लिहून विचारलं त्यानंतर तूच बोलत राहिलास. तुझ्या कविता ऐकवतोस तसं. शब्दांमागून शब्द.”
“मला माफ कर. मी तुझ्या नादाला लागलो. शब्दांचा नाद जास्त चांगला.” गंधारने त्याच्या शब्दांचा बाण फेकला.
“नादाला? हे जास्त होतंय पण ’माफ’ हा शब्द तुझ्या तोंडी दुर्मीळ आहे म्हणून ’नादाला लागलो’ हे उद्धट वक्तव्य मी दिलदारपणे सोडून देतेय. कळलं? मी सोडतेय.” सोडतेय शब्दावर जोर देत अल्पाने गालावरच्या गोड खळ्यांचा डाव टाकला. गंधार चेकाळला.
“सोड, सोड राणी तू काहीही सोड, मी देईन तुला कधीही जोड.” आपण चावट विनोद केला आहे असं वाटून गंधार स्वत:च हसला. अल्पाला आता काहीही सोडायचं नव्हतं, धरायचं होतं.
“सांग ना, काय लिहिलं आहेस? पाचवी मूव्ही असेल तुझी ही. वाच ना, वाच पटकन.” अल्पाने विषय पकडला.
“घन्या आपला निर्माता आहे. त्याला बोलवतो. एकदाच वाचेन पटकथा.” गंधारनेही आता विषय धरला.
“लगेच बोलव. पात्रं मी ठरवली तरी तिथे माझं नाव नको.” पात्रांच्या निवडीवरून शिव्या नकोत म्हणून उदारपणे अल्पाने ते श्रेय सोडून दिलं.
“नेहमीप्रमाणे वेशभूषेची जबाबदारी माझी. काय मस्त वाटतं रे नावापुढे ’कॉस्चुम डिझायनर’ बघताना.” अल्पाच्या उत्साहाने उसळी मारली.
“असं करू या. तू बटाटे उकडून ठेवशील? मी बटाटेवडे करते. ताव मारत मारत ऐकव पटकथा. घन्यालापण आवडतात ना?” ती उठलीच. गंधारने घन्याला फोन करून तासाभरात यायला सांगितलं. पटापट स्वत:चं आवरून तो तयार होऊन बसला. त्याच्या अंगात पाचव्या चित्रपटाचं चैतन्य संचारलं. वही घट्ट धरून तो घन्याची वाट बघायला लागला. बटाटे उकडायला विसरला.

घन्याने घरात पाऊल टाकलं ते अल्पाने उकडलेल्या बटाट्यांचा वास घेतच.
“आयला, बटाटेवडे. अल्पा तू ग्रेट हं. चला खाऊया.” तो थेट स्वयंपाकघरातच शिरला. गंधारने हातातली वही त्याच्या डोक्यावर मारली.
“हे ऐकायला आला आहेस. आधी ऐक. मग बटाटेवडे.” गंधारच्या हातातली वही बाजूला करत घन्या कुरकुरला.
“यार, तू वहीत लिहिणं बंद कर. कुठल्या जमान्यात राहतोस रे तू.”
“घन्या, तू घरी यावंस म्हणून तो वहीत लिहितो. तुम्ही दोघं बसा ना बाहेर. मी आलेच” अल्पाने गंधारने बटाटे उकडले नाहीत हे मोठ्या मनाने सोडून द्यायचं ठरवलं. त्यांना तिथून घालवायचा तिने प्रयत्न केला पण दोघं हलले नाहीत.
“तू पण ऐक ना. असं करू या, बटाटेवडे मी तळतो. खाऊ आणि बसू. चहा टाकेल कुणीतरी.” गंधारने बोलता बोलता बटाटेवडे तळायला घेतले. घन्या मदतीला धावला. अल्पाने मिक्सरमध्ये चटणी फिरवली.
“वाच रे आता.” बटाटेवडे पोटात गेल्यावर घन्याने तोंड उघडलं. गंधारने वही उघडली.
“नाटक, मूव्ही की मालिका ते तू ठरव. तू निर्माता, दिग्दर्शक.” गंधारने घन्यावरच निर्णय सोपवला.
“आधी वाच तर खरं.” घन्याला आता बटाटेवडे चढले होते.
“त्रिवेणी आणि अंबर. चारचौघांसारखाच दोघांचाही संसार आहे. वेगळेपणा आहे तो त्यांच्या निर्णयात. दोघांनाही मूल नको, जबाबदार्‍या नकोत. तसं त्यांनी लग्न करतानाच ठरवलेलं आहे. तुझी माणसं तू सांभाळ, माझी मी हे जितक्या तडफदारपणे त्रिवेणी सांगते तितक्याच उत्साहाने अंबर मान्य करतो. तब्बल पाच वर्षं दोघांना पाहिजे तसं आयुष्य दोघंही जगतात. पाच वर्षांनंतर त्यांना त्यांचा संसार, आयुष्य नीरस वाटायला लागतं.”
“तू काय माझ्या संसाराची कथा मांडतोयस का?” घन्याने हसत विचारलं.
“तुला मुलं आहेत की.” गंधारने त्याला भानावर आणलं.
“मुलं झाली. आधी कुठे होती? का झाली ते विचार.” घन्याने विचारायला सांगितलं; पण अल्पाने ओळखलंच मुलं का झाली असतील ते.
“आयुष्य नीरस व्हायला लागलं म्हणून?” घन्या अल्पाने काहीतरी महत्वाचा शोध लावल्यासारखा खुषीत खो – खो हसला.
“करेक्ट आणि त्या मुलाने आयुष्यात किती रंग भरला ते ठाऊकच आहे तुला.” स्वत:च्या टकलावर हात फिरवीत घन्या बराचवेळ हसत राहिला. गंधार त्याचं हसणं थांबण्याची वाट बघत.
“माझी कथा वेगळी आहे. हसणं थांबव.” घन्याने हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्याचा अभिनय केला तिकडे दुर्लक्ष करत गंधार बोलायला लागला.
“आयुष्य नीरस का होतंय याचा शोध घ्यायचं दोघंही ठरवतात आणि गेल्या पाच वर्षांत काय काय घडलं याचा पाढा वाचतात. गंधारने गोष्टीत घालता येतील असे प्रसंग सांगितले ते घन्याची घरी जायची वेळ होईपर्यंत.”
“पुढच्या आठवड्यात बसू या पुन्हा? या प्रसंगाबद्दल नीट बोलावं लागेल.” घन्या गंधार आणि अल्पाचा निरोप घेऊन निघून गेला. गंधारने भुवया उंचावून खुषीत अल्पाला विचारलं.
“काय वाटतं तुला? घन्याला आवडली असेल कल्पना?”
“न आवडायला काय झालं. आपल्या संसाराची कथा उघड्यावर मांडतोयस तू.” अल्पा लाह्यांसारखी तडतडली.
“आपला संसार? ही आपली गोष्ट वाटतेय तुला? कमाल करतेस बुवा तू! कुठूनही तू स्वत:ला कशी काय आणू शकतेस गं सगळ्या गोष्टीत?” गंधारने नवलाने विचारलं.
“आपल्याला मूल आहे?” तिने उलट विचारलं.
“त्याचा काय संबंध? काहीही असतं तुझं.” तिचा प्रश्नच त्याने उडवून लावला.
“गोष्टीत तू तेच लिहिलं आहेस.” वही त्याच्यासमोर नाचवली तिने.
“अगं बाई, त्या दोघांना मूल नको आहे, आपल्याला होत नाहीये यातला फरक कळतो ना तुला?” त्याने ती वही ओढली.
“हं,” नाईलाजाने अल्पाने हुंकार भरला.
“तुला ठाऊक आहे ना तू काय करतोस?” थोडीशी धग अजूनही शिल्लक होती.
“काय करतो?” गंधारने जोरात विचारलं. त्याला तिच्या आवाजात ’राम’ नाही हे कळलेलं होतं.
“चूक मान्य करत नाहीस!” अल्पाला गंधारच्या वर्मावर बोट ठेवायचं होतं.
“यात नवीन काय सांगतेयस. तो शिक्का तर तू कधीच मारला आहेस, ” खिजवत गंधारने हल्ला परतवला.
“तुझ्यावर मी का चिडते ते सांगतेच. एकच उदाहरण. साधंच. समज तुला मी म्हटलं, ‘अरे, हे इथे का ठेवलंयस?’ तर तू कधीच मान्य करत नाहीस की ती त्या वस्तूची जागा नव्हती. तुझं उत्तर काहीतरी तिसरंच असतं.”
“काय असतं?” गंधार आता वैतागला.
“तू म्हणणार, ‘दुसरीकडे जागा नव्हती. तुझं सामान होतं.’ ज्यात त्यात तू मला कशाला गोवतोस? सरळ करावं ना मान्य की तिथे ठेवायला नको होतं.” आव्हानात्मक स्वरात अल्पा म्हणाली.
“तुझं ध्येय मला नको त्या गोष्टी मान्य करायला लावणं हेच असतं. माझी चूक नसली तरी मी चूक कबूल करायची?” गंधारने अल्पापुढे तात्पुरती माघार घेतली होती पण कधीच हार पत्करलेली नव्हती. असली आव्हानं म्हणजे चणे – फुटाणेच होते त्याला.
“ध्येय नाही. जे आहे ते आहे. करावं ना मान्य.” अल्पा आपलं म्हणणं सोडत नव्हती.
“अरे पण तसं नसेल तर का करायचं उगाच कबूल?” त्याने तिच्या डोळ्याला डोळा भिडवला आणि अल्पा बिथरली.
“तू सोडू नकोस. तुझ्याबरोबर कोण घालवेल तोंडाची वाफ. मूर्ख कुठला, त्या कथेत आपल्या घरातलीच दिलेली उदाहरणं आहेत सगळी. जोडीला तुझ्या घन्या. तू आणि तुझे मित्र काढा चित्रपट. मांडा तमाशा लोकांसमोर.”
“अरे काय यार, घन्याला त्याच्या घरातला प्रसंग वाटतो, तुला आपल्या. माझ्या कल्पनेतून काही साकारू शकत नाही का?” आपल्या कल्पनाशक्तीला अल्पाने इतकं खुजं करावं हे गंधारला सहन होईना.
“मुलं असती तर त्यांनाही वापरलं असतंस. नावातही किती साम्य. ते बदलण्याइतकी तरी कल्पनाशक्ती लढव.” अल्पाने गंधारच्या कल्पनाशक्तीवर अजून एक घाव घातला. झाड तोडल्यासारखा.
“घन्याला त्याचं घर, तुला आपलं घर त्यात दिसलं. नावं कशी सारखी असतील जर दोन घरातले प्रसंग असतील तर?” तिच्या अकलेची त्याने कोशिंबीर केली.
“ते काय तू जमवलं असशील कसंही.” अल्पाने पुरीसारखं तोंड फुगवलं.
“म्हणजे माझ्यात कल्पनाशक्ती आहे असं म्हणतेयस ना?” गंधारने अल्पाला तिच्याच शब्दात पकडलं.
“मला तशी अजिबात शंका आलेली नाही.” अल्पा तशी कुणाच्या शब्दात सहज कधीच अडकली जायची नाही. गंधार तर काय घरचाच.
“कुजकट आहेस तू!” गंधारने त्याच्या वहीतला फाडून टाकलेल्या कागदाचा बोळा तिच्या अंगावर भिरकावला.
“पुरुषी बळ दाखवू नकोस हां तुझं. मी समर्थ आहे तुझा हल्ला परतवायला.” डोळे गरागरा फिरवलेच अल्पाने.
“कसा? परत माझ्या अंगावर कागदाचा बोळा भिरकावून. दाखव, दाखव तुझं स्त्री सामर्थ्य. फेक बोळा. पोचतो का बघ.” गंधारने स्त्री सामर्थ्याला डिवचलं.
“गळा दाबेन तुझा.” अल्पा फिस्कारली.
“दाब. मी पण दाबेन तुझा.” पुरुषांनी अशा मुस्कुटदाबीला समर्थपणे तोंड द्यायला हवं असं त्याला वाटायला लागलं होतं.
” नको मग आत्ता.” अल्पाने माघार घेतली.
“ठीके, ठीके. वेळ ठरवून दाबूया. आत्ता घे ती वही आणि वाच पुन्हा पुन्हा. आपल्या घरातलं उदाहरण आहेस म्हणालीस ना. बघ, काही प्रकाश पडला तर बदल तुझं वागणं.” गंधारने टेबलावरची वही तिच्याकडे सरकवली.
“मला नाही गरज. तूच वाच पुन्हा आणि सुधार तुझं वागणं.” अल्पाने ती वही त्याच्या दिशेने ढकलली.
“तुला वाटतंय आपल्या घरातले प्रसंग आहेत. मला नाही.” गंधारने वही टेबलावर जोरात आपटली. दोघांचंही ध्येय आता दुसर्‍याने वही वाचावी हे होतं. तयारीत दोघं टेबलाच्या दोन बाजूंना उभे राहिले. वही मध्ये.
“वाच हे.” एक डोळा तिच्यावर आणि एक डोळा वहीवर असं करण्याच्या नादात गंधारचे डोळे इकडून- तिकडे फिरत राहिले.
“तू डोळे गरागरा कशाला फिरवतोयस. माझ्याकडे बघ नाहीतर वहीकडे.” अल्पाने त्याला खिजवलं.
“तुझ्याकडे बघण्यापेक्षा वहीकडेच बघेन.” गंधारने अल्पाचा पाणउतारा केला.
“का मी काय तोंडाला काळं फासून उभी आहे? बघ माझ्याकडे.” अल्पाने गंधारला तिच्याकडे बघायला लावलं.
“अगं, आत्ता म्हणालीस वहीकडे बघ.” गंधार गोंधळला.
“आता म्हणतेय ना मी माझ्याकडे बघ. मग बघ.” दोघं एकमेकांकडे बघून गुरगुरत राहिले.
“तुम्हा बायका आम्हांला जोरूचा गुलाम करून टाकता.” तिला त्याने स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही पुरुष आम्हांला पायपुसणं.” पुरुष काही कमी नसतात हे लगेच अल्पाने सिद्ध केलं.
“दोन्ही गोष्टी एकाचवेळी कशा शक्य आहेत? मी जोरूचा गुलाम, तू पायपुसणं. एकाचवेळी?” गंधार कोड्यात पडला.
“फालतू विनोद नको करूस.” अल्पाने सुनावलं.
“मला प्रश्न पडलाय. भांडताना मी विनोद कशाला करेन?” गंधार गांगरला.
“सोडत नाहीस तू.” अल्पाला आता कंटाळा आला होता.
“काय सोडत नाही?” तो काय बोलतोय हे त्याचं त्यालाही कळेनासं झालं होतं.
“बघ, शेवटचा शब्द तुझा. झालं समाधान. गप्प बस आता.” अल्पालाही आता थांबायचं होतं.
“हे तूच बोललीस. शेवटचा शब्द तुझाच झाला.” गंधार हसत म्हणाला. अल्पाने खाणाखुणांनी गंधारचाच शब्द शेवटचा आहे हे त्याच्यावर बिंबवलं. मनातल्या मानात एकमेकांशी शब्दही न बोलण्याचा निश्चय करत दोघं आपापल्या कामाला लागले. ताणून द्यायची ठरवून अल्पाने अंग पसरलंही पण काही केल्या वही तिच्या डोक्यातून जात नव्हती. जितक्या जोरात तिने पलंगावर अंग टाकलं तेवढ्याच झटकन ती आडव्याची सरळ झाली. वाद घालून झाल्यावर शांतपणे वाचत बसलेल्या गंधारच्या हातातल्या वहीवर तिने चाल केली. वही घेऊन ती स्वत:च्या खोलीत धावली.

Pages: 1 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *