‘सूर्यकांssत…’
सायकॉलॉजिस्टच्या मदतनीसाची हाक.
सूर्यकांत कसली तरी फँटसी मनात घोळवत कॉफी पीत होता. तो दचकून बघायला लागला.
आपला नंबर आलेला आहे, काउन्सेलरला भेटायला जायचं आहे हे लक्षात येऊन तो उठला.
कॉफीचा कागदी कप कचरापेटीत टाकून काउन्सेलरसमोर जाऊन बसला.
नेहमीची चर्चा. समुपदेशक प्रधान मॅडमबरोबर.
“मागच्या महिन्यात काय काय झालं? व्यायाम करतोयस का रोज ? कामाला जातोयस का रोज ?” वगैरे वगैरे…
“ रोज जातोय मी कामाला. आठ तास असतो तिथे. वैतागवाणं काम आहे. ही असली नोकरी सहा महिने करून बँकेत पैसे साठवलेत मी. आता नोकरी सोडून घरी बसलो तर त्यात काही abnormal आहे का ?”
सूर्यकांत म्हणाला. आपला वैताग व्यक्त करणाऱ्या टोनमधे.
केवळ आईने आग्रह धरलाय म्हणून येतोय मी तुमच्याकडे असा भाव होता त्याच्या चेहऱ्यावर.
Normal, abnormal बद्दल काही न बोलता समुपदेशक प्रधान मॅडमनी विचारलं,
“ घरी बसून काय काय करणार आहेस ?”
त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सूर्यकांत म्हणाला,
“ मला आवडणारं, चॅलेंजिंग असं काही काम मिळालं तर रोज घराबाहेर जाऊनही मी करेन ते.
उगाच घरी बसून रहायला मी काही डिप्रेस्ड वगैरे झालेलो नाही. आईला आणि दादाला हे समजत नाही. मिड्लक्लास घाबरटपणा आहे त्यांच्यात… मी नोकरी सोडून देतोय म्हणजे माझ्या डोक्यातच काहीतरी गडबड झाली आहे असं वाटतय त्यांना. ”
प्रधान मॅडम काही बोलल्या नाहीत. त्यांनी त्याला एक कार्ड दिलं.
“ह्या वसुधाताईंना जाऊन भेट. त्यांच्याकडे काहीतरी काम आहे. नाटक की पटकथा असं काहीतरी लिहून हवंय त्यांना.”
सूर्यकांत गोंधळून बघायला लागला त्यांच्याकडे. हे काय मधेच? नाटक लिहायचंय?
“ पुढच्या वर्षी, ९७ ला, पन्नास वर्षे पूर्ण होताहेत ना ? स्वतंत्र भारताची पन्नास वर्षे. १९४७ ते १९९७? त्याच्याबद्दल आहे काहीतरी. ” लहान मुलाला समजावून सांगतात तसं बोलल्या प्रधान मॅडम.
सूर्यकांत चकित झाला.
प्रधान मॅडम आपल्याला उपदेश करतील, दोन वर्षांमधे तीन नोकऱ्या का सोडल्या हे विचारतील, दारू पिण्याबद्दल विचारतील, गोळ्या घ्यायला सायकियाट्रिस्टकडे पाठवतील असं त्याला वाटत होतं.
तो त्या कार्डाकडे पहात राहिला.
‘ वसुधा शिर्सेकर. सक्षम महिला मंच ’ असं छापलेलं होतं त्या कार्डावर.
****************************************
मुंबईच्या एका उपनगरातली, मॅनग्रोव्हचे जंगल असलेल्या खाडीजवळची झोपडपट्टी. जुनी असणार. लहान लहान दुकाने, दवाखाने वगैरे होते वस्तीत.
वस्तीला लागून एक मैदान होतं. त्याच्या शेजारी एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर पाटी दिसत होती.
सक्षम महिला मंच.
इमारतीबाहेर एक वॉचमन बसला होता. साध्याच कपड्यातला. वयस्कर.
कार्ड बघितल्यावर आणि नाव सांगितल्यावर त्याने सूर्यकांतला सक्षमच्या कार्यालयात पाठवलं.
एक मुलगी इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरवर काहीतरी टाईप करत होती. तिने सूर्यकांतला बसायला सांगितलं.
ताई पाच मिनिटांमध्ये येतील असंही सांगितलं.
जवळच्या फॅक्स मशीनमधून एक छापील कागद बाहेर येत होता. त्याच्याकडे पहात सूर्यकांत बसून राहिला. नंतर त्याने त्या मुलीकडे पाहिलं. काळीसावळी होती, वय वीसच्या आसपास असणार, चेहरा तसा छान होता; पण गरीब वस्तीतल्या मुली असतात तशी होती. हडकुळी आणि सपाट.
आपण आलोय कशासाठी आणि आता कसला विचार करतोय हे जाणवून सूर्यकांतला गंमत वाटली.
इतक्यात एक बाई आत आल्या. सूर्यकांतने त्यांच्याकडे पाहिलं.
पन्नाशीच्या बाई. चेहरा थोडासा मराठी सिनेमातल्या सुलोचनासारखा.
त्या आल्यावर अत्तराचा मंद सुगंध दरवळला. ती मुलगी लगेच म्हणाली, “ताई, हे आलेत तुम्हाला भेटायला. प्रधान मॅडमनी सांगितलं होतं ना !”
वसुधाताई प्रसन्न स्मित करून म्हणाल्या, “ हो, कुमुद म्हणाली होती मला. सूर्यकांत ना तुमचं नाव?”
मग वसुधाताईंनी त्याला काम सांगितलं. एका इंग्रजी बालनाट्याचा हिंदी अनुवाद करायचा होता किंवा adaptation करायचं होतं.
“वस्तीतल्या मुलांना समजेल अशी हिंदी भाषा पाहिजे. पुस्तकी नको.” असं ताई म्हणाल्या.
असले काही अनुवाद आपण केले आहेत आणि हे आठवड्याभरात लिहून होईल असं सूर्यकांतने सांगितलं.
ह्या कामाचे पैसे किती द्यावेत ह्यावर काही चर्चा झाली.
“पैसे नकोत, मला आवडेल हे लिहायला. पैसे कमवायला मी एक नोकरी करतोय, ” असं सूर्यकांत म्हणाला.
वसुधाताई हसल्या. त्या म्हणाल्या, “आम्ही थोडंसं मानधन देऊ आणि तुम्ही इथे याल तेव्हा कॉफीसुद्धा देऊ.”
कॉफीसुद्धा देऊ हे ऐकून ती मुलगी छानसं हसली.
“तुम्हाला फिल्टर कॉफी आवडते असं कुमुद म्हणाली होती, ” ताई सूर्यकांतला म्हणाल्या.
कुमुद म्हणजे सायकॉलॉजिस्ट प्रधान मॅडम.
फिल्टर कॉफी आवडते हे सूर्यकांतने एकदा – काउन्सेलिंग सेशन सुरू नसताना- गप्पा मारताना, त्यांना सांगितलं होतं.
तमिळ कुटुंबांची काही घरं होती वस्तीत. त्यांच्याकडून फिल्टर कॉफी आली. कॉफी पिताना सूर्यकांतला ताईंकडून त्यांच्या संस्थेचा इतिहास समजला. बावीस वर्षांपूर्वी ह्या वस्तीत त्यांनी काम सुरू केलं होतं.
म्हणजे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला.
“इतकी वर्षे एकाच वस्तीत काम करण्यात कोणाला का इंटरेस्ट असेल ?” सूर्यकांतच्या मनातला प्रश्न.
तो काही बोलला नाही. फिल्टर कॉफी छान होती. घरगुती, दाक्षिणात्य जायका असलेली.
कॉफी पीत, संस्थेचं माहितीपत्रक वाचत राहिला.
*****************************************
मुंबईत जी काही थोडी इराणी हॉटेलं उरलीत त्यांपैकी एक छानसं हॉटेल. सूर्यकांत बसला होता त्याच्या आवडत्या जागी. समोर छानशी बाग दिसत होती. मसाला ऑम्लेट खात तो सौरभची बडबड ऐकल्यासारखं दाखवत बागेकडे पाहत होता.
“ट्रम्पतात्या निवडून येणारच होता रे. मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. तो हुशार आहे, लोकांना काय आवडतं हे त्याला नीट समजलंय.”
मुंबईतली मस्त सकाळ होती. हिवाळ्यातली.
असला मौसम असताना काहीतरी पॉलिटिकल फंडे सांगत होता सौरभ. अमेरिकेत हिलरीला हरवून डोनाल्ड ट्रम्प निवडून आला होता त्याबद्दल.
सूर्यकांतला एक तर अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता आणि सौरभ चांगला मित्र असला तरी फालतू पत्रकार आहे, इकडचं तिकडचं वाचून टेपा लावत असतो, असंही त्याचं मत होतं.
इतक्यात एक आजोबा त्यांच्या टेबलाकडे आले. पांढऱ्या मिशा आणि पांढरे केस. साधे पण इस्त्री केलेले कपडे.
“सूर्यकांत…?” असं त्यांनी सौरभला विचारलं. सौरभने सूर्यकांतकडे बोट दाखवलं.
ह्या आजोबांचं आपल्याकडे काय काम असू शकेल, असा चेहरा करून सूर्यकांतने त्यांना बसायला सांगितलं.
“ मी जयराज सावंत. सध्या चिपळूणला राहतो. पूर्वी मुंबईत नोकरी करायचो. ” आजोबा म्हणाले.
सूर्यकांतचा चेहरा अजूनही गोंधळलेलाच होता.
ते बघूनच बहुदा आजोबा लगेच म्हणाले, “ वसुधाताईंवर एक पुस्तक लिहितोय मी. त्यांच्या बहिणीने मला सांगितलं तुमचं नाव.”
सूर्यकांतला छान वाटलं हे ऐकून.
“ नंदामावशीने सांगितलं तुम्हाला? मला भेटायला सांगितलं?” त्याने किंचित हसून विचारलं.
सावंत आजोबा हो म्हणाले. त्यांना बरंच काही विचारायचं होतं.
वसुधाताईंचं आणि सूर्यकांतचं नातं खासच होतं असं त्यांना नंदामावशी म्हणाली होती.
“तुमची आणि वसुधाताईंची ओळख कधी झाली होती ?” सावंत आजोबांनी विचारलं.
“ एका सायकॉलॉजिस्टने मला सांगितलं होतं वसुधाताईंना भेटायला. शहाण्णवला. त्यावेळी मला वाटलं होतं की कोणीतरी महिलामंडळ वगैरे चालवणारी बाई असणार ही.” असं बोलून सूर्यकांत हसायला लागला.
‘ महिलामंडळ चालवणारी बाई ’ हे वर्णन ऐकून सावंत आजोबाही हसू लागले.
ते म्हणाले, “ अनेक लोकांचा समज असाच व्हायचा. वसुधाताई कोण आहेत, कशा आहेत हे पहिल्या भेटीत समजणं कठीणच होतं. ”
सावंत आजोबांकडे पहात सूर्यकांत शांतपणे म्हणाला, “ वसुधाताईंना भेटलो नसतो तर मी आज जिवंत दिसलो नसतो. एकतर आत्महत्या केली असती किंवा दारू पिऊन किंवा एड्स वगैरे रोग होऊन मेलो असतो.”
हे ऐकून सौरभ आश्चर्याने सूर्यकांतकडे पाहू लागला. सावंत आजोबांना मात्र आश्चर्य वाटलं नव्हतं.
“ अनेकजणांच्या मनात अशीच कृतज्ञता आहे वसुधाताईंबद्दल. तेच समजून घ्यायचं आहे मला तुमच्याकडून.”
आता ह्यांना काय काय सांगायचं आणि – बोलण्याच्या ओघात – काय सांगायचं नाही ह्याचा विचार सूर्यकांत करू लागला.
“अठरा वर्षांच्या आठवणी आहेत. मी कायकाय सांगू ? तुम्ही विचारा. आठवेल तेवढं सांगेन.” इतकंच तो म्हणाला.
*********************************************
वसुधाताईंच्या संस्थेचं काम इंदिरानगर नावाच्या वस्तीत सुरू होतं. नोकरीनिमित्त किंवा लफड्यानिमित्त मुंबईत फिरताना काहीवेळा सूर्यकांत ह्या वस्तीच्या जवळपास असायचा आणि संध्याकाळी सक्षम महिला मंचच्या कार्यालयात जायचा.
ह्याचवेळी वसुधाताईसुद्धा तिथे असायच्या.
त्याने अनुवादित केलेल्या बालनाट्याचे प्रयोग वस्तीत झाले होते. त्यात काम करणाऱ्या मुलांचे छान कौतुक झाले होते.
छोट्या नाटिकांमधे काम करून वस्तीतील लहान मुलांना इंग्रजी भाषासुद्धा शिकता येईल असं सूर्यकांतने सुचवलं होतं आणि तसे उपक्रमही वस्तीत सुरू झाले होते. सूर्यकांतने काही वेळ त्या नाटिकांच्या तालमीत जाऊन मुलांना इंग्रजी बोलायला शिकवलं होतं. जमेल तसं इंग्रजी बोलत बोलत मुले नाटिकांच्या तालमी करत होती आणि मुलांचे इंग्रजी बोलणे ऐकून त्यांचे पालक खूश होत होते.
सूर्यकांतला मात्र ह्या सगळ्याचा फारसा आनंद झाला नव्हता. गरीब वस्तीत ‘सोशल वर्क वगैरे’ करणाऱ्या संस्थांच्या कामाबद्दल त्याच्या मनात बऱ्याच शंका होत्या.
“ ह्या मुलामुलींना मोठं झाल्यावर कोणत्या नोकऱ्या मिळतील? म्युनिसिपालिटीच्या शाळेत जाणारी ही मुलं मोठेपणी मॅनेजर आणि इंजिनियर बनतील की आयुष्यभर एखाद्या लहानशा हॉटेलात वेटर म्हणून काम करत राहतील? मुली इतरांच्या घरात जाऊन घरकाम करतील? तुमची संस्था कितपत मदत करू शकेल ह्यांना ?” त्याने वसुधाताईंना विचारलं होतं.
“सगळ्या मुलांना मदत नाही करू शकत आम्ही; पण दहाबारा मुलेमुली बनली आहेत उद्योजक, मॅनेजर वगैरे. त्यामुळेच तर हे काम करायची ऊर्जा मिळते आम्हांला.”
सूर्यकांत काही बोलला नाही.
इतक्या मोठ्या वस्तीतल्या फक्त दहाबारा मुलांना मदत होत असेल तर त्यामुळे ह्या वस्तीतली गरिबीची समस्या सुटणार आहे का, असं त्याला वाटलं.
त्याचे विचार ओळखूनच बहुदा वसुधाताई म्हणाल्या,
“ ती गोष्ट माहीत आहे का तुला ? एका तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मासे तडफडत असतात आणि एक माणूस मात्र त्यापैकी केवळ पंधरा-वीस मासे तलावात सोडून वाचवू शकत असतो. बाकी मासे तडफडून मरणारच असतात. मग अशावेळी त्या माणसाने निराश होऊन काही न करता बसून राहायचं की पंधरा-वीस मासे तरी वाचवू शकतो ह्यात सार्थकता मानायची ?”
ह्या अशा सुविचार आणि उपदेशवाल्या कथा फालतू असतात, ग्राउंड रिअॅलिटी ओळखून काम करताना त्यांचा काही उपयोग होत नसतो असं सूर्यकांतला वाटायचं… पण तो काही बोलला नाही.
नंतर एकदा गप्पा मारताना वसुधाताई म्हणाल्या होत्या की गरीबांच्या एखाद्या समस्येबाबत काही टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवायचा असेल; तर दहा वर्षे पाय रोवून काम करायची, सगळ्या अडचणींना भिडायची तयारी ठेवली पाहिजे.
हे तर अजिबातच पटलं नव्हतं सूर्यकांतला.
‘ दहा दहा वर्षे वस्तीत काम करणारी सक्षम माणसे कुठून मिळणार ह्यांना ? आयटी फिल्डमधे तर एका नोकरीत सहा महिन्यांचा अनुभव मिळाला की जास्त पगाराची नवीन नोकरी शोधतात सध्या मुंबईत आणि अशा नोकऱ्या मिळतातही. असल्या वस्तीमधलं काम रोज करावं लागलं तर मलासुद्धा कंटाळा येईल सहा महिन्यांत.’
हेसुद्धा तो बोलला नाही.
त्याने विषय बदलला.
संगणक वापरायला शिकवणारं एक केंद्र वस्तीत सुरू करता येईल; हे त्याने वसुधाताईंना सुचवलं. जुने पण काम करत असलले चारपाच संगणक देणगी म्हणून द्यायला त्याच्या ओळखीची एक कंपनी तयार होती.
***********************************************
नाटकाचा अनुवाद आणि संगणक केंद्र वगैरेबद्दल सूर्यकांतने सावंत आजोबांना सांगितलं.
“ मी महिन्यातून दोनतीन वेळा जायचो वसुधाताईंना भेटायला. कधी एखादा तासभर मुलांना इंग्रजी शिकवायचो किंवा संगणकावरचं टायपिंग. वसुधाताईंची टीम बरंच काम करायची त्या वस्तीत.” तो म्हणाला.
सौरभ कोणाचीतरी मुलाखत घ्यायला बिकेसीला गेला होता. सूर्यकांतला फोर्टात जायचं होतं. ‘कॅबमधे बोलूया का?’ असं त्याने सावंत आजोबांना विचारलं. त्यांना परळला जायचं होतं. ते सूर्यकांतबरोबर कॅबमधून निघाले.
“ नारगोळकरसाहेब कसे काय ओळखायचे तुम्हांला?” सावंत आजोबांनी विचारलं.
सूर्यकांतला खूप आश्चर्य वाटलं. सावंत आजोबांबद्दल थोडा संशयही आला त्याच्या मनात.
“ तुम्हांला कोणी सांगितलं मी त्यांना ओळखत होतो हे? नंदामावशीने?” त्याने विचारलं.
“ नाही, साहेबच बोलले होते. नारगोळकरसाहेबांमुळे माझ्यासारख्या अनेकांना हक्काची घरं मिळाली. तो देवमाणूस होता आमच्यासाठी. ते बोलायचे तुमच्याबद्दल. कौतुकाने. ”
अचानक अजयदांचा विषय निघेल हे सूर्यकांतला अपेक्षित नव्हतं.
अजय नारगोळकर हा बहुपेडी, खूप हुशार माणूस होता.
मिनिटभर काहीच बोलला नाही सूर्य़कांत.
नंतर म्हणाला, “मी खूप साधा, आळशी, घाबरट माणूस आहे हो. तुमच्या नारगोळकरसाहेबांकडून मी जे काही शिकलो; त्यामुळे मी दोनचार गरिबांना मदत करू शकलो. नाहीतर माझ्याकडून असं काही होऊ शकलं नसतं. माझं नशीब चांगलं होतं म्हणून अशा माणसांबरोबर काम करायला मिळालं मला.”
परत तो गप्प बसला.
वसुधाताईंनी सांगितलं होतं म्हणून तीन बिल्डरांना सूर्यकांत एकाचवेळी नडला होता आणि अनेक गरिबांना घरं मिळवून दिली होती.
‘वसुधाताईचं ऐकून काय पण करू नकोस, बिल्डर लोक तुला कधी गायब करून टाकतील ते कळणार पण नाही…’ असं अनेकजण सांगायचे त्याला.
त्यावेळी अजयदांनी बरंच काही शिकवलं होतं, मदत केली होती.
पैसा आणि पॉवर ह्यांचे डावपेच, पोलिसांना आणि ब्युरोक्रसीला स्ट्रॅटेजिकली हँडल करणे…बरंच काही.
सावंत आजोबांना सांगता येणार नाहीत अशा अनेक आठवणी सूर्यकांतच्या मनात जाग्या होत होत्या म्हणून तो गप्पच बसला.
सावंत आजोबासुद्धा काही मिनिटे काही बोलले नाहीत. “परत भेटू सवडीने, “इतकंच म्हणाले आणि परळला उतरले.
वसुधाताई, अजयदा, फारोखसाब …भलत्याच काळातली माणसं होती ही.
दहा-बारा वर्षांचे असताना त्यांनी गांधीजींना पाहिलं होतं. मुंबईला, गोवालिया टॅंकच्या मैदानात.
चले जावच्या चळवळीत प्रत्यक्ष गांधीजींना पाहिलं होतं!!!
आणि आत्तापर्यंत, म्हणजे एकविसावं शतक सुरू झाल्यावरही ही माणसं काम करत होती.
त्यांच्या डोळ्यांसमोर मुंबई वाढली, बदलली, विरूप झाली. त्यांच्या डोळ्यांदेखत एका शांत, टुमदार शहराचं विक्राळ महानगर बनलं.
असल्या मुंबईच्या आर्थिक ,राजकीय परिस्थितीचे ताणेबाणे नीट समजून घेतले होते ह्या लोकांनी.
ह्यांची गँगच होती एक. अभ्यासू गँग.
हजारो तडफडणारे मासे पाहून व्यथित होणारी, त्यातले काही मासे जगवायला धडपडणारी गँग.
ह्या लोकांची मुलं, नातवंडं, नातेवाईक परदेशात होते पण आपल्या कुटुंबापेक्षा त्यांना मुंबई जास्त आवडत होती. त्यांचा जीव मुंबईत गुंतला होता आणि इतर अनेकांना असेच गुंतवून ते निघून गेले होते.
***************
फोर्ट आल्यावर सूर्यकांत कॅबमधून उतरला.
एका आयएएस ऑफिसरला भेटायचं होतं आणि त्यानंतर एका श्रीमंत गर्दुल्याकडे जायचं होतं.
हा ऑफिसर एक लफडं करून बसला होता आणि त्यातून सुटायला तो सूर्यकांतकडे मदत मागत होता.
कायदा दाखवून श्रीमंत गर्दुल्याला धमकी देणाऱ्या काही लोकांना सूर्यकांत ‘ नीट समजावून ’ सांगणार होता.
हे सगळं केल्यामुळे काही गरिबांना मुबंईत राहायला जागा मिळणार होती आणि गरीब उद्योजक महिलांच्या एका गटाला भांडवल मिळणार होतं.
‘दहादहा वर्षं कोण करणार गरीब वस्तीमधलं सोशल वर्क ! सहा महिन्यांत असलं काम करायचा कंटाळा येईल…’ असं वाटलं होतं सूर्यकांतला.
पैसा मिळवायला, लग्न झालेल्या श्रीमंत बायकांबरोबर लफडी करायला, एका मदिर धुंदीत जगायला आवडत होतं त्यावेळी त्याला.
पुढे अजयदा, फारोखसाब वगैरेंची गँग भेटल्यानंतर, आता वीस वर्षं होत आली तरीही तो हे काम करत होता.
त्यावेळी पंचविशीत असलेला तरुण सूर्यकांत आता वयस्कर झाला होता.
त्यावेळीसुद्धा उमजायला कठीण असलेलं हे महानगर आता अधिकच विक्राळ, अरभाट झालं होतं.