काही वर्षांपूर्वी मी पूर्णवेळ प्राध्यापक – असिस्टंट प्रोफेसर म्हणून पिट्सबर्ग, अमेरिकेतल्या रॉबर्ट मॉरिस युनिव्हर्सिटी (आरएमयू) नावाच्या एका छोट्याशा विद्यापीठात रुजू झालो. हे विद्यापीठ खाजगी होतं आणि त्यामानाने फारच नवीन होतं. आमच्या आजूबाजूला आमच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेली सुप्रसिद्ध विद्यापीठं म्हणजे कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी (१२० वर्षं) आणि युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग (२३३ वर्षं) ह्यांचा खूपच दबदबा होता. ती विद्यापीठं आकाराने आणि कर्तृत्वाने प्रचंड मोठी आणि नामांकित होती. ह्यांच्यापुढे आमच्या विद्यापीठाचा निभाव कसा लागणार हा एक मोठा प्रश्नच होता. तसं पाहायला गेलं तर आरएमयूची सुरुवात झाली ती केवळ एक व्यवसाय उच्च महाविद्यालय (बिझिनेस कॉलेज) म्हणून. तेव्हा फक्त लेखा विभाग (अकाउंटिंग), कर विभाग (टॅक्सेशन), व्यवस्थापन विभाग (मॅनेजमेंट), प्रशासन विभाग(ऍडमिनिस्ट्रेशन) अशा पदव्या देत असत. ते उच्चमहाविद्यालय हळूहळू वाढत गेलं आणि त्यात संप्रेषण विभाग (स्कूल ऑफ कम्युनिकेशन्स), संगणक विभाग (स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स), शिक्षण विभाग (स्कूल ऑफ एज्युकेशन) आदी शाखांची भर पडली. पुढे १९९९ सालापासून विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि शुश्रूषा (स्कूल ऑफ नर्सिंग) विभागांची भर पडली आणि २००२ सालापासून आमच्या उच्चमहाविद्यालयाला एका स्वतंत्र विद्यापीठाची मान्यता मिळाली. मी अशा अगदी नव्याने जन्माला आलेल्या विद्यापीठात २००४ साली रुजू झालो. त्याच्या आधी मी कार्नेगी मेलन विद्यापीठात काम करत असे. मग काही वर्षं एका अभियांत्रिकी उद्योगात सल्लागार म्हणून काम करत असे. ते सगळं सोडून मी आरएमयूला रुजू झालो कारण तिथे नुकतंच सुरू झालेला संपूर्ण इंजिनियरिंग विभाग मोठा करायची संधी मला मिळणार होती. त्यामुळे कार्नेगी मेलनसारख्या मोठ्या तळ्यातला छोटा मासा न होता मी आरएमयूसारख्या छोट्या तळ्यातला मोठा मासा व्हायचं ठरवलं. अर्थात ह्यात धोका होताच. तो म्हणजे आरएमयू जर व्यावसायिकदृष्ट्या नीट चालली नाही तर आमचा विभाग बंदसुद्धा करून टाकण्यात आला असता. खाजगी संस्था असल्यामुळे सरकारी अनुदान फारसं नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून मिळणाऱ्या अध्यापन शुल्काच्या (ट्यूशन फी) कमाईतच विभाग चालवायचं आव्हान होतं. आव्हान मी अशासाठी म्हणतोय की अमेरिकेत स्टेम (STEM) – सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथ्स ह्या शाखांना फार विद्यार्थी जात नाहीत. त्यामुळे आमच्या विभागामध्ये पुरेसे विद्यार्थी मिळवणे हे खडतर आव्हान होतं ह्यात काही वादच नाही.

अशा परिस्थितीत जे विद्यार्थी आमच्याकडे यायचे त्यांना योग्य ते शिक्षण देऊन, त्यांना समाधानी ठेवून त्यांची सर्वांगीण प्रगती होते आहे की नाही ह्याची खात्री करणं हे आमचं प्राध्यापक लोकांचं काम होतं. माझ्या पहिल्याच वर्षी माझ्या वर्गात फक्त चौदा मुलं होती. त्यातली चार मुलं खेळांची शिष्यवृत्ती मिळालेली मुलं होती. अमेरिकन विद्यापीठात खेळांचं महत्त्व काय आहे त्याची कल्पना बाहेरच्या देशातल्या लोकांना येणार नाही. बास्केटबॉल, फुटबॉल, लॅक्रोस वगैरे खेळणाऱ्या खेळाडूंना दणदणीत शिष्यवृत्ती मिळते आणि त्यांचे हवे तितके लाड पुरवले जातात. ह्याचं कारण म्हणजे कॉलेज खेळांमध्ये जर तुमच्या विद्यापीठाने नाव कमावलं तर मग तुम्हांला प्रचंड प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे तुमच्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागते. शिवाय हे खेळ बघायला येणाऱ्या लोकांमुळे विद्यापीठाला भरपूर उत्पन्न मिळतं. ह्या खेळाच्या प्रशिक्षकांना (कोचेसना) विद्यापीठाच्या कुलपती (प्रेसिडेंट) पेक्षाही जास्त पगार असतात!! बहुतेक वेळा हे खेळाडू-विद्यार्थी वर्गातही चांगले वागतात; पण कधी कधी इतक्या तरुणपणी त्यांना मिळालेली लोकप्रियता आणि यश त्यांच्या डोक्यात जातं आणि मग काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.

आता प्रश्न असा येऊ शकतो की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काही शिक्षा केलीत, त्यांना नापास वगैरे केलंत तर मग विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला ते आवडत नाही! ह्याचा मला पहिल्याच वर्षी अनुभव आला. माझ्या वर्गातला एक खेळाडू-विद्यार्थी मुलगा वर्गात फारच वाह्यात वागत असे. त्याच वर्गातली एक मुलगी त्याची मैत्रीण होती. त्या दोघांचे प्रेमप्रसंग भर वर्गात चालू व्हायचे. मी एकदोन वेळा त्यांना सांगून पाहिलं. जेव्हा त्यांनी ऐकलं नाही तेव्हा मी त्यांना वर्गाबाहेर जायला सांगितलं. त्याचा त्यांना फारच राग आला. जाता जाता खुर्च्यांना लाथा मारणे, वर्गाचं दार धाडकन आपटणे वगैरे प्रकार त्यांनी केले. प्रत्येक वेळी गृहपाठ उशीरा देणे, वर्गाला उशीरा येणे, वर्गातून मधेच उठून निघून जाणे, उगीचच फिदीफिदी हसणे असे व्यत्यय आणणारे प्रकार चालूच होते. जमेल तितक्या वेळेला मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत असे. पण उपयोग काही व्हायचा नाही. शेवटी मी एकदा इतका वैतागलो की सरळ त्या विद्यार्थ्याच्या प्रशिक्षकाला फोन करून त्याच्याकडे तक्रार केली. त्याने काय केलं ते माहीत नाही पण पुढच्या वेळी तो मुलगा आला तो रागाने लाललाल होऊनच. पण नाइलाजास्तव स्वस्थ बसला होता. त्याची मैत्रीण पण माझ्याकडे खाऊ का गिळू ह्या नजरेने बघत होती.

होता होता अर्धं सत्र संपलं आणि अर्ध-सत्राच्या (मिड-टर्म )परीक्षा झाल्या. पेपर तपासले तेव्हा लक्षात आलं की ह्या पठ्ठ्याने शेजारच्या मुलाच्या पेपरची जशीच्या तशी कॉपी केलेली होती. त्यामुळे मी आधीच घालून दिलेल्या नियमांप्रमाणे दोघांनाही परीक्षेत शून्य गुण दिले आणि दोघांनाही ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं! जो मुलगा अभ्यासू होता तो लगेच आला. खूपच शरमिंदा झाला होता. त्याने मान्य केलं की त्यानेच त्याचा पेपर कॉपी करायला दिला होता. त्याने मला मनमोकळेपणाने ह्याचं कारण सांगितलं की जर त्याने ह्या खेळाडूला परीक्षेत मदत केली नसती तर त्याला वर्गाबाहेर त्रास देण्यात आला असता. शिवाय कोणत्याही मुलीने त्याच्याबरोबर मैत्री केली नसती. तो एकाकी पडला असता. प्रत्यक्ष मारहाणीच्या धमक्या नव्हता पण इतका प्रचंड दबाव – पीअर प्रेशर त्याच्या मित्रांकडून त्याच्यावर आणण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी हा खेळाडूमहाराज कुथत कुथत ऑफिसात आला आणि कशीतरी माफी मागून निघून गेला. त्या दोघांना नापास करण्यापेक्षा मी त्यांना एक वेगळी परीक्षा देऊन तो प्रसंग निभावून नेला.

पुढे काही आठवड्यांनी ‘प्राध्यापकाने शिकवण्याचं काम कसं केलं,’ हे तपासण्यासाठी विद्यापीठाने प्रथेप्रमाणे एक फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला दिला. त्यावेळी प्राध्यापकाने वर्गाबाहेर जावं लागतं. त्याप्रमाणे मी बाहेर पडलो. तो वर्ग संपला आणि त्या खेळाडूला नाइलाजास्तव मदत करणारा तो अभ्यासू मुलगा मला येऊन भेटला. तो म्हणाला, “सर! तुम्हांला हे सांगायला मला वाईट वाटतं आहे. तुम्ही आम्हांला जरी फार चांगलं शिकवलं असलं तरीही ह्यावेळी तुम्हांला चांगला अभिप्राय मिळणार नाहीये. काळजी घ्या.” त्याने सांगितलं की ह्या खेळाडू-विद्यार्थ्याने माझ्यावर सूड उगवण्यासाठी त्याच्या सर्व मित्रांना मला शून्य मार्क द्यायला सांगितलं होतं! त्याप्रमाणे त्यांनी ते दिले होते; कारण हा त्यांच्याजवळ जाऊन तशी खात्री करून घेत होता. अर्थात ह्या गुन्ह्याबद्दल त्या खेळाडूला विद्यापीठातून काढून टाकता आलं असतं; पण हे मी सिद्ध कसं करणार? त्याच्याविरुद्ध साक्ष द्यायला प्रत्यक्षात कोणी पुढे आला नसता. मी माझ्या विभाग प्रमुखाला (हेड ऑफ डिपार्टमेंटला) ह्याची कल्पना देऊन ठेवली. दुसरं काहीच मला करता येण्यासारखं नव्हतं.

आता सत्राचा शेवट जवळ आला. अंतिम परीक्षा एका आठवड्यावर येऊन ठेपल्या आणि अचानक हा खेळाडू माझ्या ऑफिसात घाबराघुबरा होऊन हजर झाला.
“बस, बस खुर्चीवर. दम टाक. काय झालं?” मी विचारलं.
“माझ्या वडिलांना आमच्या शेतावर अपघात झाला आहे. त्यांच्याकडे बघायला दुसरं कोणी नाही. आमची शेतीची कामं अडली आहेत. पीक हातात नाही आलं तर पुढच्या वर्षी आमचे हाल होतील. मला माझ्या वडिलांना मदत करायला गावी गेलंच पाहिजे सर.” तो म्हणाला.
“अरेरे – हे वाईट झालं. बरं मग मी तुला काय मदत करू शकतो?” मी विचारलं.
“पुढच्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा आहे. मला त्या परीक्षेला बसता येणार नाही. म्हणजे मी नापास होईन. मग माझी शिष्यवृत्ती जाईल. मला शिष्यवृत्तीशिवाय कॉलेज करता येणार नाही. मला कॉलेज सोडावं लागेल. सर, कृपया मला मदत करा.” तो रडकुंडीला आला होता.
“मी तुला मदत जरूर केली असती. पण…तू माझ्याशी कसा वागला आहेस ते तुला माहीत आहे आणि दुर्दैवाने ते मलाही माहीत झालेलं आहे. तुझ्या वागण्यामुळे माझी नोकरी जाऊ शकली असती ह्याची काही कल्पना आहे का तुला? मलाही व्यावसायिक प्रगती करायची आहे. मलाही संसार आहे, मुलं-बाळं आहेत,” मी म्हणालो.
“माझं चुकलं सर. मला क्षमा करा.” तो मान खाली घालून म्हणाला.
“मी तुझ्यावर विश्वास टाकू शकतो का? दिलेला शब्द तू पाळतोस का?” मी विचारलं.
“हो सर.” तो म्हणाला.
“बरं तर मग. मी एका लखोट्यात घालून तुला अंतिम परीक्षा देतो. तो लखोटा घेऊन तू गावी जा पण तो लखोटा परीक्षेच्या दिवशी, वेळ येईपर्यंत उघडायचा नाही. मग बरोब्बर दोन तासांत तू उत्तरं लिहायची. तुझ्यावर लक्ष ठेवायला तुझ्या गावी कोणीही हजर असणार नाही. केवळ तुझा सन्मान तुझ्याबरोबर असेल. मग ती परीक्षा आणि तुझी उत्तरपत्रिका ह्या लखोट्यात घालून माझ्याकडे तू पोस्टातून तू पाठवायची. ह्यातले प्रश्न कुणालाही कधीही सांगायचे नाहीत. प्रश्नपत्रिकेची नक्कल काढून कुणाला द्यायची नाही आणि मुख्य म्हणजे हे जे मी करतोय ते तुझ्या कुणाही मित्राला सांगायचं नाही. आहे कबूल?” मी म्हणालो.
“कबूल आहे सर. ऑन माय ऑनर, ” तो म्हणाला.

पुढे चार वर्षांनी तो खेळाडू यशस्वीपणे पदवीधर झाला. त्या पदवीप्रदान समारंभात त्याचे आईवडील आले होते. त्या विद्यार्थ्याने माझी त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. आनंदाने माझ्याबरोबर आणि त्याच्या कुटुंबासमवेत फोटो काढले. त्याच्या वडिलांनी हळूच मला बाजूला घेऊन माझ्याशी हस्तांदोलन करत सांगितलं, “डॉक! मी एक साधा शेतकरी आहे; त्यामुळे तुम्ही इथे काय शिकवता ते मला कधी कळणार नाही – पण तुम्हांला मला एकच सांगायचं आहे – माझा मुलगा एक अतिशय अवखळ मुलगा म्हणून इथे आला होता आणि चार वर्षांत एक जबाबदार नागरिक – एक सभ्य गृहस्थ, जंटलमॅन, होऊन बाहेर पडला! दॅट्स अ लॉट टू डू! तुमचं मनापासून अभिनंदन!”
“तुमचंही अभिनंदन! तुम्हाला अभिमान वाटेल अशीच तुमच्या मुलाची प्रगती झालेली आहे. आम्ही इथे बरेच विषय शिकवतो पण त्यातला गुणपत्रिकेवर न दिसणारा एक मुख्य विषय म्हणजे सचोटी! सचोटीने, आत्मसन्मानाने हा आयुष्याचा खेळ कसा खेळायचा हे ही आम्ही शिकवतो. त्यात तो उत्तीर्ण झाला आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे. हार्दिक शुभेच्छा!” मी म्हणालो.

ह्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या खेळात एक फार चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे हा खेळ असा आहे की अटीतटीने खेळल्या गेलेल्या ह्या खेळात शेवटी दोन्ही पक्षांचा विजय होऊ शकतो! खरोखर एक विन – विन सिच्युएशन!

1 Comment

  1. अरे काय छान लेख आणि आठवण आहे. कोणीही हादरला असता अश्या परिस्थितीत. पण तू तरीही धीरानं, कल्पकतेनं, आणि सहृदयतेनं वागलास! ब्राव्हो. तुझा अभिमान वाटतो. या प्रसंगाबद्दल आणि युनिव्हर्सिटीचं इंजिनिअरिंग स्कूल उभं केल्याबद्दल!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *