ऊन डोक्यावर आलं होतं. तरी त्याचा डोळा उघडत नव्हता. आजुबाजूची वर्दळ केंव्हाच वाढली होती, पण त्याची त्याला कसलीच कल्पना नव्हती. आजुबाजूच्या दुकानदारांनी सकाळच्या सुमारासच दुकानासमोरची झाडलोट करुन कचरा कोप-यात लोटला होता. वा-यानं तो त्याच्या अंगावर उडत होता. कागदाचे तुकडे उडून त्याच्या हातापायाला खेटत होते, बोटभर वाढलेल्या दाढीत वा-याच्या झोताबरोबर आदळत होते व वारं कमी होताच अवसान गळाल्याप्रमाणे तिथेच खाली पडत होते. डावा गुडघा छातीजवळ करुन तो पालथा पडला होता. त्याचे कपडे; कधी काळी घातलेल्या कपडयांचे अवशेष; तेल मातीत मळून मेणचट झाले होते. केसाच्या तर जटा झाल्या होत्या… पायातल्या विजोड, ठिकठिकाणी दोरीनं, मेणकापडानं बांधलेल्या चपला त्याच्या जवळच पडल्या होत्या. त्याच्या जवळच्या मळकट गाठोडयात कितीतरी गोष्टी होत्या… त्यानं जमवलेल्या फुटक्या प्लास्टीकच्या बाटल्या… कपडे… चिवडा, भजी यांच्या तेलाने काळवंडलेल्या पुडया. आजुबाजूची कुत्री तो बेसावध असलेला पाहून त्याच्या गाठोडयात तोंड घालत होती . गाठोडं लुचत होती. त्यासाठी एकमेकात भांडत होती. भुंकणं वाढताच एखादा दुकानदार ‘हा S S ड’ असा आवाज करुन त्यांना हाकलत होता.

किती गजबज होती अवतीभवती… कुणी पणत्या खरेदी करत होतं. कुणी आकाश दिवे, कुणी कपडे, मिठाई तर कुणी फटाके. सगळयांच्या मनात एक जल्लोष भरला होता… उत्साह आनंद… प्रत्येकजण धावत होता. आपापल्या परीने, ऐपतीने. त्याला ओलांडून, त्याला वळसा घालून, त्याच्यावर तुच्छ कटाक्ष फेकून” हं वेडा… !” असा उद्गार फेकून.

त्याला खूप शांत झोप लागली होती… खूप दिवसांनी. अशात कितीतरी दिवस तो झोपलाच नव्हता… जागाच; टक्क जागा… ! जागा असला की तो सतत बेचैन असायचा. शरीरातल्या सगळया हालचालीची त्याला काळजी वाटायची; सतत. त्याला वाटायचं, ह्दय धडधडतंय… शरीरात लाखोकरोडो रक्तवाहीन्या सापाच्या गतीने सळसळतायत… वळवळतायत. छातीचा भाता सारखा वर खाली होतोय. छातीत दुखतं; कधी डोकंच भणभणतं. कधी घाबरायला होतं. सारखी भूक लागते, तहान लागते आणि आश्चर्य म्हणजे वेळेनुसार काळानुसार स्थळानुसार ही भूक, तहान बदलत राहते… पण साली संपत नाही; कधीच नाही। भूक भागली म्हटलं, की थोडयावेळाने पुन्हा भूक, तहान मग त्यासाठी तडफड… तळमळ… तगमग…
त्याला वाटलं की, पोटातलं आतडं एका विशाल महाकाय अजगराप्रमाणे आपल्यासमोर तोंड वासून उभं आहे आणि आपण त्याच्या पुढे भणंगासारखे उभे आहोत. पुन्हा त्याला वाटलं की, हे आतडं लांबवर पसरलंय; चक्क आकाशगंगेच्या पलिकडेपर्यंत. त्याचा मोठा चौपदरी रस्ता झालाय आणि आपण लंगडत त्यावरुन चाललोय; हातात भिकेची झोळी घेऊन; पण आजुबाजूचे पण त्याच रस्त्यावरुन तसेच चाललेयत; एकटेच. मी… ते… तो… झाडं वेली… पक्षी… प्राणी… सगळे सारखेच. भुकेजलेले! पळतायत… अखंडपणे… सगळया धावत्या गर्दीतून आरपार त्याला फक्त धगधगती भूक दिसत होती… जन्म… जगणं… मरणं सगळंच अटळ… पण सगळे मरण्यासाठी जगतात का जगण्यासाठी मरतात ? हे कोडं त्याला कधीच उलगडलं नाही।
त्याला या पळण्याचा, धावण्याचा कंटाळा आला होता. मग एक दिवस त्यानं ठरवलं की, आपण धावणं वाढवण्यापेक्षा भूकच कमी केली तर… ? तसं त्यानं ठरवलं… पाठचं जग मात्र तो थांबलेला पाहून त्याच्याकडे पाहून हसलं… त्यांनी त्याची निंदा केली, तुच्छ मानलं त्याला… आणि गर्दीतून त्याला बाजूला लोटून त्याला ओलांडत सारे पुढे निघून गेले. त्यातल्या काहींना तर वाटलं, बरं झालं गर्दीतला एकजण कमी झाला, एक पाऊल आपल्याला पुढे पळता येऊ लागले. त्याला त्यांचं काहीच वाटलं नाही; किंबहुना हे त्यांच्या गावीही नव्हतं… त्याचे सगेसोयरे… आप्तस्वकीय… पत्नी, मुलं यांनी त्याला झिडकारलं… त्यांनी त्याचा धिक्कार केला; याचंही त्याला काही वाटलं नाही. किंबहुना आताशा हे सगळं त्याच्यापर्यंत पोचतच नव्हतं. आजवर या सा-यांच्या नजरांनीच त्याला घोळसलं होतं… रक्तबंबाळ होईपर्यंत… जोपर्यंत तो धावायचा तोपर्यंत ही सगळी जंगली कुत्र्यासारखी त्याच्या मागं धावायची, त्याचे लचके तोडण्यासाठी; पण जेंव्हा तो थांबला तेंव्हा त्यांनाही त्याचे लचके तोडल्यावर त्याच्याबद्दल घृणा वाटू लागली. मेलेली शिकार श्वापदांना चालत नाही.

