(१)

नेहमीपेक्षा आज सकाळी जरा लवकरच जाग आली. खिडकीतून उजाडतीची किरणं डोळ्यावर पडत होती. खिडकीतून येणार्‍या मोगर्‍याच्या सुगंधानं मन प्रसन्न झालं. घरी माणसात आल्याचं समाधान असेल कदाचित; पण झोपही शांत लागली होती. कालच्या प्रवासाचा शिणवटा पार निघून गेल्यासारखं वाटलं. काल पहाटेपासून सुरू असलेली ती धावपळ… घरी पोचेपर्यंत सुरूच होती.

मनाचं कसं असतं ना, एकटं असल्यावर कुठेही भिरभिरत राहतं!

संध्याकाळी घरी आले पण नेहमीच्या सवयीने केतनच्या गळ्यात नाही पडता आलं. या कोरोनाच्या महामारीच्या साथीमुळे मला अजून किती वेळा अलगीकरणात राहावं लागणार आहे कळतच नाही. केतनने मात्र मी फोनवरून ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्या त्या तंतोतंत पाळल्या होत्या. अर्थात सगळ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करूनच ऑफिसकडून त्या आलेल्या होत्या. गंमत वाटली होती ना काल आले तेव्हा!

माझ्या मनात हुरहूर होती. डोळे त्याला बघायला आसुसलेले. कधी एकदा त्याच्या कवेत जाते आणि मोकळी होते असा विचार करतच मी जिन्याच्या बारा तेरा पायर्‍या चढून वर येत होते. हातातली बॅग खाली ठेवत दरवाजावरच्या बेलच्या बटणाकडे हात उचलू पाहते तर दरवाजा उघडाच होता…

दारात दोन बादल्या, एकात साबणाचं पाणी, दुसर्‍यात साधं पाणी, शेजारी एक टब. मी टबमध्ये हातातली पर्स, गॉगल, मोबाइल, रुमाल ठेवला. मग पायातले बूट एका बाजूला काढले. जीन्स वर केली आणि आधी साबणाच्या पाण्यात हात चोळतच उभी राहिले. हातपाय त्यात असे काही चोळले, जशी काही खूप घाण हाताला लागली आहे! मग हळूच हात दुसर्‍या पाण्याच्या बादलीत टाकले आणि त्यातच पायही चोळून मी ते टबच्या शेजारीच ठेवलेल्या स्लीपर्सवर ठेवले. असं सगळं करत असताना तो तिकडून किती कौतुकानं बघत होता ना! त्याची ती प्रेमळ नजर हटत नव्हती आणि माझी मात्र तळ्यात मळ्यात करताना धडपड होत होती. ‘भेट ना रे कडकडून’ असं अगदी मनातून जिभेवर आलंही होतं; पण सांभाळलं स्वतःला! इकडे तिकडे न बघता, कुठेही हात न लावता तडक आपल्या बेडरूमकडे जाऊ पाहत होते; पण…

“अगं, अगं तिथं नाही, तुझी सोय अंजूच्या खोलीत केली आहे. तुला आता चौदा दिवस तिथेच राहावे लागेल गं!” केतनचा तो हळुवार आवाज… आईंच्या नजरेतून त्याची अगतिकता सुटली नाही हे जाणवत होतं मला! पण माझ्याही डोळ्यात टचकन पाणी तरळलं. परिस्थितीपुढे शांत राहणेच सगळ्यांच्या सोयीचं होतं ना! तब्बल चार महिन्यांनी मी केतनला भेटत होते आणि तेही फक्त नजरेने. एरवी मी आल्या आल्या सरळ आमच्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन एक कडकडून मिठी असतेच केतनला. कालही हात किती शिवशिवत होते. अंगावर रोमांच उभे राहिल्यासारखी एकदम शिरशिरी आली. पण…
चौदा दिवस तरी ते शक्य नव्हते. खरंतर यावेळी त्याच्याजवळ असण्याची जास्तच गरज वाटत होती. त्या एका घटनेनंतर मुळापासून हादरून गेले होते मी. पहाटे पुण्याहून घरातून, आर्मी निवासातून निघून दिल्लीला घरी पोचता पोचता आठ तास झाले होते. शिणलं होतं मन आणि अंगदेखील. मी बापुडीने काहीही न बोलता खाली मान घालून हातातल्या दोन बॅगा कुठेही न टेकवता अंजूच्या खोलीत पाय टाकला.

आश्चर्य म्हणजे अंजूच्या खोलीत आमूलाग्र बदल केलेला दिसत होता. खोलीची सजावट पूर्णपणे बदलून आता एखाद्या दवाखान्यातल्या स्पेशल रूमप्रमाणे केल्यासारखी वाटली. नुकतेच दवाखान्यात राहून आल्यामुळे असेल; पण त्याचीच आठवण झाली. दारातच डावीकडे एक टेबल खुर्ची. टेबलावर अंथरलेला फिक्कट गुलाबी फुलांचा टेबलक्लॉथ. त्यावर ठेवलेला पाण्याचा जग, ग्लास, नॅपकिन, टॉवेल. टेबलावर एकीकडे खाऊचे डबे- तिखट गोड पदार्थांनी भरलेले. एका कोपर्‍यात बॅग ठेवता ठेवता दिसली ती पलंगावर घातलेली लग्नातली माझ्या आवडीची आकाशी रंगाच्या नाजूक फुलांची बेडशीट. याच बेडशीटवर केतनने लग्नानंतर किती हळुवारपणे माझी कळी फुलवली होती! आहाहा गोड आठवणी…

पाण्याने भरलेल्या एका छोट्याशा घंगाळ्यात मांडलेल्या मोगर्‍याच्या फुलांच्या मंद सुवासाने, दर्शनाने प्रवासाचा कंटाळा थोडा कमी झाल्यासारखं वाटलं खरं. नंतर डोक्यावर शॉवरच्या पाण्याचा मारा सुरू झाला आणि इतका वेळ थोपवून धरलेला बांध सुटला. डोक्यावर पडलेल्या पाण्याच्या ओघळांशी डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंच्या धारा एकरूप होत होत्या. खरं तर साडेतीन महिन्यांच्या लॉक डाउनच्या एकटेपणातून सुखरूप घरी पोचल्याचा आनंद होता. पण मग माझं मलाच कळत नव्हतं, मला रडू का येतंय ते. अशी रडूबाई नव्हते ना मी… इतकी भावनाप्रधान मी नाही असंच मी समजत आलेय नेहमी. मग काल काय झालं? साठलेले अश्रू आवरणं मुश्किल का झालं?

भूक, कंटाळा आणि मागच्या काही दिवसांत एकटीनं सहन केलेल्या ठसठसणार्‍या जखमा. सगळ्याचं पर्यवसान अश्रूंतून मोकळं होत होतं कदाचित. स्वच्छ होऊन आल्यावर समोर टेबलवर ठेवलेले गरम गरम आलू पराठे आणि दही पाहून अगदी गलबलून आलं होतं. आईंनीदेखील केतनला पुरेपूर साथ दिलेली दिसत होती. भरल्या घरात येऊन असं एकटीनं खायचं बरोबर वाटत नव्हतं. नवरा- केतन खोलीच्या बाहेर उभा राहून माझ्याकडे डोळे भरून पाहत होता. अशी न्हाऊन आलेली, ओल्या केसांतून पाणी गळणारी मी दिसले की…

‘कळत होतं बरं मला, केतन, तुझ्या मनात काय चाललंय ते..’

आतूनच आलेल्या ‘आणखी पराठे वाढू का?’ आईंच्या आवाजाने आम्ही दोघेही भानावर आलो..

माझे रडून रडून लाल झालेले डोळे केतनला अस्वस्थ करून गेले. तो मला शांत रहायला, खायला खुणावत होता. आई ओरडतील म्हणून शांतपणे एकेक घास पाण्याबरोबर कसाबसा आत ढकलत होते मी. खरं तर पोटात भुकेने कावळे ओरडत होते; पण तरीही मला ती भूक नव्हतीच. अर्थात थोडं पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं.

“लीला, आता आलीस ना घरी! काsssही काळजी न करता शांत झोप काढ. सकाळी बोलू मस्तपैकी.” असं म्हणत केतन जेवायला गेला.

शारीरिक थकव्या पेक्षा मानसिक थकवा जास्त जाणवत होता मला.

