दादरच्या मधुकुंज सोसायटीच्या गेटाचा ऍंsssय्याssss ढण्ण असा रोजचा आवाज झाला. सोसायटीकरांना सकाळ झाल्याची सूचना मिळाली. पेपरवाले, दूधवाले, फुलपुडीवाले, शाळा-कॉलेजला जाणारी मुलं, ऑफिसला जाणारी मंडळी ह्यांच्या रोजच्या नाटकाला मिळालेली ती सुरुवातीची घंटा होती. तिसर्‍या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या ब्लॉकमध्ये मात्र आज औदासीन्य दाटलं होतं. सकाळी लवकर चहा करून ताज्या दुधाची वाट पाहणार्‍या अक्का आज दूधवाला पिशवी टाकून गेला तरी गादीतून बाहेर पडल्या नव्हत्या. टिचकी मारली तरी डोंगळा कसा पुन्हा फिरून त्याच जागी येतो तसं त्यांचं मन सतत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांची उजळणी करत होतं.

ह्या औदासीन्याची सुरुवात काल दुपारपासून झाली होती. क्षणात कसं असत्याचं नसतं होतं त्याचं प्रात्यक्षिक त्या जगत होत्या. त्यांचं कशाकशात लक्ष लागत नव्हतं. पण घरात आपणच सगळ्यांत वयोवृद्ध म्हटल्यावर वाटेल तसं वागताही येत नाही म्हणून त्या कशा ना कशात गढून जायचा प्रयत्न करत होत्या. प्रतिभा आणि विनायकवर आकाश कोसळलं होतं… आणि मनू? तो तर इतका कोलमडला होता की त्याने स्वतःलाच स्वतःपासून बाजूला केलं होतं, त्याचे आजोबा कठीण परिस्थितीत करायचे तसं. कुठे टी.व्ही. लाव, कुठे लॅपटॉपवर काम कर, जणू काही वावगं घडलंच नाहीये असं काहीसं त्याचं चालू होतं. चार दिवसांपूर्वीच ना मनूचं लग्न झाल? अक्कांना मध्ये जणू चार युगं उलटल्यासारखं वाटत होतं.

दहा दिवसांपूर्वी अक्कांचा लाडका नातू मनीष सिअॅटलहून आला होता. लग्नाची जोरदार तयारी झाली होती. दृष्ट लागेल असं सगळं जुळून आलं होतं. सिअॅटलला मायक्रोसॉफ्टमध्ये इंजिनियर असलेला मनू आणि अहमदाबादच्या मायक्रोसॉफ्टमधली मनाली. दोघं एकुलती एक, सर्वतोपरी अनुरूप! सगळ्या हौशी मौजीला नुसतं उधाण आलं होतं. अक्कांनी चक्क आपल्या खाटळभर उत्तम साड्या बाजूला सारून प्रतिभेच्या आग्रहाखातर दोन नव्या साड्या विकत घेतल्या होत्या. आपल्या जुन्या घसघशीत दागिन्यांना, आता नातसुनेला काहीतरी निमित्ताने द्यायचेच आहेत, म्हणून पॉलिशही करून घेतलं होतं. मनालीच्या माहेरची माणसंदेखील अगदी अक्का अक्का म्हणून त्यांच्या भोवती रुंजी घालत होती. मुळात गंभीर स्वभाव असलेल्या मनूच्या चेहेर्‍यावर देखील मधूनच स्मित हास्य झळकत होतं. त्याला हसताना बघितलं की अक्कांना फार क्वचित हसणार्‍या त्यांच्या यजमानांची आठवण होत होती. मनू स्वभावानेही बराचसा त्याच्या आजोबांसारखाच होता- अबोल, अभ्यासू, अंतर्मुख…

बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी लवकरचा मुहूर्त होता. धार्मिक विधींची घाई गडबड आटपून गुरुजींनी अंतरपाट धरला होता. एका बाजूला मनूचे मोठे मामा, दुसर्‍या बाजूला पाध्ये गुरुजी. कुठलंही लग्न म्हटलं की अगदी मुहूर्ताचा वेळी नवरी अंतरपाटामागे येऊन उभी राहीपर्यंत अक्का कायम अस्वस्थ होत असत. तसंच परवादेखील झालं; पण सगळ्या लगबगीत त्याचं त्यांना फारसं काही वाटलं नाही. सुरेख लग्न सोहळा, थाटात उठलेल्या जेवणाच्या पंगती, उखाण्यांची चढती भाजणी ह्यात दिवस कसा काही क्षणांत संपला होता. दुसर्‍या दिवशी कंकण सोडण्याचा कार्यक्रम झाला आणि तिसर्‍या दिवशी सकाळी आठ दहाच्या फ्लाईटने मनू आणि मनाली दार्जिलिंगला रवाना झालेसुद्धा. अक्कांना हे हनीमून वगैरे प्रकरण खरं कधीच मान्य नव्हतं; पण न मानून जातात कुठे! बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी स्वतःला समजावलं होतं. मनूचा बाराच्या सुमारास फोन आला होता. त्यांना वाटलं पोचला असेल दार्जिलिंगला! पण प्रतिभाचा चढता आवाज, कापरा स्वर आणि खुर्चीवर कोसळल्यागत बसणं पाहून अक्कांना अशुभाचे संकेत मिळाले होते. नंतरची शांतता घणाघाती आवाज करत निःशब्द थैमान घालत होती. विनायक आतल्या खोलीतून बाहेर येऊन एखाद्या पुतळ्यासारखा गोठून उभा होता. शेवटी न राहून अक्कांनीच विचारलं, “दोघं ठीक आहेत ना?”
“मनाली दुसर्‍या कोणाबरोबर तरी निघून गेली,” प्रतिभाचे अस्पष्ट शब्द आणि फुटलेला बांध.

“निघून गेली?… निघून गेली म्हणजे काय?… कुठे गेली? मग हा काय करत होता? ह्याचे हात काय केळी खायला गेले होते?” विनायक बिथरला होता. अक्कांनी पुढचं लाकडी दार लावून घेतलं. उगाच शेजारी-पाजारी गवगवा व्हायचा… अशा गोष्टी बंद दारातनंदेखील करपलेल्या दुधाच्या वासासारख्या सगळ्याभर तत्काळ पसरतात आणि तसंच झालं.

दिल्ली विमानतळावर विमान बदलायचं होतं मनूला. बागडोग्र्याचं विमान सुटायला मध्ये तासभर वेळ होता. जरा फ्रेश होऊन येते असं सांगून मनाली गेली ती आलीच नाही. शोधून शोधून मनू थकला. तिचा फोनही बंद होता. मग तासाभराने तिचा टेक्स्ट का काय म्हणतात तो मेसेज आला “मला माफ कर. मी माझ्या एका मित्राबरोबर जाते आहे. माझा शोध घेऊ नकोस. ” मनूने प्रतिभाला फोन करायच्या आधी मनालीच्या घरी फोन केलान् ; तेव्हा मनालीने तिच्या आईलाही असंच कळवल्याचं त्याला कळलं. तिचं म्हणे आधीच तिच्या कामावरच्या कोणाबरोबर प्रेमप्रकरण होतं. तिच्या आई-वडिलांचा विरोध होता… आणि आता? आता मनूची होरपळ होती!
मनू संध्याकाळच्या विमानाने घरी आला तेव्हा अख्ख्या सोसायटीवर दुःखाचं सावट पसरलं. गुणी, सालस आणि मनमिळाऊ मनूच्या पदरात पडलेलं हे दैवाचं कठोर दान बघून सगळेच हळहळले. ’हे असं का?’ ह्याचं उत्तर शोधत राहिले. अक्कांना मनू त्यांच्या यजमानांसारखा आहे हे माहीत होतं; पण यजमानांच्या भाळी आलेलं भाग्य मनूच्या लेखी देखील असेल असं मात्र अक्कांना वाटलं नव्हतं…

मनू त्याची मंजूर झालेली सुट्टी संपायच्या आतच सिऍटलला परत गेला. कोणीच विरोध केला नाही त्याला. त्याचं कामात लक्ष लागलं की त्याला हे सगळं विसरायला मदत होईल असा अक्कांचाही समज होता. विनायक-प्रतिभाने अहमदाबादला विनाकारण अनेक फोन केले. एकदा जाऊनही आले दोघं; पण म्हणतात ना एकदा बांगडी पिचली की पिचली…

ह्या गोष्टीला आता सहा महिने होऊन गेले. अक्का वाट पाहत होत्या प्रतिभा आणि विनायक पुढे काय पाऊल उचलतात त्याची. पण दोघं इतकी खचली होती की दोघांच्या चालण्या-बोलण्यातही बदल झाला होता. विनायकचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. प्रतिभाचा बराचसा वेळ त्याला सावरण्यात, त्याचं औषधपाणी करण्यात जात होता. मग अक्कांनीच सूत्र हलवायचा निश्चय केला. अक्कांनी त्यांच्या भजनी मंडळात खडा टाकला. “तुम्हांला सगळ्यांना मनूच्या लग्नाची वाताहत माहीतच आहे. माझा नातू म्हणून नाही म्हणत, पण मनू म्हणजे सोनं आहे सोनं. मी त्याच्यासाठी पुन्हा मुली बघायचं म्हणते. किती दिवस दैवाला दोष देत बसायचं? जे झालं ते झालं! आता पुढे चलायचं. कोणी चांगली मुलगी असली तर सुचवा.” अक्कांनी प्रतिभा आणि विनायकलासुद्धा हाच डोस दिला. त्यांची थोडी कां कूं चालू असतानाच एक दोन ठिकाणी मनूची पुन्हा नावनोंदणी देखील केली आणि म्हणतात ना दुकान मांडलं की गिर्‍हाईक येतं! तसंच झालं. पुन्हा मुली सांगून यायला लागल्या. काही कुमारिका, काही घटस्फोटिता. मनूने सुरवातीला जरा आढेवेढे घेतलेन्. पण तोही जाणून होता, विनाकारण वेळ काढण्यात काही हशील नव्हतं.

चार महिन्यांच्या आत मनू आणि अपर्णाचा साखरपुडा झाला. अपर्णाचं पहिलंच लग्न होतं. दोन्ही बाजूंनी सगळी माहितीची देवाण-घेवाण झाली. रजिस्टर लग्न करावं असा बर्‍याच जणांनी प्रस्ताव मांडला; पण अक्का हट्टाला पेटल्या. का म्हणून आपण अपराध्यासारखं वागायचं? आपली काही चूक नसताना? आणि त्या मुलीची तरी काय चूक? तिची हौस-मौज नको व्हायला? ‘मुलाची आजी ऐकतच नाही, काय करणार?’ असे उद्गार अंगावर घेत अक्कांनी गाडा रेटला. एकदा का विरोधाची चढण संपली की गाडं भरधाव जाईल ह्याची त्यांना खात्रीच नव्हे; तर अनुभवही होता. पुन्हा हॉल बुकिंग, खरेद्या, व्याही भोजनं आणि मग लग्नसोहळा…
मनू सगळ्यात सामील होता आणि नव्हताही…
“मुलीला आणा” असं गुरुजी म्हणाले आणि अक्का नेहमीप्रमाणे अस्वस्थ झाल्या; पण नेहमीप्रमाणे आज ती हुरहूर त्यांना बाजूला सारता आली नाही. ती हुरहूर त्यांना साठ वर्षांपूर्वीच्या जोशी वकिलांच्या मुलाच्या लग्नात घेऊन गेली…

“कन्येला आणा” गुरुजी खणखणीत आवाजात म्हणत होते. सोळा वर्षांची अक्का, आई आणि भावाबरोबर आली होती आणि नवरीमुलगी कुठून आणि कशी बघता येईल ह्या विवंचनेत पडली होती. जरी ती मुलाच्या बाजूने लग्नाला आली असली; तरी सगळा धीर एकवटून तिच्या आईपासून लांब मुलीच्या बाजूला जाऊन अंग चोरून उभी राहिली होती…
”कन्येला आणा लवकर, ” गुरुजींनी आता आवाज चढवला होता. अक्का हातात अक्षता घेऊन आपण मुलीकडच्या बाजूला येऊन उभ्या आहोत, हे आपल्या गावीही नाही असं भासवत होती. नवरी मुलगी बघायचीच होती तिला. नवरा मुलगा तिच्या माहितीतला होता. उंच, देखणा, वकील झालेला, जोशी वकिलांचा सदाशिव. जरी अक्का दिसायला बेताची, सातवी पास असली तरी तिच्या मोठ्या भावाने तिची पत्रिका जोश्यांच्याकडे टाकली होती. ‘कोणाचे योग कुठे असतात कोणी सांगावं?’ हा त्याच्या मागचा युक्तिवाद होता आणि अक्काला तो मान्यदेखील होता. पण जोशी वकिलांकडून निरोप आला, “पत्रिका जुळते आहे; पण यंदा कर्तव्य नाही. ” अक्का काय समजायचं ते समजली होती. “मुहूर्त टळून जाईल…कन्या कुठाय?” गुरुजींनी पुन्हा आरोळी ठोकली. जोश्यांनी कोण मुलगी पसंत केली ह्याची अक्काच्या मनातली उत्सुकता आता शिगेला पोचली होती. बराच वेळ झाल्यामुळे आता सगळ्यांच्याच माना माजघराकडे वळल्या होत्या. जरा लगबग दिसायला लागली होती, भराभरा काही मोठी मंडळी आत जात होती, उंच स्वरात काही कुजबूज सुरू झाली होती…नवर्‍यामुलीचे वडील जोशी वकिलांशी येऊन अतिशय दिलगिरीने काहीतरी बोलले. जोशी वकील, नवरा मुलगा, चुलते, बाया बापड्या ह्यांची काहीतरी खलबतं सुरू झाली. अक्का हळूच गर्दीतून वाट काढत पुन्हा आपल्या आईजवळ जाऊन उभी राहिली…

…“मुलीला आणा लवकर, ” पाध्ये गुरुजींनी मनूपुढे अंतरपाट धरला. “अक्काआजी तुला दिसतंय का?” असं गोड आवाजात विचारत कोणी होतकरू मुलीने पुढच्या दोन लोकांना बाजूला केलं. गौरीसारखी नटलेली अपर्णा मामाबरोबर येऊन बोहल्यावर चढली. मंगलाष्टकं, वरमाला, सगळं सुसूत्रपणे उरकलं. आता शेवटचा ’झाल’ हा विधी सुरू झाला. कणकीचे अनेक दिवे ठेवलेलं जबाबदारीरूपी सूप अपर्णाचे आईवडील प्रतिभा, विनायक आणि इतर वडीलधार्‍या मंडळींच्या डोक्यावर टेकवत होते. जरी हसतमुख असले तरी डोळ्यांत अजिजी होती. ‘आमच्या मुलीला नीट वागवा’, हा भाव ओसंडून वाहत होता.

…अक्का पुन्हा जोश्यांच्या लग्नात पोचल्या; जिथे त्यांचे आई वडील, हो, त्यांचे आईवडील जोश्यांच्या वडीलधार्‍या मंडळींच्या डोक्यावर झाल टेकवत होते. ’झाल’, म्हणजे ‘आता लग्न झालं! आता तुम्ही आमच्या मुलीचा सांभाळ करा ‘, अशी ज्वलंत जबाबदारी मुलाकडच्यांवर सोपवत होते. जोशी वकिलांच्या मुलाच्या लग्नाला आलेली अक्का, नवरी मुलगी आयत्यावेळी नाही म्हणाल्यामुळे जोशी वकिलांची सून झाली होती. मुलगा मांडवातून रिकाम्या हाती परतणं ही त्या काळात प्रचंड नाचक्कीची गोष्ट होती. जोशी वकिलांनी तिथल्या तिथे अक्काच्या वडिलांना विचारलं होतं, नव्हे गळच घातली होती. आणि “नशीब काढलं हो पोरीनं” असं कौतुकाने म्हणत बायाबापड्यांनी अक्काला बोहल्यावर उभं केलं होतं.

अक्का आनंदाने सासरी आली होती. सासरच्यांच्या सुखदुःखात समरस झाली होती. नवरा सतत कामात किंवा त्याच्या पुस्तकांच्यात रमलेला असे. गरजेपुरता जवळ येई. अक्कांना वाटलं लग्नसोहळ्यात झाल्याप्रकाराचा धक्का बसला असेल, हळूहळू बदल होईल; पण पहिला पाळणा हलला; तरी अक्काला आपलं हक्काचं माणूस सापडलंच नाही. अक्का मुळात हुशार होती. तिने नवर्‍याला आपलंसं करायचे खूप प्रयत्न केले. पुढे शिकायची तयारीदेखील दाखवली. पण उपयोग झाला नाही. वार केला कोणीतरीच पण शिक्षा मात्र झाली अक्काला. पुढेपुढे तिची रवानगी मुलांच्या सुट्टीनिमित्त तीन तीन महिने माहेरी होऊ लागली. पण जाब विचारण्याचं, विरोध करण्याचं, आपला हक्क मागण्याचं बळ अक्काला कधी लाभलंच नाही.

…अक्कांचं मन त्यांच्या गतजीवनाच्या आठवणींनी आता विषण्ण झालं होतं. अक्कांच्या डोक्यावर अपर्णाच्या आई वडिलांनी जरी दिव्यांचं सूप टेकवलं नसलं; तरी त्या झगझगत्या झालीची धग आता त्यांना लागत होती. मनूचं अपर्णाशी इतक्या झटपट लग्न ठरवून आपण हे काहीबाहीच करून बसलो का ह्याची आता त्यांना काळजी वाटायला लागली.

अपर्णा आणि मनू अक्काच्या पाया पडायला आले. अक्कांनी ‘नांदा सौख्यभरे’, असा दोघांना तोंडभरून आशीर्वाद दिला. मनू आणि अपर्णाला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, “मनू त्याच्या आजोबांसारखा आहे अपर्णा! पहिल्या वेळी जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, का झालं, कसं झालं हे प्रश्न अनुत्तरित राहतात बरेचदा. आपण आपल्या वाट्याला आलेलं सुख फुलवायचं, वाढवायचं आणि त्यात मोहरून जायचं. जा मनू, सुखाने संसार करा.” अक्कांनी आणखी विषय वाढवायचा नाही असा निर्णय घेतला. उगाच आपला सल, दुःख सांगून कशाला ह्या तरुण मुलांची मनं कलुषित करा! होईल त्यांचं सगळं छान!

मनू, अपर्णाला सिऍटलला परतून आता वर्ष होऊन गेलं. सगळं सुरळीत चालल्यासारखं वाटत होतं. पण जवळ असूनही माणसांची मनं उमजणं कठीण असतं; तर इतक्या लांब असलेल्या मनू, अपर्णाची मनं कशी जाणावी? असे विचार आले की अक्का अस्वस्थ होत. अगदी स्काईप, फोन सुरू असले तरी काही खरं नव्हतं. एक दिवस अक्कांनी विनायकबरोबर विषय काढलाच.

“मी काय म्हणते विनायक, मला ह्यांचं पेन्शन मिळतं ते सगळं शिल्लकच पडतं, तुम्ही मला कसलाच खर्च करू देत नाही. तर मी म्हणते, मनूकडे जाऊन यावं एकदा! मी माझं तिकीट काढीन म्हणते. तेवढीच तुम्हालाही जरा मोकळीक मिळेल. बरं त्याचंही कसं चाललंय तेही बघून येईन…”
“अक्का तू एकटी कशी जाशील? नक्की जाऊ, पण आपण तिघं जाऊ एकत्र एक-दोन वर्षांत आणि तिकिटाची नको काळजी करूस! ” विनायकने प्रतिप्रस्ताव मांडला. प्रतिभाने पण त्याला दुजोरा दिला.

“ते सगळं खरं रे विनायक; पण माझी तब्येत बरी आहे तोपर्यंतच होऊ शकेल, पुढचं कोणी पाहिलंय? आणि माझ्या माहितीतल्या भजनी मंडळातल्या एक दोघीजणी अमेरिकेला जाऊन आल्या आहेत. तितकंसं काही कठीण नाही म्हणतात. ” अक्कांच्या मनात थोडी भीती होती. नाही असं नाही. पण पूर्वी काशीयात्रेला नसत जात लोक? जे होईल ते होईल असा अक्कांनी मनाचा निर्धार केला.
मनूच्या एका मित्राच्या सोबतीने, पासपोर्ट व्हिसाच्या चक्रव्यूहावर मात करत अक्का एकदाच्या सिऍटलला येऊन पोचल्या. इथल्या सगळ्या झगझगाटात जेव्हा मनू, अपर्णाचे चेहरे त्यांना दिसले तेव्हा त्यांना साक्षात लक्ष्मीनारायण दिसल्याचा भास झाला आणि दुसर्‍याच क्षणी आपण इथे उगाच आलो अशी तीव्रतेने जाणीव झाली. आपण ह्या मुलांना काय विचारणार? नवराबायकोचं नातंच असं असतं की त्यात कोणी काही जाणून घेऊ शकत नाही. परत अपर्णा आपल्याचसारखी स्वाभिमानी असली; तर ताकास तूर लागू देणार नाही ती.

“अक्का प्रवासाची दमलीस ना? आता दोन दिवस चांगला आराम कर. मग वीकएंडला स्वस्थ गप्पा मारू. ” मनूचा प्रेमळ आवाज ऐकून अक्कांना रडूच फुटलं.
मनू, अपर्णा अक्कांची हरतर्‍हेने काळजी घेत होते. फिरायला नेत होते; पण अक्कांचं मन कशात रमत नव्हतं. मनू अपर्णाची मनं खर्‍या अर्थाने जुळली आहेत का नाही; ही एकच विवंचना त्यांना सतावत होती. अक्का बारीकसारीक निरीक्षण करत होत्या; पण त्यांना काही थांगपत्ता लागेना. बघता बघता दिवस उडून जात होते. अक्का विमनस्क होत होत्या. “आता चारच आठवडे तर उरले. आपण बहुधा काही न जाणताच परतणार आणि मग आपल्या जिवाला कायम घोर लागणार! ” अशी शंका मनात डोकावून अक्का पुन्हा पुन्हा अस्वस्थ व्हायला लागल्या. एक दिवस अक्कांना संधी सापडली. गावातल्या पुरंदर्‍यांनी अक्का आल्याच्या निमित्ताने अपर्णा मनूला जेवायला बोलावलं. तिथे जमलेल्या बायकांच्या गप्पांमध्ये प्रत्येकीचं लग्न कसं ठरलं त्याचे किस्से सुरू झाले. अक्कांनी पण आपल्या लग्नाचा किस्सा रसभरीत वर्णन करत सांगितला आणि पार्टीत बॉम्ब टाकला. अपर्णाला आश्चर्याचा धक्का बसल्याचं त्यांच्या बारीक नजरेतून सुटलं नाही आणि त्याचा अपेक्षेप्रमाणे उपयोगही झाला. रात्री मनू झोपायला गेल्यावर अपर्णाने विषय काढला, “अक्का तुम्ही पण एकदम बिनधास्त हं, आयत्यावेळी लग्नाला उभ्या राहिलात?”

“झालं खरं तसं” अक्का अंतर्मुख झाल्या. “तेव्हा मी खूप आनंदात होते, मनासारखा नवरा मिळाला म्हणून. पण जे आपल्याला मिळतं ते एक गाठोडं असतं, जे काळानुसार उलगडत जातं. आणि गंमत अशी की आपल्याला त्यात काय हवं, काय नको; असं नाही म्हणता येत. सगळंच आपलं…आपलेच दात, आपलेच ओठ…अक्का अनवधानाने आपली रामकहाणी सांगत गेल्या. दोन जिवाभावाच्या मैत्रिणी उशीरापर्यंत गप्पा मारत बसाव्यात; तशा त्या दोघी स्वयंपाकघरातल्या टेबलापाशी हलक्या आवाजात बोलताना दिसत होत्या. जवळीक साधल्यामुळे अक्कांनादेखील अपर्णाला तिच्याबद्दल विचारण्याचं आता धाडस करता आलं. काही खाजगी वगैरे बोलायची अक्कांना सवय नव्हती आणि तशी काही वेळ आलीच तर त्यांचा आवाज एकदम मोठ्ठा आणि रडवेला होऊन जायचा.
“मी काय म्हणत होते अपर्णा, तुला मनू नीट वागवतो ना? नाही म्हणजे माणसाला नुसतं अन्न वस्त्र निवारा देऊन भागत नाही. तुमचं आपापसांत कसं चालू आहे?”
अपर्णा दोन मिनिटं घोटाळली…

“अक्का खरं सांगू? पहिले सहा महिने मनू खूप अलिप्त अलिप्त वाटला. जणू तो मला मनाली पळून गेल्याबद्दल दोषी धरत होता. मग एक दिवस धीर करून मी विचारलं…” अपर्णाचा गळा दाटला, आवंढा गिळून ती म्हणाली, “आणि सांगितलं की असं राहायचं असेल तर मला परत जाऊदे, आपण वेगळे होऊ, मला तुझ्याकडून काही नको; पण असा अलिप्तपणा म्हणजे संसार नव्हे. मी हे देखील सांगितलं की आपण मनाने जवळ आल्याखेरीज आपल्याला मुलं नकोत असा माझा निर्णय आहे.”
अक्का ’आ’ वासून अपर्णाकडे बघतच राहिल्या.
अपर्णा सावरून पुढे बोलत होती, “मग हळूहळू त्याच्यात बदल व्हायला लागला अक्का, हळूहळू तो मोकळा व्हायला लागला. आता सगळं ठीक आहे, आता कसली काळजी नाही. तुम्हांला म्हणून सांगते”, अपर्णाने आपसूकपणे तिच्या ओटीपोटावर हात धरला, “अजून मनूलाही बोलले नाहीये हे, पण आता ह्या येणार्‍या बाळाच्या स्वागतासाठी मी तयार आहे. ” अपर्णा येणार्‍या भविष्यालाच जणू वचन देत होती.

अक्कांचा त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. एकदम हायसं हायसं झालं त्यांना. आपली नातसून इतकी समंजस आणि धीराची असल्याचं बघून त्यांना खूप समाधान वाटलं. आपण नाही तर नाही; पण हिने मात्र जिंकलीन् आयुष्याची लढाई, ह्याचा त्यांना खूप अभिमान वाटला. आपण जे सगळं सोसलं ते फुकट नाही गेलं, त्याचा मनूला फायदा झाला आहे आणि ते आपल्याला ’याची देही याची डोळा” बघायला मिळालं हे काय कमी आहे! त्यांनी अपर्णाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, “उगाच काळजीत पडले होते मी. आता सुखाने मरेन.”
अक्कांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले… आणि मनूचं लग्न झाल्यापासून त्यांच्या डोक्यावरची अदृश्य धगधगती झाल शमवून गेले…

3 Comments

  1. Can I just say what a comfort to find somebody who truly understands what theyre talking about on the net. You certainly understand how to bring a problem to light and make it important. A lot more people really need to look at this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely possess the gift.

  2. छान लिहिलीय कथा, प्लॅशबॅकचा सुंदर आणि उचित वापर.
    लग्न या गोड विषयासंबंधी लिहिताना असा अस्वस्थ करणारा
    अनुभव वाचायला मिळेल असं वाटत नव्हतं.
    पण कथा रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published.