उन्हामुळं त्याची कानशिलं तापली होती… अचानक कुठून एक हातगाडीवाला येऊन त्याला खेटला व त्याच्या उजव्या हाताच्या बोटावरुन हातगाडीचं एक चाक गेलं, तसा तो कळवळून ओरडला… बोट फुटलं होतं त्यातून रक्ताची धार लागली होती. एकदम भानावर येऊन त्यानं आजूबाजूला पाहीलं. भक्क उजेडातली ती लगबग पाहून त्याला काहीच वाटलं नाही. तो त्या शर्यतीत अगदी प्रेक्षक म्हणून सुध्दा सामिल नव्हता… त्यानं भळभळत्या बोटाकडं पाहीलं… आता त्याच्या हातातून रक्त मात्र धावत होतं… जणू मघाचा अजगर आपल्या सहस्त्र जिव्हा बाहेर काढून सळसळतोय. म्हणजे त्याचं धावणं संपलं नव्हतं… त्यानं ते थांबवण्याचा प्रयत्न केला. जवळचा एका पॉलीथीनच्या पिशवीचा तुकडा घेऊन त्यानं त्या बोटावर गुंडाळला तसा तो तुकडा लालभडक झाला आणि फुगा फुगावा तसं त्यात रक्त जमा झालं. काही वेळानं थेंबाथेंबानं त्यातून ओघळू लागलं. त्याच्या विजोड चपला, गाठोडं… त्यातून डोकावणा-या निरुपयोगी वस्तु चिवडया भज्याच्या कळकट्ट पुडया यासा-याचा त्याला राग आला. त्यानं ते उचललं आणि भिर्रदिशी भिरकावून दिलं… गाठोडयातल्या पुडया, वस्तु रस्त्यावर पसरल्या. तशी कुत्री तिकडं धावली आणि आजूबाजूची माणसं त्याच्यावर धावली. एका दोघांनी त्याला लाथा घातल्या आणि हाकलून लावलं… पण मी तर निघालोच होतो. मग त्यांच्या हाकलण्याला काय अर्थ ? त्याला याची गम्मत वाटली. वाटलं किती वेडे आहेत हे… त्यांच्या वेडेपणावर तो मनमुराद हसला. चालताना त्याला जाणवलं की आपलं सारं अंग ठसठसतंय… डोक्यांत तर कुणीतरी खिळे ठोकतंय असं त्याला वाटलं. कुणीतरी मानेवर, पोट-यांवर मणभर ओझं बांधलंय आणि ते त्यांना ओढता ओढल्या जात नाहीय. त्याला या सगळया व्याधीचं हसू आलं तसा तो मोठयानं हसला… आणि हसतच राहिला… कितीतरी वेळ…

रस्त्यावर जाणारे येणारे त्याच्याकडे चमत्कारीक तुच्छ नजरेने पाहत होते. त्यांच्या नजरेची त्याला मजा वाटू लागली होती. किती वेगवेगळी माणसं… वेगवेगळे रंग, आकार, छोटी मुलगी, मोठी मुलगी, छोटा मुलगा, मोठा मुलगा, बाप-भाऊ-बहिण यांना नातेवाईक म्हणायचं… मित्र-संबंधी-सगेसोयरे यांच्यासह सगळे बाजारात आले होते… दिवाळी साजरी करण्यासाठी खरेदी करायला. पैसे घालून नजरेची, आतडयाची भूक भागवत होते आणि तो… ? तो मात्र दूर कोप-यात बसून एकही पैसा न देता सारी मजा बघत होता. फुकटात
किती गम्मत आहे नाही? टिंबाला टिंब जोडत जायचं… एक रेषा तयार होते… रेषेला ठराविक आकार दिला की अक्षरं त्यातून नेमके अक्षर, वर्ण… स्वर, व्यंजन… त्यातून नेमकी अक्षरं जवळ केली की त्याचे अर्थपूर्ण शब्द आणि त्या शब्दांना सजवून वाक्य तयार करायचं… त्यातून भाषा संवाद… आरोह, अवरोह. पण मुळात भावना डोळयांनीच उमगली तर हा सारा आटापिटा कशासाठी… ? ज्यांना डोळयांनी कळत नाही त्याच्यासाठी टिंबाला टिंब जोडत जायचं. आयुष्याची निरर्थक रेषा संपेपर्यंत नाती, कुटूंब… माणसं, कर्तव्य,एकटेपणाच्या भितीपाठी आपसूक आलेला सहवास, संघटन, सहजीवन… ही सगळी शब्दावली अशीच टिंबांसारखी जोडत बसायचं; अर्थपूर्ण वाक्य होईपर्यंत. प्रत्येकाचं वाक्य निराळं… अर्थ निराळा… किती हा आटापिटा ? वेडे कुठले ? त्याला पुन्हा एकदा हसू आलं… पुन्हा तो मनमुराद हसला; अगदी मोठयाने।त्याचं हसणं पाहून काहीजण दचकले, विस्मयचकीत झाले, काहीजण अकारण सावध झाले तर काहीजण फिदी फिदी हसले, साला वेडा पागल म्हणून.

एकाच हसण्याच्या असंख्य प्रतिक्रिया. तसं त्याला पुन्हा हसू आलं… पुन्हा-पुन्हा. हे सारं पुन्हा पुन्हा आठवून त्याला पुन्हा पुन्हा हसू येत होतं आणि तो हसतोय, हे बघून आजूबाजूचे सगळेजण त्याच्यावर हसत होते. हसून हसून तो थकला. त्याचं दाभाड दुखू लागलं…आणि त्या दुखण्यानं त्याच्या डोक्याचं आणि अंगाचं दुखणं पुन्हा त्याला जाणवलं… आणि पहिली अस्वस्थता पुन्हा जाणवली तितक्याच तीव्रतेनं… धावतानाची… हसून हसून त्याच्या श्वासाला गती आली होती… एक क्षण तो गुदमरला. ही तगमग तशीच होती धावताना लागलेल्या धापेसारखी. पुन्हा त्याला तीच तगमग जाणवली… तीच तडफड, तीच धावाधाव… त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यातून फुप‹फुसापर्यंत वळवळत सरपटत जातोय असं त्याला वाटलं. पुन्हा तोच अजगर आपल्या सहस्त्र जिव्हा विस्फारुन त्याच्या पुढयात आवासून उभा राहिला. जगण्यासाठीची ही किमान धावाधाव अपरिहार्य आहे आणि त्यातून सुटका नाही. त्यावर विजय मिळवणं पण शक्य नाही. हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याला खूप रडू आलं; खूप मनातून… छाती फाडून रडावं असं त्याला वाटलं. त्याच्या हसण्यावर विविध प्रतिक्रिया देणारे भवतालचे मात्र त्याच्या रडण्यावर चिडले… हो फक्त चिडले. एकसारखेच. इथे मात्र प्रतिक्रिया वेगळया नव्हत्या. त्यांना त्याचं रडणं अमंगळ, अशुभ वाटलं होतं. त्याला ते सारे तिथूनही हुसकून लावू लागले. त्याचं त्याला आश्चर्य वाटलं… का बरं ? हसणं, रडणं, या सा-या स्वाभाविक आणि उत्स्फुर्त प्रक्रिया आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि याने व्यक्त केल्या तर मग व्यक्तीपरत्वे दोन्ही बद्दल विरुद्ध प्रतिक्रिया का ? त्याचा डोकं पुन्हा बधीर होऊ लागलं. डोक्याच्या खोल आत काहीतरी सळसळत पाझरतंय असं त्याला वाटलं. जाऊ देत वेडे आहेत सगळे… या विचारानं त्याला पुन्हा हलकं वाटलं.

एखादया प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही की त्याचं डोकं सुन्न व्हायचं। मग तो त्या विचारात सुन्न बसायचा आणि त्याच सुन्नतेत हरवायचा… कितीतरी वेळ. आणि मग ब-याचदा आपण काय विचार करत होतो, हेच त्याला आठवायचं नाही आणि नंतर मग त्या विस्मरणामुळं आपोआपच त्याला हलकं हलकं वाटायचं… परमेश्वरानं त्याला दिेलेली ही देणगी असावी.

तिथून तो उठला. नेहमीच्या रस्त्यावरुन भटकत असताना एका हाटेलासमोर तो उभा राहीला… आताशा त्याला भूक पण लागत नव्हती. तो का उभा राहीला हे त्यालाही आठवत नव्हतं, पण हाटेलातली लगबग त्याला मजेदार वाटत होती… सगळे घाईत. खाऊन पैसे देणारा, पैसा घेणारा, खायला देणारा सगळेच… कुणीच कुणाशी बोलत नव्हतं… कितीतरी वेळ तो हेच पाहत उभा होता… तसा हाटेलातला एक कामगार हातात कसलंसं तेलकट कागदी पुडकं घेऊन त्याच्याकडे आला. त्याच्या हातात बळंच ते कोंबून,” हं, चल आता पुढं” असं म्हणाला. त्याच्या खूप उशिरा लक्षात आलं. पण मुळात तो भूक लागलीए म्हणून समोर उभा नव्हताच. मग ? त्या कामगाराला आपण आशाळ भूतासारख पोटातल्या भुकेच्या आगीपोटी इथं उभं आहोत असं वाटलं की काय? या विचारासरशी त्यानं तो कागदी पुडकं झिडकारलं… तसं ते खाली पडलं… मातीत. त्या परतणा-या कामगाराला हे पाहून त्याचा राग आला… आणि त्यानं त्याच्या कमरेत लाथ घातली, ” माजलेत साले, पुन्हा इकडं आलास तर तंगडी तोडीन. चल उठ इथून”, लाथेमुळे कडमडलेल्या त्याच्याकडे रागाने पाहत तो म्हणाला.

रस्त्यावर मी उभा राहीलो तर हा माझं तंगडं मोडणार?हा रस्ता याचा कि हे तंगडं यांचं… ? कि मला भूक लागली आहे हा विचार याचा ?कि मला भूक लागली नाही म्हणून मी माजलो? कसा? प्रश्न, प्रश्न, प्रश्न. प्रश्नाला प्रश्न जोडत जायचं. त्याला उत्तराचं शेपूट लावण्याचा प्रयत्न करावं तर आपल्याच उत्तराचं शेपूट खाऊन परत उत्तराच्या शोधात सळसळणारे, गर्दीत धावणारे, उरातून धपापणारे, खरेदी करणारे, गाडयातून फिरणारे असंख्य अजस्त्र अजगर त्याच्या समोर वळवळताना त्याला दिसले त्या सा-या समोर त्याच्या पोटातला अजगर त्याला थिटा वाटू लागला. त्याला पुन्हा हसू आले आणि हसत तो पळत सुटला…

सगळयांनी जाणा-या त्याच्या पाठमो-या आकृतीकडं पाहत एक तुच्छतेचा कटाक्ष भिरकावला, हुंकार भरला ” हं… वेडा… पागल साला ”
तो मात्र हसतच होता मनमुराद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *