खोलीतून ती बाहेर आली तेव्हा चवताळलेल्या वाघासारखा गंधार इकडून तिकडे, तिकडून इकडे फेर्या मारत होता. त्याने डरकाळी फोडली.
“माझा प्राण घेऊन गेलीस तू खोलीत.”
“घे तुझी वही.” अल्पाने हळुवारपणे एका हाताने त्याचा हात धरला, तळवा सरळ केला आणि दुसर्या हाताने अलगद त्याच्या तळव्यावर वही ठेवली. गंधारचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. इतक्या प्रेमात का आली असेल अल्पा हे त्याला कळेना.
“मिळाला ना तुला तुझा प्राण. आता घे मोकळा श्वास, संसारात आणशील तू लवकरच सुवास.” गंधारच्या तोंडाचा ’आ’ वासला.
“हे मी लिहिलंय? या वहीत?” कितीतरी दिवसांनी अल्पाशी बोलत असतानाही गंधारचा स्वर मवाळ लागला. अल्पाशीच बोलतोय ना आपण की वहीशी? त्याने वही खाली टाकून पाहिली.
“लागेल रे तिला.” अल्पा कळवळून म्हणाली. आता मवाळ सूरही हरवला, शब्दच फुटेनात. काय चाललंय हे? अल्पाची तब्येत बिघडली की भास होतायत?
“आता घे मोकळा श्वास, संसारात आणशील तू लवकरच सुवास ही मला सुचलेली काव्यपंक्ती आहे गंधार” मधाळ आवाजात अल्पा म्हणाली.
“तू कविता करायला लागलीस?”
“तुझी वही वाचून, चावून चावून चोथा केली; शब्दाशब्दांतून मी माझी भावना व्यक्त केली.” तत्काळ दुसरी काव्यपंक्ती अल्पाने सादर केली.
“अल्पा, मला माफ कर पण माझ्या वहीची अशी वाट नको ना लावूस. तू भांड ना अगदी मनसोक्त भांड. पाहिजे तर मी एक शब्द बोलणार नाही, माझ्या सगळ्या चुका मान्य करेन. तू भांड पण कविता करू नकोस.” गंधार हैराण झाला.
“नको ना, नको अशी आर्जवं करू नकोस, तुझ्यातल्या तुला शरमेने लाजवू नकोस.” तिसर्या ओळीला गंधारने कानावर हात दाबून धरले. इतक्या भावनावेगाची त्याला कधी सवयच नव्हती. कसंबसं स्वत:ला सावरत पडलेली वही त्याने उचलली आणि तो त्याच्या खोलीत घुसला. अल्पालाही आपल्याला इतक्या पटापट कविता कशा सुचल्या तेच उमगेनासं झालं. तिलाही एका वहीची आवश्यकता भासायला लागली. ती गंधारच्या खोलीत गेली. वहीत डोकं खुपसलेल्या गंधारकडे तिने पाहिलं आणि दाराला टेकून मादक हावभाव करण्याचा प्रयत्न केला. गंधारला तिच्या आगमनाची चाहूलही लागली नाही. अल्पाचा खणखणीत आवाजात खोलीत घुमला आणि त्याने दचकून मान वर केली.
“वाच तुझी कथा मग कळेल तुला माझी व्यथा, जुळतील आपले सूर पुन्हा, शिकशील तू पाहून माझ्या खाणाखुणा.”
“अल्पाऽऽऽ” त्याच्या आवाजातल्या काकुळतीने तिने तिथून काढता पाय घेतला.
घन्याच्या हातात कथेचं बाड गंधारने ठेवलं.
“घन्या, तुला वाटतं आम्ही एकमेकांना आदर दाखवत नाही? रिस्पेक्ट रे.” घन्या अल्पाकडे बघतच राहिला.
“तुला काय उत्तर पाहिजे ते सांग. मी देतो. तू मला पेचात का पाडतेयस.” घन्याला या घोळात अडकायचं नव्हतं.
“उत्तर दे.” अल्पाने आवाज चढवला.
“उत्तर दे रे तिला. नाहीतर वही ओढते ती.” गंधारने वही घट्ट धरली.
“मला तुझी फिल्म करायची आहे. तू सांग मी काय उत्तर देऊ?” घन्यानेही वही घट्ट धरून गंधारला पेचात पाडलं.
“किती रे शहाण्या मुलासारखं वागता तुम्ही. हे बघा. वही सोडा. मग मीच तुम्हाला काहीतरी सांगते.” आर्जवाने अल्पा म्हणाली. दोघं तिच्याकडे तसेच बघत राहिले.
“वही सोडा.” आवाजातलं आर्जव बाजूला ठेवून ती ओरडली. दोघांनी निमूटपणे तिच्या हातात वही दिली.
“बसा.” अल्पाने हुकूम सोडला.
“तू काय आम्हाला वहीच्या बळावर ओलीस धरतेयस का?” घन्या चाचरत म्हणाला. अल्पाने उत्तर न देता बसण्याची खूण केली.
“अल्पा, मी तुझा नवरा नाही हे माहीत आहे ना तुला?” गंधारच्या बाजूला घाबरून बसत घन्याने विचारलं.
“घन्या, मी तुला गंधारच्या फिल्मची जाहिरात कशी करायची त्याची एक भन्नाट आयडिया देणार आहे.” त्याच्या पानचट विनोदाकडे दुर्लक्ष करत अल्पा म्हणाली.
“असतात अगं आपल्याकडे त्यासाठी लोक. तू कशाला त्रास घेतेस.” घन्याला पुढच्या संकटाची कल्पना आल्यासारखं त्याने म्हटलं.
“काव्यपंक्ती?” गंधारने हवालदिल होऊन विचारलं.
“नाही. आधी ऐका तर मी काय सांगते ते. पाहिजे तर बटाटेवडे करते.” अल्पाने लालूच दाखवली पण दोघे या वेळेस बधले नाहीत.
“नको तू सांग पटकन काय सांगत होतीस ते.” दोघंही एकदम म्हणाले.
“सांगते. त्रिवेणी आणि अंबर, गंधारच्या कथेतले. त्यांचं आयुष्य मला माझ्याच संसारासारखं वाटलं. घन्याला वाटलं ती त्याच्या घरातली कथा आहे. वाटलं होतं ना तुला घन्या?” तिने नुसतंच विचारल्यासारखं केलं. घन्याही ढिम्मासारखा बसला होता. त्यानेही हूं का चूं केलं नाही.
“तर ही कथा प्रत्येकाला आपली वाटू शकते. मला तर ती इतकी माझी वाटली की मी बदललेच.” अल्पा बदलली आहे? गंधारला प्रश्न पडला पण त्याने वेगळाच प्रश्न विचारला,
“तू कविता करायला लागलीस ते म्हणतेयस का?” गंधारने विचारलं
“अल्पा, तू मित्राची बायको आहेस म्हणून तुझी कविता नको हा माझ्या माथ्यावर मारू.” घन्याने एकदम अंग बाजूला काढलं.
“मी तुझीपण मैत्रीण आहे.” तिने दोघांच्या मनावर ठसवलं आणि आपलं बोलणं चालू ठेवलं.
“त्या कथेत ना मी स्वत:ला बघितलं. माझ्या लक्षात आलं की मी गंधारला माणूस म्हणून जो रिस्पेक्ट द्यायला हवा, आदर दाखवायला हवा तो दाखवतच नाही.”
“काय सांगतेस काय? मलाही तसंच वाटायचं अगं पण मी तुला ते सांगायला घाबरत होतो. बरं झालं तूच कबूल करतेयस.” गंधारचा आनंद गगनात मावत नव्हता.
“उगाच उड्या मारू नकोस. तूही मला रिस्पेक्ट दाखवत नाहीस.” अल्पाने गंधारचा आनंद काबूत आणला.
“आता मध्येमध्ये बोलू नका. माझं बोलून झालं की विचारा प्रश्न. ठिकए?” दोघांनीही निमूट माना डोलवल्या.
“माझ्या जेव्हा हे लक्षात आलं ना तेव्हा मी एक प्रयोग केला. ठरवलं, गंधारच्या रागाला प्रेमाने जिंकायचं.” अल्पा भावुक होऊन म्हणाली.
“ए, जुना मराठी चित्रपट बघतोय असं वाटायला लागलंय.” घन्याने तिच्या भावुकपणाला आवर घातला.
“अरे, तसंच झालं. गंमत म्हणजे शब्दाला शब्द वाढायचा आमचा नेहमीच. वाद घालायचा नाही असं ठरवून मी गंधारच्या कुसकटपणाला प्रेमानेच न्हाऊ घालायचं ठरवलं.”
“कधी करत होतीस तू हे?” गंधारने अचंब्याने विचारलं.
“तुला सुगावा लागूच दिला नाही मी.” अल्पाने फुशारकी मारली आणि ती पुढे बोलत राहिली. “असं दोन – तीन वेळा झाल्यावर गंधारलाही जाणवलं असेल की तो उगाच भांडतो तरी मी वादाला वाद, तोंडाला तोंड देतच नाही. आपोआप आमचे वाद कमी झाले. गंधार तुझ्या लक्षात येतंय का? दोन वर्षांत तू मला कधी आपणहून ’ए, आत्त्ता घरी येऊ का, कधी एकदा घरी येऊन तुला माझ्या कवेत घेतोय असं झालंय, माझी अपू…’”
“थांबव. अजाण बालकासमोर तुमच्या प्रणयाच्या प्रसंगांचं वर्णन नको गं करू.” घन्याच लाजेने लालेलाल झाला.
“उदाहरण देत होते रे! तर असे काही मेसेज पाठवले नव्हते याने ते यायला लागले अचानक. अजूनपर्यंत त्याला कळलेलंच नाही ते आता सांगते. गंधारही माझ्याशी वाद घालेनासा झालाय.”
“तुम्ही परत प्रेमात पडलाय ते छान झालं पण याची कशी जाहिरात करायची? तुझी ती भन्नाट आयडिया आलीच नाही अजून.” घन्याला आता स्वत:च्या घरी जावंसं वाटायला लागलं होतं, आपणही आपल्या बायकोला आदर दाखवावा अशी अंतःप्रेरणा व्हायला लागली होती. त्याला अगदी घाई झाली.
“मी तुझ्या प्रेमात होते पण आता तू मला आवडतोस. I love you but I have started liking you. दोन्ही वापर जाहिरातीसाठी. बघ, लोंढेच्या लोंढे येतील फिल्म बघायला. ” अल्पा हे सांगत होती घन्याला पण तिचे प्रेमाने ओथंबलेले डोळे खिळले होते गंधारवर. गंधार घन्या तिथे आहे हेच विसरला.
“मी तुझ्या प्रेमात होतो पण आता तू मला आवडतेस. I love you but I have started liking you क्या बात है अल्पा.” गंधारला अल्पाकडे जाताना घन्याने पाहिलं तेव्हाच पुढच्या प्रसंगाची कल्पना त्याला आली. आता डोळ्यांसमोर जे घडेल ते पाहायचं की नाही हे त्याला ठरवता येईना. घन्याने वही डोळ्यासमोर धरली आणि तो जोरात ओरडला,
“I love you but I have started liking you. I love you but I have started liking you.”
I have read your article carefully and I agree with you very much. This has provided a great help for my thesis writing, and I will seriously improve it. However, I don’t know much about a certain place. Can you help me?