अंथरुणावर पाठ टेकल्या टेकल्या मनात विचारचक्रे सुरू झाली. पोटातली आग शांत झाल्यामुळे असेल कदाचित… मन विचारात गुरफटून गेले.

(२)

कशी होते ना मी!

उदयपूरजवळ एका छोट्याशा गावात राहणारी.
अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळणारी. टेनिस खेळताना किंवा पळताना, पोहताना अंगात उत्साह संचारायचा अगदी.

“चुकून मुलगी झालीस गं, मुलगाच आहेस तू आमचा”, आईच्या तोंडचे उद्गार ऐकून तर ऊर भरून यायचा.

सर्वसामान्य जगणं म्हणजे, शाळा कॉलेज, लग्न, चूल अन मूल असं आयुष्य माझ्यासाठी नाहीच, असंच वाटायचं. देशसेवा करायची असं मनोमन ठरवलं होतं फार पूर्वीपासूनच. त्यासाठी UPSC परीक्षेची किती मनापासून तयारी केली होती मी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर!

तो एक दिवस उजाडला. निकाल लागला. मुलाखतीसाठी बोलावणं आलं. शारीरिक पातळीवरच्या सर्व परीक्षा आणि मुलाखत झाल्यावर BRO म्हणजे बॉर्डर रोड ओर्गनायझेशन मध्ये अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. काय खूश झाले होते मी तेव्हा! स्वप्नपूर्तीचा आनंदच जणू!

आठ दिवसांत आधी पुण्याला ट्रेनिंग आणि मग काही दिवसांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भारताच्या सीमेवर पोचायचं होतं. त्यावेळी ड्यूटीवर जायच्या उत्साहात असलेली मी आईच्या डोळ्यांतल्या पाण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं होतं. पण त्यावेळचे ते आईचे डोळ्यांतले भाव मी आता जाणतेय. ती आर्तता, तो होणारा मुलीचा विरह मला आता जाणवतोय..

अरुणाचलचे कसे दिवस काढले ना आपण! घरी काहीच जाणवून दिलं नव्हतं. उसळतं रक्त आणि देशाभिमान. सगळं सहन करण्याची ताकद दिली होती..

मग आताच का खचून गेलेय मी?

(३)

देशाच्या सीमेवर जाताना नेमणुकीच्या गावाला जाणारा मार्गदेखील सुखकर नव्हता. आधी उदयपूर ते दिब्रुगड विमानाने प्रवास. बसने दोन तासांचा प्रवास केल्यावर तिथून बाहेर पडून नदीकाठावरून जाणार्‍या प्रवासी बोटीतून ब्रम्हपुत्रा नदीचे अथांग पात्र ओलांडून जावे लागत असे. (आता BRO मुळे बर्‍याच ठिकाणी नदीवर पूल बांधले गेलेत आणि सीमेवर पोचणे त्यामानाने सुखकर झालंय.) राजस्थानमधील रुक्ष कोरडे वातावरण सोडून आल्यामुळे कधी न पाहिलेले अरुणाचल प्रदेशचे हिरवेगार वैभव मला मोहून टाकत असे. ब्रम्हपुत्रा नदीचे पात्र ओलांडून बोटीतून जमिनीवर उतरलं की त्यापुढचा प्रवास अतिशय कठीण असा होता. कुठे दगड धोंडे तर कुठे चिखल तुडवत जायला लागलं. हमरस्त्याला लागेपर्यंत बोटीतून उतरलेल्या इतर लोकांबरोबर चालत जाताना तर माझी अगदी भंबेरी उडाली होती. हमरस्त्यावर उभी असलेली ऑफिसची गाडी पाहिली आणि हुश्श झालं. त्यापुढील रस्ता जंगलातून जायचा होता. गाडीतून काही किलोमीटर जाताना एकीकडे नियुक्ती झालेल्या ठिकाणी पहिल्यांदाच जाण्याची हुरहूर आणि त्यातच जंगलातून जातानाचा थोडासा भयावह प्रवास. एकटेपणा होता पण देशसेवा करायची ऊर्मी अधिक होती.

संध्याकाळचे पाचच वाजले होते पण आजूबाजूला किर्र अंधार दाटून आला होता. कधी एकदा गेस्ट रूमला पोचते असं झालं होतं त्यावेळी. पहाटे दोन वाजता घरातून निघाल्यापासून किती वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांतून प्रवास करावा लागला होता. अंग अगदी शिणून गेलं होतं.

गाडी टुमदार अशा गेस्टरूमजवळ थांबली. सहायक येऊन सामान उतरवून घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ मीही खोलीत शिरले. अजून आठवतं मला, त्यावेळी मी डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला होता. बदलत्या आयुष्याची, नवीन कार्याची सुरुवात करणार होते ना मी! फ्रेश झाल्यावर मेसचं चविष्ट जेवण आणि त्यानंतर फिरत्या पंख्याकडे बघत मनात आलेले विचार…

आज खोलीत एकटीच असताना सगळंच आठवत होतं. सहा वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी … किती बदल झालाय आपल्यात!

(४)

सीमेवर काम करताना मनात धाडस होतं. समोर आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं सामर्थ्य होतं. कमी का अडचणी आल्या त्यावेळी! राजस्थानसारख्या रुक्ष, ओसाड, गरम हवामानातून अचानक हिरव्यागार, आर्द्र, डोंगराळ हवामानात सुरुवातीला कमी का त्रास झाले? कधी बूट पायांत अखंड घालून बोटांत झालेल्या चिखल्या; तर दमट हवामानाने कपडे ओलेच राहून त्यांना येणारा, खोलीत भरलेला एक प्रकारचा कुबट वास…

कामातही नेहमी काही ना काही अडचणी यायच्याच की! कधी लँडस्लाइडमुळे वरून दगड धोंडे घरंगळत येणे, तर कधी जोरदार पावसामुळे कामच थांबवावे लागणे. कधी स्थानिक आदिवासींनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत म्हणून कामात खोडा घालणे…

भूकंप आणि पाऊस यांना तर येण्यास काळ वेळ कधीच लागत नाही. कामाचं बोलत असताना अचानक टेबलावरची पाण्याची बाटली डोलायला लागायची तेव्हा धक्का बसतोय याची जाणीव व्हायची. जर जोरात धक्का असेल तर बाटली सरळ आडवी पडून घरंगळत जायची. अशा सतत येणार्‍या भूकंपाची सुरुवातीला जरा भीती वाटली होती; पण नंतर सवयीचे झाले धक्के.

काम करण्याची ऊर्जा आणि देशप्रेम यांपुढे सगळ्या अडचणी कस्पटासमान समजून दोन वर्षे काम करत राहिलो आपण. आधी पूर्ण शाकाहारी असल्यामुळे काही दिवस जेवणाचे वांदे होऊ लागले. पण मग नंतर मांस- मच्छी खायला सुरुवात केली आणि पोट भरू लागले.

कधी आदिवासींनी सण समारंभात बोलवलंच तर तो दिवस वेगळाच आनंद देऊन जायचा. त्यांचे ते लोकनृत्य, बांबू नृत्य, वेशभूषा, रंगरंगोटी बघता बघता भान हरपून जायचं अगदी. एका तालात थिरकणारी त्यांची पावलं… कितीही प्रयत्न केला तरी जमलं नाही आपल्याला. मैदानी खेळ खेळणारी मी, कितीही दूर पळायला सांगा, पळेन, पण असं एका जागी नृत्य हे सोपं नाही हेच जाणवलं. म्हणूनच त्यांचं सगळ्यांचं कौतुक वाटायचं.

त्यांची मेजवानी खायचं मात्र जिवावर यायचं. काय काय खातात ते! कुठलेही कीटक, झुरळ, साप, काहीही! तसंच पाळीव डुक्कर, साधारण म्हैस रेड्याप्रमाणे दिसणारा मिथुन प्राणी तर त्यांची आवडती मेजवानी!

त्या लोकांच्या खडतर राहणीमानात आनंद साजरा करायच्या वृत्तीने मात्र मला खूप काही शिकवलं. खरं तर कित्येकदा निसर्गाच्या प्रकोपामुळे, लँडस्लाइडमुळे तर कधी डोंगरावरून येणार्‍या पाण्याच्या लोंढ्यामुळे कधीही कोणीही गाडलं जायचं, वाहून जायचं. जिवंत बाहेर निघालं तर आनंदच;नाही तर रडत न बसता काम पुढे चालू ठेवायचं.

एकदा तर कामावर येणार्‍या गुरांगचा मुलगा आणि बायको वाहून गेले तर किती अस्वस्थ झाले होते मी! पण दोन दिवसांनी गुरांग कामावर हजर. आश्चर्याने आss वासला होता मी त्यावेळी! त्यानंतर एक दिवस रात्री लँडस्लाइडमुळे आदिवासींची घरे आणि घरातले मातीच्या प्रचंड ढिगार्‍याखाली गाडली गेले होते. बिचारे खूप आशेने माझ्याकडे आले होते आणि आमचा JCB ड्रायव्हर यायला नकार देऊ लागला. मी तेव्हा कसा झापला होता त्याला! अडचणीच्या वेळी काम करत नाही म्हणजे काय! पण आपल्या या झापण्यामुळे तो आला आणि JCB वापरून काही जणांना जिवंत बाहेर काढता आलं हे महत्त्वाचं!

वर्षानुवर्षे अशी संकटे स्वीकारून जगत रहाण्यार्‍या या लोकांकडे पाहून आपल्या अडचणी खूप क्षुल्लक वाटायला लागतात.

अशी असणारी मी, पण आताच का रडूबाई झाले आहे?

(५)

तर अशा वातावरणात काम करून दोन वर्षांनी पठाणकोटला बदली झाल्यावर किती शांत शांत वाटलं होतं नाही! ना वातावरणाची भीती, ना स्थानिक आदिवासींच्या हिंसक वृत्तीची, ना निसर्गाच्या प्रकोपाची! कामातली थरारकता निघून स्वस्थ काम सुरू झालं होतं.

आईच्या मते माझं लग्नाचं वय झालं होतं. तिने तिच्या पद्धतीने स्थळ बघायला सुरुवात केली होती. काही वेळा माझं फिरतीचं आणि विशेषतः भारताच्या सीमेवरचं काम असल्याने नकार येऊ लागले. केतनला मात्र माझी ही नोकरी मान्य होती. पठाणकोटला असतानाच आईने दिल्लीला जाऊन केतनला बघून येण्यासाठी साकडं घातलं. पहिल्या भेटीत तर केतनला माझ्या कामाचं स्वरूप ऐकून माझा अभिमानच वाटला होता. मला अगदी अपेक्षित होता तसा सहचर वाटला केतन.

लवकरच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झालं आणि पंधरा दिवसांतच मला कामावर पुन्हा रुजू व्हावं लागलं. दोन तीन महिन्यांतून एकदा केतनला भेटायला जायला वेळ काढायचा. त्यासाठी रात्रंदिवस काम करून हातातल्या कामाचा खोळंबा होऊ नये असं बघावं लागायचं. कामावर असतानाची मी आणि केतनच्या सान्निध्यात आल्यावरची मी, माझी मलाच ओळखू यायचे नाही. एक ’प्रेम’ हा शब्द जीवनच कसं बदलून टाकतो ना!

(६)

पुढच्या बदलीची वाट पाहत असतानाच पुण्याला ट्रेनिंग सेक्शनला यावं लागलं. इथे शिकाऊ अभियंत्यांना प्रशिक्षण देता देता आपले अनुभव देखील वाटता येतात. नवीन आलेल्या सगळ्यांना खूप अप्रूप वाटतं माझ्या सीमेवर आलेल्या अनुभवांबद्दल.

तसंच दर दोन महिन्यांनी केतनला भेटायला पण जाता येतंय . दिवसा प्राध्यापकासारखं शिकवायचं, संध्याकाळी भरपूर चालणं आणि टेनिस खेळणं व्हायचं. पण…

अचानक कोरोना विषाणूने आपलं बस्तान बसवलं आणि प्रत्येकाला आपल्या घरात स्थानबद्ध केलं. पुण्यातल्या घरात एकटीने बसून दिवस व्यतीत करणं असह्य होत होतं. नाही म्हणायला सकाळ संध्याकाळ चालायला, पळायला जाता येत होतं इतकंच!

अशातच शरीरात वेगळी चाहूल लागली. मन आनंदात असूनदेखील जेवण पचेनासं झालं. सकाळच्या उलट्या सुरू झाल्या. शक्तिवर्धक औषधं सुरू झाली.

कळायला लागल्यापासून या शरीरानं कधी इतका आराम केला नव्हता; पण आता काही काम करण्यात उत्साह वाटेनासा झाला. यावेळी केतन बरोबर असावा असं वाटायचं. आमच्या दोघांच्या प्रेमाचा नवा अंकुर फुटला होता. त्याला प्रेमानं वाढवायचं होतं. त्याची पोटातली कणाकणानं होणारी वाढ मी अनुभवत होते. लॉकडाउनमुळे केतनलाही वेळच वेळ असल्यानं दिवसातून दहावेळा व्हिडिओ कॉल करून तनामनाचे बदल त्याला सांगायला मजा येत असे.

वेगळीच जाणीव होत असे. समजत नव्हतं, जबाबदारी, माया, लळा असं एकदम आपल्या मनात कसं काय उत्पन्न होतंय. होऊ घातलेलं आईपण, आईच्या नजरेतून पाहायला समाधान वाटायचं. केतन खूप धीर देत असे, समजून घेत असे.

आताशा संध्याकाळच्या चालण्याचा वेग मंदावला होता आपोआपच.

भारताच्या सीमेवर जाऊन करावं लागणारं काम आणि बाळाचा जन्म, कसं असेल आपलं पुढील आयुष्य? कित्येकदा विचार यायचे मनात. दोनच महिन्यांत मी स्वप्नात रममाण होऊन जायला लागले होते.

(७)

एक दिवस पहाटे पहाटे बाळाच्या स्वप्नात गुंतून गेले असताना जाग आली तीच पोटातून आलेल्या जोरदार कळेमुळे. हे अचानक असं ओटीपोट कसं दुखायला लागलं? कंबर दुखायला लागली. काय होतंय ते काहीच कळेना. आssई गं… आssई…

पण ऐकायला कोण होतं समोर? कोणीच नाही. कसा तरी धीर करून साहेबांना फोन केला आणि ऑफिसची गाडी मागवली. साहेबांनी सर्वतोपरी साहाय्य केलं. त्याच दिवशी नेमके मिलिटरी हॉस्पिटलमधे गेल्यावर कळलं की स्त्रीरोगतज्ज्ञ येणार नव्हते. संकटं कधी एकटी येत नाहीत हेच खरं…

मला खाजगी रुग्णालयात अ‍ॅडमिट व्हावे लागले. एकटीने… कोव्हिडच्या भीतीने, लॉक डाउनमुळे, माझ्याजवळ यायला कोणालाच परवानगी नव्हती. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने, सगळी स्वप्ने विरून चालली होती. कसं थांबवू हेच कळत नव्हतं.

पार खचून गेले होते मी. पोटातील उरले सुरले बाळाचे अंश काढून दुसर्‍या दिवशी घरी आले. एकटीच. रिती होऊन… खूप रडले होते मी. डोळ्यांतलं पाणी सरता सरत नव्हतं. दुखणं एकीकडे आणि विरलेली स्वप्नं दुसरीकडे. दुखणं एकवेळ मी सहन केलं असतं; पण माझ्या बाळाचं स्वप्न मला राहून राहून अस्वस्थ करत होतं.

त्यावेळी मला आठवत होते ते आईचे अश्रू, मी तिला सोडून कामावर गेले होते तेव्हाचे! मला जाणवत होते त्या आदिवासींचे चेहरे, ज्यांची बायका मुलं लँडस्लाइडमुळे गाडली गेली होती…

प्रश्न पडत होता मला, कसं बाहेर पडायचं यातून!

(८)

दवाखान्यात म्हणजेच मिलिटरी कॅम्पसच्या बाहेर जाऊन आल्याने मला चौदा दिवस अलगीकरण क्रमप्राप्त होतं. इच्छा असूनदेखील भेटायला कोणालाच येता आलं नाही. एकटी बसून मी आणखीनच खचून गेले होते. खरं तर रडणं हा माझा मूळ स्वभाव नाही; पण राहून राहून डोळ्यांत येणारं पाणी मी थोपवू शकत नव्हते. सतत तरळत राहायचं… ओटीपोटात लागलेली बाळाची चाहूल, आई होणार म्हणून मोहरणं. अचानक कोणीतरी जवळची आवडती वस्तू ओरबाडून घ्यावी तसं झालं. सगळं सगळं रितं झाल्यासारखं वाटत होतं – शरीरही आणि मनही!

सारखे मला आईचे विचार मनात यायचे. दोन तीन महिन्यांच्या जवळिकीने आपण असे कसे इतके गुंतून गेलो त्यात. आई होण्यासाठी इतकी आतुर झाले होते का मी? पण नाही होता आलं यावेळी!

अस्वस्थ मनाने लगेच मी आईला फोन करायचे. तिच्याशी बोललं की शांत वाटायचं. खूप जवळची वाटू लागली आहे आई आता… मैत्रिणीसारखी!

तिकडे केतनला लगेचच मला सांभाळायला यावसं वाटत होतं. तसा प्रयत्नदेखील त्याने केला. पण इथे आल्यावर आधी चौदा दिवस अलगीकरण खोलीत राहावे लागेल आणि मगच त्याला घरी येता येईल असं मुख्य कार्यालयातून सांगण्यात आलं. अखेर माझा मलाच तब्येत बरी करण्यासाठी मनाला आवर घालावा लागला आणि मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं.

विमानसेवा सुरू झाल्यावर लगेच दिल्लीला केतनकडे जाण्यासाठी तिकीट काढलं आणि आता मी स्वतःच्या घरात पोचले होते.

पुन्हा एकदा अलगीकरण अगदी जिवावर आलं होतं. पण इलाज नाही. सुरक्षितता महत्त्वाची. सध्या पुणे रिटर्न किंवा मुंबई रिटर्न म्हटल्यावर लोकदेखील घाबरू लागले आहेत. त्यामुळेच कदाचित सासू, नणंद जवळसुद्धा आल्या नाहीत.

जातील हेही दिवस! असा विचार करता करताच काल झोपेच्या आधीन झाले.

(९)

सकाळी जाग आली तीच बाल्कनीतून येणार्‍या मोगर्‍याच्या सुवासाने आणि दयाळाच्या मधुर ओरडण्याने. खूप प्रसन्न वाटतंय आज. गुड मॉर्निंग म्हणत दाराबाहेर केतन चहाचा कप घेऊन आला होता. त्याचं स्मितहास्य मला आणखी खुलवून गेलं. वाटलं पटकन जवळ जावं आणि… आणि सगळं मनातच… तो मान पुढेमागे हलवत तिला सांगत होता जणू, ‘धीर धर, धीर धर गं.’

“चहा, नाष्टा कर मग आपण थोडावेळ गप्पा मारत बसू.”
“तू तळ्यात मी मळ्यात..”
“दिवसातून एकदा बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यांना पाणी घाल गं! ”
मग आम्ही खूप गप्पा मारल्या. पण इकडच्या तिकडच्या. खुशीत येऊन केतन पण थोडा मिष्किलपणा करत होता. कदाचित मला बरं वाटावं म्हणून.
नाहीतरी मला खुलवणं त्याला चांगलंच जमतं..

(१०)

पुढचे तेरा दिवस असंच सुरू राहिलं.

वेळ असेल तेव्हा मी कुंडीत लावलेल्या रोपांना पाणी घालत बसायचे. रोज त्यांच्या कळ्या उमलताना, नवीन पालवी फुटताना पहायचा छंदच लागला मला. पूर्वी आई कितीदा तरी झाडांना पाणी घालायला लावायची. पण इतकं लक्षपूर्वक कधी मी त्याकडे बघितलं नव्हतं. मुळापासून बदलती मी, स्वतःच स्वतःला शोधू लागले होते. अगदी आश्चर्यानं!
चौदा दिवस संपले.
नव्या उमेदीने आज मी आपल्या खोलीत जाणार होते.. माझ्या केतनला भेटणार होते. लग्नानंतर देखील इतकी हुरहूर लागली नव्हती जितकी आजची वाट मी पाहत होते. त्याच्या कुशीत शिरून एकेक घटना मला पुन्हा त्याच्या संगतीनं आठवायच्या होत्या. त्याच्याकडून खूप खूप लाड करून घ्यायचे होते. मला खात्री होती केतनदेखील माझ्या भेटीसाठी आतुर झाला आहे.
सकाळी लवकरच मला जाग आली. उत्साहाच्या भरात जोमाने बॅग आवरू लागले.. आपल्या खोलीत जायची घाई झाली होती ना मला.
बंधनातून मुक्ततेकडे. नवीन फुलवू पाहायचं होतं आयुष्य. मागचं सगळं आठवून रडत बसायचं नव्हतं मला आणि माझे लाड व्याजासहित वसूलदेखील करायचे होते.

(११)

कालचा दिवस स्वप्नवत गेला. रात्रीबद्दल तर बोलायलाच नको असं वाटतंय. ते गुलाबी क्षण असे कागदावर उतरवण्यापेक्षा मनातच रुंजी घालत राहावेत. रात्री कितीतरी वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत व्यक्त होत होतो. बोलणारी मी आणि समजवणारा केतन. गेल्या चार महिन्यांतल्या एकटेपणाच्या, दवाखान्याच्या सगळ्या सगळ्या गप्पा…

मी अशी कशी बदलले.. भावनाप्रधान झाले? सगळे सगळे प्रश्न… तो त्याच्या पद्धतीनं माझ्या मनाची उकल करून सांगत होता. त्याचं ते समजावणं हवंहवंसं वाटणारं!
इतक्या दिवसांचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. शरीराचं, मनाचं मीलन! किती उत्कट क्षण… हवेहवेसे वाटणारे… कधी संपूच नयेत असं वाटणारे!

सकाळी जाग आली माझा फोन खणखणला तेव्हा!

अनिच्छेनेच मी हात लांबवला आणि फोन घेतला.
“गुड मॉर्निंग सर, मिसेस लीला हिअर.”
“गुड मॉर्निंग लीला, माय ब्रेव्ह गर्ल! कॉंग्रॅच्युलेशन्स लीला! ”
“सर कॉंग्रॅच्युलेशन्स किस लिये?”
“लीला आपका प्रमोशन हो गया।”
“थॅंक यू सर”, म्हणताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच. त्याप्रमाणे सरांनी पुढे बातमी दिलीच.
“लीला, आपको जल्दही लेह चीफ ऑफिसमें रिपोर्ट करना होगा।”
“यस सर, थॅंक यू सर.”

(१२)

विमानतळाच्या प्रतीक्षाकक्षात बसून डायरी लिहावी लागेल असा विचार कधीच केला नव्हता.

काल सरांचा फोन आला तेव्हा.

क्षणात एक शिरशिरी अंगातून गेल्यासारखी वाटली आणि माझ्यातली खरी लीला कामाला लागली. लॅपटॉप उघडून लवकरात लवकर पुण्याला जायचं विमानाचं तिकीट काढलं. तिथून पुढचं लेहचं. आता पुण्याला घरी जाऊन कोणकोणती कामं करायची? ऑफिस फॉरमॅलिटीज पूर्ण करायच्या? घर आवरायला किती दिवस लागतील? या आणि अनेक प्रश्नांवर आकडेमोड करत, मुख्य म्हणजे आधी पुण्याला आलं की अलगीकरण मग ऑफिसची कामं. मग लेहला गेल्यावर पुन्हा अलगीकरण असणारच! पण तो वेळ मला तिथल्या हवामानाशी अंगवळणी पडायला कामी येईल. मगच नवीन काम. एक ना अनेक गोष्टी डोक्यात पिंगा घालू लागल्या आहेत!

खरंतर आताशा बाळाच्या चाहुलीत, स्वप्नात मी रमायला लागले होते. आवडत होतं मला ते. दिसत होतं माझं मलाच माझ्या बाळाबरोबरचं खेळणं…
पण…

आता मला हक्काचा वेळ मिळेल अलगीकरणाचा. माझी मीच बदलण्याचा. पुन्हा देशसेवेला वाहून घेण्याचा. त्रास होईल थोडा; पण परिस्थितीच मला सावरेल ही आशा आहे…

दुरून येणारे सूर कानावर पडत होते…

चला जाऊ द्या पुढे काफिला,
अजुनी नाही मार्ग संपला…

थोडी हिरवळ, थोडे-पाणी,
मस्त त्यात ही रात चांदणी

जाता जाता जरा विसावा
उतरा ओझी, विसरा थकवा

चला जाऊ द्या पुढे काफिला,
अजुनी नाही मार्ग संपला…

1 Comment

  1. किती सुरेख, तरल लेखन आहे हे.. खूप आवडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *